... मुझसा कोई कहाँ ?
आशा पारेख तेंव्हा आणि आता |
...हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या परंतु आशा पारेख या अभिनेत्री बाबत असे म्हणता येईल की कोणत्याही नटासोबत त्यांची जोडी जमून दिसत असे...
सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि परवा त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळतात सर्वप्रथम त्यांच्याच गाण्याची ओळ आठवली. जिद्दी चित्रपटात आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे "रात का समा झुमे चंद्रमा" या गाण्यांमध्ये अभिनेता नायक जॉय मुखर्जीला उद्देशूूून आशा पारेख म्हणतात "तेरी तरह जा रे जा बहुत देखे मुझसा कोई कहाँ". तशा तर त्या काळात अनेक सुंदर व अभिनय संपन्न अशा अभिनेत्री होत्या परंतू आशा पारेख यांच्यात काहीतरी वेगळेपण निश्चितच होते व म्हणूनच त्यांना त्यांच्याच गाण्यातील मुझसा कोई कहा ही ओळ लागू पडते. खरे तर आशा पारेख यांंनी अभिनेत्री म्हणून 60 च्या दशकात रुपेरी दुनियेत पदार्पण केले, म्हणजे आमच्या पिढीच्या कित्येक वर्षे आधीच्या त्या अभिनेेत्री. पण 30/35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर जुने चित्रपट मोठ्या प्रमाणावर दाखवत असत, तसेेेच टॉकीजमध्ये सुद्धा पुन: प्रदर्शीत होत असत. शिवाय गणेश उत्सव असला की गल्लोगल्ली व्ही. सी. आर. (व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डडर) आणून सिनेमा दाखवण्याचा कार्यक्रम होत असे त्यामुळे अनेक जुन्या कलाकारांची ओळख झाली त्यातीलच एक आशा पारेख. ही ओळख झाली ती एन.सी.सी.च्या कॅम्पमध्ये. त्या काळात एन.सी.सी.च्या कॅम्प मध्ये कॅडेट्सला मनोरंजन व्हावे म्हणून सिनेमा दाखवत असत. आम्ही जेव्हा कॅम्पला गेलो होतो तेव्हा आया सावन झुमके हा सुमधुर गीतांचा, ही मॅन हिरो धर्मेंद्र सोबतचा आशा पारेख यांचा चित्रपट दाखवला होता. हा सिनेमा व त्यासोबतच आशा पारेख सुद्धा लक्षात राहून गेल्या. पुढे असेच जब प्यार किसी से होता है, आये दिन बहार के, तिसरी मंजिल, आन मिलो सजना, कटी पतंग, दो बदन, कन्यादान (त्यावेळी मिटकरी असते तर त्यांनी कन्यादान या चित्रपटावर आक्षेप घेतला असता, असो !) आशा पारेख यांचे असे अनेक चित्रपट पाहण्यात आले. धर्मेंद्र सोबतचा शिकार हा सुद्धा एक लक्षात राहिलेला चित्रपट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या परंतु आशा पारेख या अभिनेत्री बाबत असे म्हणता येईल की कोणत्याही नटासोबत त्यांची जोडी जमून दिसत असे. आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेली गीते सुद्धा खूप लोकप्रिय झालेली आहेत. जब चली थंडी हवा जब उठी काली घटा मुझको ये जाने वफा तुम याद आये, अच्छा तो हम चलते है, ओ हसीना जुल्फोवाली, कितना प्यारा वादा, आजा पिया तोहे प्यार दु, जिया हो जिया कुछ बोल दो, महल चित्रपटातील देवानंद सोबतचे आंखो आंखोमे हम तुम हो गये दिवाने अशी अशी कितीतरी हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत जी आजही ऐकली जातात. 80 च्या दशका नंतर आशा पारेख या चित्रपटातून दिसणे बंद झाले. कालिया चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चनच्या वहिनीची भूमिका केली होती आणि त्यानंतर त्या बॉलीवूड पासून दुरावल्या. अनेक अभिनेत्यांना जशी चरित्र भूमिका करण्याची संधी मिळते तशा दमदार भूमिका आशा पारेख यांना मात्र मिळाल्या नाहीत आणि त्या बॉलीवूड पासून दूर झाल्या. 90 च्या दशकात त्यांनी काही मालिकांची निर्मिती केली होती. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले गेले आहे व फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. दमदार अभिनयाच्या भूमिका आशा पारेख यांना काही फार मिळाल्या नाही. त्यांचे सिनेमे म्हणजे नटीला शोभेची बाहुली सारख्या भूमिका असलेले होते पण तरीही कटी पतंग, मेरे सनम, दो बदन, मै तुलसी तेरे आंगन की, सारख्या चित्रपटातून आशा पारेख यांचा सुंदर अभिनय रसिकांना पाहायला मिळाला आहे. त्यांच्या बद्दल आणखी एक उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की त्यांचे कुणाशी अफेअर असल्याचे कधीही ऐकिवात, वाचनात आले नाही किंवा ताशा वावड्याही कधी उठल्या नाही.अविवाहित आशा पारेख या जरी आता चित्रपटातून दिसत नसल्या तरी त्या अनेक चित्रपट रसिकांच्या स्मृतीत मात्र आहे व कायम राहतील. आशा पारेख यांची अभिनय क्षेत्र , सेन्सॉर बोर्ड, दूरदर्शन आदीतील कामगिरी पाहून केंद्र सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांंना शुभेच्छा व त्या सिने पडद्यावर पुनश्च दिसोत हि "आशा"
✍️विनय वि.वरणगांवकर ©
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा