Click "Follow" Button below To Follow this Blog

१०/०८/२०२३

Article on the occassion of friendship day 2023

 छोटी छोटी बातोंकी है यादें बडी...(मैत्री दिनोत्तर लेख)

मी व प्रविण धनंजयच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो. जातांना आमच्या मनात त्याच्या घरचे आता रागावणार तर नाही, बोलणार तर नाही ? असे मोठे भययुक्त प्रश्न  घेऊन आम्ही जात होतो. धैर्याने त्याच्या घरी पोहोचलो. तो तळघरात राहत असे. धनंजयने पलंगावर अंग टाकले होते, पायाला पट्टी बांधली होती.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे जागतिक मैत्री दिन आपल्या भाषेत फ्रेंडशिप डे. यंदा पण तो उत्साहात साजरा झाला. विचारांची, संदेशांची देवाणघेवाण झाली, अनेक मित्रांशी संवाद झाला. अनेक मित्रांच्या आठवणी ताज्या झाल्या. कोरोनाने हिरावून नेलेल्या मित्रांचे स्मरण झाले. बालपणीचे मित्र व त्यांच्या सोबत घालवलेले सुवर्ण क्षण आठवले. मित्र म्हणजे काय ? अनेकांनी याबद्दल नानाप्रकारचे विचार प्रकट केले आहे. रक्ताच्या नात्यात जोडता आले नाही म्हणून देवाने मित्र या नात्याची देणगी मानवाला दिली असे म्हटले जाते. ज्याच्या सहवासात संवाद नसतानांही दीर्घकाळ पर्यंत राहता येऊ शकते असे मित्रत्व असते. माझ्या आजोबांचे एक मित्र आमचेकडे बरेचदा यायचे कितीतरी वेळा त्यांना व आजोबांना मी विनासंवादाचे बसलेले पाहिले आहे. शेवटी “नाना येतो मी आता” असे म्हणून ते निघत. मला याचे मोठे आश्चर्य वाटे. आपल्या मित्राच्या फक्त आणि फक्त सहवासासाठी म्हणून ते येत. डोळ्यातून ख्याली खुशाली व्यक्त झाल्यावर मग त्यांना त्यात शब्दांचीही गरज वाटत नसे. अशा विविध गोष्टींचे स्मरण मला या मैत्री दिनाचे निमित्ताने झाले. या विचार शृंखलेत आमच्या शालेय जीवनातील आठवणीची एक कडी सुद्धा जोडल्या गेली. आम्ही सहावीत असतांना आमच्या वर्गात एक नवीन मुलगा दाखल झाला. मध्यम ऊंची, सावळा वर्ण, बोलके डोळेतल्लख बुद्धीचा. नांवही अर्जुनाचे “धनंजय”, धनंजय काशीनाथ तम्मेवार. जेमतेम एक वर्ष आम्ही सोबत असू. पण आजही आमची ती एक वर्षाची मैत्री स्मरणात आहे. स्मृती कायम टिकण्यासाठी काही निमित्त असते कधी ते चांगले असते तर कधी त्याला वेदनेची झालर सुद्धा असते. तसे निमित्त आमच्या मैत्रीच्या स्मृतीतही होतेच. एक दिवस सायंकाळी आम्ही खामगांवातील आर्य समाज मंदिराच्या गल्लीत खेळत होतो. एक दिवस खेळल्यानंतर आम्ही तिघे मी, प्रविण मिश्रा आणि हा धनंजय असे तिघेजण आर्य समाज मंदीरासमोरून जात होतो. या ठिकाणी आता काही दुकाने आहेत. आम्ही एकमेकांना लोटालोटी करत चाललो होतो. आर्य समाज मंदिरास तारेचे कंपाऊंड होते व समोरच्या बाजूचे कुंपण रोड उंच झाल्याने अतिशय ठेंगणे होते. आमच्या लोटपोटीमुळे धनंजयला एक धक्का जोरात लागला व तो त्या कुंपणावरून मंदिराच्या प्रांगणात पडला. पडतांना त्याचा गुडघा कुंपणाच्या अणकुचीदार तारेस स्पर्शून गेला, त्याचा पाय कापल्या गेला, रक्त वाहू लागले. मी व प्रवीण त्याचे ते वाहणारे रक्त पाहून खुप घाबरलो व बालपणी असा काही प्रसंग घडल्यावर जशी घाबरगुंडी उडते तशीच ती आमचीही उडाली. जी चुक व्हायला नको होती तीच आमच्याकडून झाली. त्याला तिथेच सोडून भितीने आम्ही तिथून निघून गेलो, त्याला घरापर्यंतही सोडले नाही. कसाबसा उठून तो लंगडत-लंगडत घरी गेला असे नंतर कळले होते. मी घरी गेलो परंतू मनात प्रचंड कालवाकालव झाली. कालवाकालव, घालमेल, भीती, दु:ख हे शब्द आज आठवत आहेत परंतू आपल्या जख्मी मित्राला तसेच टाकून आल्यावर झालेली तेंव्हाची मनाची अवस्था कथन करता येत नाही. त्या अवस्थेमुळे मी माझ्या घरी घडलेला प्रकार सांगून टाकला. “अरेरे, असे नाही करू रे” माझे आई-वडील दोघेही म्हणाले. “त्याच्याकडे उद्या बिस्किटचा पुडा घेऊन त्याला भेटायला जा” वडील म्हणाले. मी दुस-या दिवशी प्रविणकडे गेलो त्याचे घर रस्त्यातच होते. मी व प्रविण धनंजयच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो. जातांना आमच्या मनात त्याचे कुटुंबीय आता रागावणार तर नाही, बोलणार तर नाही असे मोठे भययुक्त प्रश्न घेऊन आम्ही जड पावलांनी मार्गक्रमण करीत होतो. धैर्याने त्याच्या घरी पोहोचलो. तो तळघरात राहत असे. धनंजयने पलंगावर अंग टाकले होते, पायाला पट्टी बांधली होती. आम्ही घरात शिरलो, भितीने निशब्दच होतो. बिस्किटचा पुडा त्याच्या हातात दिला. “तुम्हीच आहे का रे ते ? असे सोडून जायचे असते का मित्राला ?" त्याची आई म्हणाली. आईच ती, आमचे कावरेबावरे झालेले चहेरे पाहून ती माऊली आम्हाला काही रागावली नाही. त्याच्या बहिणी, भाऊ आमच्या भोवती जमा झाले, नंतर त्याचे बाबा सुद्धा कुठून तरी आले होते असे स्मरते पण ते सुद्धा आम्हावर ओरडले नाही. त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला क्षमा केली होती. आता आमचे दडपण गेले होते, थोड्या वेळाने हसतमुखाने आम्ही तिथून निघालो. पुढे काही दिवसांनी शाळेतल्या हजेरीत त्याचे नांव आल्यावर “यस सर” असा त्याचा आवाज आलाच नाही. नंतर कळले की धनंजयच्या बाबांची बदली झाली व धनंजय खामगांव सोडून गेला. त्यानंतर त्याचा काहीच अतापता नव्हता. फेसबुकवर आता काही वर्षांपूर्वी तो सापडला. थोडाफार संवाद झाला. छ. संभाजीनगर इथे तो आता वास्तव्यास आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तो शेगांवला सहकुटुंब आला असता त्याने मला फोन केला, आम्ही एका उपहारगृहात 37 वर्षांनी भेटलो, सौ. वहिनी, मुलगी, पुतणी यांच्याशी ओळख करून देतांना “हाच तो विनय” अशी ओळख करून दिल्यावर आम्ही सर्व हसलो. बालपणी आमच्या मस्तीमुळे त्याच्या पायावर कायमच्या उमटलेल्या त्या व्रणामुळे त्याच्या कुटुंबियांना वरील सारी हकीकत आमच्या भेटीपूर्वीच कळलेली होती. त्याच्या पायावर आणि माझ्या व प्रविणच्या मनावर तो व्रण कायमच राहील पण त्याला भेटायला जा अशा वडीलांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आमची मैत्री सुद्धा कायम राहिली. आज फ्रेंडशिप डे निमित्ताने हे सारे आठवले. घडलेली गोष्ट छोटी नव्हती पण तरीही गुलजारच्या "छोटी छोटी बातोंकी है यादें बडी" या ओळी आठवत होत्या आणि आता तर या आठवणीत धनंजयची सहकुटुंब झालेली आनंददायी भेट पण समाविष्ट झाली होती.

२ टिप्पण्या:

  1. विनय तुझा लेख पूर्ण वाचला सगळं बालपण सगळा किस्सा डोळ्यासमोरून गेला तुला काय बोलावं हेच सुचत नाही मी स्पिचलेस झालो माझी पत्नी आणि मी दोघांनी सोबत पूर्ण वाचन केलं तू आजही ती छोटीशी घटना इतकी मनात ठेवून असशील असं मला कधीच वाटलं नाही वाचताना मनःपूर्वक आनंद झाला आणि डोळ्यात आनंदाश्रू आले तुझ्या भेटीच्या पुनर प्रतीक्षेत मित्रा...... हा संपूर्ण प्रसंग वाचतांना मी माझ्या पत्नीला केवळ ती जखम दाखवत होतो जी आजही माझ्या गुडघ्यावर आहे मी कधीही आयुष्यात विसरू शकणार नाही

    उत्तर द्याहटवा