Click "Follow" Button below To Follow this Blog

१०/०४/२०२५

Eating cake is harmful ?

केक नव्हे भाकरच खा ! 

    
केकची तर आता प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केकसाखरपुडा असो कापा केकदुकान उद्घाटन असले की लाओ रे केकअशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. 

केक हा तसा विदेशी पदार्थ पण भारतात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतात केकची मागणी गेल्या काही वर्षांपासून खुप वाढली आहे. साहेबांच्या आगमनानंतर भारतातील लोकांना  बेकरीत बनत असलेल्या मैद्याच्या पदार्थांची ओळख झाली आणि आजकाल तर बेकरीचे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जात आहे. त्यातल्या त्यात केक तर खूपच लोकप्रिय झालेला आहे. पुर्वी वाढदिवस कधी येत आणि कधी जात हे  माहित सुद्धा पडत नसे. परंतु गत काही काळापासून वाढदिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खेड्यापाड्यात सुद्धा वाढदिवसाचे मोठे स्तोम माजलेले दिसते. गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्याचे सुद्धा वाढदिवसाचे मोठमोठाले फलक लागलेले दिसतात. किशोरवयीन मुले तर वाढदिवसाचा केक रस्त्यावरच कापतांना दिसतात. भारतात वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत तशी बरीच जुनी आहे पण ती फक्त उच्चभ्रू समाजातच होती आता ती सार्वत्रिक झाली आहे. आजकाल तर वाढदिवसच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये केक कापला जातो. केकची जणू प्रथाच पडली आहे. वाढदिवस तर आहेच पण लग्न असले की आणला केक, साखरपुडा असो कापा केक, दुकान उद्घाटन असले की लाओ रे केक, अशाप्रकारे अनेकविध कार्यक्रमात हल्ली केक जणू अनिवार्यच  झाला आहे. भविष्यात तर "अरे केक आणा रे, आपली प्रथा आहे ती, आपले बाबा, आजोबा कापत नव्हते का !" अशी वाक्ये सुद्धा आगामी पिढी उच्चारतांना दिसेल असे म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. हिंदुत्वाचा आपण मोठा अभिमान बाळगतो पण हिंदू धर्मात हा विदेशी पदार्थ केक बेमालूमपणे कसा घुसला ? त्याची आपण कशी काय प्रथा पाडून घेतली ? हा विचारही आपल्या मनास कधी शिवला नाही किंवा कार्यक्रम साजरे करीत असतांना उपस्थितांपैकी कोणीही, "अरे केक काही आवश्यक नाही, कशाला आणता ?" असे म्हणतांना सुद्धा दिसत नाही. तसे कुणी म्हटले तरी आताची पिढी ते कितपत ऐकेल हे देव जाणे, अशीही स्थिती आहे.  बरे हल्ली हा केक केवळ खातच नाही तर तो तोंडाला सुद्धा फासतात. आजकाल तर म्हणे तोंडाला फासण्याचा वेगळा केक सुद्धा मिळतो. काय ते तोंडाला केक फासणे, काय त्या बर्थ डे बंप ! या बर्थ डे बंपमुळे तर काही मुलांचा जीव सुद्धा गेला आहे.  

        आज हे केक प्रकरण यासाठी की, मित्रांनो दक्षिण भारतात विविध आणि सुप्रसिद्ध अशा बेकरींमधून केकचे 235 नमुने गोळा करण्यात आले. या तपासणीतून धक्कादायक असे वास्तव उघडकीस आले आहे. हे केक बनवण्यासाठी जे साहित्य ( इन्ग्रेडिएंट्स ) वापरले जाते ते मनुष्याच्या प्रकृतीला हानिकारक असे आढळून आले. यामध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात उदा. अँल्युरा रेड, सनसेट येलो, टारटाझाईन हे रंग शासनाने दिलेल्या मान्यतेपेक्षाही अधिक मात्रेत टाकल्याचे आढळून आले. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे या रंगांना युरोप मध्ये बंदी आहे. भारतातही या बाबतीत निर्बंध आहे पण तरीही केक व इतरही पदार्थात हे रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पिढीला जे केक आवडतात त्या लोकप्रिय अशा ब्लँक फॉरेस्ट, रेड व्हेल्व्हेट या केकमध्ये तर या कृत्रिम व हानिकारक अशा रंगांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात तर असतेच शिवाय त्यात जी साखर वापरलेली असते ती अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर असते. इथे वाचकांना तसेच तरुणाईला वैधानिक इशारच द्यावासा वाटतो की, "अशा केकच्या वा इतर असे रंग व निकृष्ट दर्जाची साखर असलेलेल्या पदार्थांच्या सेवनाने तुमची बौद्धिक व शारीरिक क्षमता तर कमी होतेच शिवाय अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारख्या असाध्य आजारास सुद्धा आपणहून आमंत्रण दिले जात आहे." तेंव्हा हे पदार्थ टाळणेच हे आपल्या हिताचे आहे. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने या अशा हानिकारक रंगांना बंदी घातली आहे. मग तरीही बंदी असलेले हे रंग आणि इतरही पदार्थ सर्रास कसे काय वापरले जात आहेत 

        दक्षिण भारतात झालेल्या या सर्वेक्षणामुळे आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. सध्या मानवी आरोग्य हे तसेही लवकर बिघडते, अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णालय दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात, पुण्याचे उदाहरण ताजे आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. तेंव्हा आपण सर्वानी त्यातल्या त्यात कमी अशा हानिकारक पदार्थांचे सेवन कसे होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. लहान मुले, तरुण यांच्यात सुद्धा जागृती करणे गरजेचे झाले आहे. 

        इतिहासात लोकांना खायला भाकरी नव्हती तेंव्हा फ्रान्सच्या राणीने त्यांना "भाकरी मिळत नसेल तर केक खा !" असे एक विधान केल्याचे सर्वश्रुत आहे. ( ब्रेड मिळत नसेल तर केक खा असे ते विधान होते पण इतिहासात असे खरोखर म्हटले होते की नाही याबाबत विविध मते मतांतरे आहेत ) आजच्या धकाधकीच्या व असल्या निकृष्ट दर्जाच्या, कृत्रिम व हानिकारक घटक असलेल्या बाहेरच्या, विकतच्या पदार्थांच्या काळात सर्वांना हेच सांगावेसे वाटते की मायबापहो केक नव्हे तर आपली भाकरच खात जा ! वाढदिवसादी काही  सेलेब्रेशन करायचेच असेल तर घरीच काहीतरी गोडाच बनवत जा.




४ टिप्पण्या:

  1. खूपच महत्त्वाचा विषय चांगल्या पद्धतीने मांडला आहे आपले आरोग्य सगळ्यात महत्त्वाचे या गोष्टी नवीन पिढीने मनावर घ्यायलाच पाहिजे

    सौ साधना काळे

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच माहितीपूर्ण लेख आहे 👍 अशा health related food habits वर जागरूकता असणे काळाची गरज आहे👍Thanks for sharing such a thoughtful and informative article 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. Bhakari chapati peksha jast changali aahe

    उत्तर द्याहटवा