ब्युटी पार्लर मे जा जा के...
किशोरवयात चित्रपट, गाणी हा विषय मला आवडू लागला होता. तसा त्या वयात तो विषय बहुतेकांना आवडत असतो म्हणा. त्या काळात दूरदर्शनला पर्याय म्हणून केबलद्वारे विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण होणे सुरू झाले होते. व्हीसीआर हे नवीन गॅजेट उपलब्ध झाले होते, टॉकीज तर होत्या आणि गाणी ऐकण्यासाठी रेडिओ आणि कॅसेट प्लेयर सुद्धा होतेच. त्यामुळे कित्येक चित्रपट व गाण्यांच्या उजळण्या सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे काही संवाद, गाणी लक्षात राहिली तर काही गाण्यांच्या एखाद दोन ओळीच लक्षात राहिल्या. या लेखाचे शीर्षक असलेली त्यापैकीच अशी एका गाण्याची ओळ. एखाद वेळी प्रसंगानुरूप आपल्याला सहजच एखादे गीत आठवून जाते. काल वृत्तपत्रात आलेल्या एका ब्युटी पार्लरच्या पत्रकामुळे "ब्युटी पार्लर मे जा जा के वक्त अपना ना जाया करो" अशी ही ओळ मला आठवली. पण ही ओळ कोणत्या गाण्यातील आहे हे मात्र मी साफ विसरलो होतो. कारण नव्वदच्या दशकातील ते गीत काही फार सुंदर रचना वगैरे असे असणारे गीत नव्हते तर उडत्या चालीचे बी ग्रेड सिनेमाचे ते गीत होते. ओळ आठवत होती पण गीत काही आठवत नव्हते त्यामुळे डोक्यात किडा वळवळू लागला आणि मग युट्युबवर या ओळी टाकून सर्च केले आणि ते गीत सापडले. हे सर्व या लेखात सांगणे हे क्रमप्राप्तच आहे अन्यथा या लेखाचे वाचक विशेषत: महिला वाचक म्हणतील की लेखक मनानेच काहीतरी सांगून ब्युटी पार्लर विरोधी विचार मांडत आहे. मी गीत शोधल्यावर ते ऐकले त्यातील ओळी या अशा खालील प्रमाणे आहे.
ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपला वेळ वाया जातो असे प्रतीत करणाऱ्या या ओळी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर महिला वाचकांना कदाचित ते रुचणार नाही. आजकालच्या काळात कुणाला काही सल्ला देणे किंवा तत्सम लिखाण करणे हे कठीणच आहे कारण आजकालच्या लोकांची विशेषतः तरुणांची सहनशक्ती ही कमी झाली आहे. पण कोणाचा विरोध किंवा कोणाच्या व्यवसायाची अवहेलना हा या लेखाचा मुळीच उद्देश नाही. सोशल मिडिया आल्यापासून फोटो, सेल्फी काढण्याची खूपच क्रेझ वाढलेली आहे सोशल मिडियाच्या आधी सुद्धा फोटो काढले जात असत परंतु फोटो काढणे, मग तो डेव्हलपिंगला टाकणे असे बरेच सोपस्कार पार पाडल्यावर ते फोटो मिळत असत. शिवाय काढलेले फोटो हे फक्त घरचीच मंडळी बघत असत. आता फोटो काढल्यावर ते सोशल मिडियावर पण टाकावे लागतात, ते सर्वजण बघतात मग त्यांचे लाईक, कमेंट मिळवण्यासाठी ते फोटो मेकअप करून काढले जातात, इफेक्ट वगैरे दिले जातात. नवरात्र आदी समारंभात तर तरुण-तरुणी, चाळीशीतील बायका या मोठ्या सजून धजून तयार होत असतात. हल्ली प्री-वेडिंग शूट, पोस्ट विडींग शूट यांची मोठी टूम लग्नप्रसंगी निघाली आहे. हे करण्यासाठी कॅमेरा आणि इतर सामग्री असे सर्व तामझाम घेऊन विविधी लोकेशनवर फोटोग्राफर आणि फोटो काढणारे तरुण-तरुणी दिसतात. जणू काही चित्रपटाचे शूटिंग होत आहे की काय असे दृश्य असते. हे फोटो आणि त्या फोटोसाठी करावा लागणारा मेकअप यासाठी मग ब्युटी पार्लरची आवश्यकता भासते आणि सौंदर्य खुलवण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी मग ब्युटी पार्लरला मोठा वेळ द्यावा लागतो. हल्लीच्या लग्न समारंभात तर विधींपेक्षा फोटोंनाच अधिक प्राधान्य असते. एकेका विधीनंतर गुरुजी सुद्धा सांगायला लागले की चला आता फोटो काढा. काही वेळेस तर अक्षरशः विधी बाजूला टाकून दिले जातात आणि फोटो काढले जातात. वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो. एकदा तर एका लग्नात एक स्त्री येऊन माझ्याशी बोलायला लागली प्रथम तर मी तिला ओळखलेच नाही पण काही क्षणातच माझ्या लक्षात आले. "अरे मी तर तुम्हाला प्रथम ओळखलेच नाही" मी म्हणालो. ही माझी खरी, उत्स्फूर्त व नैसर्गिक, सहज स्वाभाविक प्रतिक्रिया होती परंतु त्यांना ती त्यांची स्तुती वाटली कारण इश्श !इतका चांगला मेकअप झालाय का माझा ? असे त्या म्हणाल्या. (तसं तर हल्लीच्या काळात कोणतीही स्त्री इश्श वगैरे काही म्हणत नाही, पुरुषांवरच आता इश्श म्हणावं अशी वेळ आलेली आहे पण लेखात थोडी रंगत यावी म्हणून इश्श हा शब्दप्रयोग केला आहे.) तर त्या सभ्य महिला माझ्या परिचित असल्याने त्यांचा नेहमीचा, (म्हणजे विना मेकअपचा) चेहरा माझ्या लक्षात होता पण खूप मेकअपमुळे मी त्यांना खरोखर ओळखले नव्हते. एखाद्या चित्रपट किंवा रील मध्ये दाखवल्या जाणाऱ्या किश्शांसारखाच हा प्रकार घडला होता.
आपण सुंदर दिसायला पाहिजे ही तमाम स्त्री पुरुषांची इच्छा असते किंवा बालपणापासून त्यांना तसेच शिकवले जाते त्यामुळे बहुतांश जणांना आपल्या बाह्य सौंदर्याची काळजी अधिक असते. परंतु आंतरिक सौंदर्य मात्र दुर्लक्षिले जाते. आताशा तर आंतरिक सौंदर्य हा पण काही प्रकार आहे असतो हे सुद्धा तरुणाईस ठाउक आहे की नाही अशी परिस्थिती आहे.
ज्याचे विचार चांगले असतात, विविध विषयांचे ज्ञान असते, अभ्यास असतो जो सर्वांना समदृष्टीने पाहत असतो तो सर्वाँना आपोआपच सुंदर दिसायला लागतो. त्याला बाह्य मेकअप, ब्युटी पार्लर किंवा यूनिसेक्स सलून आदी भानगडींची काही गरज वाटत नाही. परंतु सहसा अभ्यास, ज्ञान, विचार, सकारात्मकता या गोष्टींनी आपले सौंदर्य खुलवण्याऐवजी विविध रसायनांनी युक्त अशी सौंदर्यप्रसाधने वापरून आपले बाह्य सौंदर्य फुलविण्याचा प्रयत्न आजकाल खुप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेष म्हणजे ही सौंदर्यप्रसाधने अत्यंत महागडी असतात पण तरीही मेकअप करण्यावर मोठा खर्च होत आहे. लग्नाच्या फोटोंचा खर्च सुद्धा आजकाल खिशाला मोठी कात्री लावणारा झाला आहे. तसे पाहता स्त्रिया त्यांच्या सौंदर्याकडे अनादी काळापासून लक्ष देत आलेल्या आहे. आपण सुंदर दिसलो पाहिजे अशी प्रत्येक स्त्रीची स्त्रीसुलभ अभिलाषा असते. परंतु जुन्या काळात सौंदर्यप्रसाधने ही शुद्ध दुध, हळद, तूप आदी नैसर्गिक पदार्थांची अशी होती.
तर मुद्दा हा आहे की, केवळ मेकअप केल्यानेच कुणी सुंदर दिसतो असे काही नाही. काही व्यक्ती या जात्याच सुंदर असतात. त्यांना सुंदर दिसण्यासाठी म्हणून काही विशेष उपद्व्याप करावे लागत नाही. काही स्त्री पुरुष हे बिना मेकअपचे सुद्धा सुंदर दिसतात प्रहार या सिनेमात माधुरी दीक्षित ही विना मेकअपची होती आणि ती त्या सिनेमात खूप सुंदर सुद्धा दिसली आहे. साधेपणात सुद्धा एक सौंदर्य असते. काही स्त्री पुरुष हे त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. उदाहरणार्थ मेट्रो प्रकल्प प्रमुख अश्विनी भिडे आपल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि काश्मीर मधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल निर्मिती प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. जी. माधवी लता या त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. अशी आणखीही भरपूर उदाहरणे आहेत.
मेकअपचा खर्च, सौंदर्य प्रसाधनांवर होणारा खर्च त्यासाठी वाया जाणारा वेळ कदाचित यावरूनच वर दिलेल्या ओळी, ते गीत कवीला सुचले असावे आणि म्हणूनच तो म्हणतो की,

👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप छान -प्रभुदास टिकार
उत्तर द्याहटवा