Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०७/२०२३

Article on the occasion of Mohd Rafi Death Anniversary

नांवाप्रमाणेच सर्वोच्चस्थानी असलेला रफी व त्याची भजने.....

(31 जुलै मो. रफी पुण्यतिथीच्या निमित्ताने)


"मन तडपत हरिदर्शन को" या भजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गीतकार शकील बदायुनीसंगीतकार नौशाद आणि गायक मो. रफी म्हणजे तिघेही मुस्लिम परंतू ईश्वरापुढे दर्शनाची मागणी करणा-या ओळी शकिल बदायुनीने अत्यंत सुंदर रचल्या तितकीच सुंदर चाल नौशादनी दिली आणि तितक्याच हरी दर्शनाच्या व्याकुळतेनेआर्ततेने मो. रफीने त्या ओळी गाऊन हे भजन अजरामर केले आहे.गायक मो. रफी नंतर दुसरा कोणी रफी नांवाचा व्यक्ती मला तरी दिसला नाही, रफीक अनेक आहेत परंतू रफी नाही.

    संगीतामध्ये जादू असते आणि या जादूच्या काही कथा सुद्धा सांगितल्या जातात. एखाद्या सुरसम्राटाने दिप राग आळवला असता दिवे प्रज्वलित होतात तर राग मल्हार आळवल्याने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मानवावर व प्राण्यांवर सुद्धा मंजूळ सुमधुर, संथ अशा शास्त्रीय संगीतस्वरांचा मोठा परीणाम होत असतो. म्युझिक थेरपी म्हणून एक प्रकार सुद्धा आहे. माझ्या वडीलांना पूर्वीपासूनच जुन्या चित्रपटात गीतांची आवड असल्याने कित्येकदा त्यांना मी जुनी हिंदी चित्रपट गीते ऐकवत असतो. त्यांचा मुड फ्रेश होतो मग ते काही जुन्या आठवणी सांगू लागतात. त्यादिवशी अशीच जुनी गाणी लावली होती. थोड्या वेळानंतर मोहम्मद रफीने गायलेले "मन तडपत हरिदर्शन को आज" हे गीत वाजू लागले "वा वा वा" वडीलांनी उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया दिली. माझ्या वडीलांना हे भजन खूप आवडते हे फिल्मी भजन मी सुद्धा बरेच वेळा ऐकले आहे. या भजनाच्या अनुषंगाने मग आठवण झाली ती स्वरांचा जादूगार व गायनाच्या क्षेत्रातला अनभिषिक्त सम्राट व तितकाच विनम्र स्वभावी मोहम्मद रफीची. 31 जुलै म्हणजे आपल्या आवाजानेे सर्वांना भुरळ पाडणा-या मधाळसुमधूर आवाजाच्या व गायनाला भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्कम आधार असणा-या मो. रफीची पुण्यतिथी. 

    मो. रफीने 1944 ते 1980 या काळात हिन्दी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन केले. अनेक अभिनेत्यांना आवाज दिला. एखादा अभिनेता पडद्यावर जेंव्हा रफीच्या आवाजात गातांना दर्शक पाहत असत तेंव्हा ते गीत पाहतांना व ऐकतांना तो अभिनेताच ते गीत गात आहे की काय असे वाटत असे. उदाहरणच द्यायचे झाले तर राजेन्द्र्कुमारसाठी रफीने अनेक गीते गायली व तशीच शम्मी कपूरसाठी सुद्धा, परंतू दोघांची गीते ऐकतांना रफीने त्या अभिनेत्याचा आवाजत्याच्या लकबीगीत गातांनाचा अभिनय करतांना तो अभिनेता कसे हावभाव करेल याचा अभ्यास करून ते गीत गायले असल्याचे जाणवते. रफीने विविध भाषांत सुमारे 25000 गीते गायली आहेत. 1944 पासून दिलीपराजदेव यांच्याही आधीच्या नायकांपासून ते मिथून चक्रवर्ती पर्यन्तच्या नायकांसाठी रफीने पार्श्वगायन केले आहे. रफीने हजारो गीते गायली असल्याने त्यांच्याबाबत लिहिणे म्हणजे एक दीर्घ लेख होईल म्हणून त्याने गायलेल्या काही निवडक भजनांचा आढावा इथे घेतला आहे. रफीने अनेक हिंदी व काही मराठी भजने सुद्धा उत्कटतेने गायली आहेत.

    त्यातले पहिले भजन म्हणजे "मन तडपत हरिदर्शन को".  त्या दिवशी “मन तडपत हरि दर्शन को आज" हे भजन ऐकले तसे ते अनेकदा ऐकले आहे. या भजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गीतकार शकील बदायुनीसंगीतकार नौशाद आणि गायक मो. रफी म्हणजे तिघेही मुस्लिम होते परंतू “बिन गुरु ज्ञान कंहासे पाऊ”, “तुमरे व्दार का मै हूं जोगी” , “मुरली मनोहर आस ना छोडो”, "सून मोरे व्याकुल मन" अशा ईश्वरापुढे मागणी करणा-या ओळी शकिल बदायुनीने सुंदर रचून पाया घातला, त्या ओळींना तितकीच सुंदर चाल देऊन नौशादनी मंदिर उभारले आणि तितक्याच हरि दर्शनाच्या व्याकुळतेनेआर्ततेने मो रफीने त्या ओळी गाऊन त्यावर कळस चढवून हे भजन अजरामर केले आहे. ईश्वरप्राप्तीसाठी सर्वात प्रथम आवश्यकता असते ती व्याकुळतेची आणि हे भजन गातांना रफी तसाच व्याकूळ झाल्यासारखा वाटतो.    
    दुसरे भजन म्हणजे 70 च्या दशकात आलेल्या गोपी सिनेमातील सुखके सब साथी दुख मे ना कोई”. या गीताचे गीतकार राजेंद्र कृष्णसंगीतकार कल्याणजी-आनंदजी. “राजा हो या रंक सभीका अंत एकसा होई”, “मन की मैल न धोईराजेंद्रकृष्ण यांच्या जीवनाचे वास्तव प्रकट करणा-या या ओळी रफीने अशा गायल्या आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध तर होतोच शिवाय आत्मचिंतन करण्यास भाग पडतो.  
    "बडी देर भयी नंदलाला तेरी राह तके ब्रिजबाला" रफीचे हे तिसरे जलद गतीचे भजन ऐकणा-यास तल्लीन होण्यास भाग पाडते.
 "परीत्राणाय साधू नामविनाशायच दुष्कृतामधर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे" 
या भगवंतांनी सांगितलेल्या श्लोकाचा आधार घेऊन संगीतकार रविने दिलेल्या चालीवरच्या राजेंद्र कृष्णाच्या ओळींमधून  
"संकट मे है आज वो धरती जिसपर तुने जनम लिया 
पुरा करदे आज वचन गीतामे जो तुने दिया
कोई नही है तुझ बिन मोहन भारत का रखवाला रे" 
केशवाने पुन्हा या भारताच्या रक्षणास यावे अशी आर्त हाक रफीने मुरलीधरास घातली आहे.  आजच्या स्थितीला सुद्धा या ओळी लागू पडतात.  
    
    "जय रघुनंदन जय सियाराम" हे रफीने आशा भोसले यांच्यासह गायलेल्या अवीट गोडीचे चौथे भजन तर कालातीत आहे. ज्या रामाला समस्त भारतीयांनी आदर्शस्थानी  मानले आहे त्या रामाबद्दल रहीमचा बंदा रफी इतका सुंदर व भक्तिरसाने ओतप्रत असा गायला आहे की आजही हे भजन मोठ्याप्रमाणात भक्तीभावाने ऐकले जाते. रफीने उत्कटतेने रामाची इतकी सुंदर आराधना व त्याची आळवण केली आहे की हे भजन ऐकतांना श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते व रघुनंदन रामाची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते. घराना चित्रपटातील पुनश्च शकील बदायुनी यांनीच लिहिलेले हे भजन आहे.  रविने संगीतबद्ध केलेल्या या गीताचा गोडवा आजही  कमी झालेला नाही हा रफीच्याच आवाजाचा करीश्मा आहे.
    सरते शेेेवटी "प्रभू तू दयाळू" या रफीच्या मराठी भक्तीगीताचा उल्लेख न करुन कसे चालेल ? उमाकांत काणेकर यांनी रचलेले व श्रीकांत ठाकरे (राज ठाकरे यांचे पिता)  यांनी संगीतबद्ध केलेले हे मराठी भक्तीगीत रफीने मराठीतून लिलया गायले आहे. दया मागतांना रफीचा आवाज खरोखर एखाद्या देवापुढे याचना करणा-या याचकाप्रमाणे भासतो.  

    मुस्लिम असलेल्या रफीने देवी देवतांची "रामजी की निकली सवारी", " सबसे बडा तेरा नाम ओ शेरोवाली" , "वृंदावन का कृष्ण कन्हैय्या" यांसारखी अनेक गाणी व भजने उत्कटतेने, आर्ततेने, भावपुर्णतेने, तन्मयतेने गायली आहेत. कुणी म्हणेल तो त्याचा व्यवसाय होता त्याला त्याचे मानधन मिळाले. परंतू जरी व्यवसाय असला, पैसे मिळत असले तरी रफीच्या भजन गायनातून जो भाव श्रोत्यांना जाणवतो त्यावरून त्याची गायनाप्रतीची निष्ठा दिसते, ईश्वर भावाचा भुकेला असतो व रफीच्या भजनात तो आलेला आहे. 
    उपरोक्त भजनांचे स्मरण रफीच्या पुण्यतिथी निमित्ताने आज झाले. रफी हे नांव मुस्लिम समाजात क्वचितच दिसते गायक मो.रफी नंतर दुसरा कुणी रफी नांवाचा व्यक्ती मला तरी दिसला नाही. रफीक खूप आहे पण रफी नाही. रफी या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ "सर्वोच्चस्थानी पोहचलेला" असा होतो आणि खरोखर रफी त्याच्या गायनाने, गाण्यांच्या संख्येने व नम्र स्वभावाने गायन क्षेत्रात व सिनेसृष्टीत सर्वोच्चस्थानी जाऊन पोहचला व आजही त्याचे स्थान अबाधित आहे. 

२०/०७/२०२३

Aarticle about changing the name of opposition alliance UPA to India

 भारतीयत्वाचा अभाव असलेली "इंडिया"



आघाडीचे नांव नामकरण India असे केले. त्यांच्या या आघाडीच्या नांवाचे पुर्ण रूप Indian National Developmental Inclusive Alliance असे आहे. National Development असे शब्द आघाडीच्या नांवात वापरणा-यांनी  सत्तेत असतांना स्वत:ची व परीवाराची तेवढी Development केली आहे. जनता हे सारे ओळखून आहे.

इंडिया म्हणजे भारत अशी ओळख  जगभर आहे. खरेतर आपल्या देशाला महाभारतील कौरव -पांडवांचे पुर्वज असलेल्या राजा भरत या पराक्रमी राजाच्या नावावरून भारत असे नांव पाडले असे लहानपणी वाचलेल्या गोष्टींच्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते. (आता असे काही सांगितले / लिहिले की काही आधुनिक काळातील असूनही आजही प्रत्येक गोष्टीला जातीच्या चष्मातून पाहणा-या अनेकांना पुराणातील गोष्टी म्हणजे फेका-फेकी , भाकडकथा वाटते. असो ! त्यांना तसे वाटते म्हणून त्या पौराणिक कथांचा संदर्भ न घेणे , न लिहिणे हे सुद्धा योग्य नाही. अशा लोकां आपलेच म्हणणे तेवढे खरे असे वाटत असते.) तऱ राजा भरत याच्या नांवावरून पडलेले भारत हे नांव पुर्वी भारतवर्ष असे होते. जेंव्हा आपल्या या भारतावर विदेशी आक्रमकांनी अनेक आक्रमणे केली तेंव्हा सिंधु नदी व नदीच्या खो-या वरुन  Indus , Indus Vally  असे  शब्द रूढ झाले. या Indus वरूनच India असे नांव पडले जे आता भारत देशाला इंग्रजीत इंडिया असे म्हणण्यासाठी वापरतात. तसेच हिंदु या शब्दावरून भारताला हिंदुस्तान हे सुद्धा एक नांव पडले आहे. मध्यंतरी कुणीतरी आपल्या देशाला इंडिया न म्हणता भारत असेच म्हटले गेले पाहिजे अशी मागणी करणारी एक याचिका सुद्धा दाखल केली होती परंतू संविधानात India म्हणून सुद्धा भारताला ओळखले जाते असे लिहिले असल्याने ती याचिका खारीज झाली. हा झाला आपल्या देशाच्या नांवाचा ऊहापोह आता विरोधकांनी त्यांच्या आघाडीला दिलेल्या इंडिया या  नांवाविषयी पाहू. 

काल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एक सभा घेऊन UPA या त्यांच्या आघाडीचे नामकरण India असे केले. त्यांच्या या आघाडीच्या नांवाचे पुर्ण रूप Indian National Developmental Inclusive Alliance असे आहे. हे नांव ज्या बैठकीत घोषित करण्यात आले त्या बैठकीतच विरोधकांमध्ये संवाद नसल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांच्या UPA असे नांव असलेल्या आघाडीचे इंडिया हे नामकरण कोणी केले याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरू झाले. इंडिया हे नांव ममता बॅनर्जी यांनी केले असे म्हटले जाते तर बैठकीत राहुल गांधी यांनी या नावाची घोषणा केल्याचे व हे नांव काँग्रेस पक्षाने दिले याचीही चर्चा झाली. आघाडीतील माकप व तृणमूल हे पक्ष बंगालमध्ये एकत्रित निवडणूका लढणार नसून तीच परिस्थिती आप व काँग्रेसची पंजाब व दिल्ली या राज्यात आहे. विरोधक केंद्रात सत्ताप्राप्तीसाठी जरी एकत्र आले असले तरी राज्यात मात्र वेगवेगळे त्यामुळे आगामी काळात त्यांच्यात सुसंवाद होतो की विसंवाद हे दिसेलच. विरोधकांच्या या बैठकीत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताही नसलेल्या पक्षातील नेत्यांचे महत्व हे राष्ट्रीय पक्षातील नेत्यांपेक्षाही जास्त असल्याचे दिसले. NDA ला टक्कर देण्यासाठी व भारत देश, भारताप्रतीची निष्ठा प्रतीत व्हावी असे दाखवण्यासाठी आघाडीला इंडिया असे नांव जरी दिले असले तरी याच आघाडीत काही नेते असेही आहेत की ज्यांनी आपल्याच इंडियाची म्हणजे भारताची विदेशात जाऊन बदनामी केली आहे. या आघाडीच्या नांवात जरी  National Development असे शब्द असले तरी पुर्वी जेंव्हा या आघाडीतील लोक सत्तेत होते तेंव्हा यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, काहींवर तर खटले सुद्धा दाखल आहेत, National Development असे शब्द आघाडीच्या नांवात वापरणा-या लोकांनी सत्तेत असतांना स्वत:ची व परीवाराची तेवढी Development मात्र केली आहे. जनता हे सारे ओळखून आहे. विरोधकांना नांव बदलवून काही परीणाम होईल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. भारतीय जनतेला आता विकास हवा आहे. शिवाय केवळ नांव बदलवून काहीही साध्य होत नाही. कोणत्याही संघटनेचे, पक्षाचे नांव काहीही असू देत त्या संस्थेला , संघटनेला , पक्षाला त्यात काम करणा-या व्यक्तींच्या कार्यामुळे नावलौकीक प्राप्त होत असतो.  धोरणे, कल्पना, जाहीरनामा त्यात दिलेली वचने, त्यांचे पालन, शिवाय घोटाळे व भ्रष्टाचारास थारा न देणे या सा-या गोष्टींचा विचार व देशविकासासाठी योग्य ती पाऊले जर विरोधकांकडून उचलली जातील अशी जनतेला खात्री पटायला हवी. परंतू या आघाडीस योग्य नेतृत्वच नसल्याने शिवाय विरोधकांपैकी अनेक नेत्यांमध्ये जनतेला अस्सल भारतीयत्व दिसतच नाही, विदेशात भाषणे देतांना, शत्रूराष्ट्रासंबंधी भाष्य करतांना अनेक विरोधी नेते भारत विरोधीच सुरू आवळतांना जनतेने पाहिले आहे. आपल्या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांत असलेल्या मातृभूमीप्रती प्रेम, निष्ठा, भ्रष्टाचाराची चीड, राष्ट्र प्रथम मानणे, राष्ट्राला काही अर्पण करणे असे गुणसमुच्चय म्हणजेच भारतीयत्व असते व नेमक्या याच भारतीयत्वाचा अभाव नांव इंडिया असलेल्या या आघाडीत आहे. आता जनता या आघाडीला काय कौल देते हे लवकरच दिसेल.  

१६/०७/२०२३

TriBute to Ravindra Mahajani

 खेळ कुणाला दैवाचा कळला

उंचापुरा, देखणा असा रविंद्र महाजनी नजरेत भरला होता, तो मला आवडत असल्याने एक दिवस मी त्याला Friend Request पाठवली होती. त्याने ती स्विकारली सुद्धा होती आणि मग आम्ही खुप वेळा बोललो पण होतो. 

 काल वृत्तवाहिन्यांवर रवींद्र महाजनी या गतकाळातील हँडसम अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आली आणि समस्त जनतेला शोक झाला.  नुकत्याच झळकलेल्या पानिपत चित्रपटात रवींद्र महाजनीने मल्हारराव होळकरांची भूमिका वठवली होती. रवींद्र महाजनीच्या निधनानंतर अनेक जणांनी दुःखद प्रतिक्रिया आणि लेख लिहिले. मला आठवते मी लहान असताना दूरदर्शनवर मराठी चित्रपट दाखवत असत आणि छायागीत नावाचा मराठी गीतांचा एक कार्यक्रम सुद्धा सादर होत असे. या चित्रपट व गीतांच्या कार्यक्रमांमध्ये मधून रवींद्र महाजनीची ओळख झाली. "हा सागरी किनारा" ,"सहजीवनात आली ही" , "मधु इथे अन चंद्र तिथे" अशी त्याची गीते तेंव्हा पाहण्यात यायची. उंचापुरा, देखणा असा तो नजरेत भरला, त्याचा अभिनयही आवडू लागला. मुंबईचा फौजदार, झुंज, देवता इ. त्याचे चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरले. त्याचे अडनाव सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकले होते. ते मला वेगळे असे वाटले होते. आपण महाजन हे आडनाव बरेचदा ऐकलेले आहे परंतु महाजनी हे आडनाव तेव्हा मी तरी पहिल्यांदाच ऐकले होते. पुढे समाज माध्यमे आल्यावर तो मला आवडत असल्याने एक दिवस मी त्याला Friend Request पाठवली होती. त्याने ती स्वीकारली होती आणि मग आम्ही खुप वेळा बोललो पण होतो. रवींद्र महाजनीचे वडील, परिवारसंबंधीचे लोक काही चित्रपटक्षेत्राशी संबंधित नव्हते पण तरीही रवींद्र महाजनीने सुरुवातीस नाटक आणि मग सिनेमा क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्याच्यातील गुण किरण शांताराम यांनी हेरले. आणि त्याला झुंज सिनेमात घेतले. त्या काळात मराठीमध्ये ग्रामीण कथानके असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात झळकायचे अशा काळामध्ये रवींद्र महाजनी शहरी भूमिका साकारत असे. पुढे त्याने हिंदी चित्रपटात सुद्धा भूमिका करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तितकासा यशस्वी ठरला नाही. हळूहळू रवींद्र महाजनीकडे भूमिका येणे कमी झाले मग त्यानी बांधकाम क्षेत्राकडे लक्ष वळवले. तदनंतर रवींद्र महाजनीचा मुलगा गश्मीर याने सुद्धा चित्रपट क्षेत्रात शिरकाव केला. आज तो अभिनेता म्हणून स्थिरावला आहे. रविंद्र महाजनी जरी चांगला अभिनेता होता,  देखणा होता तरीही चित्रपटसृष्टी म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी अशी एक सृष्टी आहे अभिनय कारकीर्दीचा अस्त होऊ लागल्यावर त्याच्याकडे ही सृष्टी पाठ फिरवते. तसेच रवींद्र महाजनी यांचे सुद्धा झाले. पुण्यातील तळेगाव जवळील आंबी गावात पुर्वी प्रकाशझोतात वावरणारा हा कलाकार आता एकाकी जीवन व्यतीत करू लागला होता. असे एकाकी जीवन त्याच्या नशिबी का आले असावे? मुलगा इतर कुटुंबीय संपर्कात का नसतील? असे प्रश्न आता मागे उरले आहे. त्याच्या फ्लॅटमध्ये काळाने त्याच्यावर झेप घेतली. कोणत्यातरी कारणाने त्यांचे दुःखद निधन झाले.  ते कोणालाही कळले नाही. काही दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्यावर फ्लॅटमध्ये रवींद्र महाजन यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. रवींद्र महाजनी यांच्या दुःखद निधनानंतर सिनेरसिकांमध्ये शोककळा पसरली. रवींद्र महाजनी याच्यावर खेळ कुणाला दैवाचा कळला असे एक गीत चित्रित झालेले होते आणि खरंच एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असणारा रवींद्र महाजनी एकाएकी जीवन व्यतीत करीत जग सोडून गेला. त्याच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही आणि खरंच त्याच्याबाबतीत "खेळ कुणाला दैवाचा कळला  या त्याच्यावरच चित्रित झालेल्या गीताच्या ओळीची प्रचिती आली.

१३/०७/२०२३

article about Dagger/ Khanjar

खंजीर खुपसण्याच्या निमित्ताने  

ओमान येथील एक खंजीर प्रकार 

बहुमतात असलेल्या सरकार मध्ये कुण्या इतर पक्षाला येण्याची मुळात गरजच काय व त्याला अनुमती कशी मिळते हा एक संशोधनाचा विषय आहे. विश्वासघात करून सत्ता मिळवणे यासाठी खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. परंतू खंजीर हे शस्त्र नेमके असते तरी कसे ?

एकनाथ शिंदे आपले चाळीस समर्थक आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. यावर उबाठा सेनेकडून "पाठीत खंजीर खुपसला" अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली. उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती सोडून महाविकास आधाडी स्थापन केली त्यावेळी देवेन्द्र फडणवीसांनी सुद्धा "उद्धव यांनी पाठीत खंजीर खुपसला" असे म्हटले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन वर्ष उलटत नाही तर बहुमतात असलेल्या सरकार मध्ये राष्ट्रवादीतील 35 आमदार घेऊन अजित पवार बाहेर पडले. (बहुमतात असलेल्या सरकार मध्ये कुण्या इतर पक्षाला येण्याची मुळात गरजच काय व त्याला अनुमती कशी मिळते हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.) अजित पवार बाहेर पडल्यावर पुनश्च पुतण्यानी काकाच्या पाठीत खंजीर खुपसले असा शब्दप्रयोग केला गेला. खरेतर महाराष्ट्रात फोडाफोडीचे खंजीर खुपसून सत्ताप्राप्तीचे राजकारण करण्याची सुरुवात शरद पवार यांनीच केली. वसंतदादा पाटील यांचे सरकार फोडून मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या पाठीत खंजीर खुपसला असा शब्दप्रयोग शरद पवार यांचे बाबतीत वसंतदादांनी केला होता. वसंतदादांच्या वेळी सुद्धा जेवढा वापरल्या गेला नसेल तेवढ्यावेळा किंबहुना त्याहीपेक्षा जास्तवेळा "खंजीर खुपसला" असा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदारुढ व पायउतार झाल्यापासून अनेकदा वापरल्या जात आहे. गेल्या एक वर्षात तर महाराष्ट्रात खंजीर हा शब्द सर्वाधिक जास्त वापरल्या गेलेला शब्द असावा असे म्हणण्यास हरकत नाही. महाराष्ट्रातील व देशातील फोडाफोडीचे राजकारण असेच सुरू राहिले तर खंजीर या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीत सुद्धा होऊ शकतो. विश्वासघात करून सत्ता प्राप्ती करणे यासाठी खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. हे तर झाले राजकीय खंजीराबाबत परंतू खंजीर हे शस्त्र नेमके असते तरी कसे ? व खंजीराविषयीची इतर माहिती तरुणांना अधिक नसावी कारण विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची जरी आपली परंपरा असली तरी शस्त्र प्रतिबंधक कायद्यामुळे विविध शस्त्रे कशी असतात व ती कशी हाताळली जातात या बाबत मोठी अनभिज्ञता आहे. आपल्या अनेक देवी-देवतांच्या हातात सुद्धा शस्त्रे दिसतात. तलवार, परशू, तीर-कमटा, दांडपट्टा, बिछ्वा, वाघनखे व तद्नंतर तोफ, बंदुका इ. आधुनिक शस्त्रे निर्माण झालीअण्वस्त्रे निर्माण झाली. अशाच या शस्त्रांपैकी एक असलेले शस्त्र आहे खंजीर.   

खंजीर एक जुने दुधारी परंतू चाकूपासून वेगळे असे छोटे शस्त्र आहे की जे जवळ बाळगून शत्रूवर तो बेसावध असतांना वार करता येतो. खंजीरजांबिया, बिछवा, कटार आणि कटयार ही दुधारी परंतू साधर्म्य असणारी छोटी शस्त्रे आहे. यांच्या आकारात व मुठीत थोडाफार फरक असतो. पाषाण युगापासून हे शस्त्र अस्तित्वात आहे असे म्हणतात. त्या युगात ते दगडापासून बनत असे व त्याचा उपयोग केलेल्या शिकारीचे कातडे काढण्यासाठी होत असे. खंजीर हे विविध भागात विविध आकारांचे असे असते. खंजीराला म्यान सुद्धा असते व ते कमरेजवळ लपवून ठेवता येते. अफझलखान जेंव्हा शिवाजी महाराजांना मारण्यास आला होता तेंव्हा भेटीच्या वेळी त्याने शिवाजी महाराजांवर खंजीर याच शस्त्राने वार केला होता परंतू चिलखतामुळे महाराजांचे रक्षण झाले होते. ओमान या देशात खंजीर हे शस्त्र सर्वात प्रथम निर्माण झाले असे सांगितले जाते. ओमान देशाच्या बोधचिन्हात खंजीर आहे. शस्त्रे मग ती कोणतीही असोत ती दुर्जनांच्या नाशासाठी वापरली गेली तर तो त्या शस्त्रांचा योग्य वापर आहे. शस्त्रविहीन व्यक्तीवर शस्त्र चालवू नये अशीही हिंदू संस्कृतीची शिकवण आहे. पाठीवर वार करणे हे सुद्धा भारतीय परंपरेत वर्ज्य आहे. तसेच चाणक्य म्हणतात की, "ज्याच्याजवळ शस्त्र आहे अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेऊ नये, क्रोध आल्यास असा व्यक्ती कधीही घात करू शकतो". महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा, एकमेकांच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याच्या खेळाचा जनतेला वीट आला आहे. आगामी निवडणूकात जनतेचा कौल हे स्पष्ट करेलच. सततच्या खंजीर या शब्दप्रयोगाने खंजीर या शस्त्राचे व तदनुषंगाने आपली शस्त्रे व परंपरेतील काही गोष्टींचे चिंतन झाले ते वाचकांसमोर प्रकट करावेसे वाटले. जसा हल्ली खंजीर या शस्त्राचा वापर कमी होतो, हत्या होतात पण त्यात इतर शस्त्रे वापरली जातात, खंजीर काही कुणी खुपसत नाही, खुपसूही नये. त्याचप्रमाणे संख्याबळासाठी, इतर पक्ष फोडण्यासाठी राजकीय पक्षांनी सुद्धा एकमेकांच्या पाठीत फोडाफोडीचे राजकीय खंजीर खुपसू नये व आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा राखावा हेच इथे सांगावेसे वाटते.