मेरा गाँव मेरा देश
“In Every little Village in the world there are great potential, champions who only need motivation, development and good exercise evaluation”
असे न्युझीलंडच्या एका प्रशिक्षकाने म्हटले होते.
हिंदी भाषेत जरी गाँव
म्हणजे खेडे असा अर्थ होत असला तरी मराठीत मात्र गाव म्हणजे
केवळ खेडेच असा तो होत नाही.मराठीत गांव म्हणजे वसतीस्थान आणि मग ते पुढे ‘शहर’
आणि ‘खेडे’ असे विभागले जाते.शीर्षकानुसार गांव म्हणजे खेडेच असा अर्थ प्रतीत
होतो.आता खेडे,गांव याचा उहापोह कशासाठी?काही वर्षांपासून खेडी ओस पडत चालली आणि शहरे
फुगून राहिलीत. दिवसेंदिवस खेड्यातील तरुण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांपासून
दुरावला जातोय. खेड्यातील तरुण खेड्यातच राहून शेती आणि उद्योगधंदा करून ‘खेड्यातून
नवीन विकसित भारताचा उदय’ करू शकतच नाही काय?की असे आता शक्यच नाही? असा प्रश्न
आताच नव्हे तर गेल्या दीड दोन वर्षांपासून पडला आहे आणि मग "तरुण भारत"च्या “ग्रामोद्यातून
भारत उदय” या संकल्पनेतून या विचांरांना अधिक चालना मिळाली. त्यासाठीच खेडी,गांव,विकास
हा उहापोह.
खेड्यापासून भारताचा विकास करावयाचा असेल,नवीन भारत उदय करावयाचा असेल तर
केवळ खेड्यातीलाच नव्हे तर सरकार आणि तमाम जनतेने ‘मेरा गाँव मेरा देश’ हा विचार स्वत:मध्ये
रुजवला पाहिजे. माझे ग्राम म्हणजेच माझे राष्ट्र आहे असे आचरण केले तर सर्वच खेडी विकसित
होतील आणि नव भारतोदय आपसूकच होईल. परंतु विकसित खेडी ही संकल्पना काही वाटते तितकी
सोपी नाही. काहीच पोपटराव पवार, अण्णा हजारे, राजेंद्रसिंग यांसारख्या व्यक्तींनी ते
करून दाखवले आहे. परंतु असा ध्यास घेणारे व्यक्ती आताशा फारसे राहिलेले नाहीत. महात्मा
गांधीनी जरी “खेड्यांकडे चला” असे म्हटले असले किंवा “खरा भारत खेड्यांमधून दिसतो”
असे जरी असले तरी विकासाच्या असमतोलामुळे खेडी ओस पडत असून सर्व लोक शहरांकडे धावत
आहेत आणि तिथे गेल्यावर आयुष्यभर धावणे सुरूच ठेवत आहेत. शहरातील चकचकीत वातावरणाकडे
ते एखादा पावसाळी कीटक ज्याप्रमाणे विजेच्या दिव्याकडे आकर्षित होतो तसे आकर्षित
होत आहेत आणि त्या किटकाप्रमाणेच आयुष्य व्यतीत करत आहेत. खेड्यांमधून भारत उदय
साध्य करावयाचा असेल तर ग्रामीण रोजगार, शेती यांना प्रतिष्ठा मिळवून देवून शहराकडे
जाणारे युवकांचे जत्थे थोपवावे लागतील. पूर्वी कसे “उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि
कनिष्ठ नोकरी” अशी संकल्पना होती. या संकल्पनेचे आता उच्चाटन झाले आहे. आता सर्वांनाच
हवी आहे नोकरी. कारण छोकरी मिळत नाही ना! मुलींना शेतीवाला मुलगाच नापसंत असतो. जो
जगाचा पोशिंदा म्हणविला जातो तो त्यांचा पोशिंदा होईल की नाही याची त्याना शाश्वती
नसते. ”मला लगीन कराव पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे“ तसे “शेतीवाला नवरा सुद्धा पाहिजे” अशी परीस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे. जुन्या काळाप्रमाणे शेतीला प्रतिष्ठा दर्शित करणारे
चित्रपट निर्माण होणे सुद्धा गरजेचे आहे. निव्वळ रस्ते निर्मितीत करोडो रुपये
उधळण्यापेक्षा प्रलंबित नद्या जोड प्रकल्प जर केला तर अनेक कोरडवाहू शेतक-यांना
त्याचा फायदा होईल. कृषी पर्यटन हा सुद्धा व्यवसाय होऊ शकतो. शाळांतील मुलांच्या
सहली ग्रामीण भागात शेती आणि तेथील शेतीपूरक व्यवसाय दाखवण्यास नेल्या गेल्या
पाहिजेत. शेतीला भेट देणा-या मुलांच्या पालकाना संपर्क करून शेतकरी मग त्याच्चा
माल विक्री करू शकतील. ग्रामीण भागात केवळ शेती,
पूरक व्यवसाय अशा दृष्टीकोनातूनच पाहू नये. या
भागातून अनेक मैदानी खेळाडू सुद्धा देशास मिळू शकतात.
“In Every little Village in the world there are great potential, champions who only need motivation, development and good exercise evaluation”
असे न्युझीलंडच्या एका प्रशिक्षकाने म्हटले होते. गावातील युवकांना खेळाकडे, महिलांना व मुलीना त्यांच्याशी संबंधीत व्यवसायांकडे वळवणे असे पर्याय गावा सोबतच देशाचा विकास करणारे ठरू शकतात. कुण्या एका खेडे गावात एका महिलेने “ब्युटी पार्लर” सुरु केले
त्यास यश मिळेल की नाही अशी शंका तिला होती.परंतू खेड्यातील मुली व महिला यांनी
भारघोस प्रतिसाद दिला आणि ती स्त्री आज यशस्वी झाली आणि तिच्या घरची परिस्थिती
सुद्धा सुधारली. महाराष्ट्रात तर अनेक तरुणांनी, महिलांनी ग्रामीण भागात राहून
सुधा प्रगती, उन्नती साधली आहे. इतर तरुण आणि महिला सुद्धा स्वप्रगती सोबतच देशाची
प्रगती करून दाखवू शकतात गरज आहे ती वर सांगितल्या प्रमाणे “Motivation“ची म्हणजेच त्याना उत्तेजना देण्याची. त्याना फक्त
सांगा पटवून द्या की आम्ही तुमच्या सोबत आहोत, “तुम्ही करू शकता” असे म्हणून त्यांच्यातील
आत्मविश्वास जागुत करा आणि मग बघा. यासाठी सर्वानीच ध्यास घेणे जरुरी आहे. खेड्यातून
विकास साधून दाखविण्यासाठी गरज आहे ध्यास घेण्याची. शासन, कृषी खाते यांनी तसा
ध्यास घ्यावा.युवक खेड्यातच राहून आपले जीवन कसे समृद्ध करतील याचा विचार होणे आता
अतिशय जरुरी झाले आहेत. शहरातील भरमसाठ लोकांच्या भरमसाठ गरजा कशा भागवायच्या? हा
एक मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे.शहरात गेलेले सर्वच तरुण काही फार ऐशोआरामाचे
जीवन व्यतीत करीत आहेत असेही नाही.बहुतांश तरुण हे अत्यंत हलाखीचे जीवन शहरात
घालवत आहेत.शहरात पन्नास टक्क्याहून अधिक ‘प्रच्छन्न बेरोजगार’ (पात्रतेपेक्षा कमी
दर्जाची नोकरी) आहेत. या तरुणांना आता शहर सोडता येत नाही सोडले आणि पुन्हा
खेड्याकडे आले तर शेतीतले ज्ञान सुद्धा यथातथाच.म्हणजे “...घर का ना घाट का”. मग शेती
गिळंकृत करीत आहेत लोकशाहीने गब्बर झालेले नेते,डॉक्टर्स,अवैध सावकार.जवळपासच्या खेड्यापाड्यातून जर फेरफटका मारला तर यांच्याच
जमिनी.शेतकरी गेला कुठे? या अशा अवस्थेत युवकांना शेतीचे महत्व,यशस्वी शेतक-यांची
यशोगाथा हे पटवून दिले पाहिजे.‘ग्रामोद्यातून भारत उदय’ साध्या करावयाचा असेल तर गरीब शेतक-याच्या मुलांना शेती,शेतीपूरक व्यवसाय.लघु उद्योग या सर्वांच्या
प्रशिक्षणासोबतच त्यासाठी सवलती, अल्प व्याजदर असलेली कर्जे देणे गरजेचे आहे.हे
करतांना त्याना ‘मोफत’ ची सवय लावू नका.सरकारच्या अनेक योजना आहेत त्या चांगल्या
सुद्धा आहेत परंतु त्या योग्य पद्धतीने राबवल्या जात नाहीत. या योजनांचा लाभ
घेणा-यांमधून उत्कृष्ट लाभार्थीस बक्षिसे दिल्यास इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा जोमाने शेतीकडे लक्ष देतील. शासन, NGO यांनी
हे त्यांच्या मनावर बिंबवले
गेले पाहिजे. शेतक-यांकडून योजना
कार्यक्षमरीत्या राबवून घेतल्या तर आणि सर्व ग्रामस्थाने फिरून खेड्यातच राहून प्रगती केलेल्या,शेतीच्या उत्पन्नाचे उच्चांक गाठलेल्या, लघुउद्योगात प्रगती केल्लेयांच्या “Success Stories” सांगितल्या पाहिजेत. त्या याशोगाथांचे “Projector Show” आयोजित केले गेले पाहिजेत.”तुमच्या खेड्याचा विकास म्हणजेच देशाचा विकास” त्यांच्या पाठीशी शासन आणि जनता उभी आहे
असे त्यांना वाटले तर हा बळीराजा अधिक जोमाने कामास लागेल, तर त्याच्या मुलांना
सुद्धा शेती आणि पूरक व्यवसाय करण्याची रुची कायम राहील, त्यांच्या खेडे गावालाच ते “मेरा गाँव मेरा देश” समजून विकासात्मक कार्य करू लागतील त्यातूनच मग “ग्रामोद्यातून भारतोदय” होण्यास
वेळ लागणार नाही.
Khup Chan.
उत्तर द्याहटवाAajchi satyasthiti mandli.
Garaj ahe amlat yenyachi.
Thanks Mam
हटवा