Click "Follow" Button below To Follow this Blog

१०/०४/२०२५

Eating cake is harmful ?

केक नव्हे भाकरच खा ! 

    
केकची तर आता प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केकसाखरपुडा असो कापा केकदुकान उद्घाटन असले की लाओ रे केकअशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. 

केक हा तसा विदेशी पदार्थ पण भारतात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतात केकची मागणी गेल्या काही वर्षांपासून खुप वाढली आहे. साहेबांच्या आगमनानंतर भारतातील लोकांना  बेकरीत बनत असलेल्या मैद्याच्या पदार्थांची ओळख झाली आणि आजकाल तर बेकरीचे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जात आहे. त्यातल्या त्यात केक तर खूपच लोकप्रिय झालेला आहे. पुर्वी वाढदिवस कधी येत आणि कधी जात हे  माहित सुद्धा पडत नसे. परंतु गत काही काळापासून वाढदिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खेड्यापाड्यात सुद्धा वाढदिवसाचे मोठे स्तोम माजलेले दिसते. गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्याचे सुद्धा वाढदिवसाचे मोठमोठाले फलक लागलेले दिसतात. किशोरवयीन मुले तर वाढदिवसाचा केक रस्त्यावरच कापतांना दिसतात. भारतात वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत तशी बरीच जुनी आहे पण ती फक्त उच्चभ्रू समाजातच होती आता ती सार्वत्रिक झाली आहे. आजकाल तर वाढदिवसच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये केक कापला जातो. केकची जणू प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केक, साखरपुडा असो कापा केक, दुकान उद्घाटन असले की लाओ रे केक, अशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. भविष्यात तर "अरे केक आणा रे, आपली प्रथा आहे ती, आपले बाबा, आजोबा कापत नव्हते का !" अशी वाक्ये सुद्धा आगामी पिढी उच्चारतांना दिसेल असे म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. हिंदुत्वाचा आपण मोठा अभिमान बाळगतो पण हिंदू धर्मात हा विदेशी पदार्थ केक बेमालूमपणे कसा घुसला ? त्याची आपण कशी काय प्रथा पाडून घेतली ? हा विचारही आपल्या मनास कधी शिवला नाही किंवा कार्यक्रम साजरे करीत असतांना उपस्थितांपैकी कोणीही, "अरे केक काही आवश्यक नाही, कशाला आणता ?" असे म्हणतांना सुद्धा दिसत नाही. तसे कुणी म्हटले तरी आताची पिढी ते कितपत ऐकेल हे देव जाणे, अशीही स्थिती आहे.  बरे हल्ली हा केक केवळ खातच नाही तर तो तोंडाला सुद्धा फासतात. आजकाल तर म्हणे तोंडाला फासण्याचा वेगळा केक सुद्धा मिळतो. काय ते तोंडाला केक फासणे, काय त्या बर्थ डे बंप ! या बर्थ डे बंपमुळे तर काही मुलांचा जीव सुद्धा गेला आहे.  

        आज हे केक प्रकरण यासाठी की, मित्रांनो दक्षिण भारतात विविध आणि सुप्रसिद्ध अशा बेकरींमधून केकचे 235 नमुने गोळा करण्यात आले. या तपासणीतून धक्कादायक असे वास्तव उघडकीस आले आहे. हे केक बनवण्यासाठी जे साहित्य ( इन्ग्रेडिएंट्स ) वापरले जाते ते मनुष्याच्या प्रकृतीला हानिकारक असे आढळून आले. यामध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात उदा. अँल्युरा रेड, सनसेट येलो, टारटाझाईन हे रंग शासनाने दिलेल्या मान्यतेपेक्षाही अधिक मात्रेत टाकल्याचे आढळून आले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे या रंगांना युरोप मध्ये बंदी आहे. भारतातही या बाबतीत निर्बंध आहे पण तरीही केक व इतरही पदार्थात हे रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पिढीला जे केक आवडतात त्या लोकप्रिय अशा ब्लँक फॉरेस्ट, रेड व्हेल्व्हेट या केकमध्ये तर या कृत्रिम व हानिकारक अशा रंगांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात तर असतेच शिवाय त्यात जी साखर वापरलेली असते ती अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर असते. इथे वाचकांना तसेच तरुणाईला वैधानिक इशारच द्यावासा वाटतो की, "अशा केकच्या वा इतर असे रंग व निकृष्ट दर्जाची साखर असलेलेल्या पदार्थांच्या सेवनाने तुमची बौद्धिक व शारीरिक क्षमता तर कमी होतेच शिवाय अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारख्या असाध्य आजारास सुद्धा आपणहून आमंत्रण दिले जात आहे." तेंव्हा हे पदार्थ टाळणेच हे आपल्या हिताचे आहे. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने या अशा हानिकारक रंगांना बंदी घातली आहे. मग तरीही बंदी असलेले हे रंग आणि इतरही पदार्थ सर्रास कसे काय वापरले जात आहेत 

        दक्षिण भारतात झालेल्या या सर्वेक्षणामुळे आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. सध्या मानवी आरोग्य हे तसेही लवकर बिघडते, अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णालय दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, पुण्याचे उदाहरण ताजे आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. तेंव्हा आपण सर्वानी त्यातल्या त्यात कमी अशा हानिकारक पदार्थांचे सेवन कसे होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. लहान मुले, तरुण यांच्यात सुद्धा जागृती करणे गरजेचे झाले आहे. 

        इतिहासात लोकांना खायला भाकरी नव्हती तेंव्हा फ्रान्सच्या राणीने त्यांना "भाकरी मिळत नसेल तर केक खा !" असे एक विधान केल्याचे सर्वश्रुत आहे. ( ब्रेड मिळत नसेल तर केक खा असे ते विधान होते पण इतिहासात असे खरोखर म्हटले होते की नाही याबाबत विविध मते मतांतरे आहेत ) आजच्या धकाधकीच्या व असल्या निकृष्ट दर्जाच्या, कृत्रिम व हानिकारक घटक असलेल्या बाहेरच्या, विकतच्या पदार्थांच्या काळात सर्वांना हेच सांगावेसे वाटते की मायबापहो केक नव्हे तर आपली भाकरच खात जा ! वाढदिवसादी काही  सेलेब्रेशन करायचेच असेल तर घरीच काहीतरी गोडाच बनवत जा. 

०३/०४/२०२५

Article about telangana IT park issue.

किसी को उजाड़कर बसे तो क्या बसे....

चित्र स्त्रोत - आंतरजाल

वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन, त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग, इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ?

सध्या जगात सर्वत्र विकास कार्य मोठ्या जोरात सुरू आहे. सरकार तर विकास कार्य करतच आहे परंतु शहरीकरण सुद्धा झपाट्याने वाढते आहे. या शहरीकरणामुळे शेती कमी होत आहे, शिवाय अनेक ठिकाणी भूमाफिया जमिनीवर ताबा मिळवत आहे आणि मोठमोठ्या किमतीमध्ये घरे किंवा भूखंड विकत आहेत. अतिक्रणासाठी त्यांना नाले सुद्धा कमी पडत आहेत. शेती व वने असलेली जमीन ही रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तित होत असल्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावर सुद्धा होतो, पर्यावरणाचा -हास होतो. अनेकदा जंगली जनावरे शहरात आल्याच्या बातम्या वाचनात येतात. परवाच मुंबईला एक लांडगा आल्याचे वृत्त धडकले होते. वन्य प्राण्यांची हक्काची जमीन ही बळकावली जात असल्यामुळे त्यांचे रहिवासी क्षेत्र घटत आहे आणि  त्यामुळेच ते शहरांमध्ये घुसत आहेत. 

    हा सर्व ऊहापोह यासाठी आहे की, तेलंगणाच्या हैदराबाद विश्वविद्यालय (HCU) परिसरामध्ये आयटी पार्क विकसित करण्याची योजना आहे. त्या योजनेच्या विरोधात हैदराबाद विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि सरकारने त्यांना अटक करून पुन्हा सोडून दिले.  हैदराबाद विश्वविद्यालयाच्या लगत कांचा गचिबोवली ही चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती (floura fauna) आणि विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती वास्तव्य करतात. यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, हरणे तसेच इतर अनेक वन्यजीव सुद्धा वास्तव्य करतात. आता नेमके याच जागेवर नवीन आयटी पार्क होणार आणि या कामासाठी म्हणून गेल्या सोमवारी तेलंगणा सरकार तिथे खोदकाम सुरू करणार होते परंतु मोठमोठ्या मशीन (JCB) तिथे पोहोचल्यावर विरोध सुरू झाला. हा विरोध मुख्यत्वे करून विश्वविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या परिसरात  पर्यावरणासाठी काम करणारी वाटा फाऊंडेशन ही संस्था करत आहे. आयटी पार्क होणे, उद्योग प्रस्थापित होणे हे जरी वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून चांगले असले तरी त्यासाठी वने आणि वन्य जीवांच्या हक्काची असलेली जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांना तिथून निष्कासित करून तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योग , इमारती उभारणे हे कितपत योग्य आहे ? या पृथ्वीवर केवळ मनुष्याचा अधिकार नाही तर ही ईश्वराने रचलेली सृष्टी आहे आणि यावर मनुष्यासोबतच इतर चराचरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तेलंगणा सरकारला किंवा इतर कोणत्याही सरकारला उद्योग व्यवसायासाठी म्हणून जर जागा लागत असेल तर ती केवळ मोठ्या शहरालगतच न घेता वेगवेगळ्या छोट्या शहरात विभागून घेतली तर विकासाचा प्रादेशिक समतोल सुद्धा साधला जाऊ शकतो. मोठमोठ्या शहरांमध्येच उद्योगधंदे आणल्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम, गुन्हेगारी, झोपडपट्ट्या, अस्वच्छ वस्त्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच सर्वच ठिकाणच्या नेत्यांनी उद्योग व्यवसाय हे एकाच ठिकाणी केंद्रित न करता विविध शहरांमध्ये स्थापित होतील अशी पावले उचलली पाहिजे आणि त्यासाठी उजाड जमिनीचा वापर केला पाहिजे. शेती योग्य जमीन, वनांची जमीन यावर जर सरकारच्या किंवा बिल्डर लॉबीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली जाऊ लागली तर वन्यजीव व इतर प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे काय होईल? आपले जीवनचक्र कसे चालेल? भारतातल्या सर्वच संत मंडळींनी आपल्याला वनचरे ही आपली सोयरे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्यांची चिंता करायलाच पाहिजे. मोर तर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, काही वर्षांपुर्वी पंतप्रधान मोदी यांचा मोरांसोबतचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांवर झळकला होता. राष्ट्रपती भवन तसेच दिल्लीतील अनेक सरकारी निवासस्थानाच्या परिसरात मोरांचे वास्तव्य आहे. मग अशा या तेलंगणातील मोरांच्या हक्काच्या जागेवर  बुलडोझर कसे काय फिरणार? ही जमीन 1975 पासून सरकारी जमीन असल्याचे म्हटले आहे परंतु 2022 मध्ये सरकार जवळ या जमिनीची कागदपत्रे नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे आणि आगामी काही दिवस तिथे विकास कार्यास सुरुवात करण्यास स्थगिती दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या जमिनीमुळे विकास होणार आहे आणि रोजगार निर्माण होणार आहे असे म्हटले आहे आणि या विद्यार्थ्यांना कोणीतरी चिथावणी दिली असल्याचे म्हटले आहे.  

  तेलंगणा सरकार वनांची जागा, ज्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी तसेच इतर वन्यजीवांचे वास्तव्य आहे असे त्यांचे घर नष्ट करून त्या जागेवर त्या जागेवर आयटी पार्क उभारत आहे या पार्श्वभूमीवर त्यांना हेच म्हणावेसे वाटते की 

किसी का घर उजाडकर बसे तो क्या बसे 

किसी को रुलाकर हंसे तो क्या हंसे ?

✍️विनय वि. वरणगांवकर©

03/04/25

आभार - विनय नंदनपवार