मराठीची "कंडीशन"
मुद्दामच शीर्षक इंग्रजाळलेले असे दिले . आज आपली मराठी अशीच नाही आहे का झाली ? आज दि.27/12/2017 मराठी राजभाषा दिन आज दि.27/12/2017 मराठी राजभाषा दिन सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. म्हणून म्हटले की मराठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनानुसार विकिपीडिया वर खाते उघडून जरा मराठी लेखन करावे. कारण तसे इतर भाषांशी तुलना केली तर विकिपीडिया वर मराठी अगदी शेवटच्या क्रमांकाकडे गेलेली दिसते. तसेही आता मराठी भाषा आणि भाषिक हे इंग्रजाळलेले मराठी बोलत असतात. चांगले लेखन आता क्वचितच होतांना दिसत आहे.पु.ल.देशपांडे , चि. वि. जोशी , कुसुमाग्रज , सुरेश भट , भाऊसाहेब पाटणकर , शांता शेळके , बहिणाबाई चौधरी , द.मा.मिरासदार , व.पु. यांच्या सारखे मराठी लेखन आता होतांना दिसत नाही. काही सन्मानीय अपवाद जरूर आहेत परंतू हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. इंग्रजी शाळेत शिकणा-या मराठी माणसाच्या मुलास मराठी आकडा हा इंग्रजीत सांगावा लागतो."बाबा अठ्ठावीस म्हणजे "ट्वेंटीऐट" का? " असे विचारणारे पाल्य आपणास घरोघरी दिसतील. अर्थात माझेही पाल्य यास अपवाद नाही.करणार काय ? मराठी शाळांत टाकले तर मुलगा मागे पडण्याची भीती , शेजा-याचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो आणि माझा मराठीत जाईल याची वाटणारी लोक लाज यामुळे मग मराठी मुले मराठी वाचन आणि भाषा यांपासून दुरावत जात आहे. प्रत्येक पालकाने त्यांचा मुलाला कोणत्या शाळेत टाकावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू प्रत्येक पालक आपल्या पाल्यास निदान रोज एक मराठी पान लिहण्यास आणि वाचण्यास सांगू शकतो. इतर देश , आपल्या भारतातील काही राज्ये जशी मातृभाषेचा आदर करणारी आहेत, अभिमान बाळगणारी आहेत तसे महाराष्ट्रीयन मात्र नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागते. किती लोक आता भावगीते ऐकतात ? किती सकाळी आकाशवाणीवर अभंग ऐकतात ? किती तरुण मुले जुन्या पिढीतील मराठी लेखकांची पुस्तके वाचतात? असे विचारले तर निराशाजनक आकडा समोर येईल. मृत्यंजय कादंबरी कोणी लिहिली असे एका तरुणास विचारले असता शिवाजी सावंत ऐवजी शिवाजी साटम असे उत्तर येते याला काय म्हणावे ? भाऊसाहेब पाटणकर मराठी शायरी करत होते. किती जणांना पाटणकर माहीत आहेत? मराठी माणूस , मराठी अभिमान , मराठी अस्मिता असे सतत म्हणणारा शिवसेना पक्षाला महापालिका निवडणूकीत त्यांचे प्रचाराचे घोषवाक्य "डीड यु नो?" असे इंग्रजीत लिहावे लागते!"अमृतातही पैजा जिंके " असे ज्ञानेश्वर जिचे वर्णन करतात त्या मराठी आईचे अमृतासमान दुग्ध प्राशन केलेला बालक त्याच्या आईला मम्मी हाक मारतो ? हे का झाले , आपण असे आणि इतके कसे काय इंग्रजाळलो? कुठे गेले आपले मातृभाषा प्रेम? मराठी माणूस कुठेच मागे नाही आहे त्याने आपले झेंडे अटकेपार लावले आहेत आणि लावत आहे. "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" अशी मराठी माणसाची ख्याती आहे. गरज आहे ती फक्त त्याने आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याची ,मराठी माणसाने आपली भाषा समृद्ध करावयास हवी. आपल्या भावी पिढीस मराठी या आपल्या मायबोलीची गोडी लावण्याची,सर्व मराठी भाषिकांचे मेळावे घेण्याची, जात-पात विसरून मराठी भाषिक या एका गोष्टी साठी एकत्र येण्याची तेंव्हा कुठे भाषेबद्दल प्रेम, अभिमान निर्माण होईल. डोंबिवली या मराठी बहुल मुंबई उपनगरात मराठी साहित्य संम्मेलनात खुर्च्या रिकाम्या कशा राहतात? याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.बरेचवेळा दोन मराठी भाषिक भेटतात आणि हिंदीत संभाषण करतात. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मान्य आहे त्या भाषेचाही आदर आहे अरे पण तुम्ही दोघे मराठी आहात ना ! मग उगीच मोडक्या तोडक्या हिंदीत का बोलता? कुठेही गेले की मराठी माणूस दुकानदार अथवा तत्सम व्यवसायीकाशी हिंदीत बोलणे सुरु करतात बरेचदा तो मराठीत बोलतो परंतू हाच आपला मर्द मराठी हिंदीचे ज्ञान पाजळतो. असो ! आजच्या दिवसापासून तरी आपण सर्व मराठी बांधव आपली मातृभाषा समृद्द करण्याच्या, तिचा आदर करण्याचा वसा घेऊ.जय महाराष्ट्र !