‘किंगफिशर’चे बँकांना खेटराचे ‘माल्या’र्पण
किंगफिशर
हा पक्षी मराठीत धीवर किंवा खंडया अशा नावांनी ओळखला जातो. हा चलाख पक्षी तळ्याकाठच्या
झाडावरून झेप घेऊन पाण्यात डुबकी मारून माशाला गिळंकृत करतो. माशाला काय झाले हे सुद्धा
कळत नाही. किंगफिशर बिअर उत्पादने आणि हवाई उड्डयण क्षेत्रात कार्य करणा-या उद्योग
समूहाचे सर्वेसर्वा विजया माल्या यांनी सुद्धा आपल्या ब्रांडच्या नावाला साजेशे असे
काम करून दाखवले. बँक रुपी माशांना गटवून हा किंगफिशर विदेशात झेपावला.परंतु येथे बँका
किंवा सरकार तळ्यातील त्या माशाप्रमाणे अनभिज्ञ नव्हते.त्यांनी या किंगफिशरला बँका
गिळंकृत करू दिल्या व उडू पण दिले कारण पैसे सरकारी होते. तसेच या किंगफिशरला अधिक
मोठी भरारी घेण्यास मदत करणारे चांगले मित्र सुद्धा होतेच. किंगफिशर एयरलाईन्ससाठी
पद्धतशीरपणे राजकीय लागेबांधे निर्माण करून पुढे राज्यसभा सभासदत्व प्राप्त करून आणि
त्याहीपुढे राज्यसभेतील सदस्यांची एक समिती असते त्या समितीत सुद्धा सामील होऊन स्वत:च्या
व्यवसायासाठी पुरेपूर लाभ प्राप्त करून घेतला.माल्यांनी अनेक बँकांकडून कर्ज घेतले.
एकट्या स्टेट बँक ऑफ इंडिया कडून १६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. आज सकाळीच बातमी ऐकली
कि मराठवाड्यातील एक शेतकरी कर्ज परतफेड करू शकत नाही आहे तर याच स्टेट बँक ऑफ इंडियाची
शाखा त्याचे शेत जप्त करीत आहे. शासन,बँकाना म्हणावे तुमच्यात हिम्मत असेल तर माल्यासारख्यांना
कडक शासन करून दाखवा आणि मग गरीब, मध्यमवर्गीयाना कर्जासाठी म्हणा, मग गरिबांवर जप्तीसारख्या
कारवाया करा. गरीबाचा किंवा पगारी माणसाचा साधा एक हप्ता चूकला तर हे ‘कार्यक्षम’
कर्मचारी लगेच फोन करतात.आणि माल्यासारख्या लुटारुंना काहीच करू शकत नाही. एक परिचित
नव तरुण, होतकरू अभियंता सांगत होता कि घरची परिस्थिती नसल्याने त्याने ‘एज्युकेशन
लोन’ घेतले तो हप्ते भरणा करीत सुद्धा आहे. त्याला तूर्तास हंगामी नोकरी आहे. तो कर्ज
भरणारा आहे त्याने स्वत: तसे ठरवलेले आहे आणि त्याच्या घरची तशी शिकवणच आहे. अशा मुलाने
काही हप्ते भरले नाही तर त्याच्याकडे याच बँक कर्मचार्यांनी हप्ते भरण्याचा तगादा लावला.गरीब
माणूस सहसा कोणाचेही पैसे अंगावर ठेवीत नाही. कर्ज बुडवणारे तर मोठे गब्बरच आहेत. जिल्हा
सहकारी बँकांचे काय झाले? माल्यासारखे लोक खरे अतिरेकी, तेच खरे देशद्रोही. सामान्यांचे
करोडो रुपये पचवून ढेकर न देता हा माल्या विदेशात परांगदा होतो. मोठ-मोठ्या कर्ज बुडव्या
लोकांची यादि प्रकाशित करून काहीही होणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक
आहे. अशा हजारो कोटी रुपयांचे गबन करणा-यांचा गुन्हा खून,बलात्कार करणा-यांच्या गुन्ह्या
इतकाच गंभीर आहे. या दरोडेखोरांना आणि त्यांच्या सहकारी लोकनायुक्त तसेच बँक अधिकारी
आणि कार्मचा-यांना चाबकाने फोडायला हवे. इक्बाल मिरची, नदीम , ललित मोदि हि गुन्हेगार
मंडळी विदेशात आहे. काय झाले त्यांचे? आता हा किंगफिशर माल्या सुद्धा उडत जाऊन त्यांच्या
ओळीत जाऊन बसला. विदेशात आधीच करोडोची माया जमविलेल्या माल्याने त्याच्या कर्माचा-यांचा
पगार सुद्धा थकविला आहे.माल्या सारख्या लुटारूने गरिबांचे, सामान्यांचे बँकांमध्ये
साठवलेले धन कर्ज रूपाने घेऊन त्यावर मौडेल आणि सिनेमा नट्यांसोबत पार्ट्या नृत्ये
केली, ऐष केली हे करतांना त्याला काहीही वाटले नाही.बँक अधिका-यांसोबत साटेलोटे करून
त्याने ९००० कोटी रु पचवले. त्याच बँकांना खेटराचे माल्यार्पण करून हा किंगफिशर उडून
गेला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा