Click "Follow" Button below To Follow this Blog

२२/०३/२०१७

People demands lot, article describe that reduce your unexpected and various demands

भगवानने मुंह दिया;लगे मांगने

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील नागरिकांना ‘फुकट’ मिळवण्याची सवय सरकारनेच लावून दिली आणि आपल्या देशात ‘देणारे’ कमी आणि ‘घेणारे’ जास्त झाले. विनोबांनी जमिनी दया म्हटल्यावर अनेकांनी आपल्या जमिनी “भूदान चळवळीत’ दान केल्या. त्याच देशातील लोक आता नातेवाईक, मित्र, सख्खा भाऊ यांच्या तसेच सरकारी जमिनी हडपण्याच्या मागे लागले. आपल्या देशात आता “मांगीलाल” अर्थात सरकारकडे सतत काही ना काही मागण्या करणारे लोक भरपूर प्रमाणात वाढले आहेत. हिंदीत मागणे या मराठी शब्दासाठी “मांग” हा समानार्थी शब्द आहे. “हमारी मांगे पुरी करो” म्हणत अवास्तव, अवाजवी मागण्या अर्थात “मांग” करणा-यांना "मांगीलाल" हे विशेषण लावावेसे वाटले. (मांगीलाल नांव असणा-यांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये. तसा गैरसमज करून घेतला तर या लेखा विरोधात सुद्धा काही मागणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.) दररोज काही ना काही मागण्या, निवेदने सरकार दरबारी अव्याहतपणे सुरु असते. अर्थात रास्त मागण्या असतील तर काही हरकत नाही. जेथे कुठे सरकार चुकत असेल अथवा सरकार काही सोयी, सुविधा पर्यंत पोहचवू शकत नसेल, जनतेच्या हक्कांवर गदा येत असेल तर मागण्या होणे जरुरीच आहे.परंतू अशा मागण्या करता-करता मग स्वत:च्याच पात्रात तूप कसे ओढता येईल याचाच सतत विचार आणि मग स्वत:स न्याय मिळावा म्हणून सरकार दरबारी जातांना उगीचच काहीही टुमणे लावणे, अवाजवी दुरदृष्टीहीन, देशाचे हित सोडून स्वहिताच्या मागण्या करणे बरोबर नव्हे. मागील रविवारी नव्यानेच सुरु झालेल्या खामगांवातील प्रशासकीय इमारती मध्ये जाण्याचा योग आला. अंमळ थोडा वेळ होता म्हणून तेथील प्रवेशद्वारा जवळ नव्या रंग-रंगोटी केलेल्या इमारतीच्या भिंतीवर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या मागण्यांचे एक पत्रक चिटकवले होते ते वाचले.एक तर नवीन इमारतीवर असे पोस्टर चिटकवावे तरी कसे वाटते देव जाणे. या पोस्टर वर एक मागणी होती की, कर्मचा-यांची शासकीय निवासस्थाने त्या-त्या कर्मचा-याच्या नावावर करावीत. ही मागणी पाहून व्यथा, आश्चर्य असे मिश्र भाव मनात आले. “जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडीले सर्व घरदार सोडला सुखी संसार” अशा एका कवितेच्या ओळी आठवल्या. देशासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवणा-या त्याच हुतात्म्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अशा मागण्या कराव्यात?तुमच्यावर अन्याय होत असेल, वेतन, पगारवाढ या बाबत वा तत्सम इतर काही मागण्याबाबत काहीही म्हणणे नाही.परंतू तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर तुम्हाला शासकीय निवास्थान आंदण म्हणून दिले तर नवीन चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या निवासस्थानाचे काय?त्यांची सोय सरकारने कुठे आणि कशी करायची?त्याला पुन्हा नवीन घर देऊन ते पण नंतर त्याच्या सेवानिवृत्त्नीनंतर आंदणात द्यायचे का? क्रांतीवीर चित्रपटात एका प्रसंगात नाना पाटेकर म्हणतो, “भगवानने मुंह दिया;लगे मांगने” त्याप्रमाणेच आपल्या देशवासियांना मागण्याची, याचना करण्याची सवयच जडली आहे.सर्व याचक झाले आहेत. या मागण्या करतांना काही विचार केला जातो की नाही? कुणाच्या सुपीक डोक्यातून या अशा मागण्या निघतात. सरकार कडून काय-काय पाहिजे?तुम्ही सरकारकडे नोकरी करता तुम्हाला त्याचा मेहनताना मिळतो, सेवानिवृत्ती वेतन मिळते, वाहन भत्ता, आरोग्य बिले, प्रवास बिले ई मिळते अजून किती मागणार? चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधुंनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याचे निराकरण व्हायलाच हवे.तुम्हाला विरोध आहे असा गैरसमज करू नये. परंतू तुमच्या वरील मागण्यांप्रमाणे इतर सर्वच कर्मचा-यांनी अशा मागण्या केल्या तर? आपल्या मागण्या करतांना सर्वानीच स्वहीताप्रमाणे देशाहित सुद्धा पहाणे जरुरी नाही का ?

१४/०३/२०१७

Article against Hon Minister Dilip Kamble's speech

आम्हाला काय कुणाची भीती ?

होळीच्या दिवशी आपल्या राज्याचे सामजिक न्याय राज्यमंत्री मंत्री ना.मा.दिलीप कांबळे यांनी “घाबरायला मी काय ब्राह्मण आहे काय?” असे वक्तव्य केले.राज्यमंत्री महोदय तुमच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण घाबरतात आणि तुम्ही घाबरत नाही हे सूचित होते. मा. कांबळे साहेब ब्राह्मण हे अनंत काळा पासून या देशाचे शुर सरदार राहिली आहेत. देशावर जेंव्हा जेंव्हा संकट आले तेंव्हा तेंव्हा ब्राह्मणाने आपली दऊत-लेखणी व पळी-पंचपात्रे सोडून ढाल तलवार हाती घेतली आहे.बाजीराव पेशवे ,बाजीप्रभू, मुरारबाजी, पानिपतला लढणारे सदाशिवराव, विश्वासराव पेशवे “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,देव,देश,अन धर्मापायी प्राण घेतले हाती” म्हणत या देशासाठी लढले.शत्रू आल्यावर घाबरून पळाले नाहीत.तुम्ही जर म्हणत असाल की ब्राह्मण घाबरतात तर होय ब्राह्मण घाबरतात.पंरतू ते घाबरतात या देशाचा कायदा तोड़ण्याला,ब्राह्मण घाबरतात ते इभ्रतीला, ब्राह्मण घाबरतात ते भ्रष्टाचार करण्याला, ब्राह्मण घाबरतात अनितीला, ब्राह्मण घाबरतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार न वागण्याला. तुमच्या सारखे सामाजिक न्यायखात्याचे राज्यमंत्री असूनही एखाद्या विशिष्ट जातीबद्दल आकस ठेवणे किंवा त्या जातीची निर्भत्सना करणे हे तुम्हालाच जमू शकते एखाद्या ब्राह्मणास नव्हे हे या देशातील कुणीही सांगेल.या देशात शिव्या देण्यास,निर्भत्सना करण्यास एकच जात आहे ती म्हणजे ब्राह्मण याचे कारण ब्राह्मण सर्वाना घाबरतात हे नसून ब्राह्मण सद्सद्विवेकबुद्धिने वागतात.ब्राह्मण शिकवण अनुसरतात “सदा बोलणे नीच सोशीत जावे” हे सांगणा-या रामदास स्वामींची.ब्राह्मण तुमच्या सारखे काहीही बोलतच नाही, अनिष्ट शब्द उच्चारत नाहीत कारण त्यांना “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” हा संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा मन्त्र शिरोधार्ह आहे.“ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोये औरन को शीतल करे आपहु शीतल होय“ यांसारखे कबीराचे दोहे ब्राह्मणास मुखोद्गत असतात.ब्राह्मण संतवचन सदैव स्मरणात ठेवतात आणि म्हणून शांत असतात. ते शांत असतात म्हणून ते घाबरतात असे नव्हे.मा.कांबळे साहेब तुम्ही थोडे इतिहासात डोकावले तर तुम्हाला नीडर ब्राह्मण चिडले तर काय होते हे कळेल.नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही आणि तसे करुन अन्यायी नंदाचा नाश करणारा ब्राह्मण तुम्हाला कळेल,पावनखिंड लढ़वणारा बाजीप्रभु देशपांडे तुम्हाला समजेल,पुरंदर साठी लढ़णारा मुरारबाजी देशपांडे,अटकेपार झेंडे लावणारे रघुनाथराव आठवतील,पहीला बाजीराव कसा शूर होता हे समजेल.लो. टिळक कळतील,सावरकर कळतील,गांधीजींचे गुरु गोखले कळतील,एवढेच काय तर चवदार तळ्याच्या लढ्यात आंबेडकरांना सहकार्य करणारे ब्राह्मण गोडबोले होते हे समजेल. कदाचित तुम्हाला हे सर्व माहीत असेल परंतू तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की ब्रह्मणांविरुद्ध बोलल्याने काहीही होत नाही कारण ब्राह्मण हा विवेकशील आहे आणि शिवाय त्याच्या पाठीशी कायद्याचा काही आधार नाही मग घ्या तोंडसुख.आजही पूर्वी होता तसाच देशप्रेमी ब्राह्मण आहे, आजही तो घाबरत नाही परंतू आज तो शांत आहे कारण त्याला आताचा कायदा त्या कायद्याचे रक्षक, आताची परिस्थिती हे सर्व चांगलेच ज्ञात आहे. मा. कांबळे साहेब तुम्ही कोणत्या पदावर आहात निदान हे तरी ध्यानात घ्या,तुम्ही मंत्री पदाची शपथ घेतांना काय म्हटले होते ते आठवा.सामाजिक खात्याचा राज्यमंत्री जेंव्हा “मुस्काटात दिली असती” असे म्हणतो एखाद्या जातीचा अनादर करतो ही तर सरळ-सरळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या व घटनेतील समान हक्कांची पायमल्ली आहे.अशी पायमल्ली एखादा मंत्री करतो तर मग त्याचे अनुसरण कार्यकर्ते,नागरीक करतील कारण “यथा राजा तथा प्रजा” तुम्ही आजच्या काळातील राजेच. परंतू राजा हा भूपती किंवा भूपेन्द्र म्हणून ओळखला जातो. पृथ्वी ही त्याची पत्नी आणि प्रजाजन हे त्याची लेकरे समजली जातात आणि पित्याला सर्व लेकरे सारखी असतात.मा.कांबळे साहेब भारतातील उपेक्षित,पिडीत,दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जातीभेद दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटले परंतू तेच उपेक्षित,पिडीत,दुर्बळ आता असे एखाद्या जातीबद्दल अनादराने बोलत आहेत.मा. कांबळे साहेब आज जर बाबासाहेब आंबेडकर असते तर तुमची अशी वाणी ऐकून ते सुद्धा व्यथीत झाले असते.जेंव्हा जेंव्हा देशावर संकट आले तेंव्हा आईच्या गर्भात झुन्झाराची रीत  उमगलेला ब्राह्मण “देशापायी विसरुनी सारी माया ममता नाती” असा आम्हाला काय कुणाची भीती ? म्हणत पुढे सरसावला आहे आणि भविष्यात सुद्धा तसाच राहील लोक काहीही बरळले तरी.

०९/०३/२०१७

Article about killing female infant

कळ्यांचा कर्दनकाळ 

“यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी शिकवण असणा-या आपल्या देशाची गत आता “ यत्र धनस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी झाली आहे..............
......... रामकृष्ण परमहंस म्हणतात , “शिक्षक म्हणून आणि डॉक्टर म्हणून जर कोणी या जन्मात व्यवसाय करत असेल आणि तो जर योग्य पद्धतीने आणि प्रमाणिकपणे करत असेल तर त्यांना याच जन्मात मोक्ष मिळतो” परंतू मोक्ष, प्रमाणिकपणा यांना हल्ली कोण विचारतो ?

          सांगली जवळील म्हैसाळ या गावातील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करतांना झालेल्या मृत्यूमुळे आणि त्यासोबतच भारती रुग्णालयाच्या माध्यमातून झालेल्या अनेक स्त्री भृण हत्यांमुळे उभा महाराष्ट्र हादरला. एक मार्चला स्वाती जमदाडे या महिलेचा भारती रुग्णालयात मृत्यू झाला आणि डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे या त्या रुग्णालयाच्या संचालकाला अटक करण्यात आली. बी एच एम एस पदवी असलेल्या या डॉक्टरच्या रुग्णालयात खाटांची आणि शस्त्रक्रिया करण्याची साधने सुद्धा होती. अनेक स्त्री अर्भकांना याने यमसदनी धाडले आणि पुरून टाकले. “बेटी वाचवा बेटी जगवा” , “:बेटी बचाव बेटी पढाओ” असे शासन म्हणत असतांना व जनतेची सुद्धा मुलींकडे पाहण्याची मानसिकता बदलत असतांना नेमकी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रास काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस येण्यास सौ स्वाती जमदाडेंचा मृत्यू व्हावा लागला आणि तो होईपावेतो प्रशासनास वाट पहावी लागली हे एक दुर्दैव म्हणावे की प्रशासनाची लापरवाही ? पोलिसांनी जर कधी मनात आणले तर मंदेरा बाहेरची चप्पल सुद्धा चोरीला जावू शकत नाही एवढी पोलीसां जवळ माहिती असते. १९ स्त्री मृत अर्भक सापडण्या पर्यंत कुणास कसे ठावूक नाही याचे आश्चर्य वाटते. 10 वर्षांपासून तो हे रुग्णालय चालवीत आहे होमिओपॅथी डॉक्टर असूनही गर्भपात करीत आहे हे सर्व घडते म्हणजे यात अनेक लोकांचा सहभाग असेलच. आजपावेतो १९ अर्भक सापडली आहेत त्यांची संख्या अधिकही असू शकते. आजच त्याच्या कम्पाउंडर साळुंखे आणि नर्स रोजे यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.शासनाच्या योजना चांगल्या आहेत परंतू कायद्याचा धाक म्हणावा तसा नाही आहे. म्हणूनच खिद्रापुरे सारखे असे कृत्य करण्यास धजावतात. “यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी शिकवण असणा-या आपल्या देशाची गत आता “ यत्र धनस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी झाली आहे. मग धनासाठी काहीही करण्यास मागे-पुढे पहिले जात नाही , बेकायदेशीर कृत्ये त्यामुळेच घडत असतात. वैद्यकीय क्षेत्रात तर अशा अनेक घटना घडत असल्याचे सर्वानी अनुभवले आहे. मृतास “व्हँटीलेटर” वर ठेवून पेशंटच्या नातेवाईकांना फसवणे, उगाच विविध पॅथॉलॉजी टेस्ट करावयास लावणे, औषधांच्या मात्रा देण्यात चुका करणे, टेस्ट रिपोर्ट चुकीचे देणे असे कितीतरी किस्से अनेकांनी ऐकले आहेत. खिद्रापुरेने तर कहरच केला होमिओपॅथी डॉक्टर असूनही त्याने गर्भपात केले. तो होमिओपॅथी डॉक्टर तरी आहे की नाही हे आता तपासांती कळेलच. केवळ धनाच्या लालसेपाई हे असे घडते आहे दुसरे इतर काही कारण नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात , “शिक्षक म्हणून आणि डॉक्टर म्हणून जर कोणी या जन्मात व्यवसाय करत असेल आणि तो जर योग्य पद्धतीने आणि प्रमाणिकपणे करत असेल तर त्यांना याच जन्मात मोक्ष मिळतो” परंतू मोक्ष, प्रमाणिकपणा यांना हल्ली कोण विचारतो ? आता तर हवा फक्त पैसा . कोट्यावधी रुपयांचे ऋण घेऊन इस्पितळे, कोचिंग क्लासेस उभारली जातात आणि मग ऋण फेडण्यासाठी पेशंटला, विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते. अर्थात याला अनेक चांगली रुग्णालये व कोचिंग क्लासेस अपवाद आहेतच. परंतू खिद्रापुरेंसारख्या डॉक्टरमुळे समाजातील इतर चांगल्या डॉक्टरांची नावे सुद्धा बदनाम होतात. म्हैसाळ मधील नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवला. परंतू   महाराष्ट्रात कुठेही निदर्शेने , आंदोलने , मोर्चे झाले नाहीत. स्वत:च्या स्वार्थी मागण्यांसाठी , शासना कडून विविध लाभ मिळवण्यासाठी मोर्चे काढतांना आपण अनेकांना पाहतो परंतू समाजातील बेकायदेशीर कृत्ये करणा-यांच्या विरोधात मात्र असे मोर्चे क्वचितच निघतात. तेंव्हा यासाठी तर सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येऊन मोर्चा,निषेध,निदर्शने करावयास हवी. कळ्यांच्या खिद्रापुरे या कर्दनकाळास कठोरात कठोर शिक्षा करावी जेणे करून दुसरा कोणी पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.



Speech By Vinay V Varangaonkar on the occasion of Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary 2016

Speech By Vinay V Varangaonkar on the occasion of Mahatma Phule Deat Anniversary 2015

०२/०३/२०१७

BCCI decided to honour C K Naydu Lifetime Acheivement Award to ex cricket player, baller Padmakar Shivalkar.



जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
      कालच्या लोकसत्ता मध्ये खेळाच्या पानावर याच शीर्षकाची एक बातमी होती. देव आनंदच्या जगण्याच्या तत्वज्ञानाच्या “मै फिक्र को धुएमे उडाता चला गया” या गाण्यातील एक अंतरा शीर्षकातील याच ओळीने सुरु होतो.लहानपणापासून कधी चिंता निर्माण झाली तर आमचे तिर्थरूप याच गाण्याचा दाखला देत आम्हाला कधीही चिंता न करण्याचे सांगत आले आहे.त्यामुळे हे गाणे तसे पाठच आहे. साहीर लुधियानवीने लिहिलेले व जयदेव ने संगीतबद्ध केलेलं हे एक हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील “माईलस्टोन” म्हणावे असे अप्रतिम गीत आहे. या गीतात सर्वच सौंदर्य एकवटले आहे साधना,देव, जयदेव,साहीर,दिग्दर्शक विजय आनंद.अशा या सुमारे 50 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हम दोनो चित्रपटातील गीताची ओळ बातमीचे शीर्षक असलेली पाहून बातमी वाचण्यास घेतली.बातमी होती “पद्माकर शिवलकर” यांची.उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या पद्माकर शिवलकर यांना “बी सी सी आय” ने क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हे बातमी वाचल्यावर समजले.पद्माकर शिवलकर मुंबई कडून खेळणारे  डावखुरे गोलंदाज होते.वीस वर्षे ते मुंबई संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले.सर्वाधिक विकेट घेणारे ते गोलंदाज आहे. त्यावेळेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज असून सुद्धा त्यांची निवड भारतीय क्रिकेट संघात कधीही होऊ शकली नाही हे त्यांचे आणि भारतीय क्रिकेट संघाचे सुद्धा दुर्दैव म्हणावे लागेल.त्यावेळी त्यांच्या ऐवजी बिशनसिंग बेदी यांची निवड करण्यात आली होती. ती कशी झाली तो भाग वेगळा.

“हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळूनी कोणाचे जीवन उधळी , दे कुणास यश उधळोनी”

या शिवलकरांनीच गायलेल्या गीताप्रमाणे शिवलकर यांच्या दैवगतीच्या चेंडूने मात्र त्यांच्या भारतीय संघातील प्रवेशास मात्र हुलकावणी दिलीच.खेळाडू मग ते क्रिकेट वा अन्य कोणत्याही खेळातले असू देत त्यांची निवड ही पूर्णत: दैवावरच अवलंबून असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुणवत्ता असून सुद्धा आपल्या देशातील अनेक खेळाडू मागे का राहिलेत ? कसे राहिलेत ? क्रिकेटमध्ये तर तीव्र स्पर्धा असते एखादा गुणवंत खेळाडू त्याचे संपूर्ण जीवन झोकून एखाद्या खेळासाठी देतो आणि जर त्याच्या ऐवजी कुण्या दुस-याची निवड होत असेल तर ती किती  वेदनादायी असते हे तो खेळाडूच जाणू शकतो. इतर कुणी त्याचे दु:ख समझू शकत नाही. पद्माकर शिवलकर सुद्धा असेच दु:खी झाले असतील. परंतू त्यांनी सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवला आणि खेळतच राहिले वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत. कुणाशीही तक्रार नाही की दु:ख उगाळत बसले नाही.
 
“कबीरा खडा बाजार्मे मांगे सबकी खैर
ना काहू संग दोस्ती ना काहू संग बैर”

या कबीराच्या उक्तीप्रमाणे शिवलकर राहिले. ते बरे आणि त्यांचे क्रिकेट बरे. कुणी कितीही अन्याय करो वा कुणावर कितीही अन्याय होवो नियती मात्र अन्याय होणा-यावर अन्याय होवू देत नाही. नियती त्या अन्याय होणा-या व्यक्तीची दखल घेतेच किंवा घ्यायला भाग पाडते.एखादा व्यक्ती किंवा संस्था कुणावर अन्याय करीत असेल तर त्या व्यक्तीला किंवा संस्थेला ते ज्ञातच असते आणि कधी ना कधी त्याचे मन, अरबीत फार चांगला शब्द आहे “जमीर” त्याला “तू अन्याय केला आहेस “ हे सांगतेच आणि मग त्याला स्वस्थ बसवत नाही.त्याप्रमाणेच घडले बी सी सी आय या संस्थेचा चा “जमीर” इतक्या वर्षानी जागृत झाला असेल असेच म्हणावे लागेल आणि म्हणून त्यांनी पूर्वी अन्याय झालेल्या पद्माकर शिवलकर यांना परवा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. क्रिकेट रसिकांच्या विस्मृतीत गेलेले नांव पद्माकर शिवलकर पुन्हा प्रकाश झोतात आले. माध्यमांनी त्यांना दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी सांगितली. “इतक्या उशीरा तुमची दखल घेतली गेली तुम्हाला काय सांगावेसे वाटते ?” असा प्रश्न विचारला असता या साध्या,देव आनंद सारख्या उत्साही आनंदी माणसाने सकारात्मक आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणा-या देव आनंदच्या गीताची ओळ गायली “जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया”.त्यांनी दिलेल्या अशा उत्तराने त्यांची प्रतिमा अधिकच उजळली.