Click "Follow" Button below To Follow this Blog

०१/०६/२०२३

Article about Sakshi murder, Delhi

पस्तीस तुकडे, सोळा वार ...

मुली धोक्यातच


मुलींना फसवणे , बलात्कार करणे , त्यांच्या हत्या करणे अशा गुन्ह्यांसाठी खरेतर स्पेशल न्यायालय व अत्यंत कठोर असे कायदे करणे अगदी गरजेचे झाले आहे. तिकडे पाकिस्तानात हिंदू मुलींना लपवून छपवून जगावे लागत आहे आणि इकडे भारतात हिंदू मुली मारल्या जात आहे म्हणजे दोन्ही देशात हिंदू मुलीच संकटात का ? नटांच्या नशेखोर मुलांसाठी पुढे येणारे नेते सुद्धा साक्षीच्या हत्येच्यावेळी मूग गिळून गप्प आहे. 

नोहेंबर 2022 मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना दिल्ली येथे घडली होती. श्रद्धा वालकर या मुलीची हत्या आफताब नामक तरुणाने तुकडे-तुकडे करून केली होती. आफताबने श्रद्धाच्या देहाचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये  ठेवले व रात्री-बेरात्री तो त्या तुकड्यांची विल्हेवाट लावत असे. हे सर्व बंद घरात घडले होते परंतू परवा पुनश्च अशीच एक देश हादरवून सोडणारी घटना घडली ती म्हणजे साक्षीला मारण्याची,  साहील नामक तरुणाने साक्षीवर भर रस्त्यात, लोकांची वर्दळ असलेल्या वस्तीत हल्ला केला, तिच्यावर चाकूने 16 वार केले व नंतर दगडाने ठेचून साक्षीला जीवे मारले व पळून गेला. तेथून ये-जा करणा-या कुणीही त्याला हटकले नाही किंवा त्याच्यावर छुपा का होईना हल्ला केला नाही. आजकाल कोणी कोणाच्या मध्ये पडत नाही असे म्हटले जाते. परंतू आजकालची प्रकरणे, भांडणे ही सुद्धा विचित्र अशी असतात. कुणाची काय भानगड असेल काहीच सांगता येत नाही म्हणूनही कुणी कुणाच्या मध्ये पडत नाही असेही आहे. सामाजिक परिस्थिती मोठ्या वेगाने बदलली. पुर्वी कुण्या मुलाने काही व्रात्यपणा केला तर शेजारी सुद्धा त्याला दम देत असत व त्या मुलाचे पालक सुद्धा शेजा-याला काही बोलत नसत. याने सर्वांच्याच पाल्यांवर एकप्रकारचा वचक होता. आजकाल चूक मुलाची /मुलीची असली व त्याबाबतीत कुणी शेजारी बोलला, त्याने ती चूक निदर्शनास आणून दिली तर शेजा-यालाच "तुम्हाला काय करायचे ?" असे बोल ऐकावे लागतात. म्हणून मग कुणी कुणाच्या मध्ये पडत नाही व याचाच फायदा मग साहीलसारखे मारेकरी घेतात.  साहिलने हल्ला करून मारणे हा अक्षम्य, कठोर दंडनीय असा अपराध आहे. परंतू साहीलसारख्या मुलांशी मैत्री करणे, 15 वर्षाच्या मुलीने लिव्ह इन मध्ये राहणे हे सुद्धा तितकेच चुकीचे नाही का ? साक्षी साहीलसह लिव्ह इन मध्ये राहत होती व नंतर तिने त्याच्याशी ब्रेकअप करून दुस-या मुलाशी मैत्री केली होती असे वाचनात आले. मोबाईलमुळे लहान मुले सुद्धा लवकर मोठी होत आहे त्यांना नको ती समज अगदी अल्पवयातच येत आहे. साक्षी हल्ल्यावर आता अनेक तर्क वितर्क व्यक्त होत आहे. साहिलचे समाज माध्यमांवरील आतंक करण्या बाबत सारखे काही रील, त्याचे नांव बदलणे, रुद्राक्ष माळ घालणे वगैरे समोर येत आहे. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुली सुद्धा अशा तरुणांच्या नादी कशा काय लागतात ? त्यांचे ब्रेन वॉश कसे होते ? अशा मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात सामाजिक उद्बोधन होणे अत्यावश्यक झाले आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केली त्यावेळी "मुलींनो समाजातील आफताब ओळखा" असा लेख लिहिला होता. या लेखात बरेच वरील बाबत भाष्य केले होते ते वाचक "मुलींनो समाजातील आफताब ओळखा" यावर क्लिक केल्यावर वाचू शकतात. (Click on link to read) किशोरावस्थेत पदार्पण करणा-या सर्वच मुलींना त्यांच्या घरी व शाळांतून योग्य ते मार्गदर्शन होणे जरुरी आहे. मुलींसाठी असणा-या कायद्यांची एक " स्वयंसिद्धा" नामक पुस्तिका महाराष्ट्रात    ब-याच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वितरीत झाली आहे. अशी कायदे विषयक पुस्तके देशभरातील मुलींना वाटणे आवश्यक आहे. अशा पुस्तिका निव्वळ वितरीत करून भागणार नाही तर त्यांना त्या वाचण्यास प्रेरीत करणे किंवा वाचून दाखवणे जरुरी आहे. किशोरावस्थेत प्रेम, आकर्षण हे होणे साहजिक आहे परंतू आपण ज्याच्यावर / जिच्यावर प्रेम करतो आहे त्याची इत्यंभूत माहिती असणे आजच्या काळात अगदी जरुरीच झाले आहे. गतवर्षीच्या अखेरीस पोलिसांसमोर श्रद्धाच्या देहाचे तुकडे केले असे कबूल करणा-या आफताबने नंतर मात्र श्रद्धाला मारण्याचे साफ नाकारले होते. साहील प्रकरणात सुद्धा तसेच होण्याची शक्यता आहे. कारण त्याला तेथून जाणा-या येणा-यांनी हटकण्याचीच साधी हिम्मत दाखवली नाही तर प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळणे दूरच. ते तरी बरे की ही घटना सीसीटीव्ही कॅॅमे-यात कैद झाली आहे. मुलींना फसवणे, बलात्कार करणे, त्यांच्या हत्या करणे अशा गुन्ह्यांसाठी खरेतर स्पेशल न्यायालय व अत्यंत कठोर असे कायदे करणे अगदी गरजेचे झाले आहे. तिकडे पाकिस्तानात अल्पसंख्य हिंदू मुलींना लपवून छपवून वाढवावे लागत आहे , त्यांचे विवाह त्यांच्यापेक्षा वयाने दुप्पटीहून अधिक असलेल्या तेथील बहुसंख्यांकांशी जबरीने लावली जात आहे,  त्यांना विस्थापित व्हावे लागत आहे आणि इकडे भारतात हिंदू मुली मारल्या जात आहे म्हणजे दोन्ही देशात हिंदू मुलीच संकटात का ?  महिला आयोग , मानवाधिकार यांचे अद्याप साक्षीच्या हत्येबाबत काहीही एक विधान ऐकण्यात आले नाही. नटांच्या नशेखोर मुलांसाठी पुढे येणारे नेते सुद्धा साक्षीच्या हत्येच्यावेळी मूग गिळून गप्प आहे. जेंव्हा हिंसा करणा-यांना  पोलिस किंवा सैनिक मारतात तेंव्हा मानवाधिकारवाले खडबडून जागे होतात. थातूरमातूर प्रकरणात माहिला आयोग पुढे येतो साक्षीच्या हत्येच्या प्रकरणात मात्र आयोगाचे अवाक्षरही नाही. वा रे  मानवाधिकार ! वा रे महिला आयोग !  या भारतात आता नवीन संसद भवन लोकार्पित झाले आहे. या नव्या भवनातून देशातील माता , भगिनीं यांच्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी चांगल्या उपाययोजना तयार होवोत. हल्लेखोर, मारेकरी , बलात्कारी यांच्या विरोधात कठोर कायदे निर्माण होवोत हीच अपेक्षा आहे. मुलींवर अत्याचार, बलात्कार अशी दुष्कृत्ये करणा-यांविरोधात सुरुवातीपासूनच जर का कठोर कायदे या देशात असते तर अनेक गुन्हेगार निर्ढावले नसते तसेच आफताब, साहीलसारखे तरूण श्रद्धाचे पस्तीस तुकडे, व साक्षीवर सोळा वार करण्यासारखी कृत्ये करण्यास धजावलेच नसते. 

२५/०५/२०२३

Article about marathi schools

मराठी शाळा वाचवण्यास प्राधान्य द्यावे
गणवेशाच्या निर्णयापूर्वी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला. आज अशी परिस्थिती आहे की जे शिक्षक आहे तेच अतिरिक्त ठरत आहे. मायबाप सरकारने प्रथम या शिक्षकांच्या समायोजनाची पाहिले पाहिजे. मराठी शाळांची पटसंख्या कशी वाढेल हे पाहिले पाहिजे.
 परवा एक राज्य एक गणवेश ही योजना जिल्हा परिषद शाळांसाठी आखली गेल्याचे सुतोवाच माननीय शिक्षण मंत्र्यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असावा अशी ही योजना आहे. योजना चांगली आहे त्याबद्दल दुमत नाही शिवाय काही शाळांनी गणवेशाचा निर्णय आधीच घेतला असल्यामुळे तीन दिवस विद्यार्थ्यांना शाळेने ठरवलेला गणवेश घालता येईल असेही या योजनेत म्हटले आहे.  याप्रमाणे आपल्या देशातील अनेक योजना व कायदे यांच्यात सुद्धा सुसूत्रता असावी असेही इथे नमूद करावेसे वाटते. महाराष्ट्र राज्यात सध्या जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळा यामध्ये विद्यार्थ्यांची चणचण भासत आहे. गत काही वर्षात महाराष्ट्र राज्यात स्वयं अर्थ सहाय्यित  इंग्रजी माध्यम शाळा अर्थात कॉन्व्हेंट यांना बेछूटपणे मान्यता दिल्या गेल्या. यात मराठी माध्यमांच्या शाळांच्या भविष्याबाबत काहीही विचार झालेला दिसला नाही. आपला पाल्य मागे पडू नये म्हणून प्रत्येकच पालक आपापल्या पाल्याला कॉन्व्हेंट मध्येच टाकू लागला. भलेही  त्याचा पाल्य अभ्यासात साधारण असला , कच्चा असला तरी त्याला इंग्रजी माध्यमच दिले जाऊ लागले. इंग्रजीच्या भूताने एवढे झपाटले की अनेक शिक्षकांची मुले सुद्धा इंग्रजी शाळांतच आहेत, हे कटू सत्य आहे. (काही सन्मानीय अपवाद वगळता). या बाबतीत त्यांच्यावर ताशेरे सुद्धा ओढले जातात परंतू हे असे का झाले ? हे चिंतनीय आहे. कॉन्व्हेंटमध्ये दाखल करताना पालक लोक तेथील नियुक्त शिक्षक वृंदांची शैक्षणिक पात्रता,  त्यांची पदवी याकडे डोळेझाक करून पाल्यांना तिथे प्रवेशित करतात. जि. प. शाळा, खाजगी अनुदानित शाळा येथील शिक्षक हे शिक्षण क्षेत्रातील पदवी प्राप्त असतात नव्हे त्यांना ती पदवी पाहूनच नियुक्त केले जाते. तसेच त्यांचे चयन गुणवत्ता पाहून केले जाते. परंतु "आपल्या बाबुले इंग्रजी यायले पायजे ना" या अट्टाहासापायी सर्वच लोक त्यांच्या पाल्यांना कॉन्व्हेंट मध्ये टाकू लागले. याचा परिणाम जि.प. शाळा, खाजगी अनुदानित शाळा यांच्या पटसंखेवर झाला. तेथील पटसंख्या दिवसेंदिवस घटू लागली. तेथील शिक्षक
विद्यार्थ्यांसाठी वणवण फिरू लागले. मायबाप सरकारने गणवेशाच्या निर्णयाप्रमाणे जि. प. शाळा, खाजगी अनुदानित शाळा यांची पटसंख्या कशी वाढेल याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक नाही का ? महाराष्ट्रात एरवी मराठी-मराठी करणारे नेते सुद्धा या मराठी शाळांच्या हितासाठी काहीही एक करताना दिसत नाही ही या महाराष्ट्राची खंत नाही का ? गणवेशाच्या निर्णयापूर्वी शिक्षक भरतीचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. आज अशी परिस्थिती आहे की जे शिक्षक आहे तेच अतिरिक्त ठरत आहे. मायबाप सरकारने प्रथम या शिक्षकांच्या समायोजनाचे पाहिले पाहिजे. समायोजनात सुद्धा बिंदू नामावलीसारख्या एक ना अनेक अडचणी आहेत. याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. वीस-वीस वर्षांपासून सुरुवातीला विनाअनुदानित तत्त्वावर नंतर 20 टक्क्यांवर, 40 टक्क्यांवर झोकून देऊन कार्य करणारा शिक्षक जेव्हा अतिरिक्त ठरतो तेव्हा त्याला काय वाटत असेल ? त्याच्या मनाची स्थिती काय होत असेल? याची मेहरबान सरकारला जाणीव आहे की नाही ? सर्वप्रथम निर्णय घ्यायला हवा तो मराठी शाळा टिकवण्याचा. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या शिक्षणप्रेमी नेत्यांनी मराठी शाळा काढल्या, संस्था काढल्या त्या आज डबघाईस आलेल्या आहेत, मोडकळीस आल्या आहेत, काही तर बंद सुद्धा पडल्या परंतु त्यांना वाचविण्यात शासन अपयशी ठरत आहे. या लेखाद्वारे हेच सुचवायचे आहे की मराठी शाळा कशा टिकतील?, त्यातील पटसंख्या कशी वाढेल ?, जे आहेत ते शिक्षक कसे टिकतील ? या सर्व बाबींवर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक संघटना, शिक्षण मंत्रालय यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात भविष्यात जर एकही मराठी शाळा राहिली नाही, निव्वळ इंग्रजी कॉन्व्हेंटच राहिले तर कुसुमाग्रज, पु.ल., अत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या महाराष्ट्रासाठी ती एक शोकांतिका ठरेल. आज अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षण हे मराठी माध्यमातून देेण्यास सुरुवात झाली आहे. उच्च शिक्षण मराठीतून आणि अगदी सुरुवातीचे शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून होते आहे हा केवढा मोठा विरोधाभास आहे. मेहरबान सरकारला मराठी शाळा वाचवण्यासाठी अग्रेसर होण्याची हात जोडून विनंती. 

१८/०५/२०२३

Article about Bajirao First and a young man of Raverkhedi, MP

बाजीराव प्रेमाने भारावलेला युवक 

आपापसात संत-महात्मे, राजे-महाराजे, राष्ट्रपुरुष वाटून घेणा-या आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोरल्या बाजीरावांना मध्यप्रदेशात जास्त मान सन्मान, प्रचंड आदर असल्याचे या लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. या लोकांमधीलच एक तरुण बाजीराव समाधी स्थळाच्या विकासाबाबत प्रयत्नशील आहे. तर बाजीरावांच्या समाधी स्थळावरील माती व नर्मदेचे जल घेऊन शनिवार वाडा पुणे इथे जाणा-या या तरुणाने त्याच्या मुलाचे नांव बाजीराव ठेवले आहे.

कुठल्यातरी ध्येयाने झपाटून गेलेले युवक पाहिले की , त्यांच्यातील उर्जा पाहिली की आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे अशी प्रेरणा आपल्याला हमखास होत असते. असाच एक युवक याच महिन्यात भेटला. झाले असे की , माझ्या मुलीच्या कॉलेजला 8 दिवस सुट्ट्या होत्या. ती म्हणाली "बाबा आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ". मे महिन्यात, भर उन्हात कुठे फिरायला जाणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. परंतू निसर्गाने साथ दिली. आम्ही गेलो तेंव्हा ढगाळ वातावरण होते. जाण्यासाठी म्हणून कोणते ठिकाण आहे यावर विचार करू लागलो. नुकतीच 28 एप्रिल रोजी थोरले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी झाली होती. बाजीरावांचे विचार मनात होतेच त्यामुळे 10- 12 वषांपुर्वी समाज माध्यमावर वाचलेला बाजीरावांच्या समाधीबाबतचा एक लेख आठवला व कुटुंबियांसोबत चर्चा करून बाजीरावांच्या समाधीचे दर्शन घेण्यास जाण्याचे नक्की केले. ही समाधी ओंकारेश्वर पासून 40-45 किमीच्या अंतरावर आहे. ओंकारेश्वर येथे अनेकदा जाऊनही या समाधीला भेट देण्याचा योग काही कधी आला नव्हता. यावेळी मात्र ठरवून रावेरखेडी हे ठिकाण निवडले. खामगांववरून बाजीरावांच्या रावेरखेडी, जि.खरगोन,  मध्यप्रदेश येथील समाधीला जाणे म्हणजे लांबचा पल्ला होता. कुटुंबीय म्हणाले  किती वेळ लागेल ? , प्रवासच जास्त होईल. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी म्हटले, "अरे चला बाजीराव तर घोड्यावर लांब-लांबचे पल्ले गाठत, भूक लागल्यास घोड्यावर बसल्या-बसल्या कणीस कापून हातावर मळून, हुर्डा खाऊन पुढे जात असत. आपल्या जवळ तर मोटार आहे, जय बाजीराव म्हणा अन चला" त्यांच्यात उत्साह संचारला. गाडीने वेग धरला संभाजी महाराजांनी लुटलेले मुघलांचे ठाणे ब-हाणपूर, दक्षिणेचा दरवाजा म्हटला जाणारा अशीरगड अशी ठिकाणे मागे टाकत आम्ही पुढे चाललो होतो. रस्त्यात एका ठिकाणी थांबून आंब्याच्या झाडाखाली हातावर पोळी आणि झुणका घेऊन "बाजीराव भोजन" केले. भोजनोपरांत इतर सर्व पेंगुळले होते, सनावद नंंतर रावेरखेडी रस्ता म्हणजे  ग्रामिण भाग, हे ग्रामस्थ म्हणजे तत्कालीन सैनिकांपैकी इथेच वसलेल्यांचे वंशज असावेत का ? इथूनच मराठ्यांच्या फौजा दिल्लीला जात असतील, असे विचार करीत मी खिडकीतून सभोवतालचा प्रदेश न्याहाळत होतो. रावेरखेडी जवळ येत होते तसे-तसे बाजीरावांचा इतिहास आठवत होता. थोरले बाजीराव, मराठा साम्राज्याचा पेशवा अर्थात प्रधानमंत्री. एक अपराजित योद्धा, ज्याने 41 मैदानी लढाया जिंकल्या, इंग्रज, मुघल सर्व त्याला घाबरत असत, अतिशय चपळ, वेगवान हालचाली करणारा शाहू महाराजांचा निष्ठावान, कर्तबगार सरदार ज्याने शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला होता. छत्रसालाने मोहम्मद बंगशाचे आक्रमण झाल्यावर जेंव्हा  

जो गति भई गज ग्राह की, सो गति भई है आज। बाजी जात बुंदेल की, बाजी राखौ लाज ||

अर्थात "गजेंद्र मोक्ष" या पुराणातील कथेत हत्ती मगरीच्या तावडीत सापडतो व भगवंत त्याचे रक्षण करतात त्या गजेन्द्राप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. बाजीराव तुम्हीच आता बुन्देलांची लाज राखा. अशा आशयाचे पत्र पाठवल्यावर हातचा घास टाकून छत्रसालाच्या मदतीला धाऊन जाणारे बाजीराव, आणि उत्तरेवरच्या मोहिमेवर असतांना रावेरखेडी याच ठिकाणी सततच्या मोहिमा, थकवा व त्यातच झालेला उष्माघात, न उतरणारा ज्वर यामुळे अल्पवयात झालेले मराठा साम्राज्याची मोठी हानी करणारे त्यांचे दुःखद निधन. हे सारे आठवत होते तेवढ्यात एक वळण घेऊन आमची गाडी रावेरखेडी गावात शिरली व थोड्याच वेळात बाजीरावांच्या समाधीसमोर उभी राहिली. ते ठिकाण पाहताच आम्ही सर्व रोमांचित झालो. माझ्या जेष्ठ भगिनीच्या डोळ्यास धारा लागल्या. राऊ कादंबरी, राऊ मालिका, श्रीमंत बाजीराव पेशवे पुस्तक यातील दृश्ये तिला आठवली होती. शेजारी बाजीराव व मराठ्यांचा पराक्रम पाहिलेली नर्मदा नदी वाहत होती व  तिच्या  डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वच स्तब्द झाले होते. शेजारच्या चहावाल्या काकांनी "पेशवा सरकारका पराक्रम ही वैसा था" असे म्हणत पिण्यास पाणी दिले. आम्ही समाधीसमोर नतमस्तक झालो. बाजीरावांचे निष्ठावान सरदार राणोजी शिंदे यांनी ही समाधी बांधली होती. रावेरखेडी येथे बाजीवारांच्या सालस, मितभाषी पत्नी काशीबाई यांनी बांधलेले एक सुंदर शिव मंदिर आहे. इथे एक जीर्ण झालेली इमारत आहे. कुणी तिला वाडा म्हणते तर कुणी पेशव्यांचा नाका असल्याचे सांगतात. दयाराम पवार या चहावाल्या काकांनी त्यांच्या दुकानाला पेशवाजी टी सेंटर असे नांव दिल्याचे दिसले. आमची समाधीबाबत विचारपूस व जिज्ञासा बघून त्यांनी येथील अनिल बिर्ला उर्फ अनिल बाजीराव या तरुणाला फोन करून बोलावले. लेखात अगदी

अनिल बिर्ला

सुरुवातीला ज्या तरुणाचा उल्लेख केला आहे तो अनिल बिर्ला हा तरूण अगदी अल्पावधीतच समाधी स्थळी आला. अनिल बिर्ला यांचे बाजीराव समाधीबाबतचे कार्य, प्रेम, आदर पाहून लोक त्यांना अनिल बाजीराव असे म्हणू लागले आहेत. अनिल बिर्ला हे या समाधी स्थळाच्या विकासाबाबत प्रयत्नशील आहे. त्यांच्याच प्रयत्नाने मुख्य रस्त्यापासून समाधी स्थळापर्यंत रस्ता झाला आहे. अनिल बिर्ला यांनी हिंदी भाषेत "बाजीराव गाथा" ही कविता सुद्धा लिहिली आहे. अनिल बिर्ला बाजीरावांच्या समाधी स्थळावरील माती व नर्मदेचे जल घेऊन शनिवार वाडा पुणे इथे गेले होते. त्यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक झाले

होते. आपापसात संत-महात्मे, राजे-महाराजे, राष्ट्रपुरुष वाटून घेणा-या आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोरल्या बाजीरावांना मध्यप्रदेशात जास्त मान सन्मान, प्रचंड आदर असल्याचे या लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. अनिल बिर्ला यांनी मस्तानीबाई यांच्याबद्दल सुद्धा आदरयुक्त भाष्य केले. बाजीराव यांच्या जयंतीला येथे "बाजीराव भोजन" बाजीराव प्रतिष्ठान तर्फे आयोजित केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात सहभागी असतो अशी माहिती अनिल यांनी दिली. या ठिकाणी आता बाजीरावांचा अश्वारूढ असा पुतळा उभारला जाणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. अनिल यांना बाजीराव यांच्याप्रती नितांत आदर आहे. "मी त्यांचे जे काही कार्य करतो त्याचे संकेत मला पेशवा सरकारच देतात" असे अनिल यांनी सांगितले. आणखी एक गोष्ट सांगितल्यावर तर आम्ही विस्मयचकितच होऊन गेलो. अनिल बिर्ला यांना थोरले बाजीराव यांच्याप्रती इतके प्रेम, आदर, भक्ती  आहे  की त्यांनी त्यांच्या पुत्राचे नामकरण बाजीराव हेच केले आहे. हे सांगताना त्यांना होणार आनंद व त्यांच्या मनातील भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव त्यांचा जाज्वल्य इतिहास, रावेरखेडी या छोट्या ग्रामातील अनिल बिर्ला यांच्यासारखा युवक, आपल्या चहाच्या दुकानाला पेशवाजी टी सेंटर असे नांव देणारे दयाराम पवार अशा अविस्मरणीय आठवणी घेऊन आम्ही निघालो सूर्यास्ताची वेळ झाली होती गाडी ओंकारेश्वरच्या वाटेला लागली होती. बाजीराव व त्यांचा पराक्रम, आपल्या भावाला साथ देणारे चिमाजी आप्पा, काशीबाई, मस्तानीबाई, बाजीरावांचे निष्ठावान शिंदे, होळकर, गायकवाड, पवार अशी सारी थोर माणसे आठवत होती त्या आठवणीत केंव्हा ओंकारेश्वर आले कळले सुद्धा नाही. अहिल्याबाई होळकर यांचा महेश्वर येथील वाडा, त्यांच्या वस्तू, देवासाठी असलेला सोन्याचा झुला, अनेक देवी देवता असलेले, अनेक शिवलिंग असलेले देवघर,नर्मदेवर बांधलेला सुंदर घाट, राजेश्वर मंदिर हे सारे पाहून व उपरोक्त सर्व ऐतिहासिक महापुरुष व थोरल्या बाजीरावांच्या प्रेमाने भारावून जाऊन त्यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी कार्य करणारा बाजीराव प्रेमाने भारावलेला युवक अनिल बिर्ला या सा-या आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवास करु लागलो.      

११/०५/२०२३

जुवा किसिका ना हुवा


तरुणांना उच्चभ्रू लोकांसाठी सारखी जीवनशैली जगायची ओढ लागली आहे. परंतु त्यासाठी मेहनत करणे मात्र त्यांना नको आहे. असे तरुण मग या ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे आकर्षित होत आहेत.

अनेक व्यसनांसोबत एक व्यसन जुगाराचे सुद्धा असते. जुगार खेळणे हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. फक्त जुगार खेळण्याच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. तसे तर हा विषय अनेकदा चर्चिला जातो आणि यावर बरेच लिखाण सुद्धा झाले आहे तरीही याच विषयावर लिहिण्याचे ठरवले. या विषयावर अधिकाधिक लिखाण आणि उद्बोधन झाल्यास कदाचीत ते नवीन पिढीस कुठेतरी विचार करण्यास भाग पाडेल व ते जुगारासारख्या महाभयंकर अशा विषसर्पाच्या विळख्यात अडकणार नाही असे वाटले व हाच विषय लिहायला घेतला.            

कोणतेही व्यसन किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणे हे चांगले नसते "अति सर्वत्र वर्ज्यते " असे जे म्हटले आहे ते यासाठीच. आजकाल आपण पाहतो भौतिक सुखाची वा भौतिक सुख भोगण्याची लालसा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वस्तूंमध्ये सुख असते असे वाटून नाना प्रकारच्या चैनीच्या वस्तू , गॅजेट्स यांची खरेदी केली जाते. सुलभ कर्ज योजना सुद्धा याला कारणीभूत आहेत. आज अनेक लोक या सुलभ मिळणा-या कर्जावर वाहने आदी वस्तू खरेदी करतात व चार-पाच वर्षात त्या विक्रीस काढतात. जुन्या वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याचे हेच कारणं आहे. अनेक प्रसंगी या वस्तू भविष्यात टाकाऊ होऊन जातात आणि मग पृथ्वीवर कचरा वाढत जातो.  भौतिक सुखे भोगण्यासाठी वित्ताची गरज असते आणि वित्त मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या धडपडी मग केल्या जातात. चरितार्थाचे एक साधन असूनही मनुष्य इतर अनेक साधने शोधू लागतो आणि आपली शांती गमावून बसतो. या इतर अनेक साधनांमध्ये सध्या मोबाईलसारखी, इंटरनेट रेडी पीसीसारखी साधने त्यांना पालक सुद्धा मोठ्या हौसेने घेऊन देत आहेेेत. टीव्ही,  मोबाईल ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराची मोठ्या प्रमाणात जाहिरात होताना दिसतात आहे आणि या जाहिराती चक्क नावाजलेले नट करत आहेत. या जाहिराती करताना तरुणांना पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते आणि त्यांना जुगाराकडे आकर्षित केले जाते. याच जाहिरातीमध्ये कुठेतरी असा जुगार खेळणे एक जबाबदारीचे काम असते आणि त्यात नुकसानही होऊ शकते असे कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेले असते. तरुणांना आजकाल शानशौकीत राहण्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. विविध प्रकारच्या गाड्या दामटायच्या,  उंची वस्त्रे परिधान करायची आणि उच्चभ्रू लोकांसारखी जीवनशैली जगायची अशी ओढ त्यांना लागली आहे. परंतु त्यासाठी मेहनत करणे मात्र त्यांना नको आहे. असे तरुण मग या ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे आकर्षित होत आहेत. अनेक प्रसंगी असे दिसून आले आहे की या जुगार खेळण्यामुळे अनेक तरुणांना, किशोरवयीन मुलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही लहान मुलांनी हा जुगार अर्थात ऑनलाईन रम्मी खेळून आपल्या पालकांच्या बँकेच्या खात्यातील लाखोच्या घरात असलेली रक्कम गमावली आहे.  असे असतांनाही या जुगाराच्या जाहिराती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा काय केल्या जातात ? जुगारामुळे केवढा मोठा फटका बसतो हे आपल्या भारतीयांना किती चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. यासाठी आपल्या महाभारतात एवढे मोठे उदाहरण महर्षी व्यासांनी दिलेले आहे. जुगार म्हणजे तत्कालीन द्युत. हा द्युत खेळ खेळण्यास तत्कालीन क्षत्रिय नकार देत नसत अशी महाभारतकालीन प्रथा होती. दुर्योधन धर्मराजाला द्युत खेळण्यासाठी आमंत्रित करतो व त्यात धर्मराज आपले राज्य, धन, प्रिय बंधू, पत्नी या सर्वांना गमावून बसतो आणि पुढील महाभारत घडते. परंतु ही उदाहरणे लहान मुले व तरुण यांच्यापर्यंत आपण पोहोचवतच नाहीये. अशी उदाहरणे जर त्यांना वारंवार सांगितली गेली तर कदाचित हे रम्मी, ऑनलाईन जुगार व त्याच्या जाहिराती कमी होण्याची शक्यता किंवा त्या बंद होणे शक्यच नाहीच का ? नवीन पिढीपर्यन्त जे पोहोचते आहे ते आपल्या राष्ट्रासाठी भविष्यात नक्कीच हानिकारक आहे अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. महाभारत या मालिकेमध्ये अनेक प्रसंगानुरूप अशी महेंद्र कपूर यांच्या आवाजातील समर्पक गीते लागत असत याच गीतामध्ये पुढील एक गीत होते.

जुवा किसिका ना हुवा

इसमे जीत ना हार |

सर्वनाश का खेल है,

मिटे कई घरबार ||

सिख बनती है युगोसे, नये युग का करे स्वागत ||

वरील गीत पंक्ती पालक, शिक्षक व तसेच सर्वांनी लक्षात घेऊन आपआपल्या मोबाईलधारक पाल्यांना , विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्या  तरच आपल्या देशाचे आधारस्तंभ असलेली आपली भावी पिढी जुगारासारख्या महाभयंकर अशा विषसर्पाच्या विळख्यात अडकणार नाही असे वाटते.

२७/०४/२०२३

Article about english city banners

महापुरुष पुतळे, सौंदर्यीकरण फलक आणि मराठी भाषेस फाटा



शहरात इंग्रजीतील फलकांऐवजी, लव चे बदाम अर्थात "दिल" चे चिन्ह असलेल्या फलकांऐवजी मराठी भाषेत फलक लावता येणार नाही का? तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ त्यांनी उद्गारलेले सुप्रसिद्ध असे त्यांचे वाक्य लावले तर ते अधिक समर्पक व प्रेरणादायी ठरणार नाही का?

काही दिवसांपूर्वी खामगांव शहरात आय  लव्ह खामगांव ,  आय  लव्ह सिल्व्हरसिटी , आय  लव्ह कॉटनसिटी खामगांव. अशा आशयाचे विद्युतदिव्यांचे फलक लागले. या फलकातील लव्ह या शब्दाच्या ठिकाणी  लाल बदामचा आकार जो दिल अर्थात हृदयासाठी वापरला जातो त्याचा वापर केला आहे. हा आकार सहसा प्रेमीजीवांच्या प्रेमासाठी सांकेतिक पद्धतीने केला जातो. तसे तर असे फलक आजकाल अनेक शहरात लागलेले आहेत. परंतू  खामगांव शहरात हे फलक लागल्यावर विहिंपचे पालक  मा. बापूसाहेब करंदीकर यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर किंवा त्यांच्या नावे असलेल्या सुंदर स्थानांच्या जागी असे तरुणांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले लव्हचे चिन्ह वापरण्याऐवजी त्या महापुरुषांची सुप्रसिद्ध वाक्ये लावावी जेणे करून ती वाक्ये नवीन पिढीला सुद्धा कळतील अशा आशयाचा एक लेख लिहिला होता. हा लेख कुणालाही पटेल असाच होता. याच संबधीत अनेक जेष्ठ नागरीक व तरुणांनी मला महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर किंवा त्यांच्या नावे असलेल्या सुंदर स्थानांच्या जागी असे लव्ह चे चिन्ह असलेले फलक नसावेत असे फोन करून सांगितले. सर्वच स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी , क्रांतिकारकांनी पहिले प्रेम देशावर केले  परंतू त्यांनी तसे प्रेम असल्याचे फलक नाही लावले तर आपल्या कृतीतून  त्यांनी त्यांचे मातृभूमीवर किती प्रेम आहे हे सिद्ध करून दाखवले. आपला देश, आपले शहर हे सर्वांनाच प्रिय असते म्हणूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या  स्वा. सावरकरांना आपल्या मातृभूमीची आठवण येऊन 

"नभी नक्षत्रे बहुत एक परि प्यारा, मज भरतभूमीचा तारा" , प्रासाद इथे भव्य परि मज भारी आईची झोपडी प्यारी" 

असे काव्य त्यांना स्फुरले. केवळ जागोजागी इंग्रजीतील शहरांवरील प्रेमाचे फलक लावल्याने शहारावरचे प्रेम वाढेल का? त्या फलकाजवळ जाऊन सेल्फी काढणारे तरुण व प्रशासन शहरावरील प्रेमापोटी एखादी स्वच्छता मोहीम , पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील का? शहर सुंदर दिसावे त्यासाठी सौंदर्यीकरण स्थाने , आकर्षक वाहतूक बेटे असावीत , विद्युत रोषणाई असावी. आय लव्ह खामगांव सारख्या फलकांना सुद्धा अगदीच विरोध नाही परंतू ते फलक महापुरुषांच्या फुतळ्याजवळ नसावेत. तिथे महापुरुषांची सुप्रसिद्ध वाक्येच असणे जास्त समर्पक आहे. शिवाय आपल्याला आपल्या भाषेचा काही अभिमानच उरला नाही, इंग्रजी शाळांना विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे तर मराठी शाळा बंद पडत आहे, दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्या म्हणून आग्रह आणि इकडे सरकारच शहरांमध्ये आय लव्ह व त्यापुढे शहरांचे नांव असलेले इंग्रजीतील फलक लावते याला काय म्हणावे? महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आय लव्ह खामगांव प्रमाणे असलेल्या इंग्रजी फलकांऐवजी मराठी भाषेत फलक का लावले जात नाही ? त्या त्याबाबत कोणी काही मागणीही करत नाही किंवा आणि आजपावेेेतो कुणी केलीही नाही. एरवी मराठी मराठी करणारे राजकीय पक्ष व संघटना सुद्धा याबाबतीत मूग गिळून बसले आहेत. शहरावर प्रेम असल्याचे फलक इंग्रजीत लावण्याऐवजी मराठी सुद्धा लावता येऊ शकतात आणि तसेे काही शहरात लावलेले सुद्धा आहेत. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात "आम्ही वरणगावकर" असा फलक लावला आहे. याप्रमाणे इतरही शहरात इंग्रजीतील फलकांऐवजी, लव चे चिन्ह असलेल्या फलकांऐवजी मराठी भाषेत फलक लावता येणार नाही का? तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ त्यांनी उद्गारलेले सुप्रसिद्ध असे त्यांचे वाक्य लावले तर ते अधिक योग्य ठरेल व नवीन पिढीस प्रेरणादायी सुद्धा ठरेल असा विचार प्रशासनाने करायला नको का ? तसेेेच  मा बापूूूसाहेब करंदीकर यांच्या लेखानुसार महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर "अहिंसा परमो धर्म" टिळकांच्या पुतळ्या समोर "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे" असे फलक लावले असते तर ते जास्त संयुक्तिक वाटले असते व त्या महापुरुषांना ती खरी श्रद्धांजली झाली असती.