Click "Follow" Button below To Follow this Blog

१८/०९/२०१७

Marathi Sahitya Sammelan, Hivra Ashram Dist Buldhana

विघ्नसंतोष
पल्या देशात आपले स्वत:चे काम सोडून     दुस-याच्या कार्यात कसे विघ्न आणता येईल याचाच सतत विचार करणा-या लोकांचे वारेमाप पिक आले आहे. आता यात सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू सुद्धा असू शकतो किंबहुना बरेचदा तो असतोच. सरकार मध्ये सत्ताधारी काही चांगले निर्णय घेत असेल तर विरोधी विकास सोडून राजकारणासाठी त्या विकास कार्यात अडथळा अर्थात विघ्न आणतात. अनेक उदाहरणातून आपणास अशा विघ्नसंतोषी लोकांनी चांगल्या कार्यात घातलेला खोडा आठवत असेल. एकाने काही म्हटले तर दुसरी संघटना म्हणा किंवा व्यक्ती म्हणा आपली बुद्धी दुसरे काही विशेष कार्य नसल्याने त्याच्या विरोधी काहीतरी नवीन टुमणे काढतात. आता मराठी साहित्य संम्मेलनाचेच घ्या ना. बुलढाणा जिल्ह्यात हिवरा आश्रम येथे हे संम्मेलन होणार अशी बातमी येताच जिल्ह्यातील साहित्यप्रेमी सुखावला. शुकदास महाराज यांच्या बाबतीत १९८० च्या दशकात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतू त्या बातम्यांना शुकदास महाराजांच्या असंख्य भक्तांनी थारा दिला नाही. त्यांच्या वैद्यकीय सेवेबाबत प्रश्न विचारले गेले परंतू त्यांच्या वैद्यकीय सेवेने अनेकांना फायदा झाला असेही अनेक लोक सांगतात.औषधे देण्यासाठी त्यांनी एका तज्ञ डॉक्टरची सुद्धा नियुक्ती केली होती.आश्रमाने अनेक सामाजिक कार्ये केली आहेत.अनेकांना रोजगार मिळाला आहे.तसेच सर्वदूर महाराजांची चांगलीच ख्याती आहे.आमच्या लहानपणापासून कुणालाही महाराजांबद्द्ल चांगलेच बोलतांना ऐकले आहे.महाराजांचे दोष काढणा-यांनी निर्मल बाबा सारख्या बाबां विरोधात काही आंदोलन करावे,राम रहीम बाबत तर या विघ्नसंतोषी लोकांनी अजून ब्र देखील काढला नाही. आता महाराज हयात नसतांना केवळ मराठी साहेत्य संम्मेलन त्यांच्या आश्रमात होत आहे तर त्याला विरोध का ? संम्मेलनाला विरोध होतांना आणखी एका गोष्टीचे अप्रूप वाटले की महाराजांची तुलना थेट प्रख्यात गुंड दाऊदशी केल्या गेली काय तर म्हणे, “आज हिवरा आश्रमात संमेलन भरवता आहात,उद्या दाऊद ने बोलावले तर तिकडेही संम्मेलन भरवणार.” मराठी साहीत्यिकांची बुद्धीभ्रष्ट झाली आहे असे समजता का? अंधश्रद्धेचे समर्थन मुळीच नाही व कुणीही अंधश्रद्धा ठेवू नये. परंतू भारतात सर्वच धर्मीयात लाखो खेड्यापाड्यात फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आजही आहे. परंतू हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा जेवढी दाखवली जाते, तिला प्रसिद्धी दिली जाते तितकी इतरांमधील नाही. असे का? एखादी संघटना अशीही निर्माण करावी की सर्वच धर्म आणि पंथातील अंधश्रद्धा निराकरण करण्याचे कार्य करेल. अंधश्रद्धा दूर करायची असेल तर इतरांचे दोष,इतरांना नावे ठेवण्याऐवजी गरीब जनतेच्या मनातील अशी भिती दूर करावी की ज्या भिती मुळे ते अंधश्रद्धा ठेवतात. मी प्रत्यक्ष पाहिलेले उदाहरण,आहे अगदी ताजे. मागील महिन्यात प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात गेलो होतो, माझा क्रमांक आला नव्हता म्हणून वाट पहात बसलो होतो तेंव्हा तेथे एका सुशिक्षित महिलेच्या मुलास गोवर झाला होता व ती याबाबत तिच्या नातेवाईकांशी बोलत होती. ती तिच्या नातेवाईकांना म्हणाली “आता शितला माता मंदिरात जावे लागेल”.महिला सुशिक्षित असूनही तिच्या मनातील शेकडो वर्षांपासून चालत आलेली अंधश्रद्धा दूर झाली नव्हती तर तळागाळातील जनतेचे काय गत असेल? सर्व भारतीयांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करायची असेल तर ठीक ठिकाणी विशेषत: ग्रामिण भागात मोठ्या पडद्यावर वैज्ञानिक पद्धतीने आरोग्य, मानसिक रोग इ बाबत सर्व घटना दाखवा, जनतेच्या मनातील भिती दूर करा तर अंधश्रद्धा दूर होईल. दुस-यांच्या कार्यात खोडा आणून किंवा हयात नसलेल्या ज्या महाराजांवर लाखो जनतेचे प्रेम आहे,आदर आहे,विश्वास आहे,श्रद्धा आहे परंतू अंध नव्हे अशा माणसाविरोधात किंवा त्यांच्या आश्रमाविरोधात बोलून विघ्नसंतोष मिळवण्यात काय अर्थ? असे कार्यात विघ्न आणून अंधश्रद्धा दूर नाही होणार.

१४/०९/२०१७

A house owner working women that her maid cheated her regarding cast

घरगडी आणि सुरक्षितता 
आपणा सर्वाना जात नावाचा गजकर्ण झाला आहे ज्याला बरे करण्यास कोणतेही जालिम लोशन नाही आहे. यास राजकारणी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. नवतरुण,उदयोन्मुख पत्रकार यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जात-पात विषय सोडा. कोणीही कामाच्या बहाण्याने खोटे बोलून तुमच्या घरात प्रवेश करू शकते आणि पुढे काही आपत्तीजनक किंवा गुन्हेगारी कृत्यही त्याच्याकडून घडू शकते. तसे अनेकदा झालेले सुद्धा आहे. त्या घरात मोकळेपणे वावरणा-या स्वयंपाकिणीच्या मनात कदाचित पुढे अजून काही काळेबेरे आले असते तर !
नुकतेच पुण्यात स्वत:ची खरी ओळख लपवून एका स्त्रीने दुस-या स्त्रीच्या घरात स्वयंपाक करण्याचे कार्य मिळवले जेंव्हा त्या स्वयंपाक करणा-या बाईची खरी ओळख पटली तेंव्हा घर मालकिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाकडे फक्त एकच डोळा उघडा ठेऊन पहिले गेले. खरी ओळख लपवून तर आज-काल सरकारी     नोक-या सुद्धा पटकवतात आहे. जात प्रमाणपत्रे,खोटे उत्पन्न, खोटी टायपिंगची प्रमाणपत्रे सर्वदूर खोटी माहिती दाखवली जाते आणि आपला कार्यभाग साधला जातो. वरील प्रकरणात सुद्धा तसेच झाले आहे. मुळात कुणीही जातीभेद करूच नये. परंतू आपण ए पी जे अब्दुल कलामांनी दाखवलेले 2020 चे स्वप्न पाहत आहोत आणि जात काही सोडत नाही. पूर्वी नव्हता इतका जातीभेद लोक आता करीत आहे. मी अमका तू ढमका, ही संघटना ती संघटना . काय चाललंय काय या देशात ? मोठी संत परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात. जेथे एकनाथांनी 500-600 वर्षांपूर्वी आपल्या येथील पितरांच्या जेवणावळीत तत्कालीन अस्पृश्यांना बसवले होते, ज्या सावरकरांनी रत्नागिरीत सहभोजनाचे कित्येक कार्यक्रम घेतले, पतीत पावन मंदीर खुले केले होते. त्याच महाराष्ट्रात अजूनही गरजेसाठी जात लपवतात आणि गरजेसाठी जातीचा अभिमान प्रकट करतात. आपण गौरी-गणपतीला ज्यांचे पोट भरले आहे अशांनाच जेऊ घालतो उलटपक्षी एका तरी पिडीत, गरीब व्यक्तीस, गरीब विद्यार्थ्यास जेऊ घालावे तेंव्हा ख-या अर्थाने गौरी-गणपती पावतील. परंतू पुण्यातील या प्रकरणाने उठसुठ एखाद्या विशिष्ट जातीवर सतत तोंडसुख घेणा-यांना आयते कोलीतच मिळाले. अनेकांनी या प्रकरणावर जातीय बाजूनेच टीका करणे सुरु केले. परंतू या प्रकरणातून एक शिकवण घेणे अत्यंत जरुरी झाले आहे. ते म्हणजे घरी कुण्याही अनोळखी व्यक्तीस काम द्यावयाचे असेल तर त्याची इत्यंभूत माहिती घेणे अत्यावश्यक आहे. कारण कोण कामाच्या बहाण्याने खोटे बोलून तुमच्या घरात प्रवेश करेल आणि पुढे काही आपत्तीजनक किंवा गुन्हेगारी कृत्यही त्याच्याकडून घडू शकते. तसे अनेकदा झालेले सुद्धा आहे. वरील प्रकरणात सुद्धा त्या घरात मोकळेपणे वावरणा-या स्वयंपाकिणीच्या मनात कदाचित पुढे अजून काही काळेबेरे आले असते तर ! ज्याप्रमाणे मोलकरणींना अधिकार मिळत आहे. त्या अनुषंगाने मालकांना सुद्धा काही अधिकार असावे. मालकांनी सुद्धा त्यासाठी एकत्र यावे. काही तरी काम मिळवण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करायचा आणि गैरप्रकार करायचे यामुळे प्रसंगी घरमालकाच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. मोठ्या शहरांमध्ये असे कित्येक प्रकार घडले आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे लोक पैश्यासाठी काहीही करायला मागे पुढे पहात नाही आहे. यामुळेच घरात काम देतांना व्यक्ती पारखून घेणे गरजेचे झाले आहे. प्रसंगी तुम्ही कोणाला कामावर घेतले आहे मग ती स्वयंपाकीण बाई का असेना, पोलिसांना त्याची माहिती देऊन ठेवा. तुमच्यावर भविष्यात येणा-या आपत्तीची तीव्रता नक्कीच कमी होईल. पुण्यातील या प्रकरणात माध्यमांनी फक्त एकाच “अँगल” ने पाहिले आहे.घरगडी बनणारे जर अशाप्रकारे खोटे बोलून घरात दाखल होत असतील तर यात घर मालक त्याचे कुटुंबीय, लहान मुले यांच्या सुरक्षिततेची सुद्धा एक बाजू नाही आहे का? नुकतेच गुरुगाम येथील घटनेत जर बस कंडक्टर जर पारखून घेतला असता तर लहानग्या निरागस प्रद्युम्नचा जीव गेला नसता. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील तलवार दाम्पत्याने जर हेमराज या आपल्या घरगड्यास पारखून घेतले असते तर षोडशवर्षीय आयुषीने हकनाक जीव गमावला नसता. पुण्यातील या प्रकरणात ही बाजू सुद्धा ध्यानात घेणे गरजेचे आहे. परंतू आपणा सर्वाना जात नावाचा गजकर्ण झाला आहे ज्याला बरे करण्यास कोणतेही जालिम लोशन नाही आहे. यास राजकारणी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. नवतरुण,उदयोन्मुख पत्रकार यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जात-पात विषय सोडा. या प्रकरणातून घरगडी कसा खोटारडा झाला आहे,फसवा झाला आहे तो किंवा ती तुमच्या घरात बिनदिक्कत,राजरोसपणे प्रवेशीत होऊन आपला कार्यभाग साधत आहे. जे घडले ते घडायला नको होते परंतू या प्रकरणात सुरक्षितता हा सुद्धा एक विषय आहे हे सुद्धा ध्यानात असणे जरुरी आहे.

०७/०९/२०१७

Hindu Mythological story of demon brothers "Sunda" and "Upsunda" regarding the Marathi word "Sundopsundi"

तिलोत्तमा आणि सुंदोपसुंदी 
दोन गटातील अंतर्गत वाद किंवा कलह असल्यास “सुंदोपसुंदी” हा शब्द वापरला जातो. अनेक वेळा हा शब्द वृत्तपत्रातून वाचनात आलेला आहे.  राजकीय पक्षांतील अंतर्गत वादाबाबत किंवा संयुक्त सरकार असेल तर दोन पक्षातील वादाबाबत हा शब्द हमखास वापरला जातो. बातमी किंवा हा शब्द असलेले वाक्य वाचले की सुंदोपसुंदीचा अर्थ सर्वांच्या लक्षात आला येतो परन्तू हा शब्द कसा उत्पन्न झाला असावा ? हे काही ठाऊक नव्हते. येशू ख्रिस्ताने “शोधा म्हणजे सापडेल” असे म्हटले आहे. त्यामुळे “सुंदोपसुंदी” शब्दाच्या उत्पतीचा शोध सुरुच होता. अशातच तिलोत्तमाची कथा वाचनात आली त्यात “सुंद” आणि “उपसुंद” या असूरांबाबतचा उल्लेख होता आणि त्यावरूनच “सुंदोपसुंदी” या शब्दाची उत्पती झाली असावी हे शेवटी सापडलेच.आताच्या मराठी भाषेच्या स्थितीनुसार “सुंदोपसुंदी” हा शब्द व त्याचा अर्थ सांगणे आवश्यक वाटले कारण नवीन इंग्रजाळलेल्या पिढीस सुंदोपसुंदी शब्द क्वचितच माहीत असावा. त्यांना अजून “बासुंदी” शब्द ठाऊक आहे हे तरी निदान आपले आणि मराठी भाषेचे नशीब समजावे इतकी मराठी भाषेची सद्यस्थिती दयनीय आहे. मराठी भाषेनुसार या दोन असुर बंधूंच्या नावांची संधी केल्यास सुंद + उपसुंद =सुंदोपसुंद अशी होईल. अशाप्रकारे “सुंदोपसुंदी” या शब्दाच्या उत्पतीचा संबध थेट महाभारता पर्यन्त जाउन पोहोचला .तशा रामायण,महाभारत व इतर पौराणिक कथा आता अनेकांना भाकडकथा वाटत असल्या तरी त्यातून काही ना काही बोध हमखास मिळतोच.शिवाय भाषणात किंवा लेखनात दाखल्यासाठी म्हणून तरी निश्चितच त्याचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणून सुंदोपसुंद या शब्दासाठी सुंद आणि उपसुंद हे शब्द असलेली ही पौराणिक कथा सांगणे क्रमप्राप्त आहे. महाभारताएकाच स्त्री सोबत पाच माणसे विवाह करतील तर कलह होइल असा सल्ला देताना नारद मुनी पांडवांना “सुंद” आणि “उपसुंद” या असुरांची कथा सांगतात. या कथेत “सुंद” आणि “उपसुंद” हे सर्वच गोष्टी वाटून घेणारे दोघे असुर बंधू असतात. ते दोघे ब्रह्मदेवास अमरत्वाचे वरदान मागतात परन्तू तसे न करता ब्रह्मदेव त्यांना “तुम्ही दोघेच जेंव्हा एकमेकांना माराल तेंव्हाच तुम्ही मराल” असा वर देतात. मग काय हे दोघेही प्रचंड धुमाकुळ घालतात आणि देवांना सुद्धा जेरीस आणतात. देव पराजित होतील अशी स्थिती येते. मग या दोघांमध्ये भांडण लावून आपला पराजय टाळण्यासाठी ब्रह्मदेव विश्वकर्मास एका सुंदर अप्सरेचे निर्माण करण्यास सांगतात त्यानुसार तेंव्हा अलौकीक सौंदर्यमती तिलोत्तमा ही अप्सरा अवतरते. तिलोत्तमा इतकी रूपसंपन्न असते की तिचे रूप न्याहाळण्यासाठी इंद्राच्या शरीरावर सहस्त्र नेत्र निर्माण झाले होते अशी आख्यायिका आहे तर इंद्राच्या शरीरावर ते नेत्र गौतम ऋषींच्या शापामुळे निर्माण झाले असल्याची दुसरी कथा सुद्धा आहे. तिलोत्तमेने जेंव्हा भोळ्या शंकराला आदरपूर्वक प्रदक्षिणा घातली तेंव्हा शंकराला आजू-बाजूने दोन आणि मागे एक अशी तोंडे निर्माण झाली होती. तिलोत्तमा मग सुंद आणि उपसुंद यांच्या प्रदेशात दाखल होते तेंव्हा एका नदीकाठी सुंद आणि उपसुंद बंधू बसलेले असतात त्यांना रूपवान तिलोत्तमा फुले तोडतांना दृष्टीस पडते दोघेही तिच्या रूपावर मोहित होतात. दोघानांही तिच्या सोबत विवाह करण्याची इच्छा निर्माण होते आणि याच कारणामुळे त्यांच्यात मोठा वाद उत्पन्न होतो आणि वाद विकोपाला पोहोचतो दोघांचेही तुंबळ युद्ध होते. सुंद आणि उपसुंद असुर एकमेकांकरवी मारले जातात हीच ती पहिली “सुंदोपसुंदी” होते आणि तिलोत्तमा देवांचा पराजय टाळते.

२८/०८/२०१७

Article describes about Gurmeet Ram Rahim Baba

"राम”के भक्त “रहीम”के बंदे.....

एखादी घटना घडली की लोक त्याबाबतची भाष्ये, मते इ. आज कालच्या तंत्रसमृद्ध तसेच विविध दळण-वळण साधनांनी परिपूर्ण असलेल्या काळात त्वरीत व्यक्त होतात. त्यामुळे वृत्तपत्रात सदर लिहिणा-याला त्याच विषयावर लिहिणे कठीण होते किंवा लेखन पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. तसेच माध्यम समृद्धीमुळे विषय लवकर “शिळा” होत असल्याने वाचक वाचतील की नाही याचा सुद्धा विचार लेखकाला करावा लागतो. आजचा गुरमीत राम रहीम बाबा हा तसाच एक विषय. या ढोंगी बाबावर न्यायालयाने बलात्काराबाबत 25 ऑगष्ट रोजी दोषी ठरवले तसेच २८ रोजी त्याला १५ वर्षानंतर १० वर्षाची शिक्षा व काही लाख रु दंड ठोठावला. १५ वर्षानंतर होणारी हि शिक्षा असल्याने सौम्यच म्हणावी लागेल.25 ला आरोपी बाबा राम रहीमच्या समर्थकांनी म्हणा का भाडोत्री गुंडांनी म्हणा जो हिंसाचार केला तो पहावा लागणे हे आपणा सर्व भारतीयांचे दुर्दैवच आहे. या हिंसाचारात 38 लोक ठार झाले. एखाद्या आरोपीच्या समर्थनार्थ निघणा-या या जमावावर सुद्धा देशद्रोहाचे गुन्हे का नोंदवू नयेत? मुळात आसाराम. रामवृक्ष, रामपाल, राधे माँ आणि आता राम रहीम सारखे बाबा “पनपतातच” कसे ? याचे कारण सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी हेच आहेत आणि त्यानंतर भारतातील दुधखुळी जनता आहे. अक्कल गहाण ठेवून जनता यांच्या मागे इतकी वेडी कशीच काय होते? की या वेडेपणाला लैगिकता किंवा पैस्यांची किनार आहे? बाबाच जर अश्लील चाळे करीत असेल तर त्याचे समर्थक सुद्धा तसेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाबा लोक स्वत:चे प्रस्थ एवढे वाढवतात की राजकारणी सुद्धा मतांच्या भिक्षेसाठी यांच्या पायाशी लोळण घेतात आणि येथूनच सुरुवात होते यांच्या स्वत:च्या समांतर सत्ता स्थापनेची. मग हजारो एकरांची जमीन यांना विनासायास मिळते, हे स्वत:च्या अग्निशमन गाड्या. स्वत:चे प्लास्टिक चलन, थिएटर , मॉल बनवतात , थिल्लर गाणी रचतात, गातात आणि चित्रपटात सुद्धा अभिनय करतात , चित्रपट निर्माण करतात. इतर क्षेत्रात आपले जाचक नियम अटी लादणारे शासन या बाबा लोकांवर आणि त्यांच्या आश्रमांवर का नाही निर्बंध लादत? शासन सर्वात जास्त टपले असते पापभिरू शाळा कर्मचा-यांव.कधी शाळा   कर्मचा-यांवर शिक्षण हक्क कायदा तर कधी “अतिरिक्त” ची गदा , कधी पट पडताळणीची भीती तर कधी संच मान्यतेची टांगती तलवार, कधी 2005 नंतर लागलेल्या कर्मचा-यांना भीती तर कधी सेवानिवृत्त्ती वेतन मिळेल की नाही याची भीती. शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि इतर सामान्य यांना कायदाच्या बडगा उगारून सतत दडपणाखाली ठेवले जाते. अशी भीती या अनैतिक कृत्ये करणा-या बाबा आणि त्यांच्या आश्रमांना कधी दाखवली जाईल? की बाबा आणि त्यांच्या आश्रमांना कायद्याचा धाक दाखवण्याची हिम्मत सरकारमध्ये नाही? कुणीही येतो बाबा बनतो करोडोची माया जमवतो, अवैध शस्त्रे बाळगतो, स्वत:ची सेना काय बनवतो आणि हे सर्व होईतो शासन आणि आपली गुप्तचर यंत्रणा काय झोपा काढ़ते? असे प्रकार घडतात तेंव्हा या नाकर्त्या राजकारण्यांना आणि शासकीय कायदा व सुव्यवस्था राखणा-या व त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना लाज वाटली पाहीजे.हे बाबा नंतर स्वत:च्या बचावासाठी कोर्टापुढे आपल्या नपुंसकतेच्या शिखंडीला उभे करतात.निदान तेंव्हा तरी यांच्या भक्तांच्या व समर्थकांना आपण असल्या नपुंसकाच्या मागे लागल्याचा पश्चाताप वाटला पाहीजे तर उलट हे नालायक, नतद्रष्ट बाबा समर्थक हिंसाचार करतात. सर्जिकल स्ट्राइक , नोटाबंदी असे ठोस निर्णय घेणा-या मोदींनी आता संपूर्ण देशातील या तथाकथीत बाबा आणि त्यांच्या आश्रमांवर व त्यांच्या समर्थकांवर कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची जनतेची अपेक्षा आहे. 50 वर्षांपुर्वी कवी प्रदीप यांनी “देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान” या गाण्यात “ “राम”के भक्त “रहीम”के बंदे रचते आज फरेब के फंदे” अशी ओळ लिहिली होती ती या गुरुमीत राम रहीम बाबानी खरी करून दाखवली.

२४/०८/२०१७

In the memory of traditional photo albums

अल्बम आणि आठवणी

      अल्बम या शब्दाला समानार्थी मराठी शब्द काही ठाऊक नाही परंतू अल्बम म्हटले की आठवण हा शब्द हमखास आठवतोच कारण अल्बम बघितला की अनेक आठवणी ताज्या होतात. आता तर अल्बम मधील फोटो पाहून जुन्या आठवणी येण्याऐवजी अल्बमच्याच आठवणी काढण्याचे दिवस आले आहेत. नाही म्हणायला अल्बम काही अगदीच संपुष्टात आला का कालबाह्य झाला असेही नाहे. अल्बम आहेत परंतू आता केवळ साखरपुडा आणि लग्नकार्यापुरता सीमित.पूर्वी  कॅमे-यांचा सुळसुळाट झालेला नव्हता किंवा कुणीही कॅमेरा घेईल अशी ऐपतही नसायची मग गावातील “फोटो स्टुडीओ” मध्ये एका वेताच्या खुर्चीत पायाला आडी मारून “साधना कट” केलेली  कन्या, लाकडी घोड्यावर एक पुत्र विराजमान, एक मुल आईच्या कडेवर आणि एक बापाच्या असल्या स्वरूपाचा परिवाराचा फोटो काढला जात असे. परिवार मोठा असे “हम दो हमारे दो” चा जमाना नुकताच सुरु झाला होता.”हम दो हमारा एक” चा जमाना येण्यास अजून अवकाश होता. प्रत्येक घरी दरवर्षी असे काही फोटो निघत. क्वचित मीना बाजार आला की एखाद्या नटी सोबत नाहीतर मग मोटरसायकलवर बसून आणि लहान मुलाला चंद्रावर बसवून फोटो काढले जात असत.माझ्या एका मित्राने अमिताभचे बोट धरून फोटो काढला होता आणि नंतर मग त्याने तो कसा मुंबईला गेला,अमिताभ कसा भेटला अशा कथा रंगवून सांगितल्या होत्या.एकदा मीना बाजार मध्ये गेल्यावर मला सुद्धा अमिताभ भेटला परंतू मी त्याचे बोट काही धरले नाही हो मोटरसायकलवर दोन बहिणींना मात्र घेऊन बसलो होतो. अशाप्रकारे काढलेली छायाचित्रे मग दोन काळ्या जाड पानांच्या मध्ये एक पातळ पारदर्शक पांढरा कागद असलेल्या अपभ्रंशात “अल्बॉम” नांव असलेल्या पुस्तकात लावत असत. कालांतराने तो  “अल्बॉम” नसून अल्बम असतो असे समजले. प्रत्येक काळ्या पानावर दोन किंवा तीन छायाचित्र त्या अल्बम मध्ये लावता येत. फोटो लावण्यासाठी चार कोप-यावर चार अशी सुंदर कलात्मक कागदी फुले असत. ही फुले त्या अल्बमवर चिकटवायची आणि त्यामध्ये फोटो लावायचा अशी योजना.अल्बम मध्ये सर्व कृष्ण-धवल छायाचित्रे पाहतांना आपण सुद्धा जुन्या काळात तर नाही गेलो ना असे वाटायचे. छायाचित्रे असलेला अल्बम मग कुणी नातेवाईक, पाहुणे मंडळी आले की तल्लीन होऊन पहात बसत. सर्व कामे आटोपली की अल्बम निघत असत आणि चहाचे घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. हळू-हळू तंत्रज्ञान विकसित झाले रंगीत फोटो निघू लागले, अल्बमने सुद्धा आपले स्वरूप बदलले  ब्लॅक अँड व्हाईट फोटोंची जागा कलर फोटोने घेतली.तरीही काही दिवस स्वस्त असल्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट तंत्र अस्तित्वासाठी धडपड करीतच होते परंतू काळासामोर कुणाचे चालते? ब्लॅक अँड व्हाईट तंत्र नामशेष झाले. भ्रमणध्वनी मध्येच कॅमेरा आला एका क्षणात फोटो फेसबुक आणि व्हॉटस ऍप द्वारे जगभरात कुठेही पाठवता येणे शक्य झाले आणि अल्बमची क्रेज गेली दीर्घकाळ फोटो जतन करणे संपले. पटला तर ठेवला नाही तर डीलीट. काढलेल्या फोटोची प्रिंट काढून त्याला अल्बम मध्ये लावण्याची सवड लोकांना मिळेनाशी झाली. पेटीतील अल्बम काढून पाहुण्यांसोबत चहाचा घोट घेत फोटो पाहण्याचे दिवस हद्दपार झाले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैल तोगे कोकणा-या काऊ ला शकून घेण्यास सांगितले होते तो सुद्धा आता क्वचितच ओरडतो आणि पाहुणे सुद्धा क्वचितच येतात.यतकदाचित पाहुणे आलेच तर आपले फोटो आपणच आधी शेअर केल्याने त्यांनी पहिले असतात मग काय ज्याची-त्याची मान आप-आपल्या मोबाईल मध्ये. एकवेळेस मोठी माणसे तरी काही संवाद साधतील परंतू किशोरवयीन आणि तरुण मुले त्यांच्या मोबाईल मध्ये गर्क असतात.कपातील चहा थंड होत असतो आणि माळावर अडगळीत आजी आजोबांचे, आपल्या लहानपणीचे, मीना बाजारातील फोटो असलेला अल्बम धूळ खात स्वत:ला महत्व असलेल्या दिवसांच्या आठवणीत कुढत असतो, आणखी कुजत असतो.