Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/१०/२०२५

Article about a organisation and its centenary and some memories.

100 वर्षांचा तरुण आणि माझ्या आठवणी

आता हा तरुण कोण आणि या तरुणाशी माझा परिचय कसा झाला ? या बाबतच्या  काही घटना तसेच या तरुणाविषयी व तो त्याच्या शंभरीतही कसा तरुण आहे, त्याचा आणि त्या बाबतीत माझ्या काही आठवणींचा ठळक लेखाजोखा.

     शंभर वर्षाचा हा तरुण माझ्यापेक्षा 50 वर्षांनी मोठा आहे. माझा जन्म 1975 चा तर याचा 1925 चा म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा याने त्याच्या वयाची  पन्नाशी सुद्धा गाठली होती. या शंभर वर्षाच्या तरुणाशी माझा परिचय माझे वय दहा-बारा वर्षाचे असताना झाला. म्हणजे मी जेव्हा दहा-बारा वर्षाचा असेल तेव्हा हा तरुण त्याच्या साठीत होता. आता असा हा शंभर वर्षांचा तरुण कोण ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल त्यामुळे आता हा तरुण कोण आणि या तरुणाशी माझा परिचय कसा झाला या बाबतच्या  काही घटना तसेच या तरुणाविषयी व तो त्याच्या शंभरीतही कसा तरुण आहे, त्याचा शंभरी पर्यंतचा प्रवास या बाबतच्या काही ठळक बाबी या लेखात देत आहे. 

      मी बालपणी पाहिलेल्या काही जुन्या फोटोत मला माझ्या आजोबांनी काळी टोपी परिधान केलेली दिसत असे. त्यांची टोपी काळी का ? असा प्रश्न माझ्या बालपणी मला पडत असे. पुढे त्याचे उत्तर मिळाले. आजोबा दरवर्षी विजयादशमीला आमच्याकडून शस्त्र पूजन करून घेत आणि शस्त्रांना प्रणाम करवून घेत. माझे काका नेहमी तरुण भारत वृत्तपत्र वाचत असल्याचे मला आठवते. त्यामुळे संघाचे बाळकडू घरीच मिळाले होते. पण त्या काळात सरकारी नोकर हे संघात उघड उघड जाण्यास कचरत असत.  आमच्या घरची सर्व वडीलधारी मंडळी ही नेमकी सरकारी खात्यातच होती त्यामुळे संघ आणि आम्ही यात थोडे अंतरच होते. असो ! पण आता मात्र वाचकांचा हा शंभरीतला तरुण कोण ? हा प्रश्न सुटला असेल. होय हा शंभरीतला तरुण म्हणजे यंदा शताब्दी वर्ष साजरे करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच. मी या माझ्याहून पन्नास वर्षे ज्येष्ठ असलेल्या संघाकडे कसा ओढल्या गेलो त्या काही घटना संघाच्या शताब्दी वर्षात विजयादशमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका वाटत असतांना माझ्या डोळ्यासमोर येत होत्या.

     घरीच संघाचे बाळकडू मिळाल्यावर पुढे माझ्या शाळेच्याच म्हणजेच नॅशनल हायस्कूलच्या समोरच्या छोट्या मैदानात काही समवयस्क तसेच काही वयाने मोठ्या मुलांसोबत शाखेत गेल्याचे आठवते. 

     दुसरी घटना म्हणजे पुढे माझा रहीवासी पत्ता बदलल्यावर झुनझुनवाला प्लॉट मधील केशव शाखा मला जवळ पडत असे. आम्ही आमच्या कॉलनीत खेळत असू तेंव्हा या शाखेचे स्वयंसेवक संतोष दादा हे आमच्या कॉलनीत संघाचे अधिकारी अरविंद नेटके सर राहत असत त्यांचेकडे येत असत तेंव्हा ते आम्हाला शाखेत घेऊन जात. संतोष दादा म्हणजे संतोष देशमुख, ते आता खामगांव तालुका संघचालक आहे.

     असा थोडा-थोडा परिचय संघाशी, शाखेशी झाला. काही बौद्धिके ऐकण्यात आली. पुढे एकदा माझा मित्र श्रीकांत करंदीकर यांच्या घरी काही निमित्ताने जाणे झाले तेंव्हा त्याच्या त्या नीटनेटक्या आणि टापटीप घरात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या तसविरी सर्वप्रथम पाहिल्या. राणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्या पण तसविरी होत्या. त्याचे वडील म्हणजे निष्ठावंत, हाडाचे स्वयंसेवक यशवंत उपाख्य बापू करंदीकर यांचेशी परिचय झाला. ड्युटी झाल्यावर ते संघ कार्यासाठी खेड्यापाड्यात सायकलवर जात. आजही काही खेड्यात गेलो की तेथील सर्व ज्येष्ठ मंडळी बापू  करंदीकर यांचे नांव मोठ्या आदराने घेतात. बापू करंदीकर यांचा मुलगा माझा मित्र असल्याने बापूंना जवळून पाहिले त्यांची साधी जीवनशैली, त्यांच्या वागणुकीचा नकळत माझ्यावर कुठेतरी काही ना काही तरी परीणाम झाला असावा असे मला वाटते. बापू आजही वयाच्या 80 व्या वर्षातही संघात तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने सक्रिय आहेत.

     याच दरम्यान धाकट्या बहिणीचे लग्न झाले तिच्या सासरचे सर्वच संघवाले, मोठा भाऊ ABVP चा सक्रीय कार्यकर्ता, एक भाऊ घोषात सक्रिय होता, माझ्या मोठ्या वहिनींच्या माहेरचे सुद्धा संघाचेच घराणे, एक वहिनी विद्यार्थी परिषद सदस्य. असे असल्याने संघाशी संबंध अधिक दृढ झाले.

      दिवसामागून दिवस जात होते. मी कॉलेज मध्ये गेलो. संघ आता मला ब-यापैकी समजला होता. मी गद्धे पंचविशीत असतांना संघ अमृत महोत्सवी वर्षात होता. त्यावेळी मी जळगांव खान्देश येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. जळगांवला माझे मामा प्रभाकर नाईक हे संघाचे तालुका कार्यवाह होते. ते रोज रस्त्यावरच्या विविध फलकांवर सुविचार लिहिण्यास जात. त्या सुविचारांचे "परागकण" अशा समर्पक नावाने माझ्या मामीनी सुदर्शनजी यांचे कडून प्रकाशन करून घेतले होते. याच ठिकाणी माझ्या मित्राला नोकरी मिळण्यासाठी म्हणून संघाचे भास्कर वासुदेव जोशी यांनी मोठे प्रयत्न केल्याचे सुद्धा आठवते. मामा, भास्कर वासुदेव जोशी अशा लोकांना पाहून मला संघाचे लोक कसे कर्तव्यतत्पर, राष्ट्रहितैशी आणि मदतीस धाऊन जाणारे असतात हे लक्षात आले. 

    दहा पंधरा वर्षांपूर्वी मात्र जेंव्हा माझ्याकडे जे. व्ही. मेहता नवयुग विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वृंद सुनीलजी जोशी, नगर संघचालक प्रल्हादजी निमकंडे, विकासजी कुळकर्णी, शंकरजी अनासाने  हे संगणक शिकण्यासाठी म्हणून येत त्यांचेशी ब-याच चर्चा होत. तदनंतर संजयजी बोरे सुद्धा संपर्कात आले. अशी ही पुर्वी पासूनच परिचित असलेली संघ मंडळी संपर्कात आली. त्यातूनच पुढे काही कार्यक्रमात जाणे झाले आणि मग मात्र संघाने मला त्याच्या चुंबकीय शक्तीने कायमचे ओढून घेतले.

     विजयादशमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका वाटतांना असे संघ आठवणींचे चलचित्र माझ्या चक्षू पटलांवर दिसत होते. एखाद्या मनुष्याने शंभरी गाठली तर तो वृद्ध म्हणवला जातो, त्याची शारीरिक, बौद्धिक कार्यक्षमता  घटते पण संघ हा शंभरीत सुद्धा मला माझ्या वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षात जसा दिसला होता तसाच दिसतो. तोच उत्साह, तेच खेळ, त्याच नित्य शाखा, तीच संघगीते, तीच सर्व समावेशकता, तेच जाती धर्माचा लवलेश नसणे, तेच चैतन्य, राष्ट्राय स्वाहा म्हणून आपले जीवन संघाला अर्पण करणारे प्रचारक, राष्ट्र प्रथम हे मानणारे स्वयंसेवक, संघाच्या विविध आयामांच्या माध्यमातून होणारी कार्ये, सेवा कार्ये, विदेशात HSS चे वाढणारे कार्य हे सर्व आजही तितकेच तरुण आहे जेवढे पुर्वी होते. 

     दहा-बारा लोकांना सोबत घेऊन डॉ हेडगेवार यांनी हे संघरुपी रोपटे लावले, गुरुजींनी, बाळासाहेब देवरसांनी संघबंदीच्या कठीण काळातही अथक परिश्रमाचे खतपाणी घालून या रोपट्याचा मोठा वृक्ष केला. असा  हा संघ आज शंभरीत असूनही तरुणच आहे आणि चिरतरुणच राहील. कारण त्याला चिरतरुण राखण्यास "वयं अमृतस्य पुत्र" असा स्वामी विवेकानंद यांचा मंत्र मानणा-या स्वयंसेवकांच्या निष्ठेचे, कार्याचे, सेवेचे, त्यागाचे अमृत त्याला सतत मिळत राहणार आहे. डॉ हेडगेवार यांनी नागपूरात लावलेल्या या रोपट्याचा आता जगभर विस्तार असलेला भलामोठा वृक्ष झाला आहे आणि हा वृक्ष आचंद्रसुर्य राहणार आहे.



३ टिप्पण्या: