आता 'SRK' म्हटले म्हणजे तरुण वाचकांना त्यांचा आवडता अभिनेता शाहरुख
खान डोळ्यासमोर आला असेल . कारण बॉलीवूड मध्ये शाहरुख खान 'SRK' या टोपण नावाने ओळखला जातो.
आपल्या मर्कटचेष्टा आणि विवादास्पद वक्तव्ये करून सवंग प्रसिद्धी मिळवणारा हा 'SRK'. परंतू या 'SRK' च्या जन्माआधीपासून एक 'SRK' फार प्रसिद्ध होता. केवळ प्रसिद्धच नव्हे तर लोकप्रिय सुद्धा. विशेषत:
कामगारांमध्ये लोकप्रिय. हा 'SRK' म्हणजे “एस आर कुळकर्णी” अर्थात श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी. तसे हे नाव सामान्यांमध्ये
कमी माहित असलेले नांव. गोदी कामगार मात्र हे नांव कदापीही विसरू शकणार नाही. गोदी
कामगार म्हटल्यावर इतर लोक त्या क्षेत्रापासून अनभिज्ञ आणि किनारपट्टीपासून कोसो दूर
असलेल्या विदर्भातील जनतेला हे नाव माहीत असण्याचे काही कारणच नाही.परंतू आपल्या कार्याद्वारे
, निस्पृह्तेच्या गुणाद्वारे संघटनेतील लोकांच्या मनावर राज्य करणा-या, ”स्व”
बाजूला ठेवून केवळ कामगार हितासाठी लढणा-या व्यक्तीबाबत आजच्या स्वार्थ प्रथम पहाणा-यांच्या
जगात सर्वांनाच माहिती असावी.
'SRK' यांचा जन्म १९२७ ला झाला.
त्यांनी साने गुरुजींच्या प्रेरणेने १९४२ च्या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि वयाच्या
१४ व्याच वर्षी ९ महिन्याचा तुरुंगवास भोगला होता. १९४६ मध्ये गोदीतील कंत्राटी कामगार
पद्धत बंद करण्याच्या संघर्षात त्यांनी सहभाग घेतला होता. “सामोपचाराचा संघर्ष” ही
पद्धत त्यांनी गोदी कामगारांच्या मागण्यासाठी वापरली होती. कामगारांना हिंसक बनवले
नव्हते. बुद्धीने अत्यंत तल्लख, प्रखर स्मरणशक्ती कित्येक कामगारांची नावे स्मरणात
असलेला, कामगारांची सेवा करीत असेलेला हा महाराष्ट्रातील कामगार नेता वृद्धापकाळात
देखील कामगारांची काळजी घेत होता. त्यांच्यातील
गुणांची दाखल आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली होती आणि १३७ सदस्य देश आणि
६० लाख सभासद असलेल्या आशिया पॅसिफिक लेबर युनियन चे ते चेअरमन होते. गोदी
प्रमाणेच एअर इंडिया. नाशिक सिक्युरीटी प्रेस येथील कामगारांना सुद्धा त्यांनी संघटीत
केले होते. कार्यालयाने कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावयास लावून त्यांचे नुकसान
केल्यावर कामगारांना सेवानिवृती वेतन लढा देवून त्यांनी मिळवून दिले होते. एस आर कुलकर्णी
यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन असले तर सरकारला सुद्धा धडकी भरत असे. स्वत:च्या लाभाच्या
पोळ्या शेकणा-या कामगार नेत्यांच्या उदयानंतर सुध्दा एस आर कुलकर्णी निरपेक्ष भावनेने
कामगारांसाठी झटतच राहिले. देशात इंग्रजांची सत्ता असूनही कामगारांची संघटना उभी करणे
म्हणजे एकप्रकारे राजद्रोह्च. परंतू एस आर कुलकर्णी यांनी ते शक्य केले १९५४ साली त्यांच्याकडे
ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियन या संघटनेचे नेतृत्व आले. त्यानंतर राष्ट्रीय
स्तरावर असलेल्या डॉक वर्कर्स युनियनचे सुद्धा त्यांनी नेतृत्व केले. स्वतंत्रता पुर्वकाळापासून
कामगारांसाठी लढा देणा-या या डॉक कामगार नेत्याला १९ डिसेंबर ला कामगारांपासून
काळाने हिरावून नेले. तसे एस आर कुलकर्णी यांची विचारसरणी सुद्धा “निस्पृहस्य तृणं जगत्” या प्रकारची होती. जग म्हणजे त्यांच्यासाठी
एक गवताची काडीप्रमाणे होते. तरुणांनी जरूर मनोरंजन म्हणून 'SRK' (शाहरुख खान )
कडे पहावे परंतू प्रेरणा घ्यावी , आदर्श ठेवावा
तो निष्पृह कामगार नेते 'SRK' म्हणजेच एस. आर. कुळकर्णींचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा