Click "Follow" Button below To Follow this Blog

१८/१२/२०२५

Article about Jujube, Chinese date, Ber

"जुजुबे"चे दिवस आणि आठवणी

आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ?

      हे काय नवीन जुजुबे ? असा प्रश्न ब्लॉग वाचकांना पडला असेल. तर तो आता हा लेख वाचला की उलगडेलच.

का रे तुम्ही काही बोरं, सुर्यफुलाच्या बिया खात नाही का रे ? शाळेमध्ये वाढणारा चिप्स, कुरकुरे आणि तत्सम पदार्थाच्या पाकिटांचा कचरा पाहून मी माझ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थी अनुत्तरीत होते. पुर्वी शाळांमध्ये विद्यार्थी बोरे, चिंचा, आवळे, सुर्यफुलांच्या बिया असे पदार्थ खात व त्यामुळे बोरांच्या आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ? का त्यांना या रानमेव्या पेक्षा मॅगी, पिझ्झा, बर्गर इ. असे फास्ट फूड आवडू लागले ? असा प्रश्न मला पडला. दुसऱ्या दिवशी माझ्या परिचित रस्त्याने शाळेत जातांना नित्य परिचित अशी ठिकाणे दृष्टीस पडत होती. अनेक स्थानांमध्ये नवीन बदल झाले होते. कालच्या मुलांना विचारलेला  अनुत्तरीत प्रश्न माझ्या मनात घोळत होताच. शाळेत जातांना मी लहान असताना ज्या ठिकाणी बोरं विकणारी लोक बसत ती ठिकाणे सुद्धा मला दिसली परंतु आता त्या ठिकाणी एकही बोरं विक्रेता माझ्या काही दृष्टीपथास आला नाही. सरकारच्या फुकटछाप योजनांमुळे पूर्वीचे अनेक व्यवसाय लोकांनी जवळपास सोडूनच दिले आहे. अगदी नगण्य अशा संख्येत काही विक्रेते मात्र आजही टिकून आहे. माझ्या लक्षात आले की हा रानमेवा विकणारे लोकच जर नसतील तर मुले असा रानमेवा घेणार तरी कुठून ? आम्ही शाळेत असतांना प्रत्येक शाळेच्या बाहेर रानमेवा, विकणारे गुळपट्टी आदी घरी बनवलेली पदार्थ विकणारे लोक असत. आता मात्र जास्तीत जास्त प्रमाणात पॅकड फूड विकणारेच शाळा परिसरात विक्रीला आलेले दिसतात. महाविद्यालयात असतांना आमच्या महाविद्यालयाच्या मागे कित्येक अशी बोरांची झाडे होती. आम्ही त्यांचा खूप आस्वाद घेत असू. कुणाला कच्ची बोरे आवडत तर कुणाला पिकलेली, कुणाला चण बोरं (एकदम बारीक आणि लाल बोरं ) आवडत. काहींना शेंबडी बोरे आवडत असत. ज्या बोरांमध्ये द्रवरूप असा मगस असतो अशा बोरांना कुणीतरी, कधीतरी शेंबडे बोर असे नांव पाडले असावे. या बोरांच्या बिया मग काही व्रात्य पोरे शाळा, महाविद्यालयाच्या भिंतीवर फेकून त्या भिंतीला चिटकवत असत. आता बोरांच्या ऋतूत बोरे काही विकायला येत नाही. गावाच्या बाहेर लदबदलेल्या बोरीच्या झाडांभोवती पोरांची गर्दी दिसत नाही. असा पण काय हा बदल व्हावा ? का असा बदल व्हावा ? मी शाळेत पोहोचलो, शाळा सुटल्यावर घरी जातांना गावातून गाडी घेतली आणि कोण जाणे कसा एक व्यक्ती बोरं घेऊन बसलेला मला दिसला... "लॉ ऑफ ॲट्रक्शन"  का कशामुळे तो तिथे आला असावा असा प्रश्न मला पडला. मी आनंदाने त्याच्याकडे गाडी घेतली....माझ्या अचानक गाडी वळवल्याने एका व्यक्तीला अडचण सुद्धा झाली. मी मानेनेच त्याला माफीचा इशारा केला त्यानेही तो उदार मनाने स्वीकारला. बोरं विक्रेत्याकडून बोरे घेतली...पुर्वी दिसणारी मापे आता मात्र नव्हती... बोरं विक्रेत्याची चौकशी केली. त्यांचे नांव रमेश बोदडे असे होते. "मी अनेक रानभाज्या व फळे आणतो सर" त्यांच्या या उद्गारावर "हो तुमच्याकडून मी अनेकदा भाज्या इ घेतले आहे" असे मी म्हटल्यावर त्यांनी ओळखले. त्याच्याकडे नागपुरी बोरे होती. आपोआप माझा हात खिशात गेला आणि मी मोबाईलवर त्यांचा फोटो घेतला.


     बालपणीच्या जुन्या बोरं विक्रेत्याच्याच जागी म्हणजे एकबोटे चौक, संत पाचलेगांवकर महाराज मार्ग खामगांव या ठिकाणी हा नवीन बोरं विक्रेता मला दिसला होता. इतर जुन्या बोरं विक्रेत्यांच्या जागा जशा नॅशनल हायस्कूल, सहा नंबर शाळा, अलका लॉज समोरील जागा या जागा मात्र हल्ली बोरांच्या दिवसात रिक्तच असतात. गतवर्षी जिल्हा परिषद शाळेसमोर सुद्धा एक बोरं विक्रेता दिसला होता त्यावेळी मी त्याची चित्रफित बनवली होती. घरी जातांना माझ्या मनात बोरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या होत्या. माझे वडील फळ फळावळांचे चाहते, त्यामुळे ते आम्हाला विविध प्रकारची फळे खाऊ घालत, बोरं पण खूप आणत. माझे मामा जळगांवला राहत ते आमच्यासाठी मेहरुणची बोरे आणत. मेहरूणची बोरे गोड म्हणजे गोडच असत. नागपुरी बोरं असतात गोड पण किडके जास्त असतात. हल्ली नवीन निघालेली ॲपल बोरं ज्यांनी गावरान बोरं चाखली आहे त्यांना आवडत नाही. आयुर्वेदात सर्वच फळांचे जसे महत्व सांगितले आहे तसेच बदर अर्थात बोर. बोराचे सुद्धा पित्त, वात नाशक, शक्तीवर्धक, उष्णता रोधक म्हणून महत्व सांगितले आहे. बोरकुट हा एक चांगला पदार्थ सुद्धा आता दुर्मिळ झाला आहे. मला दिसलेल्या त्या विक्रेत्याकडून मुलांसाठी थोडी बोरे घेऊन घरी गेलो.  बोरांच्या दिवसात अशा बोरांबाबतच्या स्मृती ताज्या झाल्या. बोरांना इंग्रजीत jujube असा हा शब्द आहे. जुजुबे हा शब्द डेट्स म्हणजेच पेंड खजूर साठी सुद्धा काही प्रदेशात वापरला जातो.  बोरे, बोरकुट असा हा रानमेवा बाजारात पुन्हा जोरदार उपलब्ध व्हावा सर्वांनी तो खावा आणि आपल्या बालगोपालांना सुद्धा त्याची गोडी लावावी असे मला वाटले.

     दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो मधल्या सुटीत एक विद्यार्थी माझ्या जवळ आला आणि सर तुमच्यासाठी एक गंमत आणली म्हणून एक पुडके माझ्यापुढे ठेवले. मी उत्साहाने ते उघडले त्यात बोरं होती...मी त्याच्याकडे कौतुकाने, आनंदाने बघत राहिलो. या मुलांना अशीच अस्सल पदार्थांची गोडी वाटत राहावी असे माझ्या मनात आले मी त्याने दिलेल्या बोरांतील चार - पाच बोरे उचलून उरलेली बोरे इतर विद्यार्थ्यांना वाटण्यास सांगितली. 


 

११/१२/२०२५

Article about increasing no of leopards and their attack.

 बिबटे उदंड जाहले


बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेषात आले तर मग ही भिती किती वाटेल हे विचारूच नका. बिबट्यांच्या वाढत्या संख्ये बाबत हा ऊहापोह.

गत बुधवारी नागपूरच्या पारडी भागात बिबट्याने पाच ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. महाराष्ट्रात आणि देशातही गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये, गाव-खेड्यांमध्ये बिबटे घुसण्याचे प्रमाण  वाढले आहे.  गत एक दोन वर्षात तर हे प्रमाण फारच वाढले आहे. काही अभ्यासकांचे तर असेही म्हणणे आहे की, प्रत्येकच शहरात दररोज रात्री बिबटे येत असतात आणि उकर्ड्यावरचे मांसाचे तुकडे, कोंबड्या, शेळ्या खात असतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांना सुद्धा त्यांनी फस्त केले आहे. यावर संपूर्ण राज्यात, विधानसभेत गदारोळ सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सुद्धा मांडली. परंतु बिबट्या हा प्राणी केंद्रीय सुचीत येत असल्याने राज्याला त्याबाबत निर्णय घेण्यास मर्यादा येतात. तरीही केंद्राने काही बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले.शहरात बिबट्या आल्याच्या बातम्या आता नित्याच्याच  झाल्या आहे.बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण असेही सांगितले जाते की मादी बिबट ही वर्षातून दोन वेळा पिल्ले देते आणि बहुतांश वेळी ऊसाच्या शेतात पिल्ले दिल्यामुळे ती पिल्ले सुरक्षित राहतात आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांच्या शहरात घुसण्याच्या प्रकारावर उपाययोजना म्हणून नाना प्रकारचे उपाय सुचवले जात आहे. उदाहरणार्थ बिबट्यांची नसबंदी, जंगलामध्ये शेळ्या सोडणे हा सुद्धा एक अजब उपाय सांगण्यात आला, भिंती/कुंपण घालणे असे उपाय अभ्यासक, लोक सुचवत आहेत. विद्यार्थी सुद्धा त्यांच्या शालेय प्रकल्पांमध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे व मानवांचे संरक्षण कसे करावे या प्रकारचे प्रकल्प बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बिबट्यांची संख्या कशी वाढते आहे यावर त्यांच्या शैलीमध्ये भाष्य केले, तसेच काल बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात ज्यांचा वचक असतो ज्यांचेकडे अधिकार असतात ते  लोकप्रतिनिधी सुद्धा  बिबट्याच्या वेशात आले तर मग हा वचक किती वाटेल हे विचारूच नका. म्हणून मग सभापतींनी त्यांना समज दिली. असो ! वरील विविध उपाययोजना बिबट्यांना रोखण्यासाठी अनेकांकडून सुचवल्या गेल्या. जंगलात शेळ्या सोडणे हा ही एक उपाय त्यात आला, पण त्या फुकटच्या शेळ्या पकडून माणसेच तर त्यावर ताव मारणार नाहीत ना ! अशीही भीती आहे. वन्यजीव शहरात घुसण्याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि सोयीस्कररित्या मिळणारे गृह कर्ज यामुळे घरे बांधण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि मनुष्य वस्ती वाढत चालली आहे त्यामुळे जंगलांचे प्रमाण घटत आहे मग ते वन्यजीव कुठे जातील ? कोणे एकेकाळी जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशाच्या ठिकाणी आज मानवाने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आता मनुष्य राहायला लागला आहे, शेती करू लागला आहे. त्यांच्या हक्काची जागा मनुष्यानेच हिरावून घेतलेली आहे आणि आता जें व्हा ते मनुष्यवस्तीत येत आहे  तेव्हा आपण ते वन्यजीव आपल्या वस्ती झाल्याची तक्रार करीत असतो. बिबट्यांप्रमाणेच हरणे आणि रोही सुद्धा शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पिके उद्ध्वस्त करीत असतात. 

     या सर्व उपाययोजना व अशी पार्श्वभूमी असतांना खालील  काही उपाययोजना सुचावाव्याशा वाटतात

१. महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात प्राणिसंग्रहालयांना परवानगी दिल्यास अनेक बिबट्यांना त्यात ठेवता येईल व बिबटे आटोक्यात येतील , त्यांच्यासाठी पिंजरे सुद्धा प्रशस्त ठेवावे.

२. ज्याप्रमाणे आपण विदेशातून चित्ते आणले त्याप्रमाणे कुण्या देशाला बिबट्यांची आवश्यकता असेल तर त्यांना आपण बिबटे पाठवले पाहिजे. 

३. अन्य राज्यात जिथे मांसभक्षक प्राणी कमी असतील व शाकाहारी वन्यजीव जास्त असतील अशा राज्यातील जंगलात बिबटे सोडणे.

     उदंड जाहलेल्या या बिबट्यांच्या संख्येमुळे व त्यांच्या शहरात येण्यामुळे न घाबरता, त्यांना न घाबरता सकारात्मक पद्धतीने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे, आवश्यक ती काळजी घेणे हेच नागरिकांना करावे लागेल असे वाटते. याप्रसंगी वरील काही उपाय मनात आले त्यावर राज्य सरकार , केंद्र सरकार यांनी यावर विचार करावा असे वाटते. 

२७/११/२०२५

Artical on decide demise of actor and good human being Dharmendra


 तु म्हारो कौण लागे ?


धर्मेंद्रला अनेक लोकांचे प्रेम मिळाले. त्याने सुद्धा लोकांवर भरभरून प्रेम केले. धर्मेंद्रचे समकालीन अभिनेते हे  80-90 च्या दशकात चरित्र भूमिका स्वीकारत होते तेंव्हाही धर्मेंद्र  नायक सहनायकांच्या भूमिकात दिसत होता. 

जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोण सुटलेला आहे ? जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळच असला तरीही जवळचा व्यक्ती न जावा असेच सर्वांना वाटत असते. अगदी असेच धर्मेंद्र या अभिनेत्याचे निधन झाल्यावर त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना वाटले. कुण्या एखाद्याचा मृत्यू झाल्यावर इतर जनांना त्याचे दुःख होत असते परंतु आपणही त्याच मार्गावर आहे याचे मात्र विस्मरण होत असते. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,

अकस्मात तोही पुढं जात आहे |

संतजनांनी जे काही लिहून ठेवलेले आहेत ते सर्व कालातीत आहे परंतु तरीही दुःख हे होतच असते. 

   चित्रपट अभिनेते हे सामान्यजनांपासून खूप लांब असतात. बोटावर मोजता येतील इतक्यांशी त्यांची भेट होते किंवा त्यांना ते दिसत असतात परंतु तरीही पडद्यावरील त्यांच्या भूमिका पाहून आणि त्यांच्या बाबतच्या काही गोष्टी ऐकून लोक त्यांच्या प्रेमात पडत असतात. धर्मेंद्र हा असा एकमेव अभिनेता आहे की ज्याला लोकांचे अफाट प्रेम मिळाले. धर्मेंद्रच्या वागण्या-बोलण्यातून नेहमी तो जमिनीशी जुळलेला आहे इतर लोकांबद्दल त्याला प्रेम आहे , आपुलकी आहे जीवनावर त्याचे प्रेम आहे असे कित्येकदा दिसून आले आहे.

 कोई मुस्कुराता है तो, मै हात बढाता हुं |

कोई हात बढाता है, तो मै सीने से लगा लेता हुं|

कोई सिनेसे लगाता है, तो मै दिल में बिठाता हुं |

या त्याच्या  स्वरचित ओळीतून धर्मेंद्रचे व्यक्तिमत्व आपल्याला कळते. 

     खरे तर या सिने कलाकारांसोबत  आपले काय नाते असते ? त्यांच्या अनेक कृती,  अनेक गैरकायदेशीर बाबी याबाबत पब्लिकला माहिती असते तरीही पब्लिक त्यांना एवढी डोक्यावर का घेते ? हे सर्व प्रश्न हमखास पडतातच. तसाच आमच्या घरी धर्मेंद्र हा प्रत्येकाच्या आवडीचा अभिनेता. आमच्यासह आमच्या मित्र परिवारात सुद्धा धर्मेंद्र हा आवडीचा अभिनेता आहे . असे कोणी का आवडू लागते ? त्याच्यात असे काय असते ? आपल्या अध्यात्मानुसार या जीवनामध्ये आपला ज्या-ज्या लोकांशी संबंध येतो त्या-त्या लोकांशी आपला पूर्व जन्मात सुद्धा संबंध आलेला असतो असे म्हटले जाते.  मग तसे काही असू शकते का ? हे सेलिब्रिटी सुद्धा पूर्व जन्मात आपले परिचित असतील का ? की, ज्यामुळे आपल्याला हे सिनेकलाकार सुद्धा आवडू लागतात. असे सुद्धा नाना प्रश्न पडतात. आमच्या घरी कदाचित माझ्या वडिलांमुळे धर्मेंद्र आम्हा सर्वांना आवडू लागला असावा. ते सुद्धा धर्मेंद्रचे फॅन आहे. त्यांना धर्मेंद्रचे देमार चित्रपट पाहायला आवडते. कुणाच्या दिसण्याच्या बाबतीत किंवा मारामारीच्या बाबतीत त्यांना धर्मेंद्रचे दाखले देतांना आम्ही कित्येकदा ऐकले आहे. "मारधाड से भरपूर" , दुष्टांचे निर्दालन होऊन सज्जनांचा विजय दाखवले जाणारे चित्रपट पाहतांना "असे चित्रपट पाहतांना डोक्याला काही ताण नसतो"  असे ते म्हणतात. तसेच धर्मेंद्रसारखा दिलदारपणा, व्यायामाची आवड, "पैसोसे ज्यादा इंसानियतको, सेहतको अहमियत देना चाहिये" हा समान विचार, सर्वांचे हृदय जिंकून घेण्याची कला,  त्यांच्या हृदयात जागा मिळवण्याची कला, जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन, असे साम्य त्यांच्यात व धर्मेंद्रमध्ये आम्हाला जाणवते. दिसण्यात जरी काही साम्य नसले तरी देहबोली आणि स्वभाव यामध्ये मात्र ते साम्य आम्हाला आजही वाटते. मिशी राखलेला धर्मेंद्र आणि माझे वडील यात तर ते साम्य आम्हाला थोडे अधिक वाटते आणि म्हणून मग धर्मेंद्र हा आमच्या परिवाराचाच आवडता असा कलाकार अभिनेता आणि व्यक्ती झाला. हिंदी सिनेसृष्टीत अनेक लोकप्रिय सिनेकलाकार होऊन गेले व आहे. परंतु जनतेचे अफाट प्रेम मिळालेला असा धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता होता. प्रचंड लोकप्रियतेने जनतेने त्याला खासदार सुद्धा बनवले परंतु साधे सरळ जीवन व्यतीत करण्याची वृत्ती असल्याने राजकारणात त्याचे मन रमले नाही. राजकारणात जसे अटल बिहारी वाजपेयी होते तसा सिनेसृष्टीत धर्मेंद्र होता आणि दोघांमध्ये आणखी एक साम्य होते ते म्हणजे दोघेही कवी मनाचे होते. अटलजी उत्कृष्ट कवी होते तर धर्मेंद्रला शायरी करण्याची आवड होती. आधी उल्लेख केल्याप्रमाणे सिने कलाकार हे आपले कुणीही नसतात परंतु तरीही आपल्याला त्यांच्याबद्दल आकर्षण प्रेम वाटत असते. धर्मेंद्र सुद्धा त्याला अपवाद नव्हता. त्याला अनेक लोकांचे प्रेम मिळाले. त्याने सुद्धा लोकांवर भरभरून प्रेम केले. धर्मेंद्रचे समकालीन अभिनेते हे  80-90 च्या दशकात चरित्र भूमिका स्वीकारत होते तेंव्हाही धर्मेंद्र  नायक, सहनायकांच्या भूमिकात दिसत होता. 80 च्या दशकातच त्याचा बटवारा हा चित्रपट झळकला होता. त्यात डिंपल कपाडिया आणि त्याच्यावर चित्रित झालेले एक गीत होते. 

थारे वास्ते रे ढोला 

नैण म्हारे जागे रे जागे,

सारी  रैण जागे

 तु म्हारो कौण लागे ?

धर्मेंद्रच्या मृत्यूनंतर त्याची मोठी अंतिम यात्रा जरी निघाली नसली,  त्याचा शासकीय इतमामात अंतिम संस्कार जरी झाला नसला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अफाट चाहत्यांना, सहकलाकारांना झालेले मोठे दुःख मात्र सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. जरी त्याच्या चाहत्यांचा तो कोणी नसला तरी त्याच्या चाहत्यांना मात्र  त्याच्या बद्द्ल अफाट प्रेम वाटत होते आणि म्हणूनच त्यांना तु म्हारो कौण लागे ? असा प्रश्न कदाचित पडला असेल.  




२०/११/२०२५

Article about various works assigned to school teachers

शिक्षक की डेटा एन्ट्री ऑपरेटर ?


माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर , उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. अशा रीतीने शिक्षकांना निव्वळ ऑनलाईन कार्यास जुंपून टाकले आहे.

परवा शिक्षकांना अचानकपणे खान अकॅडमीसाठी विद्यार्थ्यांची नांवे पाठवण्याचा आदेश दाखल झाला. आदेश दिला त्याच दिवशी व वेळेच्या मर्यादेत नांवे अपलोड करण्याचे सांगितले गेले. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आपापली शैक्षणिक कार्ये थांबवून खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याचे कार्य पुर्ण केले. याबाबत अनेकांना ही माहिती का पाठवली जात आहे वगैरे अशी काही इत्यंभूत माहिती मिळाली नाही. काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये खाजगी परीक्षा घेणारे, स्पर्धा घेणारे अशांना , अशा संस्थांना शाळेत त्यांच्या परीक्षांची व स्पर्धांची जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मग आज शासन स्वतः खाजगी संस्था असलेल्या खान अकॅडमीला विद्यार्थ्यांची माहिती कशी काय पाठवण्यास सांगत आहे ? माहिती सुद्धा अत्यंत घाईघाईत पाठवण्याचे काय ' खास '  कारण आहे ? असा प्रश्न तमाम शाळांना पडला आहे. 

     शिक्षण क्षेत्रात येता-जाता नवीन-नवीन काहीतरी प्रयोग केले जात आहे आणि रोजच काही ना काही माहिती अपलोड करण्याचे सांगितले जात आहे. शिक्षकांना सोपवल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत अनेकदा उहापोह होतो व झालेला आहे. अशैक्षणिक कामासोबतच शिक्षकांना शिक्षण विभागा अंतर्गतच दिल्या जाणा-या शैक्षणिक कामांचा सुद्धा अतिरिक्त बोजा सद्यस्थितीत खूपच वाढलेला आहे. शिक्षकांवर सोपवल्या जाणाऱ्या अनेक कार्यामुळे ज्या मुख्य कार्यासाठी शिक्षकांना नियुक्त केले जाते ते शिकवण्याचे, विद्यादानाचे कार्य शिक्षक सध्या नीटपणे करू शकत नाही आणि त्यामुळेच जशी पाहिजे तशी शैक्षणिक प्रगती साध्य होत नाही. ती साध्य होत नसल्यामुळे पुन्हा नवनवीन प्रयोगांचा भडीमार केल्या जातो आणि शिक्षकांना आणखी इतर नवीन कार्यास जुंपले जाते. दिर्घकालीन अशी कोणतीही प्रणाली किंवा उपाययोजना केल्या जात नाही. धोरणे नियम बनवतात आणि त्वरित बदलले जातात. आठवी पास नापासचे उदाहरण ताजेच आहे. नवीन सरकार आले की, जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलवून टाकते. 

     इंटरनेट आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत बरीच कार्ये ऑनलाईन व्हायला लागली त्यात शाळांचाही समावेश झाला. सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांना अनेक ऑनलाईन  कार्ये करावी लागत आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर सुद्धा होत आहे, पण याचा शासन विचार करते की नाही ?  व्हॉट्स ॲपमुळे त्वरित संदेश पाठवला जातो आणि त्यामुळे आजकाल त्वरित म्हणजे अगदी वेळेवर आदेश देऊन कार्य करण्यास सांगितले जाते जसे काही शिक्षकांकडे, शाळांकडे सर्व माहिती नेहमी अगदी तयारच असते. अगदी वेळेवर माहिती मागितल्याचे परवाचे खान अकॅडमीचे उदाहरण वर दिलेच आहे. आजच आदेश पाठवला जातो आणि आजच माहिती मागवली जाते. मग ती माहिती मागवतांना वर्गावर कोण जाईल? तासिका कशी होईल? याचा काही विचार शासन किंवा अधिकारी वर्ग करतो की नाही देव जाणे ? आज ही माहिती भर ,उद्या ती माहिती भर, परवा हे अपलोड कर, तेरवा ते अपलोड कर. कधी शासनाचे पेपराचे मार्क अपलोड कर, तर कधी हजेरी अपलोड कर,  शाळांचे फोटो अपलोड कर , मां के नाम पेड चे फोटो अपलोड कर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. विशेष म्हणजे प्रश्न हा पडतो की एवढा सगळा डेटा अपलोड होत आहे तर तो तपासतो कोण? तो तपासल्यावर त्याच्याबद्दल कुठे काही आकडेवारी व माहिती सुद्धा प्रसिद्ध होत नाही, ती झाली तरी त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही मग हा रोजच माहिती पाठवण्याचा, डेटा अपलोड करण्याचा अट्टाहास का ? ऑनलाइन झाले म्हणून हुरळून जाऊन सर्वच माहिती पोर्टलवर टाकण्याची खरंच काही आवश्यकता आहे का ? ती टाकल्यावर त्यांनी शाळांची प्रगती होत आहे का, किंवा होईल का ? बरे शासनाने माहिती भरण्यासाठी जी पोर्टल दिली असतात त्यांचे सर्व्हर स्ट्रॉंग नसतात. मग कित्येकदा वेबसाईटवर ते कार्य होत नाही, वेबसाईट चालत नाही किंवा हळूहळू चालते याकडे पण शासनाचे लक्ष नाही. शासनाला जर ऑनलाईन माहिती हवीच असेल तर मग तसे स्ट्रॉंग सर्व्हर सुद्धा शासनाने ठेवले पाहिजे. शालार्थ या वेतनाच्या पोर्टलमधे असलेल्या एका तृटीमुळे शाळांनी खोटे कर्मचारी आयडी दाखवून पगार उचलला. त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली परंतु शालार्थ प्रणाली पुरवणाऱ्या कंपनीवर काय कारवाई झाली हे काही कुठे वाचनात आले नाही. 

     शिक्षण क्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. समाजाची सद्यस्थिती पाहता शिक्षणाचा दर्जा एकदम उच्च कोटीचा असणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे बालमनावर वाईट परिणाम होत आहे. नको त्या गोष्टींचे ज्ञान त्यांना नको त्या वयात होत आहे त्यामुळे बालकांकडे अधिकाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून शासनाने शिक्षकांना शिक्षकच राहू द्यावे डेटा एन्ट्री ऑपरेटर बनवू नये जेणेकरून ते या बालकांकडे चांगले लक्ष देतील आणि मोबाईलमुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम रोखल्या जाऊन त्यांच्यावर शिक्षणाद्वारे चांगले संस्कार रुजवू शकतील.


३०/१०/२०२५

Article about craze of photos and beauty parlour

 ब्युटी पार्लर मे जा जा के...

हल्लीच्या झकपक लग्न समारंभात वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात. माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो.

किशोरवयात चित्रपट, गाणी हा विषय मला आवडू लागला होता. तसा त्या वयात तो विषय बहुतेकांना आवडत असतो म्हणा. त्या काळात दूरदर्शनला पर्याय म्हणून केबलद्वारे विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण होणे सुरू झाले होते. व्हीसीआर हे नवीन गॅजेट उपलब्ध झाले होते, टॉकीज तर होत्या आणि गाणी ऐकण्यासाठी रेडिओ आणि कॅसेट प्लेयर सुद्धा होतेच. त्यामुळे कित्येक चित्रपट व गाण्यांच्या उजळण्या सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे काही संवाद, गाणी लक्षात राहिली तर काही गाण्यांच्या एखाद दोन ओळीच लक्षात राहिल्या.  या लेखाचे शीर्षक असलेली त्यापैकीच अशी एका गाण्याची ओळ. एखाद वेळी प्रसंगानुरूप आपल्याला सहजच एखादे गीत आठवून जाते. काल वृत्तपत्रात आलेल्या एका ब्युटी पार्लरच्या पत्रकामुळे "ब्युटी पार्लर मे जा जा के वक्त अपना ना जाया करो" अशी ही ओळ मला आठवली. पण ही ओळ कोणत्या गाण्यातील आहे हे मात्र मी साफ विसरलो होतो. कारण नव्वदच्या दशकातील ते गीत काही फार सुंदर रचना वगैरे असे असणारे गीत नव्हते तर उडत्या चालीचे बी ग्रेड सिनेमाचे ते गीत होते. ओळ आठवत होती पण गीत काही आठवत नव्हते त्यामुळे डोक्यात किडा वळवळू लागला आणि मग युट्युबवर या ओळी टाकून सर्च केले  आणि ते गीत सापडले. हे सर्व या लेखात सांगणे हे क्रमप्राप्तच आहे अन्यथा या लेखाचे वाचक विशेषत: महिला वाचक म्हणतील की लेखक मनानेच काहीतरी सांगून ब्युटी पार्लर विरोधी विचार मांडत आहे. मी गीत शोधल्यावर ते ऐकले त्यातील ओळी या अशा खालील प्रमाणे आहे.  

तुम वैसे ही इतनी हसीं हो
मेकअप ना लगाया करो,
ब्यूटी पार्लर में जा जा के
वक़्त यूँही न जाया करो |

ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपला वेळ वाया जातो असे प्रतीत करणाऱ्या या ओळी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर महिला वाचकांना कदाचित ते रुचणार नाही. आजकालच्या काळात कुणाला काही सल्ला देणे किंवा तत्सम लिखाण करणे हे कठीणच आहे कारण आजकालच्या लोकांची विशेषतः तरुणांची सहनशक्ती ही कमी झाली आहे. पण कोणाचा विरोध किंवा कोणाच्या व्यवसायाची अवहेलना हा या लेखाचा मुळीच उद्देश नाही. सोशल मिडिया आल्यापासून फोटो, सेल्फी काढण्याची खूपच क्रेझ वाढलेली आहे सोशल मिडियाच्या आधी सुद्धा फोटो काढले जात असत परंतु फोटो काढणे, मग तो डेव्हलपिंगला टाकणे असे बरेच सोपस्कार पार पाडल्यावर ते फोटो मिळत असत. शिवाय काढलेले फोटो हे फक्त घरचीच मंडळी बघत असत. आता फोटो काढल्यावर ते सोशल मिडियावर पण टाकावे लागतात, ते सर्वजण बघतात मग त्यांचे लाईक, कमेंट मिळवण्यासाठी ते फोटो मेकअप करून काढले जातात, इफेक्ट वगैरे दिले जातात. नवरात्र आदी समारंभात तर तरुण-तरुणी,  चाळीशीतील बायका या मोठ्या सजून धजून तयार होत असतात. हल्ली प्री-वेडिंग शूट, पोस्ट विडींग शूट यांची मोठी टूम लग्नप्रसंगी निघाली आहे. हे करण्यासाठी कॅमेरा आणि इतर सामग्री असे सर्व तामझाम घेऊन विविधी लोकेशनवर फोटोग्राफर आणि फोटो काढणारे तरुण-तरुणी दिसतात. जणू काही चित्रपटाचे शूटिंग होत आहे की काय असे दृश्य असते. हे फोटो आणि त्या फोटोसाठी करावा लागणारा मेकअप यासाठी मग ब्युटी पार्लरची आवश्यकता भासते आणि  सौंदर्य खुलवण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी मग ब्युटी पार्लरला मोठा वेळ द्यावा लागतो. हल्लीच्या लग्न समारंभात तर विधींपेक्षा फोटोंनाच अधिक प्राधान्य असते. एकेका विधीनंतर गुरुजी सुद्धा सांगायला लागले की चला आता फोटो काढा. काही वेळेस तर अक्षरशः विधी बाजूला टाकून दिले जातात आणि फोटो काढले जातात. वधू आणि वधू माय फुल मेकअप मध्ये असतात माय कोण आणि लेक कोण ? असा प्रश्न सुद्धा वऱ्हाडी मंडळीला पडत असावा, कारण आता सर्व कसे मेन्टेन असतात, आणि वरून तसा त्यांचा मेकअप असतो. एकदा तर एका लग्नात एक स्त्री येऊन माझ्याशी बोलायला लागली प्रथम तर मी तिला ओळखलेच नाही पण काही क्षणातच माझ्या लक्षात आले. "अरे मी तर तुम्हाला प्रथम ओळखलेच नाही" मी म्हणालो. ही माझी खरी, उत्स्फूर्त व नैसर्गिक, सहज स्वाभाविक प्रतिक्रिया होती परंतु त्यांना ती त्यांची स्तुती वाटली कारण इश्श !इतका चांगला मेकअप झालाय का माझा ? असे त्या म्हणाल्या.  (तसं तर हल्लीच्या काळात कोणतीही स्त्री इश्श वगैरे काही म्हणत नाही, पुरुषांवरच आता इश्श म्हणावं अशी वेळ आलेली आहे पण लेखात थोडी रंगत यावी म्हणून इश्श हा शब्दप्रयोग केला आहे.) तर त्या सभ्य महिला माझ्या परिचित असल्याने  त्यांचा नेहमीचा, (म्हणजे विना मेकअपचा) चेहरा माझ्या लक्षात होता पण खूप मेकअपमुळे मी त्यांना खरोखर ओळखले नव्हते. एखाद्या चित्रपट किंवा रील मध्ये दाखवल्या जाणाऱ्या किश्शांसारखाच हा प्रकार घडला होता. 

     आपण सुंदर दिसायला पाहिजे ही तमाम स्त्री पुरुषांची इच्छा असते किंवा बालपणापासून त्यांना तसेच शिकवले जाते त्यामुळे बहुतांश जणांना आपल्या बाह्य सौंदर्याची काळजी अधिक असते. परंतु आंतरिक सौंदर्य मात्र दुर्लक्षिले जाते. आताशा तर आंतरिक सौंदर्य हा पण काही प्रकार आहे असतो हे सुद्धा तरुणाईस ठाउक आहे की नाही अशी परिस्थिती आहे.

  ज्याचे विचार चांगले असतात, विविध विषयांचे ज्ञान असते, अभ्यास असतो जो सर्वांना समदृष्टीने पाहत असतो तो सर्वाँना आपोआपच सुंदर दिसायला लागतो. त्याला बाह्य मेकअप, ब्युटी पार्लर किंवा यूनिसेक्स सलून आदी भानगडींची काही गरज वाटत नाही. परंतु सहसा अभ्यास, ज्ञान, विचार, सकारात्मकता या गोष्टींनी आपले सौंदर्य खुलवण्याऐवजी विविध रसायनांनी युक्त अशी सौंदर्यप्रसाधने वापरून आपले बाह्य सौंदर्य फुलविण्याचा प्रयत्न आजकाल खुप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेष म्हणजे ही सौंदर्यप्रसाधने अत्यंत महागडी असतात पण तरीही मेकअप करण्यावर मोठा खर्च होत आहे. लग्नाच्या फोटोंचा खर्च सुद्धा आजकाल खिशाला मोठी कात्री लावणारा झाला आहे. तसे पाहता स्त्रिया त्यांच्या सौंदर्याकडे अनादी काळापासून लक्ष देत आलेल्या आहे. आपण सुंदर दिसलो पाहिजे अशी प्रत्येक स्त्रीची स्त्रीसुलभ अभिलाषा असते. परंतु जुन्या काळात सौंदर्यप्रसाधने ही शुद्ध दुध, हळद, तूप आदी नैसर्गिक पदार्थांची अशी होती. 

      तर मुद्दा हा आहे की, केवळ मेकअप केल्यानेच कुणी सुंदर दिसतो असे काही नाही. काही व्यक्ती या जात्याच सुंदर असतात. त्यांना सुंदर दिसण्यासाठी म्हणून काही विशेष उपद्व्याप करावे लागत नाही. काही स्त्री पुरुष हे बिना मेकअपचे सुद्धा सुंदर दिसतात प्रहार या सिनेमात माधुरी दीक्षित ही विना मेकअपची होती आणि ती त्या सिनेमात खूप सुंदर सुद्धा दिसली आहे. साधेपणात सुद्धा एक सौंदर्य असते. काही स्त्री पुरुष हे त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. उदाहरणार्थ मेट्रो प्रकल्प प्रमुख अश्विनी भिडे आपल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि काश्मीर मधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल निर्मिती प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. जी. माधवी लता या त्यांच्या कर्तुत्वाने सुंदर दिसतात. अशी आणखीही भरपूर उदाहरणे आहेत. 

मेकअपचा खर्च, सौंदर्य प्रसाधनांवर होणारा खर्च त्यासाठी वाया जाणारा वेळ कदाचित यावरूनच वर दिलेल्या ओळी, ते गीत कवीला सुचले असावे आणि म्हणूनच तो म्हणतो की,

तुम वैसे ही इतनी हसीं हो
मेकअप ना लगाया करो
ब्यूटी पार्लर में जा जा के
वक्त युंही ना जाया करो |

 टीप - सद्यस्थितीतील फोटो, मेकअप बाबतची ही वस्तुस्थिती कथन केली आहे. लेखक कुणालाही फोटो न काढण्याचा किंवा मेकअप न करण्याचा आग्रह करत नाही. शेवटी घटनेने आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहेच. त्यामुळे लेखातून आपल्याला पटते तेवढे घ्यावे ही विनम्र सूचना