प्राकृतिक गुण घाताचे कारण
चंदन वृक्षाला सुद्धा या जगतनियंत्याने सुवासाचा गुण प्रदान केला आहे. मात्र सुवासाचा हा गुणच त्या वृक्षाचा घात करतो. चंदन तस्कर विरप्पन याने तर पुर्वी खुप मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षांची तस्करी केली होती. चंदन वृक्ष अनेक शहरात असतात , त्यांच्या चो-यांचे प्रमाण वाढतच चालले आहे.
ईश्वराने रचलेल्या या सृष्टीत “अफाट जगती जीव रज:कण” या उक्तीनुसार अब्जावधी , नानाविध जीव वास करतात. भूतलावार निराळे, जलधीत निराळे व या आसमंतात उडणारे शेकडो पक्षी, शिवाय ज्यांची मोजदाद करणे सुद्धा अशक्य आहे असे कृमी किटक, नानाविध वृक्षवल्ली यांशिवाय धरणी मातेच्या पोटातून, सागरतळातून प्राप्त होणारी खनीज संपत्ती आहेच. यापैकी अनेक जीवांवर, वस्तूंवर काही गुण वैशिष्ट्यांचे प्रदान, सौंदर्य यांची भरपूर उधळण ईश्वराने केली आहे. ज्याचे पिस भगवंताने आपल्या मुकुटात धारण केले आहे तो मयूर, फुलांमध्ये ज्या फुलाचा धन संपत्तीच्या देवीने, लक्ष्मीने आसन म्हणून केला आहे ते कमलपुष्प , हंसवाहिनी सरस्वतीचा हंस, मृग, वाघ, सिंह इ कितीतरी अशी नांवे घेता येतील. वृक्षांमध्ये चंदन वृक्ष. अशी ही काही नांवे आहेत की ज्यांच्या अंगभूत सौंदर्यामुळेच त्यांचा घात होतो. असे एक सुभाषित / श्लोक सुद्धा आहे परंतू त्याचे स्मरण तूर्तास काही झाले नाही. मोरपिसांसाठी सौंदर्यवान मोराची शिकार होते, कमळ पुष्पे सर्रास खुडली जातात , मृग , वाघ , सिह यांची त्यांच्या कातड्यासाठी व त्यांच्या अवयावांसाठी मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे व आजही लपून छपून होतेच.
हे सर्व विषय, हा ऊहापोह आज ध्यानात येण्याचे कारण असे की, काल खामगांव शहरातील नामांकित नॅशनल हायस्कूल मधील चंदनाचे झाड काल चोरीला गेल्याचे वृत्त. काल रात्री भर वस्तीत असणा-या नॅशनल हायस्कूल मधील हे मोठे चंदनाचे झाड चोरीला गेले. त्याआधी पंचशील होमिओपॅथी कॉलेज व घाटपुरी पाण्याची टाकी परिसर येथील चंदन वृक्ष कापून नेले गेले. काही महिन्यांपूर्वी स्टेट बँकेतील भलेमोठा चंदन वृक्ष व तत्पुर्वी गजानन वायचाळ यांच्या सुटाळा येथील निवासस्थानासमोरील चंदन वृक्ष स्थानिक छोट्या विरप्पन मंडळीने चोरून नेला होता. बुलढाणा शहरात सुद्धा अनेक चंदन वृक्ष आहेत व त्यातील अनेक वृक्ष सुद्धा चोरीला गेले आहेत. कहर म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक परीसरातील चंदन वृक्ष मागे चोरट्यांनी कापून नेला होता. चंदन वृक्षाला सुद्धा या जगतनियंत्याने सुवासाचा गुण प्रदान केला आहे. मात्र सुवासाचा हा गुणच त्या वृक्षाचा घात करतो. चंदन तस्कर विरप्पन याने तर पुर्वी खुप मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षांची तस्करी केली होती. चंदन वृक्ष अनेक शहरात असतात , त्यांच्या चो-यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. चंदन वृक्षाच्या खोडातील गाभा हा सुवासिक असतो व त्याचा उपयोग सुद्धा अनेक वर्षांपासून केला जातो. परंतू प्राचीन काळी आपल्या पुर्वजांना निसर्ग , वृक्षांप्रती नितांत आदर होता, ते प्राणी, पक्षी, वृक्ष यांना पूजत त्यांचा मान राखत. वृक्ष खुप जुना झाला , त्याचे वय झाले की मगच तो तोडत असत. आज मात्र तसे नाही मानव या निसर्गाला ओरबाडू लागला आहे. स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी, निसर्ग धन लुटू लागला आहे. मानवाच्या या अशा वर्तणूकीमुळे पर्यावरणाचा -हास होतो आहे. प्रदूषण , ऋतूचक्रात बदल होत आहे. या अशा जंगलचोर , वृक्ष तस्कर, प्राणी तस्कर , चंदन चोर यांना पायबंद हा बसलाच पाहिजे. अनेकदा चंदन वृक्षांची चोरी झाली अशी वृत्ते येतात परंतू चंदन चोर पकडल्या गेल्याची वृत्ते वृत्त मात्र कमीच येतात हे ही तितकेच कटूसत्य आहे.
वरील पशू, पक्षी, वृक्ष यांचा त्यांच्या अंगभूत गुणांमुळे घात होत असला तरी हा घात करणारे जे तस्कर आहेत त्यांचा छडा मात्र लागायलाच हवा, त्यासाठी चंदना सारखे झिजावे लागले तरी बेहत्तर परंतू हे तस्कर , चोरटे यांना पकडून त्यांना कठोर शासन हे व्हायलाच हवे. ज्या नागरिकांच्या घरी चंदन वृक्ष आहे त्यांनी त्या वृक्षाला चांगल्या जाड ताराचे ट्री गार्ड लावावे जेणे करून चोरट्यांचा वेळ हा ट्री गार्ड कापण्यात जाईल त्याने आवाजही होईल व झाड वाचण्याची शक्यता बळावेल. तसेच चंदन वृक्ष आपल्या बागेत असल्याची रीतसर नोंद सुद्धा वन विभाग व पोलीस खात्यात करण्यास हरकत नाही. अशा काही उपाययोजना करता येऊ शकते. आपल्यासाठी हा निसर्ग सुद्धा आवश्यकच आहे त्याचे संरक्षण, संवर्धन हे व्हायलाच हवे व आपण सर्वानी जागरूक राहायला हवे तेंव्हा या सृष्टीतील या गुणसंपन्न जीवांचा -हास होणार नाही.