Veteran Actor, Politician Vinod Khanna passed away yesterday article about him and his movies
“विनोदा”चे दु:ख
आता काही
दिवसांपूर्वी अत्यंत कृश झालेल्या देखण्या रुबाबदार विनोद खन्नाचे चित्र माध्यमांवर
झळकले, त्याच्या निधनाची खोटे वृत्त सुद्धा सर्वदूर पसरले होते आणि काल पुन्हा
त्याच्या निधनाची बातमी माध्यमांवर झळकली. दुर्दैवाने कालची बातमी मात्र खरी होती. विनोद
गेला दु:ख देऊन गेला. त्याला कधी राजेश खन्ना सारखी लोकप्रियता नाही मिळाली किंवा
अमिताभ सारखे “ग्लॅमर” नाही मिळाले परंतू कुठे ना कुठे तो त्याच्या चाहत्यांच्या
मनामध्ये एक स्वतंत्र जागा करून बसला होता. “मन का मीत” या त्याच्या प्रथम
चित्रपटापासूनच तो चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांच्या “मीत” बनला. सुरुवातीला खलनायकी
भूमिका करून नंतर नायक बनलेला विनोद खन्ना अभिनयात कुणापेक्षाही तसूभर सुद्धा कमी
नव्हता. पूर्वी जुने चित्रपट पुन:प्रसारित होत असत.असाच “मेरा गांव मेरा देश” हा
चित्रपट खामगांवच्या “श्याम टॉकीज” आताचे “सनी पॅलेस येथे झळकला होता” मी तो बघीतला
विनोद खन्नाने “जब्बार” डाकूची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. येथेच विनोद
खन्नाशी परिचय (पडद्यावरचा) झाला. तशी आमची पिढी म्हणजे अमिताभ,विनोद खन्ना यांचा
काळ ओसारतांनाची पिढी. परंतू त्यांचे चित्रपट आणि अभिनय पाहिलेली पिढी. विनोद
खन्ना आणि अमिताभ या जोडगोळीचे अनेक चित्रपट नंतर पाहण्यात आले. जमीर,खून पसीना,परवरीश,मुकद्दर
का सिकंदर,हेरा फेरी या सर्वात अमिताभ सोबत विनोदने सुद्धा भूमिका यथायोग्य
साकारल्या होत्या.यशाच्या शिखरावर असतांना विनोदच्या जीवनात कलाटणी आली आणि तो
आचार्य रजनीश अर्थात “ओशो” यांच्या कडे आकर्षिला गेला आणि त्यांनी काही वर्षे संन्यास
घेतला. पुनरागमना नंतर सुद्धा त्याने चांदनी, सूर्या,जुर्म,दयावान असे सरस चित्रपट
दिले. त्यानंतर राजकारणात सुद्धा ठसा उमटवला.“इम्तिहान” चित्रपटात गुंड
प्रवृतीच्या बेशिस्त विद्यार्थ्यांना सुधारण्याची इच्छा बाळगणा-या आदर्श प्राध्यापकाची
भूमिका विनोद खन्नाने छान वठवली होती.महाविद्यालय अध्यक्षाची मुलगी या प्राध्यापकावर
लैंगिक शोषणाचा आरोप लावते आणि मग या प्राध्यापकास कशी परीक्षा अर्थात “इम्तिहान”
द्यावी लागते
असे कथानक. यातील “रुक जाना नही तू कंही हार के” असे आशावादी गीत
विनोद खन्नावर चित्रित झाले होते.ज्यांना कुणाला निराशा वाटत असेल,जे निराशावादी
झाले असतील,“फ्रस्टेट” झाले असतील त्यांनी हे गीत एकदा जरूर ऐकावे. नक्कीच त्यांना
जगण्याची नवी उमेद मिळेल.विनोदला अनेक सुंदर गाणी सुद्धा मिळाली होती. “नैनोमे
दर्पण है, दर्पण मी कोई” , “प्यार जिंदगी है” , “चाहिये थोडा प्यार” , गुलजारच्या
मेरे अपने ज्यातून तो खलनायकी भूमिका सोडून नायक बनला होता त्यातील “कोई होता
जिसको अपना” आणि अलीकडील चांदनी मधील “लगी आज सावन की फिर वो झडी है” आणि जुर्म
मधील “जब कोई बात बिगड जाये”. अशी मधुर गीते त्याच्यावर चित्रित झाली आहेत.वडीलांशी
विद्रोह करून सिनेमा क्षेत्रात प्रवेश केला त्या नंतर संन्यास पुन्हा सिनेमा पुढे
राजकारण असा प्रवास विनोद खन्नाने केला. त्याचे काल निधन झाले. आपले सर्वांचे
राजकारण, चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटपटू या सर्वांशी कसे अनामिक नाते जुळले आहे. या
क्षेत्रातील लोक त्यांचे कार्य करीत असतात त्यांची शैली, त्यांच्या भूमिका त्यांचा
खेळ पाहून आपले त्यांच्याशी अनामिक असे नाते जुळते. त्यांना आपण ठावूक सुद्धा नसतो
, त्यांचे प्रताप,दोष सुद्धा आपणास ठाऊक असतात तरीही त्यांच्या जाण्याने समाजाला दु:ख
होते.विनोदच्या जाण्याने सुद्धा तसेच झाले. जरी तो “सुपरस्टार” नव्हता “लाईमलाईट”
मध्ये नव्हता परंतू रसिकांच्या मनात मात्र घर करून होता काल तो गेला आणि प्रथमच रसिकांना सुख देणारा, आपल्या
अभिनयाने काही वेळ का होईना त्यांना “रीलॅक्स” करून त्यांचे दु:ख विसरवणारा “विनोद” काल मात्र दु:ख देऊन
गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा