...प्राण तळमळला
आपणास सविनय कोटी कोटी प्रणाम.
तुमची आज १३३ वी जयंती.परंतु तुमचे स्मरण
करणारे आता फारच थोडके आहेत किंवा असूनही हेतुपुरस्सर तुमचे स्मरण टाळतात. कारण
तुम्ही जाज्वल्य देशाभिमानी. तुम्ही रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना अस्पृश्यता निवारणासाठी किती झटले परंतु
आज ते किती जणांना माहित आहे? “हे हिंदू नृपती प्रभो शिवाजी राजा” अशी शिवाजी महाराजांची
आरती लिहिणारे तुम्ही त्यांना प्रेरणास्थान मानून तुमच्या जीवनात त्यांचेच अनुसरण
केले आहे. मग ती स्वतंत्रतेची शपथ असो व आग्र्याच्या सुटकेप्रमाणे तुम्ही फिरंग्यांच्या
जहाजातून घेतलेली ती जगप्रसिद्ध उडी असो. तुमची हेटाळणी करणारे तुमच्या सुटका कमी
करण्याच्या पत्रांचा वारंवार माफी पत्रे लिहिली म्हणून सतत उल्लेख करीत असतात. परंतु
शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेब आणि अफझल खान यांना घाबरण्याचे नाटक केलेच होते
ना ! म्हणून काय ते खरच घाबरले होते? सावरकर तुम्ही कळण्यास या देशातील कधीही जात न
विसरणा-या जनतेला कैक जन्म घ्यावे लागतील. तुम्ही विविध गुण संपन्न तुमच्या विषयी
लिहिणे म्हणजे मोठे दिव्यच कारण तुमच्या समोर आम्ही म्हणजे अगदीच कस्पट. तुम्ही
स्वातंत्र्यवीर, तुम्ही मराठी भाषाप्रभू, तुम्ही क्रांतीकारी अग्रणी, तुम्ही प्रखर
बुद्धीमान, तुम्ही समाज सुधारक, तुम्ही कवी, तुम्ही लेखक. कोणता असा गुण आहे कि जो
तुमच्या जवळ नव्हता? काव्य आणि लिखाणाचा वारसा तुम्हाला मातृ आणि पितृ दोन्ही
घरापासून मिळाला तुम्ही 9 वर्षांचे असताना तुमच्या मातेचा मृत्यु झाला. पित्याला
प्लेग झाला असता तुम्ही त्यांची सेवा केली. लहानपणापासून हाल अपेष्टेतच तुमचे दिवस व्यतीत
झाले ते अगदी देहत्याग करेतो. काळ्या पाण्याच्या शिक्षेत तुम्ही जेवढ्या यातना
भोगल्या तेवढ्या यातना नंतर स्वातंत्र्याची फळे चाखणा-या इतर कोणत्याही नेत्याने
भोगल्या नाहीत. त्यांनी भोगले सुख, सत्ता.आर.ओ.वॉटर चा शोध लागला नव्हता म्हणून सिमल्याचे
ताजे पाणी पिण्यास उपलब्ध असे अश्या आणि इतर थाटात त्यांनी सत्ता भोगली. तुमचे मात्र
साधे तैलचित्र संसदेत लागण्यास 40-50 वर्षे लागली. सर्वात मोठे वाईट तर त्या प्रसंगाचे
वाटते कि जेंव्हा भारत स्वतंत्र झाला आणि कुणालाही तुमची आठवण झाली नाही. तत्कालीन
नेत्यांनी तुम्हाला बोलावण्याचे हेतुपुरस्सरपणे टाळले आणि तुम्ही स्वत:च्या
राहत्या घरी तिरंगा फडकवला. आज त्याच तत्कालीन नेत्यांची पुढची पिढी तुम्हाला गांधी
हत्येच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष ठरवले असतांनाही पुन्हा तुम्ही त्या कटात
सामील असल्याचे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीतच आहे. “गांधी
आमचे सावरकर तुमचे” असे उद्गार भर संसदेत काढत आहे. त्यांना साधे हे सुद्धा कळत
नाही की गांधी असो वा सावरकर ते सर्व जनतेचे आहेत. सावरकर कुठे तुमची पिढी कि जी
शिष्यवृत्तीच्या आधारावर विदेशात गेली तुम्ही आंबेडकर, मदनलाल धिंग्रा, सेनापती
बापट अशा बुद्धिमान लोकांबद्दल आजची तथाकथित बुद्धिमान आणि ऐशोआराम करण्यासाठी
विदेशात जाणारी तसेच सत्तेसाठी आजही जातीभेद वाढवणारी किंवा मानणारी
उच्चविद्याविभूषित पिढी बोलते तेंव्हा संताप-संताप होतो. परंतु आजच्या लोकशाही
शासनात त्यांचे विरुद्ध काहीही करता येत नाही. काही करण्यासाठी आहे फक्त लेखणी. आज
महाराष्ट्रात टिळक, आगरकर आणि सावरकर यांचा जणू विसरच पडला आहे मग सरकार कोणत्या का
पक्षाचे असो ना. सावरकर तुम्हाला मात्र आजची हि परिस्थिती पाहून स्वर्गात फार यातना
होत असतील. भारतरत्न या पुरस्काराचे तुम्ही खरे मानकरी एवढे कि तुम्हाला जर
भारतरत्न दिले तर या पुरस्काराची शोभा वाढावी. परंतु जातीभेद, व्देष आणि गालीच्छ
राजकारण यांच्या जोखडातून हा देश कधी मुक्त होणार नाही असेच नाईलाजाने वाटत आहे. आज
जाती भेद इतका वाढला आहे कि अमुक एक जातीचा म्हणून असे केले, किंवा अमक्या बद्दल
लिहिले असे तूच्छ विचार लोक करतात. तुम्ही विलायतेत असतांना तुम्हाला मातृभूमीची
तीव्र आठवण आली आणि तुमचा प्राण तळमळला होता. आज तुमच्या तीव्र उपेक्षेने आमचा
प्राण तळमळला आहे.