संत दासगणू वर्णित लोकमान्य टिळक
करावयासी राष्ट्रोद्धार | योग्य बाळ गंगाधर | याच्या परी न होणार | राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे ||
आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी. या दोघांचेही कार्य आपापल्या क्षेत्रात उत्तुंग असे आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि संत गजानन महाराज हे एका सभेत एकत्र आले होते. श्री संत दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथातील 15 व्या अध्यायातील लोकमान्य टिळकांच्या सभेशी संबंधित ओव्यांपैकी 10 ते 23 व 39 , 71 अशा काही ओव्या खाली देत आहे. यावरून आपल्याला गजानन महाराज , दासगणू महाराज व लोकमान्य टिळक यांचे श्रेष्ठत्व, एकमेकांप्रतिच्या भावना दिसून येतात. या ओव्या पुढीलप्रमाणे
टिळक बाळ गंगाधर | महाराष्ट्राचा कोहिनूर | दूरदृष्टीचा सागर | राजकारणी प्रवीण जो ||
निज स्वातंत्र्यासाठी | ज्याने केल्या अनंत खटपटी | याची धडाडी असे मोठी | काय वर्णन तिचे करू? ||
करारी भीष्मासमान | आर्य महींचे पाहून दैन्य | सतीचे झाला घेता वाण | भीड न सत्यांत कोणाची ||
वाक्चातुर्य जयाचे | बृहस्पतीच्या समान साचे | धाबे दणाणे इंग्रजांचे | पाहून जयाच्या लेखाला ||
कृती करून मेळविली | ज्याने लोकमान्य ही पदवी भली | ती न त्यांना कोणी दिली | ऐसा होता बहादुर ||
तो एके वेळी अकोल्याला | शिवजयंतीच्या उत्सवाला | लोकाग्रहे येतां झाला | व्याख्यान द्याया कारणे ||
झाली तयारी उत्सवाची | त्या अकोल्यामध्ये साची | मोठमोठाल्या विद्वानांची | गेली गडबड उडून ||
दामले, कोल्हटकर, खापर्डे | आणखी विद्वान बडेबडे | जमते झाले रोकडे | तया अकोल्या ग्रामासी ||
अध्यक्ष त्या उत्सवाचे | नेमिले होते टिळक साचे | नाव ऐकता टिळकांचे | व-हाड सारे आनंदले ||
शिवरायांची जयंती | याच्या आधीच या प्रांती | झाली पाहिजे होती | त्याचे कारण ऐसे पहा ||
शिवाजीची जन्मदात्री | जी वीर माता जिजा सती | ती वऱ्हाडीच आपुली होती | सिंधखेडी जन्म जिचा ||
त्या वीरगाजी शिवाजीला | जिने पोटी जन्म दिला | व-हाड-महाराष्ट्र एक झाला | या सतीच्या कर्तृत्वे ||
माता होती व-हाडी | पिता महाराष्ट्री शहाजी गडी | अवघ्या दांपत्यात ही जोडी | खचित होती अनुपम ||
आधीच उत्सव शिवाजीचा | जो कलिजा महाराष्ट्राचा | आणखी वरी अध्यक्ष त्याचा | टिळक बाळ गंगाधर || ....
करावयासी राष्ट्रोद्धार | योग्य बाळ गंगाधर | याच्या परी न होणार | राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे ||
संत दासगणूंच्या वरील वर्णनानंतर टिळकांच्या सभेचे वर्णन केले आहे. यात गजानन महाराजांना सभेसाठी निमंत्रित केल्याचा उल्लेख व टिळकांच्या भाषणाचा व सभेस उपस्थित गणमान्यांचा उल्लेख आलेला आहे. टिळकांच्या भाषणानंतर गजानन महाराज म्हणतात
अरे अशानेच पडतात | काढण्या दोन्ही दंडाप्रत | ऐसे बोलून गणगणात | भजन करू लागले |
गजानन महाराजांचे वरील 71व्या ओवीतील भाकीत खरे ठरले होते. आज टिळक पुण्यतिथी निमित्त वरील ओव्या वाचन व लेखन करण्याची ईश्वर कृपेने प्रेरणा झाली व या ओव्या आपल्यापर्यंत पोहचवाव्या असे वाटले.
जय गजानन.
खूप छान
उत्तर द्याहटवाKhup chhan lekh pan tu pudhe lihale nahi ki Tilakana karavas zala pan Gajanan maharaj chya prernene tyani Gita rahasya ha Granth lihala hach maharaj cha Prasad lokmanya Tilakana milala
उत्तर द्याहटवा