कमोशन आणि ककॉफनी चे दिवस
आता कमोशन ( commotion ) आणि ककॉफनी ( cacophony ) या इंग्रजी शब्दांची ही काय नवीन भानगड ? असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल. तसा प्रश्न पडणे स्वाभाविक सुद्धा आहे कारण इंग्रजी ही काही आपली भाषा नाही आणि हे शब्द कोणाला माहित नसतील तर त्यांचे त्यामुळे काही अडतही नाही. इंग्रजी विषयाचे चांगले ज्ञान असणाऱ्या वाचकांना मात्र या शब्दांबाबत प्रश्न पडण्याचे काही कारण नाही. त्यांना शीर्षक वाचल्या क्षणीच अर्थ लागला असेल आणि लेखाचा विषय सुद्धा ध्यानात आला असेल. गत महिन्यामध्ये
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥
मडके फोडावे, कपडे फाडावे, हवे तर गाढवावर बसून फिरावे, पण येन केन प्रकारेण - कसल्याही मार्गाने प्रसिद्ध व्हावे.
असा या सुभाषिताचा अर्थ होतो. हे सुभाषित म्हणत डीजेला विरोध करणारे, वरील सुभाषिताप्रमाणे सवंग प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा नसणारे विद्यानंद बापट हे चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आणि तार्किकदृष्ट्या त्यांचे म्हणणे अनेकांना पटले. सर्वच धर्माच्या लोकांनी उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होईल अशा प्रकारे उत्सव साजरा करू नये, डीजे वाजवू नये असे बापट यांचे म्हणणे आहे. अद्यापही बापट यांचा विषय ताजा आहे आणि हा विषय सुरू असतानाच माझ्या वाचनात महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाच्या इंग्रजी विषयातील An Encounter of a Special Kind हा पाठ आला. एका माकडाच्या पिल्लाला म्हाळ्या (माकडांच्या टोळीचा प्रमुख नर माकड) पासून वाचवणाऱ्या एका मुलाची गोष्ट या पाठात सांगितलेली आहे. शीर्षकातील कमोशन आणि ककॉफनी हे शब्द या धड्यात वाचनात आले. या शब्दातील कमोशन चा अर्थ आवाज, गोंधळ, हुल्लडबाजी असा होतो ककॉफनी शब्दाचा अर्थ भला मोठा आवाज, गोंगाट कर्णकर्कश्श आवाज असा होतो. कमोशन आणि ककॉफनी या शब्दांनी माझे विशेष लक्ष वेधले कारण डीजेचा आवाज हा सुद्धा प्रचंड मोठा असा आवाज असतो, कर्णकर्कश्श आवाज असतो, कुणी कर्णबधिर होईल असा तो आवाज असतो आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे तर महाराष्ट्रात पुणे येथील विद्यानंद बापट यांनी डीजे विरोधाचा मुद्दा लावून धरला आहे. परंतु याबाबत डीजे व्यावसायिक, गणेश मंडळे, राजकीय लोक हे कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणून इथे गणपती बाप्पालाच पुढील प्रार्थना करावीसी वाटली.
गणपती बाप्पा तू उद्या जाणार आहे. गणपती बाप्पा तुझे कान मोठे आहे या मोठ्या कानांमुळे तुला लांबवरचे ऐकू येते पण तुझ्या मिरवणुकीतील डीजेमुळे तू सुद्धा त्रस्त होत असशील. तुझ्या भक्तांचे कान तर छोटे आहेत ते डीजेचा मोठा आवाज सहन करणार नाही असे आहे. उद्या तुझी मिरवणूक निघेल, तुझे विसर्जन अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे असते परंतु याच विसर्जनाच्या दिवशी प्रचंड कोलाहल असतो, डीजेचा आवाज असतो. बाप्पा आधीच तर शहरात किती गोंगाट असतो. कुठे गाड्या, कुठे जेसीबी, कुठे हॉर्न कुठे भोंगे आणि त्यातच आता भरीस भर म्हणून ही आलेली डीजेची नसती ब्याद. देवा हा आवाज थांबवण्याची बुध्दी तू लवकरात लवकर सर्वांना प्रदान कर अशी तुला विनवणी. कारण या आवाजामुळे अनेकांचे जीव गेले आहेत तर कित्येकांना बहिरेपणा आला आहे. ध्वनि प्रदूषण करणाऱ्यांना चांगली बुद्धी झाली तरच हे बंद होऊ शकते त्यांना जर नाहक सल्ला वगैरे दिला तर ते कुणाचे ऐकत नाही हे बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून दिसून आले. सामान्यांच्या मनातील या प्रार्थनेशिवाय इतर कोणतंही पर्याय दिसत नाही. असो!
श्रावण महिन्यापासून आपले सण समारंभ सुरू होतात आणि कावड यात्रेपासून डीजेचा गोंगाट सुरू होतो. हा आवाज गणपती मिरवणुकांमध्ये उच्चांक गाठतो आणि त्यानंतर नवरात्रीच्या मिरवणुकीपर्यंत हा डीजे धुमाकूळ घालत असतो. इतर वेळी महापुरुषांच्या जयंत्या, लग्न समारंभ, वाढदिवस, नेत्यांच्या रॅल्या यामध्ये सुद्धा या डीजेचा धुमाकूळ सुरूच असतो. परंतु गणपतीमध्ये अतिउत्साह असल्यामुळे डीजेचा आवाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. अशाप्रकारे 365 दिवसांपैकी मोजकेच दिवसच हे शांततापूर्ण (अर्थात डीजे विरहित असतात इतर ध्वनी प्रदूषण मात्र असतेच.) असतात अन्यथा उर्वरित सर्व दिवस हे निव्वळ कमोशन आणि ककॉफनी चे च दिवस असतात.

सामान्य नागरिकांनी सुद्धा डीजेला विरोध करून सरकारच्या समोर आपले मत प्रकट करावे लेख खरोखरच खूप चांगला आहे.
उत्तर द्याहटवाAti thithe mati utsav have pan tyache mul rup enjoy karata aale pahije D J ha keval unmand aahe
उत्तर द्याहटवा