.......हे वागणं बर नव्हं !
बंदूक म्हटले की ती पूर्वी सैनिक
आणि पोलीसांजवळच असायची. लहान मुलांना
खेळण्यातील आणि फार फार तर आनंद मेळ्यात फुगे फोडण्याची बंदूक असायची. आता मात्र
बंदूका आणि बंदूका बाळगणा-यांचा सुळसुळाट झाला आहे. सुमारे एका वर्षापूर्वी एक
मंत्री महोदय कंबरेला ‘रीव्हॉल्वर” लाऊन जाहीर समारंभात गेले होते आणि आता स्वत:ला
“राष्ट्रवादी” समजणा-या दोन नेत्यांनी जाहीर मेळाव्यात एकमेकांविरुद्ध बंदूका
रोखल्या. एकाच पक्षातील नेते असे वागत असतील तर यास काय म्हणावे? तसे आता पक्ष, निष्टा
इत्यादी शब्द कागदोपत्रीच शिल्लक राहिले आहेत म्हणा. एकीकडे एकाच पक्षातील नेते
जाहीर समारंभात बंदूका काढतात तर दुसरीकडे सरकार मध्ये सामाविष्ट असणा-यांची एकमेकांविरुद्ध
शाब्दिक गरळ ओकणे सतत सुरु असते. खरेच “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा”? बंदूका,
हाणामा-या म्हटल्या की पूर्वी बिहार आणि उत्तरप्रदेश नजरे समोर तरळायचे. आता मात्र
आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील नेते जनते समक्ष एकमेकांवर बंदूका रोखतांना दिसत
आहेत. ज्यांच्या कडून देश चालविण्याच्या अपेक्षा असतात ते बंदूका चालवण्याचे पहात
आहेत, ते सुद्धा आपल्याच पक्षातील नेत्यावर एवढे वाईट चित्र असेल तर उद्या हे नेते
जनतेला बंदुकीने उडवण्यास कमी करणार नाही. मान्य आहे तुम्हे परवाना धारक बंदूकधारी
असाल म्हणून काय सतत बंदूक घेवून निघायचे? बंदूक बाळगण्याचा परवाना हा आत्मसंरक्षणासाठी
मिळत असतो स्वकीयांविरुद्ध बंदूका रोखण्यास नव्हे. आणि हो तुम्हाला बंदूका
रोखण्याची फारच खुमखुमी असेल तर जा ना सीमेवर उगारा बंदूका दहशतवाद्यांवर. तसे
कराल तर ती खरी मर्दुमकी. येथे केवळ धाक
दाखवण्यासाठी बंदूक काढता ? येथे काही जंगलराज नाही आहे की ज्याप्रमाणे जंगलात एका
वाघाच्या क्षेत्रात दुसरा वाघ जाऊ शकत नाही त्याप्रमाणे नेतेही जाऊ शकत नाही.तुम्ही
एकच पक्षातील आहात एकमेकांना तुम्ही पाण्यात पहाता तेथे जनतेचे काय भले पहाणार
आहात ? पूर्वीच्या गांधी विचारसरणीच्या पक्षातून फुटून स्वत:च्याच समर्थकांनी
घोषित केलेल्या ‘जाणत्या राजाच्या’ नेतृत्वात तुम्ही वेगळी चूल मांडली. जरी वेगळे
झाले तरी तुम्हीसुद्धा गांधींची अहिंसेची विचारसरणी मानता. एकीकडे महात्मा
गांधींची विचारसरणी दाखवायची आणि दुसरीकडे स्वकीयांविरुद्ध बंदुका काढायच्या हे
दुट्टपी वागणे जनतेला आता चांगले कळते आणि म्हणूनच तुम्ही सध्या सत्तेपासून दूर
झालेले आहात. तुमच्या अशा वर्तनामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यातून काय
शिक्षा होईल किंवा दंड होईल तो होवो. तसेच पक्षांतर्गत कारवाई होईल की नाही ते सुद्धा
देव जाणे कारण तुमच्यापैकी एक ‘नबाब’ आणि दुसरे
“दीनांचे” पुत्र. नबाबावर कारवाई कोण करणार? “वोटबँक” पण सांभाळावीच लागते ना ! सोबतच
“दीन” दुबळे व त्यांच्या पुत्रांची मते पण सांभाळावी लागतात . त्यामुळे सरकारी
किंवा पक्षांतर्गत कारवाई काहीही होणार नाही आणि झालीच तर थातूर-मातूर होईल आणि
तुम्ही पुन्हा मोकळे. जनता काय जनता सर्व विसरतेच.आणि हो जर तुम्हाला एखाद्या
भागात किंवा मतदारसंघात स्वत;चे श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व सिद्ध करायचे असेल तर ते
विकास कामे करून सिद्ध करा ना ! आज मुंबईच्या पदपथांची निव्वळ वाट लागली आहे. पावसाळ्यात
किती दुरवस्था होते आणि इतर अनेक या समस्यांकडे कानाडोळा करायचा आणि जाहीर मेळाव्यात असे वागायचे ? अहो
नेते बुवा देशात होते आहे शोभा हे वागणं बर नव्हं !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा