... अरे राजू रिटायर्ड पण झाला !
समय का पहिया चलता है, दिन ढलता है रात आती है |
यानुसार काळ झपाट्याने पुढे सरकत असतो इतका वेगाने की बऱ्याच वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना सुद्धा अगदी काल-परवा घडून गेल्यासारख्या वाटतात. मी शाळकरी विद्यार्थी असतांना राजू महाविद्यालयीन जीवनात होता. वयाने माझ्यापेक्षा आठ वर्षांनी जेष्ठ. आम्ही सर्वच बहिण भावंडे एकमेकांशी मित्रत्वाने वागत असू, खेळीमेळीने राहत असू.
कई साल हमने गुजारे यंहां
यंही साथ खेले हुये हम जवान
था बचपन बडा आशिकाना हमारा
आमचे बालपण पण असेच रम्य म्हणून या ओळी आम्हाला पण लागू पडतात. हायस्कूलमध्ये गेल्यावर राजूने एकदा विज्ञान प्रदर्शनासाठी पाणचक्कीचे युनिट बनवल्याचे मला आठवते. तेव्हाच मला राजू म्हणजे खूप हुशार मुलगा असे वाटू लागले आणि तसा तो आहे सुद्धा. गणितामध्ये एकदम हुशार म्हणून त्याने विज्ञान शाखा निवडली होती. त्याचे हस्ताक्षर एकदम वळणदार. त्याची पेन पकडण्याची लकब सुद्धा एकदम निराळीच. तो चार बोटांनी पेन पकडतो, करंगळीचा सुद्धा आधार असतोच. अशा पद्धतीने पेन पकडून लिहिणारे लोक अगदी विरळच आहेत. राजू एन.सी.सी. मध्ये अंडर ऑफिसर होता. बऱ्याच वेळा मी त्याला बुटाला पॉलिश करतांना, बेल्ट आणि बॅजला ब्रासो लावतांना न्याहाळात बसत असे. एकदा काँग्रेस भवन वरील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला तो पायलट (प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्यासाठी घेऊन जाणारे राष्ट्रीय छात्र सेनेचे जवान) झाला होता आणि मी जूनियर डिव्हिजन मध्ये परेडला होतो. तेव्हा मी माझ्या मित्रांना अभिमानाने सांगितले होते की, "तो बघा तो पायलट झालेला मुलगा आहे ना तो माझा मोठा भाऊ आहे." पुढे पोलीस खात्याचे अधिकारी त्याला ध्वजारोहणासाठी घेऊन जाऊ लागले. आमच्या भावंडांमध्ये ऑफिसर बनवण्याची त्याची एकट्याचीच प्रबळ इच्छा/जिद्द होती आणि तो झाला सुद्धा. Not failure but lower aim is crime ही म्हण मला राजूनेच सांगितल्याचे स्पष्ट स्मरण आहे. तो नेहमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मग्न असे. त्या काळात त्याला इतर नोकऱ्या आवडत नसत. त्याचे इंग्रजीवर पण प्रभुत्व आहे. वृत्तपत्र बातम्या यातील मर्म तो व्यवस्थित समजून घेतो. त्या काळी तो दस्तुर रतनजी ग्रंथालयाचा वाचक सभासद होता. बऱ्याच वेळा तो त्याच्या मित्रांकडे मला त्याच्या लॅम्ब्रेटा स्कूटरवर घेऊन जात असे. त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यामुळे मला सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली होती. पण कदाचित मी ते कार्य म्हणावे तितके समर्पित होऊन केले नसेल म्हणून दुसरीकडे वळावे लागले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आम्ही दोघे रोज सायंकाळी गो.से.महाविद्यालयात धावणे, गोळा फेक यासाठी जात असू. अनेक विषयांवर चर्चा व अनेक बाबी आम्ही एकमेकांशी 'शेअर' करीत असू. तो नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जेव्हा जायचा तेव्हा मला मोठे कौतुक वाटायचे तिथे सुद्धा त्याने नाटक वक्तृत्व यांमध्ये भाग घेऊन त्याचा ठसा उमटवला होता. वक्तृत्व गुण तर त्याच्यामध्ये बालपणापासूनच आहे. बालपणी त्याने अनेक भाषण स्पर्धात बक्षिसे प्राप्त केली आहे. राजू सुरुवातीपासूनच टापटीप राहण्याकडे आणि शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देत आलेला आहे. हस्त प्रक्षालन आणि मुख प्रक्षालन याचे महत्त्व त्याने बालपणापासूनच जाणले आहे. त्याचे हे गुण व एकूणच व्यक्तिमत्त्व हेरून आमच्या मोठ्या वहिनींचे वडील स्वर्गवासी बाबुराव डांगे हे त्याला तो नोकरीला लागायच्या आधीपासूनच तहसीलदार साहेब म्हणत असत. त्यांचे वचन खरे ठरले, पुढे तो तहसीलदार झालाच. तहसीलदार होण्यापूर्वी तो खामगावला अल्पबचत अधिकारी होता. अल्पबचत अधिकारी असतांना त्याने अनेक लोकांना बचत खात्यांचे एजंट होण्यास प्रेरणा दिली होती. ते लोक आजही मला भेटले की वरणगांवकर साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे असे सांगतात. उदा सौ. चितलांगे आणि श्री झोपे. तो खामगांवला अल्पबचत अधिकारी असतांना बरेचदा अनेक लोक मलाच अल्पबचत अधिकारी समजून माझ्याशी बचत खाते वगैरेची चर्चा करायला सुरुवात करत मग मी त्यांना तो मी नसून माझा भाऊ आहे असे सांगत असे. मग त्या अनोळखी लोकांशी माझा परिचय होऊन गेला व आजही आहे. त्याला खाद्यपदार्थ तेही उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ खाण्यात, फळे खाण्यात मोठा रस आहे. त्याच्या आणि माझ्या बऱ्याच आवडीनिवडी मध्ये साम्य आहे. पोहणे आम्हाला दोघांना प्रचंड आवडते. तो नोकरीला लागल्यापासून ज्या-ज्या ठिकाणी त्याने नोकरी केली आहे त्या-त्या सर्व ठिकाणी देवीची प्रख्यात मंदिरे आहेत असे माझे निरीक्षण आहे. मुंबई ते महागाव पर्यंत प्रत्येक ठिकाणी सुप्रसिद्ध अशी देवीची मंदिरे आहेत. यांमुळे त्याच्यावर देवीची कृपा असल्याचे वाटते. तहसीलदार म्हणून त्याची कारकीर्द ज्या ठिकाणी तो होता त्या प्रत्येक गावी गाजली आहे. अनेक ठिकाणी त्याने अवैध रेतीवाल्यांवर कारवाई केल्यामुळे, त्यांचे ट्रॅक्टर स्वतः चालवत आणून जप्त केल्याने, त्यांचा पिच्छा करून त्यांना पकडल्याने त्याला "दबंग तहसीलदार" असे संबोधन प्राप्त झाले. कार्यालयीन शिस्त, कामकाजात शिस्त ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असे. वेळे प्रसंगी शेरोशायरी करून हास्यविनोद करून तो त्याच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असे. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा त्याने व्यवस्थित संबंध ठेवले. वरिष्ठ त्याच्या कामगिरीवर खुश असत. त्याच्या कामकाजाच्या शैलीने जनतेला प्रभावित करून सोडले होते. राजू जेंव्हा अल्पबचत अधिकारी म्हणून नियुक्त झाला होता त्यात सुमारास राजू बन गया जेंटलमॅन हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि त्या चित्रपटात
"अपना राजू हिरो है
और हम सब उसके फॅन
की राजू बन गया जेंटलमेन"
असे गाणे होते या योगायोगामुळे जणू सर्व वरणगांवकरांच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त झाली होती. आजकाल सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा मोठा समारंभ केला जातो. खानदेशात ही प्रथा फार पूर्वीपासून आहे तिथे तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची मिरवणूक सुद्धा काढतात. म्हणूनच राजूच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे कुठेतरी मनात वाटत होते परंतु पारिवारिक अडचण व उन्हाळ्यानंतर शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. वडील नायब तहसीलदार आणि भाऊ तहसीलदार असल्याने मी महसूल विभागाला जवळून अनुभवले आहे. हल्ली गढूळ झालेल्या या विभागात जनतेची कामे करणारे, वाम मार्गाने न जाणारे असे अधिकारी क्वचितच आढळतात. तशा कर्तव्यदक्ष अधिका-यांतील एक अधिकारी राजू , आज तो सेवानिवृत्त होत आहे ही शासनाची सुद्धा हानीच म्हणावी लागेल. परंतु सेवानिवृत्तीनंतर तो निश्चितच काही तरी वेगळे व चांगले करेल अशी खात्री आहे. ज्यांना-ज्यांना मी राजू रिटायर्ड होतो हे सांगितल्यावर त्यांनी "अरे राजू रिटायर्ड पण झाला !" असे आश्चर्य कारक उद्गार काढले , समय का पहिया इतक्या वेगात पुढे सरकला हे त्यांच्या पण लक्षात आले नाही.
आगामी वाटचालीसाठी, निरोगी व उदंड आयुष्यासाठी राजूला शुभेच्छा ! आणि ही लेखरुपी छोटीसी भेट.
लिहावेसे असे खुप आहे परंतु लेख प्रदीर्घ होईल नव्हे झालाच आहे. करीता विराम देतो. राजूला कविता/शायरी हे आवडतात म्हणून या स्वरचित ओळी
ये सफर मैने तय किया
मेरी अपनी अदा से|
आगे भी और कुछ करूँगा
आपके प्यार और साथ से |
✍️ विनय वि.वरणगांवकर©
30/06/24