काल विजय माल्या या भारतातून फरार कर्जबुडव्या
माणसाला लंडन येथे अटक झाली. ती बातमी भारतात येऊन धडकत नाही तोवर तिकडे ‘वेस्टमिनिस्टर’
कोर्टाने त्याला जमानत सुद्धा दिली होती.बरे झाले जमानत झाल्याचे लवकर कळले नाहीतर
नेहमी जल्लोष करणा-या आपल्या काही लोकांनी म्हणा अथवा बँकांनी म्हणा लगेच आनंद,
उत्साह आणि ढोल बजावणे सुरु केले असते. करोडो रुपयांचा चुना भारतातील बँकांना लाऊन
फरार झालेला हा आरोपी इंग्लंड मध्ये हजारो एकरात पसरलेल्या आलिशान बंगल्यात निवास करतो.
भारताच्या हातावर तुरी देऊन स्वत:च्या विमानाने फरार झालेला हा कर्जदार, हा थकबाकीदार
राज्यसभा सदस्य आता इंग्लंड मध्ये सुद्धा कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न
करीत आहे. तिथे निदान त्याला पकडण्यासाठी तरी गेले, पकडले आणि नंतर जमानत मिळाली येथे
तर पकडण्यासाठी तर जातच नाही आणि अटक पण करीत नाही. काल तर उत्तर प्रदेशात मैनपुरी
येथे पोलिस स्टेशन मध्ये हाणामारी झाली आणि पोलिस पळून गेले. हेच पळतात तर अटक कोण
करणार? भारतातातील जवळपास सर्वच शहरात करोडो कर्ज बुडवे लोक आहेत,काय होते त्यांचे?
त्यांनी घेतलेले करोडो रुपयांचे कर्ज आजही थकीत आहे. काय करतात बँका आणि प्रशासन?
का नाही कायद्यात सुधारणा करत? स्वातंत्र्य मिळवून झालीत ना ७० वर्षे. विरोधाभास असा
आहे की या बँका यांच्या कर्ज योजनांची वृत्तपत्रातून जाहिरात देतात त्या जाहीरांतींवर
लाखो रुपये खर्च करतात. पुढे एखादा सामान्य माणूस ती जाहिरात पाहून जर बँकेत कर्ज मागण्यासाठी
गेला तर संबंधीत अधिकारी असा वागतो की जसे त्याच्याकडे कुणी भिक मागायला आले आहे किंवा
तो बँक कर्मचारी त्याच्या स्वत:च्या खिशातून कर्ज देतो आहे.कर्ज मंजूर करतांना सुद्धा
हे कर्मचारी अतिशय हीन दर्जाची वागणूक कळत-नकळत त्या कर्जदारास देत असतात.
प्रमाणिक कर्जदाराचे दोन चार हफ्ते थकले तर त्याच्या मागे याच बँका फोन, पत्र याचा
ससेमिरा लावतात. यांना साधे हे सुद्धा ओळखू येत नाही की कोण कर्ज बुडवणारा आहे आणि
कोण कर्ज फेडणारा. प्रामाणिक कर्जदारांना हे सळो की पळो करून सोडतात आणि जे कर्ज बुडवतात
त्यांच्या पुढे नांग्या टाकतात. या बँकावाल्यांना म्हणावे की धमक असेल तर वसूल करून
दाखवा ते कर्ज जे तुमच्या कडून प्रसंगी तुम्हाला फसवून माल्यासारख्या अनेक गब्बर लोकांनी
घेतले आहे. करून दाखवा कारवाई त्या कर्जबुडव्या व्यक्तींवर परंतू तसे होत नाही याचे
कारण स्पष्ट आहे “पैसा पैस्याला ओढतो” माल्या सारख्या पैस्याने गब्बर व्यक्तीपुढे या
बँका,यांचे कर्मचारी झुकतात म्हणूनच असे होते.माल्याला “स्कॉटलंड यार्ड” निदान अटक
तरी करायला गेले. येथे तर काहीही होत नाही एखादा कुणी कर्ज बुडवत असेल तर आपल्या बँका
जमानतदाराच्या मागे लागतात. कर्जदार हात वर करतो, राजरोसपणे गावात फिरतो आणि बँका
जमानतदाराच्या मागे लागतात. हे सर्व कधी सुरळीत होणार? सरकार बँकांच्या कर्ज वितरण
आणि वसुली प्रणालीच्या नियमांमध्ये कधी बदल करणार? की हे असेच सुरु राहणार? यात नेत्यांची
काही भूमिका आहे का ? नेते लोकांची माणसे कर्जे घेऊन आपल्या नेत्याच्या पाठीमागे लपून
कर्ज बुडवण्यास धजावतात काय ? प्रमाणिक कर्जदारास त्याच्या प्रामाणिक कर्जफेडी बद्दल
काही सवलत, कर्जामध्ये काही सूट देता येवू शकत नाही काय ? हफ्ता चुकला तर तुम्ही व्याज
कसे जास्त लावता मग परतफेड केली तर काही बक्षीस काही सूट नको का द्यायला ? याने प्रमाणिक
कर्जदार परतफेडीस साठी अजून प्रेरित नाही का होणार ? परंतू या सर्व बाबींचा विचार करणार
कोण ? सरकार आणि विरोधी पक्ष ते कोणत्याही पक्षाचे असू देत ते नेहमी एकमेकांचे उणे-दुणे
काढण्यात मश्गुल असतात,विकास राहतो बाजूला. बँकाना अधिक सक्षम करणे, कर्ज नियम सूटसुटीत
करणे, प्रामाणिक कर्जदारास भिकारी न समजणे, कर्जबुडव्यांकरीता कठोर नियम बनवणे हे सर्व
आपल्या देशात कधी होणार? सर्व बँकाना जर त्यांच्या बुडीत कर्जाची माहिती विचारली तर
नक्कीच डोळे विस्फारायला लावणा-या बुडीत रक्कमेचा आकडा समोर येईल. या माल्या सारख्या
अनेक कर्जबुडव्यांना काहीच होत नाही न्हणून इतर कर्जदार सुद्धा कर्ज बुडवण्यास मागे पुढे पाहत नाही. त्यांना काहीही
होत नाही म्हणून म्हटले की इंग्लंडमध्ये निदान पोलीस पकडण्यास तरी गेले जमानत मिळाली
तो भाग वेगळा येथे तर ‘किंगफिशरने’ अटक करण्यास जाण्याची संधी सुद्धा पोलिसांना दिली
नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा