सण संभ्रम रहीत साजरे व्हावे
यंदाचे रक्षाबंधन जवळ येताच माध्यमांवर रक्षाबंधन कोणत्या वेळेस साजरे करायचे याबद्दल विविध मते मतांतराचे संदेश फिरू लागले. भद्रा आहेत म्हणून रक्षाबंधन हे संध्याकाळ नंतर करण्यात यावे असे या संदेशांमध्ये सांगण्यात आले होते. संध्याकाळ नंतर म्हणजे विस्तृतपणे सांगितल्यास काही संदेशांमध्ये सायं सात नंतर काहींमध्ये रात्री आठ नंतर तर काहींमध्ये रात्री नऊ नंतर बहिणीने भावाला ओवाळावे असे सांगण्यात आले होते. यामधील एका संदेशात रावण आणि शुर्पणखा यांच्या रक्षाबंधनाचा सुद्धा उल्लेख आला होता. रावण आणि शुर्पणखा यांचे रक्षाबंधन भद्रा कालात झाले होते असे म्हटले होते. यंदाच्या रक्षा बंधनातील या भद्रा प्रकरणामुळे सर्वच हिंदू बांधव संभ्रमात पडले की नेमके रक्षाबंधन केव्हा करावे ? मला आठवते मी लहान असताना आमच्याकडे सकाळी लवकर प्रल्हाद जोशी भटजी यायचे व घरातील सर्वांना मंत्रोच्चारण करून राखी बांधायचे. आम्ही सगळे त्यादिवशी सकाळी लवकर उठून प्रल्हाद भटजी येण्याच्या आधी तयार राहत असू. त्यांनी राखी बांधल्यावर आम्हाला मोठा आनंद होई, घरात मंगलमय, प्रसन्न असे वातावरण निर्माण होई. ते आमच्या सायकलच्या हँडलला सुद्धा राखी बांधून द्यायचे. 40-50 वर्षांपूर्वीच्या काळातील ही गोष्ट आहे. तेंव्हा सुद्धा भद्रा असतीलच ना ! पण तरीही प्रल्हाद भटजी दरवर्षी सकाळीच यायचे व रक्षाबंधन करून द्यायचे. माझे आजोबा सांगायचे ज्या दिवशी जो सण आलेला आहे तो पुर्ण दिवसच शुभ असतो. दिवसभरात तो सण केव्हाही साजरा केला तरी चालते असे ते म्हणायचे. शिवाय भद्रा म्हणजे काय हेच अनेकांना ठाऊकच नाही व तसे ते मला ही ठाऊक नव्हते. काल भद्रा - भद्रा प्रकरण सुरु होते म्हणून मी ते ज्योतिष्यशास्त्र व पंचांग यांचे जेष्ठ अभ्यासक बळवंत नारायण उपाख्य बाळासाहेब कुळकर्णी ह.मु. अमरावती यांच्याशी संपर्क करून जाणून घेतले असता भद्रा म्हणजे दिवसातील अशूभ काळ असे कळले या काळात मंगल कार्य संपन्न होत नाही असे त्यांनी सांगितले. पण भद्रा काळ हा योग्यरित्या व अभ्यासपूर्वकच सांगितला जावा असेही ते म्हणाले. तर काही जेष्ठ लोक असेही सांगतात की काही भद्रा या चांगल्या असतात तर काही भद्रा या वाईट असतात त्यामुळे चांगल्या भद्रांच्या काळात कार्य करण्यास, सण साजरा करण्यास काही हरकत नसते. अशी नाना मते कळली.
आज माध्यमांचा उपयोग योग्य ते संदेश पाठवण्यासाठी होण्याऐवजी बरेच वेळा संभ्रम निर्माण करणारे संदेश, अफवा पसरवणारे संदेश, अंधश्रद्धा वाढविणारे संदेश यांचीच आदानप्रदान होतांनासाठी दिसतो. पंचांगात जसे सांगितले त्याप्रमाणे आपले सण साजरे होत असतात. मी काही पंचांग अभ्यासक नाही परंतु हिंदू धर्मातील सणांबद्दल पंचांग अभ्यासकांकडून अगदी अचूक असे मार्गदर्शन हिंदू बांधवांना व्हावे असे वाटते. किंबहुना तशी गरजच आहे. आता गणेशोत्सव समीप आलेला आहे त्यामुळे विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठा केंव्हा करावी याबद्दलचे सुद्धा विविध मते मतांतरे असलेले संदेश येतीलच तेव्हा हिंदू बांधवांनी गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवस योग्य मानून पार्वतीनंदनाची प्राणप्रतिष्ठा करावी असे वाटते. आगामी काळात माध्यमांवर पंचांग अभ्यासक, ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून हिंदु सण हे केंव्हा व कसे साजरे करावेत याचे आवाहन योग्य प्रकारे करावे. यामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा मार्गदर्शन करावे असे यंदाच्या रक्षाबंधनावेळी भद्रांच्या झालेल्या घोळामुळे वाटते. हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे, सर्वसमावेशक आहे, यातून नाना पंथ निर्माण झालेले आहे, हिंदू धर्मात कुणावर काही सक्ती नाही, धर्मातील प्रत्येकाला पूजाविधी आदींचा स्वत:चा मार्ग निवडण्याची अनुमती आहे, देव मानण्याची सक्ती सुद्धा नाही. असा हा जगाच्या पाठीवरील एकमेव धर्म, एकमेव जीवनपद्धती आहे. तेंव्हा या धर्मातील सण साजरे होतांना त्यांच्यात सुसूत्रता असावी असे कालच्या संभ्रमामुळे वाटते म्हणून हा लेखन प्रपंच. ज्योतिष्यशास्त्री, पंचांग अभ्यासक, वेदशास्त्र अभ्यासक, पुरोहित मंडळी यांनी सणांच्या वेळी धर्मबांधवांना योग्य ते मार्गदर्शन करावे असेच यंदाच्या रक्षाबंधनाच्या वेळी भद्रांच्या झालेल्या संभ्रमामुळे सांगावेसे वाटते.