राम माधव यांचे व्याख्यान;
खामगांवकरांनो वैचारीक सोने लुटा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा उत्सवांपैकी विजयादशमी उत्सवास विशेष महत्व आहे. संघ हा उत्सव देशभर साजरा करत असतो. देशात अनेक ठिकाणी या अनुषंगाने देशहित, देशाच्या समस्या, देशकार्य याबाबत लाखो वक्त्यांची बौद्धिके होत असतात. सरसंघचालकांच्या बौद्धिकाकडे तर जनता, माध्यमे व संपूर्ण जगाचे लक्ष केन्द्रित झालेले असते. यंदा विजयादशमी उत्सवाच्या अनुषंगाने आपल्या खामगांव नगरीत 8 ऑक्टोबर रोजी नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर राम माधवजी प्रमुख वक्ते म्हणून येणार असल्याचे वृत्त काही दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रात झळकले होते.
राम माधवजी म्हणजे एक वैचारिक क्षेत्रातील मोठे मानले जाणारे नांव. बालपणीच संघ संस्कार रुजलेले, अनेक वर्षे पत्रकारितेत घालवलेले असे ते नेते आहेत. "भारतीय प्रज्ञा" या मासिकाचे ते संपादक आहे, त्यांनी अनेक पुस्तकांचे इंग्रजी व तेलगु भाषेत लेखन सुद्धा केले आहे."पार्टिशंड फ्रिडम, "अनइजी नेबर्स इंडिया अँँड चायना आफ्टर 50 इअर्स ऑफ वॉर " सारखी त्यांची ग्रंथसंपदा आहे. 2003 ते 2014 या काळात ते संघाचे प्रवक्ते होते तदनंतर भाजपा सरचिटणीस व आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीत ते आहे. भाजपा सरचिटणीस पदाच्या कार्यकाळात (2014 ते 2020) त्यांनी काश्मीर मध्ये राजकीय स्थिती हाताळली तर उत्तर पुर्व भारतात पक्ष विस्तार केला. 1981 पासून ते संघाचे पुर्णवेळ स्वयंसेवक आहे. 370 कलम हटविण्यापुर्वी ते काश्मीरला प्रभारी होते. "इंडीया फाऊंडेशन" म्हणून नवी दिल्ली येथे असणा-या राजकारण, देश विकास आदी बाबत कार्य करणा-या "थिंक टँक" म्हणून ओळखल्या जाणा-या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहे. तसेच "व्हिजन इंडीया फाऊंडेशन" या युवकांमधून सामाजीक क्षेत्रात नवीन नेतृत्व निर्माण करणा-या संस्थेचे ते पालक म्हणून काम पाहतात, भारताच्या विदेश नीती मध्ये सुद्धा त्यांची भूमिका असते. कॅॅनडा , चीन , थायलंड व इतर अनेक देशांत ते विविध शांतीपूर्ण चर्चांसाठी गेलेले आहे. राम माधवजी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1964 रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदविका व राजशास्त्राची पदव्युत्तर पदवी असे त्यांचे शिक्षण झाले आहे.
राम माधवजी यांचा असा मोठा परीचय आहे. आपल्या खामगांव नगरीचे भाग्य असे की स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इथे अनेक मोठ-मोठे नेते व अमोघ वक्तृत्व शैली असलेले वक्ते येऊन गेले आहेत. खामगांवकर जनतेने नेहमीच अशा वक्त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद , प्रतिसाद दिला आहे व त्यांच्या अमुल्य विचारांचा ठेवा जतन केला आहे. टिळक स्मारक मंदिर , विदर्भ साहित्य संघ यांसारख्या खामगांवातील अनेक संस्थांनी अनेक वक्त्यांना आमंत्रित केलेले आहे. येथील नामांकित महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनात सुद्धा अनेक नामांकित वक्ते येऊन गेले आहेत. असेच आता राम माधवजी सुद्धा आता येत आहे. राम माधव हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले असून त्यांनी आपली पत्रकारीता व लिखाण तसेच आपल्या वैचारीक भूमिकेने सर्वदूर आपली छाप पाडली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची खामगांव येथील नॅॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायं 6 वा 15 मि. सभा संपन्न होणार आहे. राम माधव हे जेष्ठ व विविध ठिकाणी कार्य केलेले असल्याने त्यांचा व्यापक दृष्टीकोन आहे त्यांचे विचार ऐकणे म्हणजे एक पर्वणीच ठरेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी श्रवण, मनन, निधीध्यासन जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे लौकिक जगात , प्रपंचात सुद्धा श्रवणाला महत्व आहेच. त्यामुळे खामगांवकर जनता व विशेष करून युवक वर्गाने ही संधी सोडू नये व त्यांचे व्याख्यान जरूर ऐकावे. तसेच या निमित्ताने एक स्मरण होते एकदा खामगांव येथे बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानासाठी आले असता उपस्थित श्रोत्यांना उद्देशून म्हणाले होते की , " थोर पुरुषांचा इतिहास ऐकण्यासाठी आलेली ही खामगांवकर जनता म्हणजे खामगांव शहराचे भूषणच आहे" अशी त्यांनी खामगांवकर जनतेची स्तुती केली होती. राम माधव यांच्या सारख्या नामांकित, प्रभावी वक्त्याच्या सभेला सुद्धा सुज्ञ खामगांवकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे व यंदाच्या विजयादशमीचे वैचारीक सोने लुटावे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या खामगांवकर जनतेची तारीफ केली होती ते खामगांवकर नागरीक व युवा राम माधव यांच्या विचारांचे सोने लुटायला नक्की येतील अशी खात्री आहे. सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
✍️विनय वि.वरणगांवकर ©
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा