...थानेदार आया है
श्रीनिवास ठाणेदार |
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही सत्ता प्राप्तीसाठी मोफत योजनांची आश्वासने व ज्या जुन्या योजना आहेत त्यातून मिळणाऱ्या निधीमध्ये सुद्धा वाढ करून देण्याच्या आश्वासनांची खैरात लुटत आहे. विविध पक्षातील विविध नेते हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. येन केन प्रकारेण जोरात प्रयत्न सुरू आहे, असे वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. तर तिकडे अमेरिकेतील निवडणूक संपन्न झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. अमेरिकेत अनेक भारतीय लोक कित्येक वर्षापासून स्थायिक आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या नेत्या सुद्धा उभ्या होत्या परंतु त्यांना विजयी मात्र होत आले नाही. ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत तसेच ट्रम्प यांनी भारताचा आशिया खंडातील एक शक्ती असा उल्लेख यापूर्वी केला आहे. ट्रम्प यांचा आगामी कार्यकाळ भारतासाठी कसा असेल हे लक्षात येईलच. अमेरिका किंवा इतर देशातील निवडणुका आणि भारतातील निवडणुका यांच्यात खूप मोठा फरक आहे पण त्याच्या विश्लेषणात आपल्याला जायचे नाही. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका येत्या 20 नोव्हे रोजी होत आहे. या निवडणुकीत काका-पुतणे, भाऊ-भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत असले तरी तिकडे अमेरिकेच्या निवडणुकीत मात्र एक मराठी उमेदवार खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहे. त्यांचे नाव आहे डॉ. श्रीनिवास ठाणेदार. डॉ. ठाणेदार यांचा जन्म बेळगाव मध्ये झाला असून ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहे. अल्प उत्पन्न कुटुंबात वाढलेल्या ठाणेदार यांचे वडील वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्त झाले. लहान वयातच ठाणेदार यांनी त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अनेक नोकऱ्या केल्या. रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना बँकेत नोकरी लागली परंतु विज्ञान शाखेनंतर बँकेत का नोकरी करायची म्हणून त्यांनी बी. ए. आर. सी. म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर या नामांकित संस्थेत नोकरी केली. 1979 मध्ये ते अमेरिकेत गेले, आणि 1988 मध्ये ते अमेरिकेचे नागरिक झाले. अमेरिकेच्या अक्रोन विद्यापीठात त्यांनी पीएचडी केली आणि नंतर पॉलिमर उद्योगात प्रवेश केला. त्यांनी अनेक बुडीस जाणाऱ्या उद्योग , कंपन्या विकत घेऊन त्या कंपन्यांना नफ्यात आणले. 2018 मध्ये ते राजकारणात उतरले आणि मिशिगन गव्हर्नेटरीय निवडणुकीत डेमोक्रॅट म्हणून उभे राहिले. नोव्हेंबर 20 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि जानेवारी 21 मध्ये त्यांनी खासदार पदाची शपथ घेतली. ठाणेदार यांनी 2021 ते 2023 पर्यंत मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य म्हणून काम केले. आता ते पुन्हा दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. त्यांनी काही पुस्तके सुद्धा दिली आहेत. "This is Shri's Wish" हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. 69 वर्षे वय असलेले ठाणेदार यांचे कर्नाटक विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील अक्रोन विद्यापीठ येथे शिक्षण झाले आहे. अशी ही श्रीनिवास ठाणेदार यांची माहिती आहे.
भारतातील निवडणुका म्हटल्या की जातीपातीचे-धर्माचे राजकारण, चुनावी जुमले, फोडाफोडीचे राजकारण, या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या, या पक्षातून त्या पक्षात पक्षनिष्ठा दावणीस बांधून जातांना सुद्धा केली जाणारी प्रसिद्धी, मतदारांना, कार्यकर्त्यांना प्रलोभने, नागरिकांना लावलेली फुकटची सवय या सगळ्या गोष्टी येतात. अमेरिकेत व इतर देशात मात्र विकासात्मक आणि विकासाच्या भोवती राजकारण फिरते. देशहित आणि देशाचा विकास या मुद्द्यांवरती निवडणूका होतात. उमेदवारी मिळवताना तेथील अनेक कंपन्या या उमेदवारांचा पूर्ण इतिहास शोधून काढतात आणि त्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडून मगच उमेदवारी निश्चित केली जाते. त्यामुळेच श्रीनिवास ठाणेदार यांचा विजय हा उल्लेखनीय व गौरवास्पद आहे. एक भारतीय मराठी माणूस अमेरिकेत काय जातो आणि तेथील आपल्यापेक्षा शिस्तबध्द, नियमबद्ध निवडणूक प्रक्रिया पार पाडून सलग दोन वेळा खासदार बनतो हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे आणि म्हणूनच ...थानेदार आया है असे हिंदीत म्हणावेसे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा