खंजीर खुपसण्याच्या निमित्ताने
ओमान येथील एक खंजीर प्रकार |
बहुमतात असलेल्या सरकार मध्ये कुण्या इतर पक्षाला येण्याची मुळात गरजच काय ? व त्याला अनुमती कशी मिळते ? हा एक संशोधनाचा विषय आहे. विश्वासघात करून सत्ता मिळवणे यासाठी खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. परंतू खंजीर हे शस्त्र नेमके असते तरी कसे ?
एकनाथ शिंदे आपले चाळीस समर्थक आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. यावर उबाठा सेनेकडून "पाठीत खंजीर खुपसला" अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली. उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती सोडून महाविकास आधाडी स्थापन केली त्यावेळी देवेन्द्र फडणवीसांनी सुद्धा "उद्धव यांनी पाठीत खंजीर खुपसला" असे म्हटले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन वर्ष उलटत नाही तर बहुमतात असलेल्या सरकार मध्ये राष्ट्रवादीतील 35 आमदार घेऊन अजित पवार बाहेर पडले. (बहुमतात असलेल्या सरकार मध्ये कुण्या इतर पक्षाला येण्याची मुळात गरजच काय ? व त्याला अनुमती कशी मिळते ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.) अजित पवार बाहेर पडल्यावर पुनश्च पुतण्यानी काकाच्या पाठीत खंजीर खुपसले असा शब्दप्रयोग केला गेला. खरेतर महाराष्ट्रात फोडाफोडीचे खंजीर खुपसून सत्ताप्राप्तीचे राजकारण करण्याची सुरुवात शरद पवार यांनीच केली. वसंतदादा पाटील यांचे सरकार फोडून मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या पाठीत खंजीर खुपसला असा शब्दप्रयोग शरद पवार यांचे बाबतीत वसंतदादांनी केला होता. वसंतदादांच्या वेळी सुद्धा जेवढा वापरल्या गेला नसेल तेवढ्यावेळा किंबहुना त्याहीपेक्षा जास्तवेळा "खंजीर खुपसला" असा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदारुढ व पायउतार झाल्यापासून अनेकदा वापरल्या जात आहे. गेल्या एक वर्षात तर महाराष्ट्रात खंजीर हा शब्द सर्वाधिक जास्त वापरल्या गेलेला शब्द असावा असे म्हणण्यास हरकत नाही. महाराष्ट्रातील व देशातील फोडाफोडीचे राजकारण असेच सुरू राहिले तर खंजीर या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीत सुद्धा होऊ शकतो. विश्वासघात करून सत्ता प्राप्ती करणे यासाठी खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. हे तर झाले राजकीय खंजीराबाबत परंतू खंजीर हे शस्त्र नेमके असते तरी कसे ? व खंजीराविषयीची इतर माहिती तरुणांना अधिक नसावी कारण विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची जरी आपली परंपरा असली तरी शस्त्र प्रतिबंधक कायद्यामुळे विविध शस्त्रे कशी असतात व ती कशी हाताळली जातात या बाबत मोठी अनभिज्ञता आहे. आपल्या अनेक देवी-देवतांच्या हातात सुद्धा शस्त्रे दिसतात. तलवार, परशू, तीर-कमटा, दांडपट्टा, बिछ्वा, वाघनखे व तद्नंतर तोफ, बंदुका इ. आधुनिक शस्त्रे निर्माण झाली, अण्वस्त्रे निर्माण झाली. अशाच या शस्त्रांपैकी एक असलेले शस्त्र आहे खंजीर.
खंजीर एक जुने दुधारी परंतू चाकूपासून वेगळे असे छोटे शस्त्र आहे की जे जवळ बाळगून शत्रूवर तो बेसावध असतांना वार करता येतो. खंजीर, जांबिया, बिछवा, कटार आणि कटयार ही दुधारी परंतू साधर्म्य असणारी छोटी शस्त्रे आहे. यांच्या आकारात व मुठीत थोडाफार फरक असतो. पाषाण युगापासून हे शस्त्र अस्तित्वात आहे असे म्हणतात. त्या युगात ते दगडापासून बनत असे व त्याचा उपयोग केलेल्या शिकारीचे कातडे काढण्यासाठी होत असे. खंजीर हे विविध भागात विविध आकारांचे असे असते. खंजीराला म्यान सुद्धा असते व ते कमरेजवळ लपवून ठेवता येते. अफझलखान जेंव्हा शिवाजी महाराजांना मारण्यास आला होता तेंव्हा भेटीच्या वेळी त्याने शिवाजी महाराजांवर खंजीर याच शस्त्राने वार केला होता परंतू चिलखतामुळे महाराजांचे रक्षण झाले होते. ओमान या देशात खंजीर हे शस्त्र सर्वात प्रथम निर्माण झाले असे सांगितले जाते. ओमान देशाच्या बोधचिन्हात खंजीर आहे. शस्त्रे मग ती कोणतीही असोत ती दुर्जनांच्या नाशासाठी वापरली गेली तर तो त्या शस्त्रांचा योग्य वापर आहे. शस्त्रविहीन व्यक्तीवर शस्त्र चालवू नये अशीही हिंदू संस्कृतीची शिकवण आहे. पाठीवर वार करणे हे सुद्धा भारतीय परंपरेत वर्ज्य आहे. तसेच चाणक्य म्हणतात की, "ज्याच्याजवळ शस्त्र आहे अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेऊ नये, क्रोध आल्यास असा व्यक्ती कधीही घात करू शकतो". महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा, एकमेकांच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याच्या खेळाचा जनतेला वीट आला आहे. आगामी निवडणूकात जनतेचा कौल हे स्पष्ट करेलच. सततच्या खंजीर या शब्दप्रयोगाने खंजीर या शस्त्राचे व तदनुषंगाने आपली शस्त्रे व परंपरेतील काही गोष्टींचे चिंतन झाले ते वाचकांसमोर प्रकट करावेसे वाटले. जसा हल्ली खंजीर या शस्त्राचा वापर कमी होतो, हत्या होतात पण त्यात इतर शस्त्रे वापरली जातात, खंजीर काही कुणी खुपसत नाही, खुपसूही नये. त्याचप्रमाणे संख्याबळासाठी, इतर पक्ष फोडण्यासाठी राजकीय पक्षांनी सुद्धा एकमेकांच्या पाठीत फोडाफोडीचे राजकीय खंजीर खुपसू नये व आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा राखावा हेच इथे सांगावेसे वाटते.
खूप चांगला लेख आहे
उत्तर द्याहटवा