मोदी, वनतारा आणि लहान वन्यजीव ? World Wildlife Day Special
दिनांक 2 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी जामनगर गुजराथ येथील वनतारा या उद्योगपती अंबानी यांच्या हजारो एकर परिसरात बनवलेल्या वन्यजीव उपचार. संवर्धन, संरक्षण प्रकल्पाचे उद्घाटन केले. 3000 एकरच्या रिलायंस रिफायनरीच्या परिसरात असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मानवी वस्तीत सापडलेल्या, जखमी झालेल्या तसेच ज्यांना उपचाराची गरज आहे अशा वन्य प्राण्यांवर उपचार केले जातील अशी सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून अंबानी करणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे वन्यजीव प्रेम सर्वश्रूत आहे. भारतातून चित्ते लुप्त झाले होते ते आणण्याचे कार्य मोदी यांच्याच कारकिर्दीत झाले. आता या आणलेल्या चित्त्यांची नवीन पिढी सुद्धा तयार झाली आहे. यापूर्वी सुद्धा मोदी यांची वन्यजीव, जंगल भेट, मोरांना खाऊ घालणे या प्रकारची चित्रे, चलचित्रे अनेकदा प्रसारित झाली आहेत. परवापासून मोदी यांच्या वनतारा भेटीच्या रील्स समाज माध्यमांवर लोकप्रिय होतांना दिसत आहे. वनतारा हा अंबानी यांचा वन्यजीव प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा आहे.
या भारतात अनादी अनंत काळापासून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण दिली गेली आहे. कण्व ऋषींची कन्या शकुंतला ही सुद्धा जखमी , अनाथ अशा हरणांच्या शावकांची देखभाल आश्रमात करीत असल्याचे महाकवी कालीदास यांच्या " अभिज्ञान शाकुंतलम" या ग्रंथात वर्णन आहे. चक्रधर स्वामींच्या मांडीवर वाघांची पिले येऊन बसत. भारतात वन्यजीव वा पाळीव प्राणी यांच्यावरील प्रेमाचे कित्येक दाखले देता येतील पण पुढे आधुनिक काळात भारतातून इंग्रजांच्या गच्छंतीपुर्वी मुघल सम्राट व इंग्रज यांनी भारताच्या समृद्ध जंगलातून वारेमाप शिकारी केल्या. शिकार करणे म्हणजे तत्कालीन मनोरंजनाचे साधन होते, एक खेळ होता. अनेक भारतीय राजे-महाराजे शिकारीसाठी म्हणून दूर-दूर जात, जंगलातच मुक्काम ठोकत. शिकार झाली की वाजत गाजत गावात येत व मोठ्या हौशेने वन्यप्राण्यांचे मुंडके आपल्या दरबारात लावत. त्यांचे कातडे आसन म्हणून वापरत. अशाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारींमुळे पट्टेदार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. अगदी गत महिन्यात सुद्धा चंद्रपूर जंगलात एक वाघांचा शिकारी पकडल्या गेला. चीन पर्यंत त्याचे धागे दोरे जुळले आहेत. यावर उपाय योजना म्हणून वाघांचे संवर्धन, टायगर प्रोजेक्ट निर्माण झाले. शिकारीवर बंदी आणली गेली, अभयारण्ये निर्माण केली गेली. जंगल कायदा मात्र तोच इंग्रजांनी तयार केलेला. अनेक मोठ्या जीवांचे संवर्धन झाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल, हरीण व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या एवढी वाढली की, शहरात बिबट व अस्वल घुसू लागली तर हरणे व रोही शेतक-यांची डोकेदुखी झाली. परंतू हे घडण्याचे कारण सुद्धा मानवच आहे कारण ज्या जमीनीवर पुर्वी वन्यजीवांचा हक्क होता त्या जमिनीवर आता मानवाने कब्जा केला आहे. त्यांच्याच जमिनीवर ते आले की आपल्याला ते आपल्या हद्दीत घुसले असे वाटते. कर्नाटकातील दोडामार्ग येथील हत्तींच्या मार्गात मानवी वस्त्या, शेती झाल्याने त्यांच्या पुर्वीच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवामुळे मग त्यांना निर्घुणपणे मारण्याच्या घटना सुद्धा घडतात. भारतात कितीतरी एकर जमीन जंगलांनी व्यापली आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त वन जमीन आपल्या विदर्भात आहे. परंतू निव्वळ जंगले असून चालणार नाही तर तेथील वन्यजीव संपदा सुद्धा टिकली पाहिजे ती टिकण्यासाठी सरकारसोबत जनतेला, वन्यजीव प्रेमींना सुद्धा अग्रेसर व्हावे लागेल.
03 मार्च हा दिवस "जागतिक वन्य प्राणी दिन" म्हणून साजरा केला जातो. वनतारा प्रकल्पास मोदी यांची भेट तसेच जागतिक वन्य प्राणी दिन या औचित्याने इथे असे निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की, वनविभाग व सरकार यांचे लक्ष हे केवळ मोठ्या वन्यजीवांच्या संवर्धनाकडेच असल्याचे दिसते. एकीकडे वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रोही यांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे मात्र रानससे, तितर, बटेर (बाटी) / लावरी, टोयी (लहान पोपट) हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा होत आहे ? , कोण करत आहे ? वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही ? जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठी, जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे लहान वन्यजीव नाहीत का ? तर लहान वन्यजीव सुद्धा आवश्यकच आहे परंतू केंद्र व राज्य सरकारचे मात्र लहान वन्यजीव संवर्धनाकडे मात्र लक्ष नाही असे जाणवते. जंगल भ्रमंतीस गेल्यावर रानससा मुळी दिसतच नाही किंवा कुणाला दिसल्याचे ऐकीवात येत नाही. जंगल भ्रमंती करून आल्यावर समाज माध्यमांवर लोक जे फोटो पोस्ट करतात त्यात कधीही रानससा, साळीन्दर, टोयी (लहान पोपट ) तितर यांचे फोटो शेअर केल्याचे दिसत नाही. वन्यजीवांची जेंव्हा शिरगणती होते त्यात सुद्धा या प्राण्यांची संख्या दिलेली दिसत नाही. वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिकारी व दुर्लक्ष यामुळे आज चित्त्यासारखा चपळ, तेज, सुंदर प्राणी भारतातून केंव्हाच लुप्त झाला होता परंतू सरकारने आता काही चित्ते आफिकेतून आणले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आज कित्येक फुलपाखरांच्या जाती लुप्त झाल्या आहेत.
आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त लहान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सुद्धा पाऊले उचलली गेली पाहिजे, वन्यजीवप्रेमींनी सुद्धा यावर विचार करायला हवा.
दिनांक 03/03/2022 रोजी याच विषयावर लिहिलेल्या लेखाची ही नवीन आवृत्ती.
टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापर करू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये.
खूप छान लिहिले आहे. लहान वन्य जीव सुरक्षीत असणे गरजेचे आहे
उत्तर द्याहटवा