Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०७/२०२३

Article on the occasion of Mohd Rafi Death Anniversary

नांवाप्रमाणेच सर्वोच्चस्थानी असलेला रफी व त्याची भजने.....

(31 जुलै मो. रफी पुण्यतिथीच्या निमित्ताने)


"मन तडपत हरिदर्शन को" या भजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गीतकार शकील बदायुनीसंगीतकार नौशाद आणि गायक मो. रफी म्हणजे तिघेही मुस्लिम परंतू ईश्वरापुढे दर्शनाची मागणी करणा-या ओळी शकिल बदायुनीने अत्यंत सुंदर रचल्या तितकीच सुंदर चाल नौशादनी दिली आणि तितक्याच हरी दर्शनाच्या व्याकुळतेनेआर्ततेने मो. रफीने त्या ओळी गाऊन हे भजन अजरामर केले आहे.गायक मो. रफी नंतर दुसरा कोणी रफी नांवाचा व्यक्ती मला तरी दिसला नाही, रफीक अनेक आहेत परंतू रफी नाही.

    संगीतामध्ये जादू असते आणि या जादूच्या काही कथा सुद्धा सांगितल्या जातात. एखाद्या सुरसम्राटाने दिप राग आळवला असता दिवे प्रज्वलित होतात तर राग मल्हार आळवल्याने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मानवावर व प्राण्यांवर सुद्धा मंजूळ सुमधुर, संथ अशा शास्त्रीय संगीतस्वरांचा मोठा परीणाम होत असतो. म्युझिक थेरपी म्हणून एक प्रकार सुद्धा आहे. माझ्या वडीलांना पूर्वीपासूनच जुन्या चित्रपटात गीतांची आवड असल्याने कित्येकदा त्यांना मी जुनी हिंदी चित्रपट गीते ऐकवत असतो. त्यांचा मुड फ्रेश होतो मग ते काही जुन्या आठवणी सांगू लागतात. त्यादिवशी अशीच जुनी गाणी लावली होती. थोड्या वेळानंतर मोहम्मद रफीने गायलेले "मन तडपत हरिदर्शन को आज" हे गीत वाजू लागले "वा वा वा" वडीलांनी उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया दिली. माझ्या वडीलांना हे भजन खूप आवडते हे फिल्मी भजन मी सुद्धा बरेच वेळा ऐकले आहे. या भजनाच्या अनुषंगाने मग आठवण झाली ती स्वरांचा जादूगार व गायनाच्या क्षेत्रातला अनभिषिक्त सम्राट व तितकाच विनम्र स्वभावी मोहम्मद रफीची. 31 जुलै म्हणजे आपल्या आवाजानेे सर्वांना भुरळ पाडणा-या मधाळसुमधूर आवाजाच्या व गायनाला भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्कम आधार असणा-या मो. रफीची पुण्यतिथी. 

    मो. रफीने 1944 ते 1980 या काळात हिन्दी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन केले. अनेक अभिनेत्यांना आवाज दिला. एखादा अभिनेता पडद्यावर जेंव्हा रफीच्या आवाजात गातांना दर्शक पाहत असत तेंव्हा ते गीत पाहतांना व ऐकतांना तो अभिनेताच ते गीत गात आहे की काय असे वाटत असे. उदाहरणच द्यायचे झाले तर राजेन्द्र्कुमारसाठी रफीने अनेक गीते गायली व तशीच शम्मी कपूरसाठी सुद्धा, परंतू दोघांची गीते ऐकतांना रफीने त्या अभिनेत्याचा आवाजत्याच्या लकबीगीत गातांनाचा अभिनय करतांना तो अभिनेता कसे हावभाव करेल याचा अभ्यास करून ते गीत गायले असल्याचे जाणवते. रफीने विविध भाषांत सुमारे 25000 गीते गायली आहेत. 1944 पासून दिलीपराजदेव यांच्याही आधीच्या नायकांपासून ते मिथून चक्रवर्ती पर्यन्तच्या नायकांसाठी रफीने पार्श्वगायन केले आहे. रफीने हजारो गीते गायली असल्याने त्यांच्याबाबत लिहिणे म्हणजे एक दीर्घ लेख होईल म्हणून त्याने गायलेल्या काही निवडक भजनांचा आढावा इथे घेतला आहे. रफीने अनेक हिंदी व काही मराठी भजने सुद्धा उत्कटतेने गायली आहेत.

    त्यातले पहिले भजन म्हणजे "मन तडपत हरिदर्शन को".  त्या दिवशी “मन तडपत हरि दर्शन को आज" हे भजन ऐकले तसे ते अनेकदा ऐकले आहे. या भजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गीतकार शकील बदायुनीसंगीतकार नौशाद आणि गायक मो. रफी म्हणजे तिघेही मुस्लिम होते परंतू “बिन गुरु ज्ञान कंहासे पाऊ”, “तुमरे व्दार का मै हूं जोगी” , “मुरली मनोहर आस ना छोडो”, "सून मोरे व्याकुल मन" अशा ईश्वरापुढे मागणी करणा-या ओळी शकिल बदायुनीने सुंदर रचून पाया घातला, त्या ओळींना तितकीच सुंदर चाल देऊन नौशादनी मंदिर उभारले आणि तितक्याच हरि दर्शनाच्या व्याकुळतेनेआर्ततेने मो रफीने त्या ओळी गाऊन त्यावर कळस चढवून हे भजन अजरामर केले आहे. ईश्वरप्राप्तीसाठी सर्वात प्रथम आवश्यकता असते ती व्याकुळतेची आणि हे भजन गातांना रफी तसाच व्याकूळ झाल्यासारखा वाटतो.    
    दुसरे भजन म्हणजे 70 च्या दशकात आलेल्या गोपी सिनेमातील सुखके सब साथी दुख मे ना कोई”. या गीताचे गीतकार राजेंद्र कृष्णसंगीतकार कल्याणजी-आनंदजी. “राजा हो या रंक सभीका अंत एकसा होई”, “मन की मैल न धोईराजेंद्रकृष्ण यांच्या जीवनाचे वास्तव प्रकट करणा-या या ओळी रफीने अशा गायल्या आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध तर होतोच शिवाय आत्मचिंतन करण्यास भाग पडतो.  
    "बडी देर भयी नंदलाला तेरी राह तके ब्रिजबाला" रफीचे हे तिसरे जलद गतीचे भजन ऐकणा-यास तल्लीन होण्यास भाग पाडते.
 "परीत्राणाय साधू नामविनाशायच दुष्कृतामधर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे" 
या भगवंतांनी सांगितलेल्या श्लोकाचा आधार घेऊन संगीतकार रविने दिलेल्या चालीवरच्या राजेंद्र कृष्णाच्या ओळींमधून  
"संकट मे है आज वो धरती जिसपर तुने जनम लिया 
पुरा करदे आज वचन गीतामे जो तुने दिया
कोई नही है तुझ बिन मोहन भारत का रखवाला रे" 
केशवाने पुन्हा या भारताच्या रक्षणास यावे अशी आर्त हाक रफीने मुरलीधरास घातली आहे.  आजच्या स्थितीला सुद्धा या ओळी लागू पडतात.  
    
    "जय रघुनंदन जय सियाराम" हे रफीने आशा भोसले यांच्यासह गायलेल्या अवीट गोडीचे चौथे भजन तर कालातीत आहे. ज्या रामाला समस्त भारतीयांनी आदर्शस्थानी  मानले आहे त्या रामाबद्दल रहीमचा बंदा रफी इतका सुंदर व भक्तिरसाने ओतप्रत असा गायला आहे की आजही हे भजन मोठ्याप्रमाणात भक्तीभावाने ऐकले जाते. रफीने उत्कटतेने रामाची इतकी सुंदर आराधना व त्याची आळवण केली आहे की हे भजन ऐकतांना श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते व रघुनंदन रामाची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते. घराना चित्रपटातील पुनश्च शकील बदायुनी यांनीच लिहिलेले हे भजन आहे.  रविने संगीतबद्ध केलेल्या या गीताचा गोडवा आजही  कमी झालेला नाही हा रफीच्याच आवाजाचा करीश्मा आहे.
    सरते शेेेवटी "प्रभू तू दयाळू" या रफीच्या मराठी भक्तीगीताचा उल्लेख न करुन कसे चालेल ? उमाकांत काणेकर यांनी रचलेले व श्रीकांत ठाकरे (राज ठाकरे यांचे पिता)  यांनी संगीतबद्ध केलेले हे मराठी भक्तीगीत रफीने मराठीतून लिलया गायले आहे. दया मागतांना रफीचा आवाज खरोखर एखाद्या देवापुढे याचना करणा-या याचकाप्रमाणे भासतो.  

    मुस्लिम असलेल्या रफीने देवी देवतांची "रामजी की निकली सवारी", " सबसे बडा तेरा नाम ओ शेरोवाली" , "वृंदावन का कृष्ण कन्हैय्या" यांसारखी अनेक गाणी व भजने उत्कटतेने, आर्ततेने, भावपुर्णतेने, तन्मयतेने गायली आहेत. कुणी म्हणेल तो त्याचा व्यवसाय होता त्याला त्याचे मानधन मिळाले. परंतू जरी व्यवसाय असला, पैसे मिळत असले तरी रफीच्या भजन गायनातून जो भाव श्रोत्यांना जाणवतो त्यावरून त्याची गायनाप्रतीची निष्ठा दिसते, ईश्वर भावाचा भुकेला असतो व रफीच्या भजनात तो आलेला आहे. 
    उपरोक्त भजनांचे स्मरण रफीच्या पुण्यतिथी निमित्ताने आज झाले. रफी हे नांव मुस्लिम समाजात क्वचितच दिसते गायक मो.रफी नंतर दुसरा कुणी रफी नांवाचा व्यक्ती मला तरी दिसला नाही. रफीक खूप आहे पण रफी नाही. रफी या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ "सर्वोच्चस्थानी पोहचलेला" असा होतो आणि खरोखर रफी त्याच्या गायनाने, गाण्यांच्या संख्येने व नम्र स्वभावाने गायन क्षेत्रात व सिनेसृष्टीत सर्वोच्चस्थानी जाऊन पोहचला व आजही त्याचे स्थान अबाधित आहे. 

२ टिप्पण्या: