कौन बनेगा आमदार ?
जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून अनेक अपेक्षा असतात त्यांची पूर्तता विजयी उमेदवाराने करायची असते. खामगाव शहरात असलेली पाणीटंचाई आणि सतत विस्कळीत होणारा पाणीपुरवठा हा यक्षप्रश्न विजयी उमेदवाराने त्वरीत निकाली काढणे हीच खामगाव शहरवासियांची अपेक्षा विजयी उमेदवाराकडून राहील.
काल महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये मोठे वाक्-युद्ध रंगले होते. तसेच घोषणांचा मोठा पाऊस पडला. अनेक ठिकाणी उमेदवार म्हणून नातेवाईकच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अनेक मतदान केंद्रांवर शिवीगाळ, हल्ले होणे, जखमी होणे असे प्रकार घडले. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर घड्याळाचे चित्र असलेल्या चिठ्ठ्या वाटपाचा आरोप झाला. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला होणे, अमरावतीला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर जमावाचे धाऊन जाणे असे प्रकार घडले. करोडो रुपयांची रक्कम सुद्धा या निवडणुकीदरम्यान जप्त झाली. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे सुद्धा पैसे वाटप करताना आढळून आले. अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. महायुती व महाआघाडी या दोघांनीही मतदारांना अनेक काही गोष्टी देण्याचे आश्वासन दिलेले आहे. महायुतीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना विजयाची खात्री आहे, शिवाय त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम सुद्धा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे त्यांना त्याचा फायदा या निवडणुकीत होणार असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. परंतु जनतेच्या पैशाची अशी खैरात वाटणे हे राज्याच्या हिताचे नाही तसेच अशा योजनांमुळे जनतेला श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व वाटत नाही. या निवडणुकीत मोदी व योगी यांनी "बटेंगे तो कटेंगे" आणि "एक है तो सेफ है" हे जे दोन नारे दिले त्या ना-यांमुळे त्याचा फायदा महायुतीला होणारच अशी त्यांना खात्री वाटत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर यंदाच्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा चांगले मतदान केल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे परंतु तरीही पुणे, ठाणे, नागपूरसारख्या इतरही मोठ्या शहरातील मतदारांचा उत्साह मात्र कमीच आढळून आला. काही शहरांमध्ये अनेक निवासी संस्थांमध्ये (रहिवासी फ्लॅट / सोसायटी) मतदानाची केंद्रे यंदा होती तरीही शहरांमधील मतदानाची कमी झालेली टक्केवारी ही आश्चर्य वाटेल अशीच आहे. यंदा अनेक छोट्या शहरातील मोठ्या शहरात शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी गेलेले नव मतदार व तरुण मतदारांना आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. ती कितपत यशस्वी झाली ठाऊक नाही परंतु मतदानवाढीसाठी तो एक चांगला व स्तुत्य प्रयत्न आहे. आपल्या खामगाव मतदारसंघात सुद्धा यावेळेस मोठी चुरस दिसून आली. खामगाव मतदारसंघात एकूण 18 उमेदवार उभे होते. मुख्य लढत भाजपचे आकाश फुंडकर तर काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांच्यातच आहे. इतर ठिकाणाप्रमाणे खामगावात सुद्धा उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्याचे चित्र दिसून आले. खामगाव मतदारसंघात मोठ्या सभा एखाद दोनच झाल्या. प्रचारात मोठी चिखलफेक एकमेकांवर करण्यात आली. काँग्रेस उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांच्याबाबत सर्वत्र प्रसारित झालेले पत्र आणि ते पत्र खोटे असल्याची त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली तक्रार हा मुद्दा चांगलाच गाजला. तसेच मतदान केंद्रावरती बाचाबाची करणे, शिवीगाळ करणे असे प्रकारही खामगांव येथे झाले. दिलीपकुमार सानंदा यांच्या विषयीचे समाज माध्यमांवर प्रसारित झालेले ते पत्र धादांत खोटे असल्याचे दिलीपकुमार सानंदा यांनी व्हिडिओ प्रसारित करून सुद्धा स्पष्टीकरण दिले. खामगावात भाजप व काँग्रेस या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावला असल्याचे चित्र दिसले. भारतातील निवडणुका म्हटल्या की जात-पात आणि धर्म हे येतेच त्या अनुषंगाने खामगावातील दोन्ही उमेदवारांच्या मागे विविध जाती धर्म व समाजातील त्यांच्या परंपरागत मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसले. खामगाव मतदारसंघात अनेकांशी संपर्क केल्यावर असे दिसून आले की भाजप व काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये कोणीही एक जर निवडून आला तर तो फार कमी फरकाने निवडून येईल असेच मत सर्वांचे दिसून आले. ग्रामीण भागात जे मतदान झाले त्या मतदानाची टक्केवारी सुद्धा चांगली झालेली आहे आकाश फुंडकर यांना त्यांनी खामगाव शहरात केलेल्या विकास कामांमुळे तसेच गतकाळात ग्रामीण भागात झालेल्या जलयुक्त शिवारसारख्या कामांमुळे आत्मविश्वास आहे तर नेहमीच चर्चेत असलेले दिलीपकुमार सानंदा हे दहा वर्षानंतर उभे असल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या कार्यामुळे त्यांनाही विजयाची आशा आहे. जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून अनेक अपेक्षा असतात त्यांची पूर्तता विजयी उमेदवाराने करायची असते. खामगाव शहरात असलेली पाणीटंचाई आणि सतत विस्कळीत होणारा पाणीपुरवठा हा खामगावकरांचा एक यक्षप्रश्न आहे तो विजयी उमेदवाराने गांभीर्याने व त्वरित निकाली काढणे हीच सर्व खामगाव शहरवासियांची अपेक्षा विजयी उमेदवाराकडून राहील. तसेच विजयी उमेदवाराने खामगावातील इतर अनेक समस्या निकाली काढाव्या, खामगाव मतदारसंघात रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न करावे ही सुद्धा आशा तमाम मतदारांना आहे. आता 23 तारखेपर्यंत खामगावकर जनतेसोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील जनतेला त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात कौन बनेगा आमदार ? हाच प्रश्न पडलेला राहील.
Khup chhan lekh pan janata jagrukh hone garajeche aahe janatach jar paise yenyachi vat palate tar netyana kay bolave pan aamdar AAKASH FUNDAKAR
उत्तर द्याहटवा