Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/१२/२०१६

"Musalman" The only handwritten newspaper in India or may be in the world

"मुसलमान
हा एक धर्म आहे हे कुणीही सांगेल. पंरतू “मुसलमान” नावाचे एक वर्तमानपत्र आहे हे थोड्या लोकांना माहीत आहे आणि हे वर्तमानपत्र भारतातील किंबहुना  जगातील एकमेव हस्तलिखित वर्तमानपत्र आहे हे अगदीच कमी लोकांना ठाऊक आहे.”हस्तलिखित वर्तमानपत्र” ! आश्चर्य वाटले ना ? होय “मुसलमान” हे वृत्तपत्र आजही हाताने लिहिले जाते आणि हेच या वृत्तपत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. एखाद्या गोष्टीने झपाटून जाणे म्हणजे काय असते याचे प्रत्यंतर या वृत्तपत्राची माहिती मिळाल्यावर येते. वर्ष १९२७ , ब्रिटीशकालीन भारत. याच काळात चेन्नई तत्कालीन मद्रास या शहरातील सईद अफजतउल्लाह या व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरु केले.त्याकाळी मुद्रण कला बाल्यावस्थेतच होती आणि म्हणावी तेवढी फोफावली नव्हती म्हणून “मुसलमान” हे हस्तलिखित या प्रकारात सुरु झाले, भाषा उर्दू हे सांगणे न लगे. सईद अफजतउल्लाह यांच्या नंतर या वृत्तपत्राची धुरा त्यांच्या मुलाकडे म्हणजे फजलउल्लाह यांच्याकडे आली. स्वातंत्र्योत्तर काळसुद्धा म्हणावा तितका विकसित नव्हताच त्यामुळे वृत्तपत्र तसेच म्हणजे हस्तलिखित याच प्रकारात सुरु राहिले.फजलउल्लाह यांनी जीवनाच्या अखेर पर्यंत याच वृत्तपत्राचे कार्य सुरु ठेवेल असा निर्धारच केला होता.जेंव्हा त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली होती त्यावेळी ते कार्यालयात वृत्तपत्राचेच कार्य करीत होते.त्यांचे निधन झाल्यावर आता सध्या संपादक म्हणून कार्य पाहणा-या त्यांच्या मुलाने म्हणजेच सईद आरीफउल्लाह यांनी वडीलांचा वारसा सुरु राहावा या प्रेरणेने २००८ पासून वृत्तपत्राची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.मार्केटिंग मध्ये एमबीए झाल्यावर मोठ्या पगाराची नोकरी करण्याच्या संधी असून सुद्धा अत्यल्प उत्पन्न असणा-या या क्षेत्रास केवळ वडिलोपार्जित वारसा सांभाळण्यासाठी आरीफ ने या कार्यास वाहून घेतले.मुस्लीम तहजीब अर्थात मुस्लीम संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याची परंपरा आहे.“कॅलीग्रॅफी” चा वापर करून हस्तलिखित कुराणाच्या प्रती राजे- महाराजे,धनिक यांच्यासाठी लिहिल्या जात असत.मुद्रण कलेतील क्रांती नंतर मात्र हस्तलिखित हा प्रकारच सर्वच संस्कृतीमधून बाद होऊ लागला,आता तर संगणक,स्मार्ट फोनचे युग आहे,हाताच्या बोटाने स्मार्ट फोनवर पेन चालवतात त्याप्रमाणे लिहिता येते,आपण बोललेले संगणकाच्या पडद्यावर टाईप होते.मग कोण कशाला हाताने लिहिणार? परंतू “मुसलमान” मात्र अजूनही हाताने लिहिल्या जात आहे.त्यांना नावे ठेवणारी मंडळी आहे, हसणारे लोक आहेत.तरीही अव्याहतपणे मुसालमानचे कार्य सुरूच आहे.फक्त ७५ पैस्यात मिळणा-या मुसलमानच्या २१००० प्रती रोज निघत आहेत. संपूर्ण भारतात त्याचे वाचक आहेत.३० ते ३५ वर्षांपासून कार्य करणा-या कर्मचा-यांचे कुटुंब तेथे आहे.तीन वार्ताहर  ज्यामध्ये एक हिंदू आहे आणि तीन “कॅलीग्रॅफर्स” आहेत जे टाक किंवा बोरूने आणि शाई ने लिहितात ( नवीन पिढीसाठी टाक-जुन्या काळातील लिहिण्याचे साधन ज्याचे टोक शाईत बुडवून लिहावे लागते ) एक पान लिहिण्यास त्यांना 2 तास लागतात.“मी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर मी माझा “युनिकनेस” माझा वेगळेपणा गमावून बसेल” असे आरीफउल्लाह यांना वाटते आणि म्हणून ते “मुसलमान” ला हस्तलिखितच ठेवणार आहे.आताच्या या झगमगत्या दुनियेत अत्यल्प मोबदला असूनही वडिलोपार्जित व्यवसाय व वारसा जोपासणा-या आरीफउल्लाह व त्यांच्या सहका-यांना सलाम.आरीफउल्लाह हस्तलिखित वृतपत्र सुरु ठेवण्याच्या  “रोजोल्युशनवर” ठाम राहिले.आपण सुद्धा आता “न्यू ईअर रोजोल्युशन” करणारच आहोत,तेंव्हा आपण सुद्धा जे काही रोजोल्युशन करू त्यावर ठाम राहूयात.


नूतन वर्षाभिनंदन ! 

२२/१२/२०१६

Doc Trade Union SRK alias Mr S R Kulkrani passed away on Monday 19 Dec 16 . article to tribute him.


 " SRKची एक्झिट

आता 'SRK' म्हटले म्हणजे तरुण वाचकांना त्यांचा आवडता अभिनेता शाहरुख खान डोळ्यासमोर आला असेल . कारण बॉलीवूड मध्ये शाहरुख खान 'SRK' या टोपण नावाने ओळखला जातो. आपल्या मर्कटचेष्टा आणि विवादास्पद वक्तव्ये करून सवंग प्रसिद्धी मिळवणारा हा 'SRK'. परंतू या 'SRK' च्या जन्माआधीपासून एक 'SRK' फार प्रसिद्ध होता. केवळ प्रसिद्धच नव्हे तर लोकप्रिय सुद्धा. विशेषत: कामगारांमध्ये लोकप्रिय. हा 'SRK' म्हणजे “एस आर कुळकर्णी” अर्थात श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी. तसे हे नाव सामान्यांमध्ये कमी माहित असलेले नांव. गोदी कामगार मात्र हे नांव कदापीही विसरू शकणार नाही. गोदी कामगार म्हटल्यावर इतर लोक त्या क्षेत्रापासून अनभिज्ञ आणि किनारपट्टीपासून कोसो दूर असलेल्या विदर्भातील जनतेला हे नाव माहीत असण्याचे काही कारणच नाही.परंतू आपल्या कार्याद्वारे , निस्पृह्तेच्या गुणाद्वारे संघटनेतील लोकांच्या मनावर राज्य करणा-या, ”स्व” बाजूला ठेवून केवळ कामगार हितासाठी लढणा-या व्यक्तीबाबत आजच्या स्वार्थ प्रथम पहाणा-यांच्या जगात सर्वांनाच माहिती असावी.

'SRK' यांचा जन्म १९२७ ला झाला. त्यांनी साने गुरुजींच्या प्रेरणेने १९४२ च्या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि वयाच्या १४ व्याच वर्षी ९ महिन्याचा तुरुंगवास भोगला होता. १९४६ मध्ये गोदीतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करण्याच्या संघर्षात त्यांनी सहभाग घेतला होता. “सामोपचाराचा संघर्ष” ही पद्धत त्यांनी गोदी कामगारांच्या मागण्यासाठी वापरली होती. कामगारांना हिंसक बनवले नव्हते. बुद्धीने अत्यंत तल्लख, प्रखर स्मरणशक्ती कित्येक कामगारांची नावे स्मरणात असलेला, कामगारांची सेवा करीत असेलेला हा महाराष्ट्रातील कामगार नेता वृद्धापकाळात  देखील कामगारांची काळजी घेत होता. त्यांच्यातील गुणांची दाखल आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली होती आणि १३७ सदस्य देश आणि ६० लाख सभासद असलेल्या आशिया पॅसिफिक लेबर युनियन चे ते चेअरमन होते. गोदी प्रमाणेच एअर इंडिया. नाशिक सिक्युरीटी प्रेस येथील कामगारांना सुद्धा त्यांनी संघटीत केले होते. कार्यालयाने कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावयास लावून त्यांचे नुकसान केल्यावर कामगारांना सेवानिवृती वेतन लढा देवून त्यांनी मिळवून दिले होते. एस आर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन असले तर सरकारला सुद्धा धडकी भरत असे. स्वत:च्या लाभाच्या पोळ्या शेकणा-या कामगार नेत्यांच्या उदयानंतर सुध्दा एस आर कुलकर्णी निरपेक्ष भावनेने कामगारांसाठी झटतच राहिले. देशात इंग्रजांची सत्ता असूनही कामगारांची संघटना उभी करणे म्हणजे एकप्रकारे राजद्रोह्च. परंतू एस आर कुलकर्णी यांनी ते शक्य केले १९५४ साली त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियन या संघटनेचे नेतृत्व आले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर असलेल्या डॉक वर्कर्स युनियनचे सुद्धा त्यांनी नेतृत्व केले. स्वतंत्रता पुर्वकाळापासून कामगारांसाठी लढा देणा-या या डॉक कामगार नेत्याला १९ डिसेंबर ला कामगारांपासून काळाने हिरावून नेले. तसे एस आर कुलकर्णी यांची विचारसरणी सुद्धा “निस्पृहस्य तृणं जगत्” या प्रकारची होती. जग म्हणजे त्यांच्यासाठी एक गवताची काडीप्रमाणे होते. तरुणांनी जरूर मनोरंजन म्हणून 'SRK' (शाहरुख खान ) कडे पहावे परंतू प्रेरणा घ्यावी , आदर्श ठेवावा तो निष्पृह कामगार नेते 'SRK' म्हणजेच एस. आर. कुळकर्णींचा.       

१६/१२/२०१६

Article On Corrupts Banks and Bank officers who involved in unauthorized currency distribution after demonitization


'प्यारे देशवासी'च नालायक
मा. नरेंद्र मोदीजी
सविनय नमस्कार
सर्वप्रथम आपण देशासाठी काहीतरी करू ईच्छिता यासाठी आपले अभिनंदन आणि आभार.

8 नोव्हेबर 2016 रात्री 8 वा. “ 500 और 1000 की नोट आज से बस एक कागज का तुकडा है” असे आपण जाहीर केले. सर्व देशात एकच गडबड सुरु झाली.जनेतेने आपल्या नोटांचे व्यवस्थापन करणे सुरु केले. सुरुवातीला विरोधकांनी सुद्धा निर्णयाचे स्वागत केले. एकूण चलनाच्या 86% असलेल्या 500 व 1000 च्या नोटांचे चलन बाद झाले आणि 2000 व 500 च्या नवीन नोटा वितरीत करणे सुरु झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात ATM Calibration करणे सुरु झाले कारण नवीन नोटांसाठी तसे करणे आवश्यकच होते. हुशार काळा पैसा बाळगणा-यांनी आपल्या नोटा बदलण्यासाठी एजेंट नेमले. मोठ-मोठ्या रांगा देशभर दिसू लागल्या. जेंव्हा बोटांवर काळी शाई लावणे सुरु झाले तेंव्हा या नोटा बदली करणे बंद झाले. नोटा बंदी होऊन 20-25 दिवस झाले तरी सुद्धा जेवढे पाहिजे तेवढे चलन खेळते झाले नाही. याचे कारण म्हणजे “कुंपणच शेत खाते” हे होय. मोदीजी कदाचित आपण विचार सुद्धा केला नसेल की ज्या सामान्य जनतेसाठी आपण Demonitization केले त्याच सामान्य जनतेला भ्रष्ट बँक अधिकारी आणि काळे पैसे वाले यांनी वेठीस धरले. या भ्रष्ट लोकांनी करोडो रुपये मागच्या दरवाजाने पांढरे करणे सुरु केले, नोटा ATM मध्ये येण्यापुर्वीच या लबाड धनदांडग्यांजवळ करोडो रुपयांच्या संख्येत जाऊन पोहचत होत्या. सर्वात प्रथम चेन्नई येथील छाप्यात नवीन नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या नंतर अनेक शहरात त्या सापडत आहेत. याचा अर्थ काय ? मोदीजी एकीकडे आपल्या निर्णयामुळे सामान्य प्रमाणिक जनता रांगेत असूनही, त्याना त्रास होत असूनही आपला निर्णय चांगला आहे हेच म्हणत आहे. तर दुसरीकडे काळे पैसेवाले नाना क्ल्पृत्या करून आपले धन पांढरे करीत आहे.  काही भ्रष्ट बँकानी व तेथील कर्मचा-यांनी जुन्या नोटांद्वारे धनाकर्ष काढून, 25 % कमिशन घेऊन नंतर धनाकर्ष रद्द करून नवीन नोटा लबाड धनदांडग्यांना दिल्या.जमा झालेल्या नवीन ग्राहकांच्या कागदपत्रांद्वारे नवीन खाते बनवून त्यात पैसे जमा करून ते काढून देण्यात आले. रिजर्व बँकेचा एक अधिकारी सुद्धा या नवीन नोटा अनाधिकृतरीत्या वितरीत करतांना पकडला गेला. मोदीजी आपण देशासठी सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहात, गरीबांसाठी खरोखर काही तरी करू ईच्छित आहात परंतू एक कटू सत्य हे आहे की अनेकांच्या गुलामीत राहण्याची सवय आणि मानसिकता असलेल्या तसेच भारत स्वतंत्र झाला तेंव्हापासून संरक्षण खात्यातील जीप खरेदी प्रकरण, नगरवाला प्रकरण, बोफोर्स , हर्षद मेहताची सूटकेस , 2. जी स्पेक्ट्रम , कोळसा तसेच विविध राज्यांतील विविध घोटाळे असे अनेक घोटाळे या देशातील जनता पाहत आली आहे. या सततच्या घोटाळ्यांमुळे येथील जनता सुद्धा “यथा राजा तथा प्रजा’ या म्हणीप्रमाणे काहीही करा पण पैसे मिळवा या मानसिकतेची झाली आहे. अद्याप एकही आरोप न झालेले राजे म्हणजे लालबहादूर शास्त्रीं नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि तद्नंतर जनता आपल्यालाच पाहत आहे. मोदीजी या अशा जनतेस वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यातील देशप्रेम जागृत करण्याचे आपण सतत प्रयत्न करीत आहात परंतू बँकांमध्ये येणारे नवीन चलन गैरमार्गाने काळे पैसेवाल्यांना देणे आणि सामान्यांची पिळवणूक करणे यावरून हेच सिद्ध होते की ज्यांच्या भल्यासाठी, काळ्या पैस्याचा अटकाव करण्यासाठी , कॅशलेस व्यवहार होण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात ते आपले प्यारे देशवासीच नालायक आहेत.     

०८/१२/२०१६

Story on invention of biodegradable plastic carry bag by Indian origin industrialist Ashwath Hegde of Maglore current location Quatar

विरघळणा-या कॅरीबॅग !

दिवसेंदिवस काही ना काही नवीन शोध लागत आहेत. आज जे “गॅजेट” आहे ते महिना सहा महिन्यात जुने होत आहे. नवीन भ्रमणध्वनी, नवीन संगणक उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यात तर क्रांती झाली आहे. गंमत अशी की आजचे उपकरण हे जुने झाल्याने त्याला काही किंमत राहत नाही आणि मग अशा वस्तूंचा होतो “ई कचरा”. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक असा हा कचरा होय. पर्यावरणास भेडसावणारी आणखी एक मोठी समस्या ती म्हणजे प्लास्टिक कॅरीबॅगची. कॅरीबॅग म्हणा अथवा प्लास्टिकच्या इतर काही वस्तू .प्लास्टिक हे कधीही नष्ट होत नाही आणि त्यामुळे ते जमिनीस फार हानिकारक ठरत आहे. आपल्याकडे तर आणखी एक समस्या आहे. ती म्हणजे गायींची. आपल्याकडे मालकांनी गायी केवळ नावापुरता पाळल्या असतात आणि त्या मोकाट सोडून दिलेल्या असतात.या मोकाट गायी बहुतांश हमरस्त्यांवर रहदारीस अडथळा करतांना किंवा उकीरड्यावर आढळून येतात. उकीरड्यांवर या गायींच्या पोटात मग प्लास्टिक कॅरीबॅग जातात. गायींचे आरोग्य खराब होते. गोहत्याबंदी योग्य आहे परंतू गोपालन सुद्धा व्यवस्थितरीत्या केले पाहिजे. प्लास्टिक कॅरीबॅगवर जरी बंदी असली तरी विशिष्ट जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग सुरूच आहेत. जाड असो वा बारीक प्लास्टिक कॅरीबॅग ही घातकच आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पर्यावरण बचावासाठी आता अनेक लोक,उद्योग,सामाजिक संस्था तसेच सरकार सुद्धा पुढे सरसावले आहेत. शाळा- महाविद्यालयात आता पर्यावरण हा विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पर्यावरण रक्षणाची जागृती झाली आहे. आणि आता आणखी एक चांगली बातमी म्हणजे भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने आता पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक शोधून काढले आहे. विशेष म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होत नाही.मूळच्या मंगलोरच्या परंतू आता कतार येथे स्थित असलेल्या अश्वथ हेगडे यांच्या एन्वीग्रीनया कंपनीने बायोडिग्रेडेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. हा अभिनव शोध लावणा-या हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात विक्रीसाठी आणण्याची त्यांची मनीषा आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे.या पिशव्या जवळपास  ३ रुपयांच्या दरात बाजारात उपलब्ध होतील. या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळणा-या असतील. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनलेली आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे.आपण सर्वानी पर्यावरण बचावासाठी आपापल्यापरीने प्रयत्नशील रहायला हवे. हेगडेंसारख्या उद्योजकाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार की ज्यांनी स्वत:च्या व्यवसायातून पर्यावरण बचावाचे कार्य सुरु केले आहे.“विरघळणा-या कॅरीबॅग” सारख्या अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणल्यास भारत प्लास्टिकमुक्त होवू शकेल.

०१/१२/२०१६

Revolvers shown to each other in Maharashtra by leaders

.......हे वागणं बर नव्हं !

बंदूक म्हटले की ती पूर्वी सैनिक आणि पोलीसांजवळच असायची. लहान  मुलांना खेळण्यातील आणि फार फार तर आनंद मेळ्यात फुगे फोडण्याची बंदूक असायची. आता मात्र बंदूका आणि बंदूका बाळगणा-यांचा सुळसुळाट झाला आहे. सुमारे एका वर्षापूर्वी एक मंत्री महोदय कंबरेला ‘रीव्हॉल्वर” लाऊन जाहीर समारंभात गेले होते आणि आता स्वत:ला “राष्ट्रवादी” समजणा-या दोन नेत्यांनी जाहीर मेळाव्यात एकमेकांविरुद्ध बंदूका रोखल्या. एकाच पक्षातील नेते असे वागत असतील तर यास काय म्हणावे? तसे आता पक्ष, निष्टा इत्यादी शब्द कागदोपत्रीच शिल्लक राहिले आहेत म्हणा. एकीकडे एकाच पक्षातील नेते जाहीर समारंभात बंदूका काढतात तर दुसरीकडे सरकार मध्ये सामाविष्ट असणा-यांची एकमेकांविरुद्ध शाब्दिक गरळ ओकणे सतत सुरु असते. खरेच “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा”? बंदूका, हाणामा-या म्हटल्या की पूर्वी बिहार आणि उत्तरप्रदेश नजरे समोर तरळायचे. आता मात्र आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील नेते जनते समक्ष एकमेकांवर बंदूका रोखतांना दिसत आहेत. ज्यांच्या कडून देश चालविण्याच्या अपेक्षा असतात ते बंदूका चालवण्याचे पहात आहेत, ते सुद्धा आपल्याच पक्षातील नेत्यावर एवढे वाईट चित्र असेल तर उद्या हे नेते जनतेला बंदुकीने उडवण्यास कमी करणार नाही. मान्य आहे तुम्हे परवाना धारक बंदूकधारी असाल म्हणून काय सतत बंदूक घेवून निघायचे? बंदूक बाळगण्याचा परवाना हा आत्मसंरक्षणासाठी मिळत असतो स्वकीयांविरुद्ध बंदूका रोखण्यास नव्हे. आणि हो तुम्हाला बंदूका रोखण्याची फारच खुमखुमी असेल तर जा ना सीमेवर उगारा बंदूका दहशतवाद्यांवर. तसे कराल  तर ती खरी मर्दुमकी. येथे केवळ धाक दाखवण्यासाठी बंदूक काढता ? येथे काही जंगलराज नाही आहे की ज्याप्रमाणे जंगलात एका वाघाच्या क्षेत्रात दुसरा वाघ जाऊ शकत नाही त्याप्रमाणे नेतेही जाऊ शकत नाही.तुम्ही एकच पक्षातील आहात एकमेकांना तुम्ही पाण्यात पहाता तेथे जनतेचे काय भले पहाणार आहात ? पूर्वीच्या गांधी विचारसरणीच्या पक्षातून फुटून स्वत:च्याच समर्थकांनी घोषित केलेल्या ‘जाणत्या राजाच्या’ नेतृत्वात तुम्ही वेगळी चूल मांडली. जरी वेगळे झाले तरी तुम्हीसुद्धा गांधींची अहिंसेची विचारसरणी मानता. एकीकडे महात्मा गांधींची विचारसरणी दाखवायची आणि दुसरीकडे स्वकीयांविरुद्ध बंदुका काढायच्या हे दुट्टपी वागणे जनतेला आता चांगले कळते आणि म्हणूनच तुम्ही सध्या सत्तेपासून दूर झालेले आहात. तुमच्या अशा वर्तनामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यातून काय शिक्षा होईल किंवा दंड होईल तो होवो. तसेच पक्षांतर्गत कारवाई होईल की नाही ते सुद्धा देव जाणे कारण तुमच्यापैकी  एक ‘नबाब’ आणि दुसरे “दीनांचे” पुत्र. नबाबावर कारवाई कोण करणार? “वोटबँक” पण सांभाळावीच लागते ना ! सोबतच “दीन” दुबळे व त्यांच्या पुत्रांची मते पण सांभाळावी लागतात . त्यामुळे सरकारी किंवा पक्षांतर्गत कारवाई काहीही होणार नाही आणि झालीच तर थातूर-मातूर होईल आणि तुम्ही पुन्हा मोकळे. जनता काय जनता सर्व विसरतेच.आणि हो जर तुम्हाला एखाद्या भागात किंवा मतदारसंघात स्वत;चे श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व सिद्ध करायचे असेल तर ते विकास कामे करून सिद्ध करा ना ! आज मुंबईच्या पदपथांची निव्वळ वाट लागली आहे. पावसाळ्यात किती दुरवस्था होते आणि इतर अनेक या समस्यांकडे कानाडोळा  करायचा आणि जाहीर मेळाव्यात असे वागायचे ? अहो नेते बुवा देशात होते आहे शोभा हे वागणं बर नव्हं !