Click "Follow" Button below To Follow this Blog

२२/०३/२०१८

Article about God Ram and His temple issue in Ayodhya


रामाचा वनवास लवकरच संपावा      
     येत्या रविवारी म्हणजे 25  मार्च 2018 रोजी रामनवमी आहे. हजारो वर्षांपासून भारतीयांच्या हृदयात प्रथम स्थान मिळवलेला, त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पुरुषांमधील उत्तम, मर्यादाशील असा राम भारतीयांच्या मनातच नव्हे तर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी वसत आहे असे भारतीय मानतात. म्हणूनच त्याला “हे रोम रोममे बसनेवाले राम जगात के स्वामी” असे म्हणतात. या रामावरील प्रेमापोटी शबरीने त्याला एक एक बोर गोड आहे की नाही हे चाखून पाहिले, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी लहानगा नारायण बोहल्यावरून पळून गेला आणि त्रयोदशाक्षरी मंत्र उच्चारीत समर्थ रामदास बनला. पत्नीच्या प्रेमात बुडालेला तुलसी तिच्यासाठी मोठ्या अजगराचा आधार घेऊन वरच्या मजल्यावर चढला. हे पाहून पत्नी म्हणाली “इतना प्रेम यादी रामसे करते तो राम प्रसन्न हो जाते” हे ऐकल्यावर तो रामावरील निस्सीम प्रेमापोटी “श्रीरामचरितमानस” रचयिता झाला. “अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम, दास मलूका कह गये सबके दाता  राम” असे लिहून रामच सर्वांचे दाता आहेत सांगणारे दास मलूका. परंतू काहीही काम केले नाही तरी चालते , राम सर्वाना देतो असा या दोह्याचा उलट अर्थ मात्र कुणी घेऊ नये. “कस्तुरी कुंडल मे बसे , मृग
ढुंढे वनमाही , ज्यो घट घटमे राम है , दुनिया देखे नाही | “असे म्हणूनराम सर्वत्र आहे असे सांगणारा संत कबीर. अशा कितीतरी संतानी, कवींनी राम महात्म्य सांगितले आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा आपले स्वराज्य रामराज्य असावे असे वाटे. अनेकांनी राम महात्म्य मानले आहे कारण राम व त्याचे चरित्रही तसेच आहे, सर्वाना आकर्षित करणारे. “रघुकुल रित सदा चली आई प्राण जाये पर वचन न जाये” या इक्ष्वाकू कुळाच्या रीतीनुसार पित्याने दिलेले वचन पाळण्यासाठी वनवासात जाणारा राम. कनिष्ट बंधूला राज्य देण्यास यत्किंचितही मागे पुढे न पाहणारा राम, रावण ज्ञानी होता हे लक्ष्मणास सांगून शत्रूच्या सुद्धा गुणांची वाखाणणी करणारा राम , “रामने हसकर सब सुख त्यागे ...” अशा सर्व सुखांचा त्याग करणारा राम म्हणूनच सर्वप्रिय आहे. वडीलानी दिलेले वचन पूर्ण करून अयोध्येत परत आलेल्या अशा रामाला 14 वर्ष नंतर त्याचे राज्य मिळाले मात्र कित्येक वर्षांपासून त्याला अजूनही त्याच्या हक्काचे मंदीर मात्र प्राप्त झाले नाही. त्याचे मंदीर अगदीच नव्हते असे नाही ते होते पुढे अनेक वर्षानी मूर्तीभंजक परकीय या देशात आले. येथील पुरातन वास्तू, शिल्पे, मंदिरे नष्ट करून स्वत:ची प्रार्थना मंदिरे उभे करू लागले. अयोध्या सुद्धा त्याला अपवाद नव्हती. रामाचे मंदीर जाऊन विवादास्पद अशी एक वास्तू तेथे उभारल्या गेली आणि रामाला पुनश्च वनवासात जावे लागले ते आजपावेतो. रामाला पुनश्च त्याच्या जन्मस्थानी आणण्यासाठी मध्यंतरी बरीच आंदोलने, यात्रा झाल्या परंतू अद्याप रामाला काही अयोध्येत सन्मानाने आणता आले नाही. देशासाठी विशेष योगदान     नसणा-या, आदर्श म्हणून काहीही मागे न ठेवणा-या नट- नट्यांची मंदिरे या देशात त्वरीत उभी राहतात. नट- नट्यांच्या या मंदिरांना त्वरीत जागा कशी मिळते? यासाठी नियमांची पूर्तता होते की नाही? हे कुणी पाहते की नाही ? रामाच्या मंदिरास रामाच्याच देशात इतका विलंब होत असेल तर ते या देशातील सर्वांनाच लज्जास्पद नव्हे का ? इंडोनेशिया व इतर काही देशात आजही राम मानल्या जातो, रामलीला सारखे सण साजरे होतात. आपल्या देशात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. राम मंदिराबाबत विचार मंथन , राजनैतिक, न्यायिक उहापोह वर्षानुवर्षे सुरु आहे. युक्तीवाद होत आहे. हे किती काळ सुरु राहणार ? सामान्य राम भक्तांना मात्र रामाचा वनवास संपून त्याचे मंदीर उभे राहण्याची चातकासारखी प्रतीक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा