Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०३/२०२५

Article about statements of leaders on history

 इतिहास मत पूछो ! 

इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही  दिवसांत तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात संदर्भहीन भाष्ये करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या लेखाचे जे शीर्षक आहे ते वाक्य सतत आठवत आहे. माणसाच्या स्मरणात काय राहील काही सांगता येत नाही. या वाक्याचे सुद्धा तसेच आहे. माझा ज्येष्ठ बंधू कनिष्ठ महाविद्यालयात असतांना त्यांना संगारे सर इतिहास शिकवत असत. मी सुद्धा संगारे सरांचा विद्यार्थी राहिलेलो आहे ते इतिहास खूपच चांगला शिकवत असत. तर एकदा माझ्या ज्येष्ठ बंधूच्या इतिहासाच्या पिरेडला कुणीतरी विद्यार्थ्यांनी संगारे सर येण्याच्या आधीच फळ्यावर "इतिहास मत पूछो" असे लिहून ठेवले होते. सर आल्यावर त्यांनी त्या लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मी एकदा हे वाक्य एका ॲटोच्या मागे लिहिले असलेले सुद्धा पाहिल्याचे मला स्मरते. काही लोक भेटल्यावर अनेक गोष्टींची विचारणा, नसत्या चौकशा करत राहतात या उद्देशातून खरे तर हे इतिहास मत पूछो वाक्य म्हटले गेलेले आहे. पण आपल्या भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सतत ऐतिहासिक घटना, महापुरुष, खलनायक यांच्याबद्दल जी विधाने केली जातात त्यावरून हे  शीर्षकातील वाक्य नसती वक्तव्ये करणा-यांना उद्देशून म्हणावेसे वाटते. 

   खरे तर इतिहास आपल्याला बरेच काही शिकवत असतो. इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही दिवसांमध्ये अनेक तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्ये करीत आहेत. या भाष्यांमुळे काही थोर पुरुषांचा अपमान होत आहे तर काही क्रूर पुरुषांचा उदो उदो होत आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्रे यांबद्दल इतके बोलले जात आहे की जणू काही ही वक्तव्ये करणारी मंडळी तज्ञ इतिहासकार किंवा पुरातत्व तज्ञच आहे. माझ्या मागच्या छावा या चित्रपटासंबंधीत लेखात मी भाष्य केले होते की, यांना एवढेच जर का इतकेच इतिहास प्रेम असेल तर मग त्या इतिहासातील पात्रांचे गुण यांनी आपल्या अंगी बाणवायला नको का ! पण तसे मात्र आढळून येत नाही. कोणीही उठते आणि काहीही बोलून जाते परवाच काँग्रेसचे हुसैन दलवाई यांनी छ. संभाजी राजांना जी शिक्षा झाली ती शिक्षा मनुस्मृती नुसार झाली असे बेलगाम वक्तव्य केले. प्रत्यक्षात मनुस्मृती मध्ये देहदंडाबाबत काहीही सांगितलेले नाही असे तज्ञ मंडळी सांगतात. ही नाहक वक्तव्ये करणारी माणसे एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाचा रोष ओढवून घेतात, दुस-या समाजाला नाराज करून लोकशाही, संविधान यांचा सर्रास अपमान करतात. यामुळे सामाजिक एकोपा भंग पावतो. विनाकारणची उपटसुंभ वक्तव्ये करण्यापेक्षा राज्यातील प्रश्न, देशातील प्रश्न, प्लास्टिक निर्मूलन, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न यांबाबत भूमिका मांडायला नको का ? अनेक शहरात तर पाण्याची समस्या वर्षांनुवर्षांपासून तशीच आहे. इतिहासामध्ये जे काही चांगले घडले त्याचा अंगीकार सर्वांनी करायला पाहिजे तसेच जे धर्मांध, क्रूर, परकीय राजे होते त्यांचा सन्मान हा मुळीच करू नये. उगीच तो आपल्या समाजाचा होता म्हणून चांगलाच होता अशी भावना वृद्धिंगत होऊ देऊ नये. चांगल्या,  देशाभिमानी, प्रजाहितदक्ष अशा ऐतिहासिक पात्रांकडून,  घटनातून  काहीतरी बोध घेत घ्यावा. रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल खालील ओळी लिहिल्या आहेत.

 शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
समर्थ रामदास स्वामींच्या उपरोक्त ओळींप्रमाणे सांप्रत सर्वच नेते, प्राध्यापक, बुद्धीवादी यांनी इतिहासाची पाळेमुळे न  शोधता किंवा संदर्भ नसलेल्या गोष्टींबद्दल विधान करणे सोडून देऊन छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे, बाजीराव पेशवे , महाराणा प्रताप, छत्रसाल अशा थोर पुरुषांविषयी तारतम्य ठेवून वक्तव्ये करावीत. ते कसे होते ते बघावे, त्यांचे गुण घ्यावे, त्यांचा पराक्रम पाहावा. कोणीही येतो आणि छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल आधार नसलेली वक्तव्ये करून मोकळा होतो आणि मग शासन, जनता, माध्यमे हे सर्व त्यात विषयाभोवती घुटमळत राहतात, राजकारण विकास सोडून विनाकारण केलेल्या संदर्भहीन वक्तव्यांभोवती फिरत राहते. शिवाय नवीन पिढी, तरुण वर्ग संभ्रमात पडतो की, नक्की खरा इतिहास तो होता तरी काय? त्यामुळे जनतेने सध्याच्या तथाकथित नेत्यांच्या, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या इतिहासाबद्दलच्या ऐतिहासिक संदर्भ, आधार नसलेल्या विधानांकडे दुर्लक्ष करून खरा इतिहास, घटनांचा संदर्भ असलेली पुस्तके  वाचावीत. तसेच तमाम उपटसुंभ व आधारहीन वक्तव्ये करणाऱ्या लोकांना हेच म्हणावेसे वाटते की , विनाकारण इतिहास मत पूछो !
जे ज्ञात असेल व जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वक्तव्ये करावीत. उगीच कोणी काहीही विचारले नसतांना काहीही पिल्लू सोडून देऊ नये. 
अर्ल चेस्टरफिल्ड याने म्हटलेच आहे की, 
History is but a confused heap of facts.

२ टिप्पण्या: