काय सूर्य एकमेव दोषी ?
दरवर्षी उन्हाळा सुरु झाला एप्रिल
महिन्यात तापमान वाढीस सुरुवात झाली की, मग माध्यमांमध्ये “सूर्य आग ओकतोय” ,
“सूर्य तळपतोय” “सूर्य कोपलाय” अशा शीर्षकाच्या बातम्या सुरु होतात. खरंच सूर्य आग
ओकतोय ? , खरंच सूर्य कोपलाय ? आजची जी तापमान वाढीची कारणे आहेत ती काय केवळ
सूर्यामुळे आहेत ? वरील आशयांच्या बातम्यांमुळे Global Warming अर्थात जागतिक तापमान वाढीस केवळ सूर्यच जबाबदार असल्याचे सूचित होते. आपला काही दोष नाही? जगाला प्रकाशमान करणा-या सूर्याच्या माथ्यावर तापमान
वाढीचे खापर आपण फ़ोडत आहोत. तसेही आपल्या अपयशाचे खापर दुस-याच्या माथी फ़ोडण्यात मानव जात वाकबगार आहेच.
ठीक आहे सूर्य आग ओकतो आहे, कोपला आहे परंतू तुमच्या लाखो करोडो “ए सी” चे काय ?
तुम्ही सर्वत्र केलेल्या डांबरी व सिमेन्ट रस्त्यांचे काय? तुम्ही चालविलेल्या
वृक्षांच्या सर्रास कत्तलीचे काय ? तुम्ही नष्ट करीत असलेल्या जल स्त्रोतांचे काय? चांगल्या-चांगल्या विहिरी लोकांनी अक्षरक्ष: कचरा कुंड्या करून टाकल्या, नळाचे
पाणी डांबरी रस्त्यावर शिंपडतात स्वत:च्या घरासमोरचा रस्ता तर खराब करतातच शिवाय
पाण्याचा विनाकारण अपव्यय करतात. कुणाला म्हणायची काही सोय नाही कारण उत्तर ठरलेले
“आमचा नळ
आहे आम्ही पाहू काय करायचे ,तुम्ही कोण शिकवणारे?” पाण्याचे, नैसर्गिक
जाल स्त्रोतांचे जतन न करणे, “ए.सी” , वाढलेली वाहन संख्या, सिमेंट रस्ते हे सर्व घटक
पारा ४० ते ५० पर्यंत वाढण्यास कारणीभूत आहेत केवळ सूर्य नव्हे. “ए सी” घरातील
उष्णता बाहेर फेकतो, असे कित्येक घरातून, कार्यालयातून, वाहनातून असंख्य “ए सी”
बाहेर उष्णता फेकत आहेत यानी नाही वाढत तापमान? रस्त्यांसाठी संपूर्ण भारतात करोडो
वृक्षांची कत्तल सुरु आहे त्या मानाने लागवड अत्यल्प आहे. हमरस्ते रुंद करताना मोठ-मोठाली
झाडे तोडली जातात आणि कन्हेरासारखी छोटी झाडे लावली जातात.महामार्गावरील सावलीच
आता गायब झाली आहे.“सर्विस लाईन” मध्ये सुद्धा सिमेंट रस्ते तयार करतात, काय गरज
आहे? सिमेंट रस्ते अनधिकृत बांधलेल्या सिमेंटच्या अधिकृत इमारती ज्या शासनच पुन्हा
अधिकृत करते या सिमेंट च्या चाललेल्या अनिर्बंध बांधकामांमुळे नाही वाढत का
तापमान? लाखो वाहने त्यांचे “ए सी” त्यांच्या धुरामुळे नाही वाढत का प्रदूषण व तापमान?
वाहनांच्या विक्रीवर, वापरावर काहीही बंधने नाहेत.ओझोन वायूच्या थराला भगदाड पडत
आहेत, आम्लवर्षा होत आहे. हे सर्व घटक भविष्यातील चित्र आताच “ट्रेलर” प्रमाणे
दाखवत आहे. परंतू आपण सुस्त आहोत तंत्रज्ञानाने परिपूर्ण परंतू निसर्गास हानिकारक
अशा उपकरणांसह भौतिक सुखात आणि आत्म सुखात मश्गुल आहोत जगाचे काही घेणे-देणे नाही.
पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जाबदारीच नव्हे तर कर्तव्य सुद्धा
आहे.तापमान वाढ जर रोखायची असेल तर या सर्व बाबी सुद्धा सरकारला आणि सरकारच्या पर्यावरण
खात्याला तसेच नागरीकांनी सुद्धा ध्यानात घेणे जरुरी आहे. केवळ ध्यानात घेऊन
चालणार नाही त्यासाठी शासनास कठोर उपाय योजना करणे व नागरीकांनी स्वयंशिस्त लावणे सुद्धा
क्रमप्राप्त आहे. निव्वळ सूर्य भगवानास दोष देवून काय फायदा ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा