‘त्रिपुरा’सुर ऐसा कोपे
तारकासुराच्या तीन मुलांना
मिळून ‘त्रिपुरासुर’ असे नांव पडले होते. त्यांच्या कठोर तपस्येमुळे त्यांना तीन
किल्ले मिळाले होते जे ‘त्रिपुरा’ म्हणून ओळखले जात. पुढे या तिघांचा नायनाट
देवांनी केला. अशी कथा पुराणात आहे. (कथा सत्य आहे की असत्य आहे वा दंतकथा आहे तो
भाग सोडून देवू. कारण आजकाल अशा कथांची खिल्ली उडवली जाते. ‘केवळ त्रिपुरा’ या नामसाधर्म्यामुळे
या कथेचा दाखला दिला. हेच त्रिपुरा राज्य
नुकत्याच झालेल्या निवडणुका व त्यानंतर पडलेला लेनीनचा पुतळा यामुळे त्रिपुरासारखे
कोपले आहे. पुतळे हटवणे, त्यांची विटंबना करणे, पुतळे पाडणे अशा घटना भारतात
वारंवार घडत असतात. थोर व्यक्तींनी केलेल्या असाधारण कार्यामुळे पुढील पिढी
त्यांचे पुतळे उभारत असते. परंतू आता देशातील जनतेला विभाजित करून त्यांची मने
दुभंगावीत या एकमेव हेतूने पुतळ्यांचे राजकारण सुरु झाले. भारतात हे नसते उठाठेव
करण्याची सुरुवात कुठून झाली देव जाणे. महाराष्ट्रात मात्र दादोजी कोंडदेव यांचा
पुतळा लाल महालातून हटविला गेला आणि त्यानंतर राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडण्यात
आल्याची उदाहरणे ताजी आहेत. परवा रशियन क्रांतिकारक लेनीन याचा त्रिपुरातील पुतळा
पाडण्यात आला. एक जमाव बुलडोजर घेऊन आला आणि त्यांनी लेनिनचा पुतळा पाडला. लेनीन
याच्या विचारांचा प्रभाव जगावर पडला आहे. लेनीनचे पुतळे जगभरात विविध ठिकाणी आहेत.
लेनिनचे नांव विविध देशांमधील कित्येक
रस्ते व चौकांना सुद्धा दिलेली आहेत.पुतळे पाडून काय साध्य होते किंवा
करायचे असते हे सर्वसामान्यांना कळत नाही असे नाही. बरे या पुतळे पाडणा-यांना ना ‘डावे’
कळत असते ना ‘उजवे’ ना भांडवलशाही कळत असते , ना मार्क्सवाद. कळते ते फक्त वाद
उपस्थित करणे. लेनीन रशियाचा होता. मग त्याचा पुतळा आपल्या देशात का ? असेही
मुद्दे उपस्थित झाले. परंतू इंग्लंड अमेरिका येथेही आपल्या देशातील विचारवंतांचे,
थोर नेत्यांचे पुतळे नाहीत का ? असे होऊ नये परंतू जर तिकडे त्यांच्या पुतळ्यांना
पाडले किंवा विटंबना झाली तर तुम्ही काय करणार ? तुम्हाला लेनिनची विचारधारा मान्य
नसेल तर त्याचा राग पुतळ्यावर का ? लेनीनचा पुतळा पाडला त्याचे पडसाद उमटायला
सुरुवात झाली पेरीयार स्वामी व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांना काळे
फासण्यात आले. दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी साजरी केली तर दोन तासात त्यांची
प्रतिमा हटवली गेली. विचारांचा विरोध विचाराने का करता येत नाही ? कारण तेवढी
अभ्यासू ,ज्ञानपिपासू वृत्ती नाही शिवाय राजकारण आहेच. भारतात पुतळे आणि प्रतिमा
यांचे प्रस्त फार वाढत चालले आहे. चौका-चौकात प्रतिमा, पुतळे लावले जातात.
त्यासाठी रीतसर परवानगी घेतली आते की नाही ते सुद्धा पाहणे आवश्यक आहे. मग विरोधी
विचारांच्या समाजकंटकांच्या डोळ्यात खुपते , पोटात दुखते आणी नको ते घडते. त्रिपुरातील
लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशातील वातावरण ढवळून गेले. नीरव मोदिचा घोटाळा 11
हजार कोटी वरुन 29 हजार कोटीवर पोहोचला
याकडे कुणाचे लक्षही गेले नाही. देशातील मुख्य मुद्दे दूर सारले जाऊन संसदेच्या ,
विधानसभेच्या सभागृहात विकासात्मक बाबींच्या चर्चा सोडून पुतळा पुतळे उभारणे ते कुणीतरी
पाडणे, त्यांची कुणीतरी विटंबना करणे या बाबत वेळ घालविणा-या चर्चांची गु-हाळ
घातली जातात, जनतेचा व देशाचा वेळ नाहक खर्ची घातला जातो. महापुरुषांची स्मारके,पुतळे
ही निश्चितच प्रेरणादायी असतात परंतू आता सरकारने त्यांची सुरक्षा करणे व त्यांना
क्षती पोहचविणा-यांवर कठोर कारवाई करणे सुरु केले पाहिजे,प्रसंगी नवीन कायदा
त्याबत तयार करणे अपेक्षित आहे म्हणजे आज ‘त्रिपुरा’सुराप्रमाणे देश पुतळा
प्रकरणावरून जसा कोपला आहे तसे होणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा