Click "Follow" Button below To Follow this Blog

२५/०४/२०२४

Article about constitution and it's features

स्मरण घटनेच्या वैशिष्ट्यांचे


सध्या  सत्ताधारी व विरोधक यांच्या घटना बदलाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या निमित्ताने घटनेच्या वैशिष्ट्यांचे विशेषतः एका वैशिष्ट्याचे प्रकर्षाने स्मरण होत आहे.

खरे तर आपण सर्व शालेय जीवनात घटनेची वैशिष्ट्ये शिकलो आहोत पण तरीही शाळेत शिकलेल्या अनेक बाबींचे जीवनाच्या रहाटगाडग्यात विस्मरण होत असते. या बाबी पुनश्च आठवल्यावर मात्र अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो आणि त्या गोष्टींचा खुलासा होण्यास मदत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घटना बदलाबाबत बराच उहापोह व मोठा गदारोळ होत आहे म्हणून या पार्श्वभूमीवर स्मरण होते ते आपल्या घटनेच्या वैशिष्ट्यांचे. या निवडणुकीत भाजपाने अबकी बार 400 पार असा नारा दिला आहे व म्हणून विरोधी पक्ष काँग्रेस 400 चा आकडा हा घटनेत बदल करण्यासाठी म्हणून सत्ताधा-यांना हवा आहे असा कांगावा करीत आहे. तसे पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळात आजरोजीपावेतो कित्येक वेळा राजकीय फायदा होईल या हेतूने घटनेत बदल केले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका भाषणात घटनेत 80 वेळा बदल झाल्याचे सांगितले आहे. विरोधकांच्या घटना बदलाच्या कांगाव्यास सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास "घटनेत बदल करणार" , ही विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे असे म्हणत आहे. दोन्ही पक्षांचे दावे-प्रतिदावे हे काही असू देत. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या घटनेच्या मसुदा समिती मधील चमूने अथक प्रयत्न करून, विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून सर्वांग सुंदर, जगातील सर्वात मोठी लिखित अशी घटना आपल्या देशाला अर्पण केली आहे व या घटनेचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. या समितीमध्ये एकाहून एक बुद्धिजीवी, अभ्यासू असे सात सदस्य होते. तसेच संविधान सभेतील एकूण 289 सभासदांपैकी 15 सभासद ह्या गार्गी, मैत्रेयी या विदुषीं प्रमाणे बुद्धिमान असलेल्या हुशार महिला सुद्धा होत्या. घटना समिती, मसुदा समिती, संविधान सभा यांच्या अथक प्रयत्नातून निर्मित आपल्या घटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांबाबत विस्तृतपणे लिहायला गेलो  तर मोठा प्रदीर्घ लेख होईल म्हणून त्या वैशिष्ट्याचा थोडक्यात आढावा इथे घेऊ आणि नंतर आज घटना बदलाच्या उहापोहाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विरोधक आणि सत्त्ताधारी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपामुळे ज्या वैशिष्ट्याची विशेष आठवण झाली असे आपल्या घटनेला काळानुरूप अधिक प्रगत किंवा आजच्या भाषेत update/upgrade करता येईल अशा आपल्या घटनेच्या एका मोठ्या वैशिष्ट्याबाबत सुद्धा पाहू. 

     जगातील सर्वात मोठी व लिखित अशी आपली राज्यघटना आहे. राज्यघटनेची निर्मिती ही विविध स्त्रोतांपासून झाली आहे. लोककल्याणकारी राज्य अपेक्षित असणारी व नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करणारी तसेच नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये सुद्धा असल्याचे सांगणारी आणि मार्गदर्शक तत्वे सांगणारी, संसदीय शासनपद्धतीचा अवलंब करणारी व न्यायव्यवस्थेस स्वतंत्रता प्रदान करणारी, आणि न्यायव्यवस्थेस महत्वाचा दर्जा देणारी, आपल्या देशात ज्यामुळे प्रजेच्या हाती सत्तेची चावी आलेली आहे ती प्रजासत्ताक पद्धती असणारी अशी आपल्या घटनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. 

      या वैशिष्ट्यांशिवाय ज्या एका महत्वाच्या वैशिष्ट्याचे घटना बदलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या निमित्ताने प्रकर्षाने स्मरण होत आहे त्या विषयी थोडक्यात पाहू. घटनेचे ते वैशिष्ट्य आहे "घटनेची लवचिकता". आपली राज्य घटना ही पुरेशी लवचिक व ताठर अशी आहे. अमेरिकन राज्यघटना ही ताठर आहे त्यामुळे त्या घटनेत बदल करणे किंवा ती बदलणे हे कठीण आहे. पण आपली राज्यघटना ही स्वत: घटना निर्मात्यांनी पुरेशी लवचिक अशी बनवली आहे म्हणजे भविष्यात घटनेत काही ना काही तरी बदल करणे आवश्यक असल्यास ते करता येऊ शकतील अशी दूरदृष्टी त्यांची होती. म्हणूनच पुरेशी लवचिकता हे आपल्या राज्यघटनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. घटनेत भविष्यात बदल करावे लागतील अशी खुद्द घटना निर्मिती करणा-या कुशाग्र, तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या  बाबासाहेबांना व तशाच त्यांच्या हुशार सहकाऱ्यांना नक्कीच ज्ञात होते. मग जर पुरेशी लवचिकता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे असे वैशिष्ट्य आहे तर घटनेत बदल होतो आहे असा कांगावा करणे म्हणजे जनतेची एक प्रकारे दिशाभूल करणे असेच कृत्य आहे. तसेच घटनेत मुळीच बदल करणार नाही असे म्हणणे सुद्धा चुकीचेच नाही का ? काळानुरूप आवश्यक, सर्व जनतेस हितकारक, राष्ट्रहिताचे असे काही बदल हे होतच असतात किंवा करावे लागतात असे अनेक थोर व्यक्ती व राष्ट्रपुरुषांनी सुद्धा म्हटले आहे. असे बदल भविष्यात करावे लागतीलच म्हणूनच कदाचित आपल्या घटनेस "पुरेशी लवचिक" अशी बनवली आहे.

     विरोधक म्हणत असलेल्या घटना बदलाच्या पार्श्वभूमीवर वरील सर्व बाबींचे स्मरण झाले. त्यातही "पुरेशी लवचिक" या आपल्या घटनेच्या  महत्वपुर्ण अशा वैशिष्ट्याचे स्मरण झाले म्हणून ते वाचकांसमोर प्रकट करावेसे वाटले त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी जनतेने सुज्ञतेने, अभ्यासू पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांवर विचार करावा हेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिप्रेत आहे.

१८/०४/२०२४

Article about sand smuggling

अवैध रेती मुळे होणारी प्राणहानी कशी रोखणार?

अवैध धंदे करायचे व शासन कारवाईसाठी आले की प्राणघातक हल्ले करायचे. प्रशासनास, अधिका-यांना, कायदेशीर कारवाईला हे लोक घाबरत कसे नाही ?

काल संग्रामपूर तालुक्यात रेतीची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर चालवला आणि त्यात लक्ष्मण भिकाजी अस्वार नावाच्या कोतवालाचा दुर्दैवी अंत झाला. अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये यापुर्वी सुद्धा घडल्या घडल्या आहे व घडत आहे. नदीतून अमाप रेती अवैधरित्या काढून तिची विक्री करण्यात येते. नद्यांमधून बेसुमार पद्धतीने रेतीचा उपसा केल्यामुळे त्या नद्या संकटात आल्या आहेत आणि भविष्यात त्या नष्टही होऊ शकतात. गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे सरकारने महसूल कर्मचाऱ्यांना रेती तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार अनेक ठिकाणी तहसीलदार तथा महसूल कर्मचारी रेती तस्करांवर कारवाईसाठी जातात आणि त्यांच्यावरच संकट ओढवते. यात कुठे ना कुठे पाणी नक्कीच पाणी मुरत असते व त्यामुळे रेती तस्कर हे महसूल अधिकारी , कर्मचारी यांच्यावर थेट जीवघेणे हल्ले करतात, त्यांच्यावर गाड्या चालवतात, त्यांना धमक्या देतात. या रेती तस्करांना कायद्याचा काहीही एक धाक उरलेला नाही का ? आपल्याला कोणी काही करू शकत नाही आणि आपले काहीही होणार नाही असे त्यांना का वाटते? यामुळे नाना प्रकारच्या शंका जनमानसात निर्माण झाल्या आहेत. अवैध धंदे करायचे व शासन कारवाईसाठी आले की प्राणघातक हल्ले करायचे. प्रशासनास, अधिका-यांना, कायदेशीर कारवाईला हे लोक घाबरत कसे नाही ? महसूल विभागावर सुद्धा अनेक शंका या प्रकरणात केल्या जात आहेत. सरकारला जर रेतीचा अवैध उपसा होणे टाळायचे असेल तर निव्वळ तस्करांना पकडून चालणार नाही तर रेती खरेदी करण्यावर सुद्धा काही ना काही निर्बंध लावणे आवश्यक आहे किंवा खरेदी करणाऱ्यावर रेती वरती वाढीव स्वरूपात कर आकारला गेला पाहिजे. मध्यंतरी रेती तस्करांचे होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने स्वतः रेती विकण्याचे ठरवले आणि तसेच सुरूही केले परंतु तरीही छुप्या पद्धतीने, रात्रीच्या अंधारात रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर भरून भरून रेती विक्री केली जाते. अवैध प्रकार, तस्करी हे प्रकार अनेक व्यवसायात होतात आणि त्यावरती रोख लावण्यासाठी  कठोर कायदे निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवरती थेट ट्रॅक्टर व तत्सम वाहने चालून त्यांची हत्या करण्याची या तस्करांची इतकी हिंमत होतेच कशी काय ? त्यांना कुणाचे पाठबळ आहे हे सुद्धा उघडकीस आले पाहिजे. अनेक प्रसंगी तहसीलदार तथा त्यांचे पथक जीव धोक्यात घालून या रेती तस्करांच्या मागे धावतात जीवाची तमा  न करता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही जणांचा जीव हा हकनाक जातो त्याचे कुटुंब वाऱ्यावर येते सरकार मग त्या कर्मचाऱ्यासाठी काय करते ? त्याला काय मदत होते ? याबाबत मात्र जनसामान्यात अनभिज्ञता असते. पुन्हा दैनंदिन व्यवहार सुरू होतात. पुन्हा तीच नदी आणि तेच तस्कर इतर माणसांच्या माध्यमातून तोच अवैध धंदा राजरोसपणे सुरू ठेवतात वाळूची तस्करी होणे व त्यावर कारवाई होणे यासाठी महसूल विभागाला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची तरतूद सरकारने करायला हवी तहसीलदार / नायब तहसीलदाराला आत्मसंरक्षणासाठी बंदूक बाळगण्यास परवानगी दिली गेली पाहिजे. खाण व खनिज अधिनियमात नवीन तरतुदी करणे सुद्धा आवश्यक आहे. अशा काही तरतुदी करणे आवश्यक आहे की जेणेकरून रेती तस्कर हे महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यास धजावले नाही पाहिजे. 1980- 90 च्या दशकात रेती उपसा, गौण खनिज याकडे सरकारचे म्हणावे तसे लक्ष नव्हते आणि त्यामुळे महसूल विभाग अवैध रेती उपसाकडे किंवा गौणखनीज उपज यांकडे (हेतुपुरस्सर) कानाडोळा करीत होता आणि त्यामुळे आणि आज जेंव्हा वाळू उपसा करणा-यांवर कारवाया होतात तेंव्हा हे रेती तस्कर चवताळले आहे. या व्यवसायात अनेक गरीब मजूर आहेत ज्यांना या अवैध व्यवसायामुळे रोजगार मिळतो हा पण एक भाग आहे. एकीकडून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा  असे सरकारचे प्रेशर व कारवाई केल्यावर जीव जाण्याची भीती अशी द्विधा स्थिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्या अनुषंगाने सरकारने त्वरित एखादी विशेष मोहीम हाती घेऊन यावर मार्ग काढावा असेच महसूल कर्मचारी व जनतेला वाटते आहे जेणेकरून लक्ष्मण अस्वार सारख्या इतर कुण्या कर्मचाऱ्याचा जीव जाणार नाही. अवैध रेती उपसा करणा-या तस्करांमुळे होणारी प्राणहानी कशी रोखता येईल हा सरकार समोरचा एक मोठा प्रश्न आहे. 

०४/०४/२०२४

Article about indian freedom revolutionary Shyamji Krushna Warma

श्यामजी कृष्ण वर्मा...महान तरीही उपेक्षित

कोंबडा कितीही झाकला तरी तो दिवस निघाला की आरवणारच. तसा दिवस आता निघू लागला आहे, खरा इतिहासरुपी झाकलेला कोंबडा आता आरवू लागला आहे. नुकत्याच आलेल्या काही सिनेमांमुळे लोकांना अनेक गोष्टी कळल्या आहे.  श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतींना सावरकर सिनेमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला.

श्यामजी कृष्ण वर्मा भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक अविस्मरणीय असे नांव. परंतू तरीही अनेकांना हे नांव ज्ञात असेलच असे नाही. 22 मार्च रोजी सावरकर हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात श्यामजी कृष्ण वर्मा यांना सुद्धा दर्शविले गेले आहे. नव्हे तर श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर सिनेमात दाखवणे क्रमप्राप्तच होते कारण त्यांनी ब्रिटन मध्ये क्रांतिकारकांना राहण्यासाठी "इंडिया हाऊस" नांवाची वास्तू उपलब्ध करून दिली होती. (शालेय पाठयपुस्तकात त्यांचा इतकाच उल्लेख असतो. शिवाय त्यांची जयंती, पुण्यस्मरण पण कधी कुठे होत नाही किंवा झाल्याचे ऐकिवात पण नाही.) कोण होते हे श्यामजी कृष्ण वर्मा ? लंडन मध्ये क्रांतिकारकांना त्यांनी निवासाची सोय कशी काय करून दिली ? असे प्रश्न सावरकर सिनेमा पाहिल्यावर पडले. तत्पूर्वी त्यांच्या उपरोक्त जुजबी माहितीवर समाधान मानून घेतले होते असेच म्हणावे लागेल. पण सावरकर सिनेमा पाहिल्यावर मात्र श्यामजी कृष्ण वर्मा हे नांव डोक्यात फिरू लागले. 

सावरकर सिनेमातील श्यामजी कृष्ण वर्मा

    त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले म्हणून मग घरी उपलब्ध असलेल्या सावरकर विषयक पुस्तकात त्यांच्याबाबत काही माहिती धुंडाळली व काही आंतरजालावर (Internet) शोधली. श्यामजींचा जन्म गुजरात मध्ये मांडवी कच्छ येथे 4 ऑक्टो 1857 रोजी झाला होता. शालेय शिक्षणानंतर त्यांनी अजमेर येथे वकिली केली व सोबतच स्वतंत्रता कार्यात सुद्धा सहभाग घेतला. ते बुद्धिमान व क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांच्यावर लोकमान्य टिळक व दयानंद सरस्वती यांचा प्रभाव होता. जात्याच हुशार असल्याने त्यांनी जर्मनी, इंग्लंड येथील शैक्षणिक संमेलनात सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी इंग्लंड मध्ये "द इण्डियन सोशियोलोजिस्ट" नामक मासिक सुद्धा काढले होते. ते इंग्लंड मध्ये असतांना त्यांनी हुशार भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देऊन त्यांची इंग्लंड मध्ये राहण्याची सोय केली होती. भारतात आल्यावर त्यांनी 1905 मध्ये क्रान्तिकारक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इण्डियन होम रूल सोसायटी सुद्धा स्थापित केली होती. ते संस्कृत विषयात सुद्धा चांगलेच पारंगत होते व त्यामुळेच ते ऑक्सफोर्ड विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून सुद्धा नियुक्त झाले होते. हुतात्मा मदनलाल धिंग्रा त्यांचे आवडते विद्यार्थी होते. सावरकर यांना सुद्धा वर्मांनी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. क्रांतीकारक तरुणांना मार्गर्शन, शिष्यवृत्ती, निवासादी सोय उपलब्ध करून देत असल्याने त्यांना क्रांतीगुरू असे सुद्धा म्हणत असत. नुकतीच त्यांची पुण्यतिथी झाली. 31 मार्च 1930 रोजी त्यांचे जिनेव्हा येथे निधन झाले. 1989 मध्ये जरी त्यांचे टपाल तिकीट निघाले असले तरी त्यांच्या अस्थी जिनेव्हा येथेच होत्या. त्या नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये परत भारतात आणल्या गेल्या. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगांवी म्हणजेच मांडवी येथे त्यांचे स्मारक सुद्धा बनवले गेले ज्याचे राष्ट्रार्पण 2010 मध्ये झाले. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की बुद्धिमान, क्रांतिकारी देशभक्तांची किती अवहेलना आपल्याच देशातील नेत्यांनी स्वतंत्रता प्राप्तीनंतर केली. श्यामजी कृष्ण वर्मा सारख्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन तसेच विदेशात इंडिया हाऊस ही निवासाची सोय करणा-या महान देशभक्ताच्या अस्थी विदेशातून आणण्यास आपल्याला 73 वर्षे लागली. त्यांचे स्मारक बनवण्यास 80 वर्षे लागली. सावरकरांची मालमत्ता सुद्धा जप्त झाली होती. स्वतंत्र भारतात सुद्धा सावरकरांना अटक करण्याचे दुष्कृत्य, महापातक स्वतंत्र भारताच्या आपल्याच सरकारने दोन वेळा केले होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बाबत सुद्धा किती कमी माहिती जनमानसांत आहे. याला कारण म्हणजे स्वातंत्र्य फक्त काही लोकांमुळेच व त्यांच्याच तत्वांमुळे मिळाले हे सिद्ध करण्याचा स्वातंत्र्योत्तर काळात केलेला अट्टाहास. परंतू असे करणे, खरा इतिहास दडपून  टाकण्याचा प्रयत्न करणे हे काही चिरकाल टिकणारे नसते. कोंबडा कितीही झाकला तरी तो दिवस निघाला की आरवणारच. तसा आता दिवस निघू लागला आहे, खरा इतिहासरुपी झाकलेला कोंबडा आता आरवू लागला आहे. 370 , काश्मीर फाईल, केरला स्टोरी, सावरकर यांसारख्या सिनेमांमुळे लोकांना अनेक गोष्टी कळल्या आहे. लोक विचार करू लागले आहेत. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतींना सावरकर सिनेमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. नुकतीच वर्मा यांची  पुण्यतिथी झाली. वर्मा यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. आजच्या काळात सुद्धा अनेक भारतीय विदेशात जात आहेत परंतु त्यांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारा श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासारखा तिकडे कुणी नाही. असेल का ? असल्यास त्याला नमन. श्यामजी कृष्ण वर्मा यांना विनम्र अभिवादन.