Click "Follow" Button below To Follow this Blog

१२/०८/२०१६

Article Describes about hanging photos of God & Goddess on public places, electric poles etc

देव तसे चांगले...पण खांबाला टांगले      
     गांव तस चांगल पण वेशीला टांगल या नावाचा एक जुना मराठी सिनेमा होता. गांव तस चांगल पण वेशीला टांगलं याचप्रमाणे आता मात्र शीर्षकाप्रमाणे देव तसे चांगले पण खांबाला टांगले असे म्हणावेसे वाटते.कोणत्याही शहरात जा विद्युत दिव्यांच्या तसेच दूरध्वनीचे जे काही उर्वरीत खांब आहे त्यांवर देवाचे फोटो लावलेले दिसून येतात.त्यातही एखाद्या प्रसिद्ध धार्मिक गावात आणि त्याच्या आजू बाजूच्या गांवातून हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसून येते.मानव आता अतिशय देवभीरु झाला आहे असे म्हणावे लागेल.भक्ती संप्रदाय खूप जुना आहे. महाराष्ट्रात तर या संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. संतकृपा झाली| इमारत फळा आली ||
ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालाया ||
नामा तयाचा किंकर | तेने रचिले ते आवार ||
जनार्दन एकनाथ | खांब दिला भागवत ||
तुका झालासे कळस |........
संत बहिणाबाई यांच्या वरील ओळींवरून आपल्याला या भक्ती संप्रदायाच्या भल्या मोठ्या काळाची माहिती मिळते.हे थोर संत महराष्ट्रात होते परंतू यांनी कधी भक्तीचा आव आणला नाही.देवाला रस्त्यावर आणले नाही.आज मात्र भक्ती,देवाचा उदो उदो,रस्ते अडवून जेवणावळी.काही प्रसंगी तर सरकारी कार्यालयाकडे जाणारे वर्ग 1,2 अधिका-यांचे रस्ते सर्रास अडवून जेवणावळी घातल्या जातात ज्यांच्या घरी दोन वेळ जेवणाची सोय असते तेच तिथे जास्त “हाणतात”.गरीब उपाशी तो उपाशीच राहतो.अन्न वाया सुद्धा किती घालवतात.तसेच जिथे-तिथे संत महात्मे,देव यांचे फोटो रस्त्यांवरील खांबांवर टांगले जातात.तुम्हाला तो देव आवडतो ना? तुम्ही त्याची भक्ती करता ना? मग त्याची विटंबना होते असे तुम्हाला वाटत नाही का?तुम्ही लावलेले देवाचे चित्र कालांतराने खराब होते आणि मग ते चित्रातील देव विद्रूप दिसू लागतात. घरी तुम्ही देवा बाबत अतिशय स्वच्छता पाळता, कुणी देवाचे खराब चित्र काढले की, कुणी त्याची विटंबना केली की तुमचा राग अनावर होतो आणि इकडे तुम्ही देवाचे चित्र टांगलेल्या खांबावर कुत्रे मुत्र विसर्जन करतात,खाली प्रचंड अस्वच्छता असते.अशा साध्या गोष्टी हे असे सर्र्रास देवाला खांबांवर टांगणा-यांच्या कशा लक्षात येत नाही ?त्याचं खांबावर किंवा त्याच्या बाजूला एखाद्या सिनेमाचे बिभित्स पोस्टर सुद्धा टांगले जाते.जे कुणी हे तथाकथीत देवाच्या भक्तीचा आव आणणारे असतील त्यांनी या वरील बाबींवर सखोल चिंतन करावे ही कळकळीची विनंती.कुठेही देवाचे फोटो टांगून आपल्याच देवाचा अपमान करू नये.कुठेही टांगून त्याची भक्ती करण्यापेक्षा माणसात देव पहा.संत गाडगेबाबा सुद्धा हाच संदेश देवून गेले आहेत. देवाला आपल्या घरी अथवा मंदिरात आदराने बसवून त्याची विटंबना थांबवा तरच तो तुमच्यावर प्रसन्न होईल असा खांबांवर टांगल्याने नव्हे.                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा