"वन्स मोअर" चा "शोर"
पहिलीच्या मराठी कवितेबाबत प्रतिक्रिया देतांना मंत्री महोदय म्हणतात की, " प्रॅक्टिकल राहायला पाहिजे" ही प्रतिक्रिया देतांना सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल या शब्दाला मराठीतील व्यवहारीक हा पर्यायी शब्द आठवला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात "जंगलात ठरली मैफल" कवितेत माऊस, वन्स मोअर हे इंग्रजी भाषेतील तसेच शोर हा हिंदी भाषेतील शब्द आल्याचे वृत्त परवा विविध वाहिन्यांवर सुरु होते. आपली मराठी भाषा, माय मराठी, माझी मराठी, आम्ही मराठी, मराठी माणूस, मराठी शाळा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, सरकारी कार्यालयांचे कामकाज मराठीतून करा, दुकानांवर मराठीत पाट्या लावा. अशा मागण्या, मुद्दे व मराठी भाषेबाबतचा ऊहापोह हा अनेकदा होत असतो. प्रत्यक्षात शुद्ध मराठी बोलतांना किंवा बोलायचे झाले तर आपली त..त.. , प..प होते, विशेषतः हल्लीच्या इंग्रजाळलेल्या पिढीची तर होतेच होते. बालभारतीच्या इयत्ता पहीलीच्या मराठीच्या पुस्तकातील नृत्यांगना व निवेदक असलेल्या पूर्वी भावे यांच्या कवितेबाबत व त्या कवितेत वापरलेल्या इंग्रजी व हिंदी भाषेतील शब्दांबाबत बोलतांना शिक्षण मंत्री केसरकर साहेब काय म्हणाले ते प्रथम वाचा, केसरकर साहेब म्हणतात "वन्स मोअर ला पर्यायी शब्द आहे का ? शेवटी यमक जुळवण्यासाठी एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार बाऊ केला पाहिजे असे नाही. आपण टेबल हा शब्द वापरतो हा शब्द मराठी आहे का. मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द आहेत त्याला पर्यायी शब्द आलेले नाहीत. त्यामुळे आपण थोडं प्रॅक्टिकल राहायला पाहिजे" दीपक केसरकर साहेबांनी अशी प्रतिक्रिया काल दिली. आपल्या मातृभाषेबाबत मंत्री महोदय म्हणतात की प्रॅक्टिकल राहायला पाहिजे ही प्रतिक्रिया देताना सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल या शब्दाला मराठीतील व्यवहारीक हा पर्यायी शब्द आठवला नाही. असे त्यांचेच नव्हे तर अनेकदा आम्हा सर्व मराठी जनांचेही हल्ली होत असते. हा दोष आपलाच आहे. देशातील इतर भाषिकांपेक्षा मराठी माणसाचे भाषा प्रेम हे थोडे कमीच आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. केसरकर म्हणतात की टेबलसारख्या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाही. यावर असे सांगावेसे वाटते की, कोण म्हणते पर्यायी शब्द नाही ? ते तर फार पूर्वीपासून आहेत. परंतु इंग्रजाळलेल्या नवीन पिढीला टेबलला मेज म्हणतात असे कोणी शिकवलेच नाही. घरी सुद्धा कोणी मेज म्हणत नाही आणि शाळेत सुद्धा त्याला कोणी टेबल म्हणजे मेज असे शिकवत नाही. वन्स मोअरला आपण "पुन्हा एकदा" असे म्हणू शकतो. शिवाजी महाराजांनी त्या काळात मराठी शब्दकोश केला होता. सावरकरांसारख्या अनेक भाषाप्रभू व्यक्तींनी कितीतरी इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिलेले आहेत परंतु त्याचा वापर करण्यात आपण कमी पडतो. केवळ मराठी दिनापुरतेच मराठीचे गोडवे गायचे आणि इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठीत पर्याय नाही असे म्हणायचे हे चुकीचेच आहे. मराठी शब्दांचा वापर करण्यात आपण कमी पडतो असे म्हणण्याचे कारण की, बरेचदा आपण बाजारपेठेत, प्रवासात असतांना कुणी व्यक्ती भेटल्यास किंवा दुकानदाराशी संवाद साधताना मराठी असूनही आपण हिंदीत/इंग्रजीत बोलण्यास सुरुवात करतो. काही वेळा तर आपण हिंदीत बोलतो व त्यास समोरच्याकडून मराठीत प्रतिसाद येतो. मग आपल्याला तो व्यक्ती मराठी असल्याचे कळते. कधी-कधी तर हिंदी भाषिक आपल्यासोबत मराठीत बोलतो पण आपणच हिंदी बोलू लागतो. याचा अर्थ हिंदी ही आपली राष्ट्रभाषा बोलूच नाही किंवा तिचा द्वेष करावा असा नाही परंतु बोलतांना प्रथम आपल्या मातृभाषेचा प्रयोग करायला हवा. मराठी बोली भाषेत हल्ली इंग्रजी भाषेतील व हिंदी भाषेतील शब्दांची इतकी सरमिसळ झाली आहे की आपल्याला त्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुद्धा आठवत नाही. म्हणूनच केसरकर साहेबांनी टेबल या मराठीत मिसळलेल्या शब्दाचे उदाहरण दिले. टेबल व टेबल सारखे पेन, बाईक, माईक, ऑफिस, कॉलेज, फोटो इत्यादी अनेक शब्द मराठी भाषेत इतके मिसळले आहेत की आपण टेबलला असलेला मेज हा पर्यायी शब्द कधीच वापरत नाही. तसेच बाईकला दुचाकी, माईकला ध्वनिक्षेपक, ऑफिसला कार्यालय आणि कॉलेजला महाविद्यालय सुद्धा अभावानेच म्हणतो. फोटोला कुणी छायाचित्र व true copy ला कोणी सत्यप्रत म्हटले तर त्याच्याकडे असे पाहिले जाते जणू काही तो कोणती दुसरी भाषा बोलतो आहे की काय ! मुद्दा हा आहे की मराठी भाषेमध्ये अनेक नामवंत कवी होऊन गेले असतांना व त्यांच्या शुद्ध मराठीत असलेल्या अनेक कविता असतांना भाषा विषयाची समिती असे इंग्रजी व हिंदी शब्द असलेली मराठी कविता अभ्यासक्रमात निवडतेच कशी ? अगदी लहानपणी हिंदी व इंग्रजी शब्द असलेली मराठी कविता विद्यार्थी शिकतील मुखोद्गत करतील तर त्यांना शोर, माऊस, वन्स मोर हे शब्द मराठीच शब्द असल्याचे वाटणार नाही का? असा प्रश्न पडतो. पुर्वी बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांच्या मध्ये खूप सुंदर अशा कविता असायच्या की ज्या आजही अनेकांच्या मुखोद्गत आहे.
तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड झाडावर धिवराची हाले चोच लाल जाड
तसेच रोपट्या विषयीची ही पुढील कविता
आज ये अंगणा पाहुणा गोजिरा, ये घरा आमुच्या सोयरा साजरा
व ही पुढील बालकविता
वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणाटणा वाटेत भेटला तिळाचा कण
अशा कितीतरी सुंदर कवितांचा अभ्यासक्रमात समावेश असे. परंतु हल्लीच्या अभ्यासक्रमात विषय समित्या कविता, पाठांची निवड कशी करते ? त्यासाठी कोणते निकष असतात ? ते जाहीर होणे गरजेचे झाले आहे. ज्ञानेश्वर माऊली, केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे, टिळक, आगरकर, सावरकर, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मराठी शाळा मरणासन्न स्थितीत आहे. इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झाला आहे. मराठी शाळांमधल्या शिक्षकांवर गंडांतर आलेले आहे. इंग्रजी शाळेतल्या मराठी बाबूला एकोण ऐंशी म्हटले की समजत नाही त्याला सेव्हंटी नाईन असे सांगावे लागते अशी स्थिती आहे. भाषा टिकवण्याची आपणा सर्वांचीच तसेच शासनाची सुद्धा जबाबदारी आहे. मंत्री महोदयच जेंव्हा मराठी भाषेत इंग्रजी व हिंदी शब्द आले असता त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाही म्हणून थोडे प्रॅक्टिकल (त्यांच्या भाषेत) अर्थात व्यवहारीक व्हावे लागेल असे म्हणतात तेव्हा आगामी काळात "माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके" असे ज्या मराठी भाषेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केले होते त्या मराठी भाषेची काय दशा असेल असा प्रश्न मराठी भाषिक मराठी प्रेमी असलेल्या जनतेच्या मनात निश्चितच उपस्थित होत असेल.