शिवज्ञान स्पर्धा
एक स्तुत्य उपक्रम
गेल्या वर्षांपासून विहिंप
व बजरंग दल खामगांव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनोख्या पद्धतीने साजरी
करणे सुरु केले आहे. मागील वर्षी 19 फेब्रुवारी या दिनी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी
शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर यंदा
शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन दोन गटात
करण्यात आले होते . मागील वर्षीपासून हजारोच्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत
सहभाग नोंद्वत आहेत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आराध्य दैवत
आहे. त्यांच्या बाबत सर्वांनाच माहिती असणे जरुरी आहे.
“काशीजीकी कला जाती ,
मथुरामे मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी”
असे वर्णन कवी ने केले आहे या एकाच ओळीवरून शिवाजी महाराज
त्यांचे कार्य , त्यांची जिद्द , त्यांची धडाडी हे सर्व कळून येते त्यामुळे अशा
स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे विद्यार्थी वाचन
करतात आणि त्यांना इतिहास ज्ञात होतो. निव्वळ रॅली, डीजे मिरवणुका काढण्यापेक्षा थोर
व्यक्तींची माहिती, त्यांचे विचार समाजात आणखी पसरविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन
हे निश्चितच जास्त सकारात्मक ठरेल , प्रेरणादायी ठरेल, त्यांचे विचार आत्मसात करण्यास
बळ देणारे ठरेल. शिवाजी महाराजांची स्मारके , पुतळे तर आहेतच आणि होणारही आहेत
परंतू शिवाजी आपल्या मनात आपल्या रक्तात आहे का ? लोकप्रतिनिधी शिवाजीचे नांव
धेतात परंतू शिवाजी प्रमाणे विचार खरेच ठेवतात काय ? नागरिक , युवक शिवाजीच्या
नावाने जल्लोष करतात परंतू शिवाजी राजांचे शंभर टक्के गुण तर कुणीच अंगी बाणवू शकत
नाही. निदान शिवाजीचा एक तरी गुण हल्लीचे शब्दापरत , वाक्यापरत शिव्या , अश्लील
शब्द उच्चारणारे तरुण अंगी बाणवण्याचा संकल्प करू शकतील काय ? अनेक तरुण आजही
चांगले कार्य करीत आहेत परंतू त्यांची संख्या अत्यल्प. आयोजकांनी पुढील वर्षी
महाविद्यालयीन तरुणांना सुद्धा या स्पर्धेत सहभागी करून घ्यावे व परीक्षेनंतर
महिला, मुली यांचेसमोर तसेच शाळा , महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द व
शिवीगाळ न करण्याची प्रतिज्ञा त्यांच्या कडून करून घ्यावी असे विनम्रपणे सांगावे
वाटते. हल्ली कुणीही जणू काही मोठा इतिहास संशोधक आहे या आविर्भावात काहीही बरळतो
आणि वाद उपस्थित करतो , राजकीय पोळी शेकण्यासाठी समाजात ,जातीत तेढ निर्माण करतो. या
पार्श्वभूमीवर विद्यार्थी वाचन करून अशा परीक्षांना सामोरे गेल्यावर त्यांना
निश्चितच खरा तो काय इतिहास कळण्याची मोठी शक्यता निर्माण होते आणि त्यामुळे भावी
पिढी निश्चितच स्वत:च्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करेल कुणाच्या सांगण्यावरून काही
दुष्कृत्य करणार नाही अशी आशा आहे. आयोजकांनी स्पर्धेचे आयोजन सुनियोजितरित्या
केले, विद्यार्थी उत्साहात होते , अनेक लोक स्वयंस्फूर्तीने शक्य तो हातभार लावत
होते. एकूणच सर्व वातावरण शिवभक्तीने भारावलेले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये
ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य करणारे श्री अमोलभाऊ अंधारे, श्री राजेंद्रदादा
राजपूत, श्री बापूसाहेब करंदीकर, श्री बापूसाहेब खराटे व त्यांना मदत करणारे सर्व
कार्यकर्ते तसेच विविध खाजगी शिकवणी वर्ग संचालक व शाळा शिक्षक हे निश्चितच अभिनंदनास
पात्र ठरतात. व समाजाने सुद्धा त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्त आहे कारण पुढील
कार्य करण्यास त्यांना उत्साह प्राप्त होतो व बळ निर्माण होते.