रोक्सानाचे ‘रक्षा बंधन’
रक्षा बंधन आणि इतर सणांच्यावेळी त्या-त्या सणांशी संबंधीत ऐतिहासिक कथांचे स्मरण करणे, नवीन पिढीस त्या ऐकवणे हे महत्वाचे कार्य घरोघरी होणे अत्यावश्य आहे. शाळांमध्ये इतिहासाच्या शिक्षकांनी स्वत: उत्साहाने क्रमिक प्रकरणासोबतच इतर ऐतिहासिक गोष्टी सांगणे आवश्यक आहे. अन्यथा आपणच आपली गौरवशाली परंपरा विसरून जाऊ. अशा कथा मुलांना ऐकवल्यास त्यांना हमखास प्रेरणा मिळेल.
आता ही कोण रोक्साना? असा प्रश्न
वाचकांना पडणे स्वाभाविकच आहे. कारण आपल्याला इतिहासाचे ज्ञान फारच जुजबी. शिवाजी
महाराज आणि राणा प्रताप यांच्या बाबत एखाद दोन प्रसंग, घटना इथपर्यंतच आपली मजल. मागच्याच
महिन्यात काही महाविद्यालयीन तरुणांना शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नांव विचारले
तर माहीत नव्हते. यावर काहींचे असेही मत असेल की मग यात काय झाले? परंतू जिजाऊने
सुद्धा शिवरायांना पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा सांगितल्याच होत्या आणि त्यामुळेच
शिवाजी राजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा निर्माण झाली. सध्या आपल्या भारतामध्ये
सर्वात अत्यावश्यक असलेली गोष्ट म्हणजे मुलांना आपल्या प्राचीन कथा, पौराणिक कथा, अध्यात्मिक
कथा सांगण्याची. शाळांतून अशा कथा सांगणे आता हद्दपारच झाले आहे. या प्राचीन
कथांमुळे मुलांवर निश्चितच चांगला परिणाम होईल आणि त्यांची वागणूक सुधारेल. त्वरीत
रागावून या मुलांचे पाउल आत्महत्या करण्यापर्यंत जाणार नाही. परंतू हा विचार करणार
कोण? कुणाला मुळी वेळच नाही आहे. सर्व कसे आप-आपल्या कामात व्यस्त नाहीतर मोबाईल
मध्ये तरी व्यस्त(?). साधे शिवरायांच्या आजोबाचे नांव माहीत नसलेल्या तरुणाईला ‘रोक्साना’
माहीत असणे दुरापास्तच.
अशा विचाराअंती रक्षा बंधनाच्या पर्वावर आठवण झाली ती रोक्साना
आणि पुरू यांच्या रक्षा बंधनाच्या ऐतिहासिक घटनेची. रोक्साना तर राहिली बाजूला आणि
आता हा पुरू कोण ? असा अजून एक प्रश्न अनेकांना कदाचित पडला असेल. तर काहींना थोडा “क्लू”
मिळाला असेल. परंतू ज्यांना अद्यापही रोक्साना काय ? पुरू काय ? काही कळले नाही
त्याना आता कळेल की जगज्जेता अलेक्झांडर अर्थात सिकंदर सध्याच्या पंजाब प्रांतात
राज्य करणा-या एका तत्कालीन राजाला कैद केल्यावर व त्याच्या समोर आणल्यावर विचारतो
की, “बोल तेरे साथ कैसा सूलूक किया जाए?“ यावर “जैसा एक राजा दुसरे राजाके साथ
करता है?” असे बाणेदार उत्तर देणारा राजा म्हणजे पुरू अर्थात पोरस. या सिकंदरच्या
पत्नीचे नांव होते रोक्साना. जग जिंकून भारतात आलेल्या आपल्या पतीला येथील लढाई
मध्ये मृत्यू येवू नये म्हणून तिने राजा पोरस अर्थात पुरू यांस राखी बांधली होती. लढाईमध्ये
जेंव्हा सिकंदरवर पुरू शस्त्र उगारतो आणि त्याचे लक्ष मनगटावरील राखी कडे जाते तेंव्हा
त्याला रोक्साना या त्याच्या मानलेल्या बहिणीची आठवण येते आणि तो सिकंदरला अभय
देतो. सिकंदरच्या मनावर येथील थोर वैचारीक परंपरा, संस्कृती याचा फार मोठा प्रभाव
पडतो आणि मग तो मोहीम अर्धवटच सोडून परतीच्या प्रवासाला लागतो. असे हे रोक्सानाचे
रक्षा बंधन.
भारतामध्ये रक्षा बंधन या सणाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. द्रौपदी
आणि भगवान श्रीकृष्ण, मृत्यू देवता यम आणि यमुना, महाराणी कर्णावती आणि हुमायुं यांच्या
रक्षा बंधनाच्या कथा आहेत. याच कथांच्या
शृंखलेत सिकंदर पत्नी रोक्साना आणि राजा पुरू अर्थात पोरस यांच्यातील बहीण
भावाच्या संबंधांची ही कथा सुद्धा आहे. रक्षा बंधन आणि इतर सणांच्यावेळी त्या-त्या
सणांशी संबंधीत ऐतिहासिक कथांचे स्मरण करणे, नवीन पिढीस त्या ऐकवणे हे महत्वाचे
कार्य घरोघरी होणे अत्यावश्य आहे. शाळांमध्ये इतिहासाच्या शिक्षकांनी स्वत:
उत्साहाने क्रमिक प्रकरणासोबतच इतर ऐतिहासिक गोष्टी सांगणे आवश्यक आहे. अन्यथा आपणच
आपली गौरवशाली परंपरा विसरून जाऊ. अशा कथा मुलांना ऐकवल्यास त्यांना हमखास प्रेरणा
मिळेल तसेच एका जुन्या गीता प्रमाणे “सिकंदरने पोरससे की थी लडाई , जो की थी
लडाई तो मै क्या करू ? “ अशा नीरस भावनेने इतिहासाकडे पाहू नये.
(उपरोक्त कथेस ऐतिहासिक पुरावा नाही)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा