पस्तीस तुकडे, सोळा वार ...
मुली धोक्यातच
नोहेंबर 2022 मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना दिल्ली येथे घडली होती. श्रद्धा वालकर या मुलीची हत्या आफताब नामक तरुणाने तुकडे-तुकडे करून केली होती. आफताबने श्रद्धाच्या देहाचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले व रात्री-बेरात्री तो त्या तुकड्यांची विल्हेवाट लावत असे. हे सर्व बंद घरात घडले होते परंतू परवा पुनश्च अशीच एक देश हादरवून सोडणारी घटना घडली ती म्हणजे साक्षीला मारण्याची, साहील नामक तरुणाने साक्षीवर भर रस्त्यात, लोकांची वर्दळ असलेल्या वस्तीत हल्ला केला, तिच्यावर चाकूने 16 वार केले व नंतर दगडाने ठेचून साक्षीला जीवे मारले व पळून गेला. तेथून ये-जा करणा-या कुणीही त्याला हटकले नाही किंवा त्याच्यावर छुपा का होईना हल्ला केला नाही. आजकाल कोणी कोणाच्या मध्ये पडत नाही असे म्हटले जाते. परंतू आजकालची प्रकरणे, भांडणे ही सुद्धा विचित्र अशी असतात. कुणाची काय भानगड असेल काहीच सांगता येत नाही म्हणूनही कुणी कुणाच्या मध्ये पडत नाही असेही आहे. सामाजिक परिस्थिती मोठ्या वेगाने बदलली. पुर्वी कुण्या मुलाने काही व्रात्यपणा केला तर शेजारी सुद्धा त्याला दम देत असत व त्या मुलाचे पालक सुद्धा शेजा-याला काही बोलत नसत. याने सर्वांच्याच पाल्यांवर एकप्रकारचा वचक होता. आजकाल चूक मुलाची /मुलीची असली व त्याबाबतीत कुणी शेजारी बोलला, त्याने ती चूक निदर्शनास आणून दिली तर शेजा-यालाच "तुम्हाला काय करायचे ?" असे बोल ऐकावे लागतात. म्हणून मग कुणी कुणाच्या मध्ये पडत नाही व याचाच फायदा मग साहीलसारखे मारेकरी घेतात. साहिलने हल्ला करून मारणे हा अक्षम्य, कठोर दंडनीय असा अपराध आहे. परंतू साहीलसारख्या मुलांशी मैत्री करणे, 15 वर्षाच्या मुलीने लिव्ह इन मध्ये राहणे हे सुद्धा तितकेच चुकीचे नाही का ? साक्षी साहीलसह लिव्ह इन मध्ये राहत होती व नंतर तिने त्याच्याशी ब्रेकअप करून दुस-या मुलाशी मैत्री केली होती असे वाचनात आले. मोबाईलमुळे लहान मुले सुद्धा लवकर मोठी होत आहे त्यांना नको ती समज अगदी अल्पवयातच येत आहे. साक्षी हल्ल्यावर आता अनेक तर्क वितर्क व्यक्त होत आहे. साहिलचे समाज माध्यमांवरील आतंक करण्या बाबत सारखे काही रील, त्याचे नांव बदलणे, रुद्राक्ष माळ घालणे वगैरे समोर येत आहे. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुली सुद्धा अशा तरुणांच्या नादी कशा काय लागतात ? त्यांचे ब्रेन वॉश कसे होते ? अशा मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात सामाजिक उद्बोधन होणे अत्यावश्यक झाले आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केली त्यावेळी "मुलींनो समाजातील आफताब ओळखा" असा लेख लिहिला होता. या लेखात बरेच वरील बाबत भाष्य केले होते ते वाचक "मुलींनो समाजातील आफताब ओळखा" यावर क्लिक केल्यावर वाचू शकतात. (Click on link to read) किशोरावस्थेत पदार्पण करणा-या सर्वच मुलींना त्यांच्या घरी व शाळांतून योग्य ते मार्गदर्शन होणे जरुरी आहे. मुलींसाठी असणा-या कायद्यांची एक " स्वयंसिद्धा" नामक पुस्तिका महाराष्ट्रात ब-याच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वितरीत झाली आहे. अशी कायदे विषयक पुस्तके देशभरातील मुलींना वाटणे आवश्यक आहे. अशा पुस्तिका निव्वळ वितरीत करून भागणार नाही तर त्यांना त्या वाचण्यास प्रेरीत करणे किंवा वाचून दाखवणे जरुरी आहे. किशोरावस्थेत प्रेम, आकर्षण हे होणे साहजिक आहे परंतू आपण ज्याच्यावर / जिच्यावर प्रेम करतो आहे त्याची इत्यंभूत माहिती असणे आजच्या काळात अगदी जरुरीच झाले आहे. गतवर्षीच्या अखेरीस पोलिसांसमोर श्रद्धाच्या देहाचे तुकडे केले असे कबूल करणा-या आफताबने नंतर मात्र श्रद्धाला मारण्याचे साफ नाकारले होते. साहील प्रकरणात सुद्धा तसेच होण्याची शक्यता आहे. कारण त्याला तेथून जाणा-या येणा-यांनी हटकण्याचीच साधी हिम्मत दाखवली नाही तर प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळणे दूरच. ते तरी बरे की ही घटना सीसीटीव्ही कॅॅमे-यात कैद झाली आहे. मुलींना फसवणे, बलात्कार करणे, त्यांच्या हत्या करणे अशा गुन्ह्यांसाठी खरेतर स्पेशल न्यायालय व अत्यंत कठोर असे कायदे करणे अगदी गरजेचे झाले आहे. तिकडे पाकिस्तानात अल्पसंख्य हिंदू मुलींना लपवून छपवून वाढवावे लागत आहे , त्यांचे विवाह त्यांच्यापेक्षा वयाने दुप्पटीहून अधिक असलेल्या तेथील बहुसंख्यांकांशी जबरीने लावली जात आहे, त्यांना विस्थापित व्हावे लागत आहे आणि इकडे भारतात हिंदू मुली मारल्या जात आहे म्हणजे दोन्ही देशात हिंदू मुलीच संकटात का ? महिला आयोग , मानवाधिकार यांचे अद्याप साक्षीच्या हत्येबाबत काहीही एक विधान ऐकण्यात आले नाही. नटांच्या नशेखोर मुलांसाठी पुढे येणारे नेते सुद्धा साक्षीच्या हत्येच्यावेळी मूग गिळून गप्प आहे. जेंव्हा हिंसा करणा-यांना पोलिस किंवा सैनिक मारतात तेंव्हा मानवाधिकारवाले खडबडून जागे होतात. थातूरमातूर प्रकरणात माहिला आयोग पुढे येतो साक्षीच्या हत्येच्या प्रकरणात मात्र आयोगाचे अवाक्षरही नाही. वा रे मानवाधिकार ! वा रे महिला आयोग ! या भारतात आता नवीन संसद भवन लोकार्पित झाले आहे. या नव्या भवनातून देशातील माता , भगिनीं यांच्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी चांगल्या उपाययोजना तयार होवोत. हल्लेखोर, मारेकरी , बलात्कारी यांच्या विरोधात कठोर कायदे निर्माण होवोत हीच अपेक्षा आहे. मुलींवर अत्याचार, बलात्कार अशी दुष्कृत्ये करणा-यांविरोधात सुरुवातीपासूनच जर का कठोर कायदे या देशात असते तर अनेक गुन्हेगार निर्ढावले नसते तसेच आफताब, साहीलसारखे तरूण श्रद्धाचे पस्तीस तुकडे, व साक्षीवर सोळा वार करण्यासारखी कृत्ये करण्यास धजावलेच नसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा