श्रीदेवीचा
मृत्यू , चिरतरुण दिसण्याची लालसा आणि मिडीया
पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून
ओळखल्या जाणारी श्रीदेवी हिचा 24 फेब्रुवारी रोजी दुबई येथे बाथटब मध्ये बुडून अपघाती
मृत्यू झाला. वयाच्या 54 व्या वर्षी काळाने तिच्यावर घाला घातल्यामुळे सर्वांनाच
हळहळ वाटली. श्रीदेवीचा मृत्यू चटका लावून जाण्याचे कारणही तसेच होते. वयाची 50
वर्षे तिने सिने क्षेत्रात घालवली होती आणि 80 चे दशक ते अगदी आता आताच्या ‘इंग्लिश
विंग्लिश’ व ‘मॉम’ पर्यंत आपल्या अभिनयाने, खट्याळ हास्याने, नृत्य शैलीने
रसिकांच्या मनावर एकछत्री अंमल केला. तिच्या मृत्यूची बातमी आल्यावर नाना
प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातील एक मुख्य मुद्दा म्हणजे श्रीदेवीने सुंदर दिसावे म्हणून
अनेक शस्त्रक्रिया केल्याची चर्चा. त्यासाठी तिला अनेक उपचार व औषधे घ्यावी लागत
असत व त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला. अशा चर्चा माध्यमांवर रंगवून ‘ग्राफिक्स’
च्या माध्यमातून दाखवल्या गेल्या.
चिरतरुण दिसण्याची लालसा
कुणाला नसते? सर्वांनाच तसे वाटत असते, आवडत असते. त्यातल्या त्यात स्त्रीयांना
अधिक. म्हणून ‘सेलिब्रेटी’ महिला स्वत:च्या शरीरास नाना प्रकारच्या यातना देत
असतात किंवा त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना तसे करावेच लागते. नेहमी चिरतरुण
दिसण्याची लालसा हा प्रकार अनादी काळा पासून सुरु असल्याच्या कथा, दंतकथा आपण ऐकतच
आलो आहोत. गोकुळातून दुध, दही, तूप हे पदार्थ मथुरेत मोठ्या प्रमाणात जात असत कारण कंसाच्या राणीवशातील
स्त्रीयांना म्हणे कुणी चिरतरुण राहण्यासाठी या दुग्धजन्य पदार्थांचे लेपन
करण्याचे सांगितले होते. श्रीदेवीने तिच्या नाकावर प्लॅस्टिक सर्जरी केली होती आणि
सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा अनेक उपचार केले होते. सेलिब्रेटींची त-हाच निराळी
असते. मनाचे सौंदर्य, वय झाले तरी मनाने तरुण राहणे याप्रमाणे त्यांना आचरण करताच
येत नाही का? रजनीकांत किंवा अक्षयकुमार सारखे मोजकेच आपली पांढरी दाढी आणि टक्कल
घेऊन कॅमेरा आणि मिडीया समोर मोकळेपणाने वावरतात तर देव आनंद आपली छबी रसिकांसमोर
चिरतरुणच राहावी म्हणून आपली अंतिम क्रिया विदेशात करण्याची अंतिम इच्छा ठेवतो. राजश्री
ही नटी आता कशी दिसते हे तिच्या आप्त परिवारा व्यतिरिक्त कुणालाही माहीत नाही.
यानंतर मुद्दा येतो तो
आपल्या मिडीयाचा. श्रीदेवीचा मृत्यू बाबत माध्यमांनी मोठा उहापोह केला.सोशल मिडीयावर तर लगेच श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्यांचे बिडंबन सुरु झाले.माध्यमांनी
श्रीदेवी मृत्यूच्या बातमीला अवास्तव प्रसिद्धी दिली, अति विस्तृत असे ‘कव्हरेज’
दिले असेही मत अनेकांनी व्यक्त केले. टी.आर.पी. च्या नादातून हे सर्व होत असते. गेल्या
तीन दिवसांत देशात कुठे काय घडले? राहुल गांधी कर्नाटकात काय करीत होते ? नरेंद्र
मोदी देशात होते की बाहेर होते ? एका शेतक-याने त्याच्या मुलासह आत्महत्या केली. एका
जवानाचा अपघाती मृत्यू झाल्यावर पाच दिवसाच्या बाळाला सोबत घेऊन सैन्यात नोकरी
करणारी महिला अधिकारी पतीच्या अकाली निधनाला कशी सामोरी गेली अशा सर्व बातम्या बंद
होत्या. श्रीदेवी निश्चितच गुणी अभिनेत्री होती, सुंदर होती, तिच्या निधनाने आपणा
सर्वांनाच दु:ख झाले. मान्य आहे की ती अभिनय सम्राज्ञी होती परंतू अभिनया
व्यतिरीक्त तिने देशासाठी काय योगदान दिले आहे, समाजातील गरजूंना कधी मदतीचा हात
पुढे केला आहे का? आयकराचा भरणा नियमितपणे केला आहे की नाही? हे सर्व तिने केले असल्यास
त्या सर्व बाबी सुद्धा माध्यमांनी जनतेसमोर आणायला नको का? माध्यमांनी तिच्या
मृत्यूचे केलेल्या वर्णनासोबतच जर का तिने जर काही देशहिताचे तसेच समाजोपयोगी
कार्य केले असेल ते शोधून जनतेला सांगितले असते तर ते अधिक प्रेरणादायी व जनमानसात
श्रीदेवीचा आदर वाढवणारे झाले असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा