कर्णतृप्ती करणारे व्याख्यान
स्थानिक टिळक स्मारक मंदिर खामगांव येथील व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर दोन दिवसांचे व्याख्यान झाले. प्रथम दिवशीचे व्याख्यान चुकले. परंतू दुस-या दिवशी प्रा. सुमंत टेकाडे हे व्याख्याते आहे म्हणून कळले प्रा. टेकाडे यांचे दर
रविवारी तरुण भारत दैनिकाच्या पुरवणीत शिवाजी महाराज या विषयावर सदर सुरु आहे. वाचक या सदराची आवर्जून वाट पाहत असतात. हे सदर वाचत असल्याने दुस-या दिवशी
व्याख्यानास जाण्याचा निश्चय केला. व्याख्यानात प्रा. टेकाडे यांनी ओघवत्या शैलीत
श्रोत्यांना अडीच ते तीन तास खिळवून ठेवले. शिवाजी महाराज, त्यांचे बालपण , युद्ध
शैली , अफझल खानाचा निप्पात, शिवाजी महाराज कोणत्याच एक जातीच्या विरोधात नव्हते तर
दुर्जन मग तो कोणत्या का जाती,धर्माचा असो त्याचा मुलाहिजा शिवाजी महाराजांनी
ठेवला नाही हे त्यांनी हे दाखले देऊन सांगितले. आपल्या स्वत:च्या मुलाचे श्राद्ध
त्याच्या जीवंतपणी कोण करू शकतो ? परंतू शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी संभाजी
राजांचे श्राद्ध घातले तेंव्हा त्यांच्या मनाची काय घालमेल झाली असेल. या संबधी
ऐकतांना रसिक श्रोत्यांच्या
भावना दाटून आल्या. औरंगजेबाच्या दरबारात झालेल्या
अपमानामुळे मोगल दरबाराची तहजीब झुगारून फोडलेली डरकाळी. आग्र्याहून बिना युद्धाने
सर्वांना सुटका करून आणणे हे सर्व नियोजना मुळे होते . नियोजन,व्यवस्थापन यात त्या
काळातही शिवाजी महाराज पुढारलेले होते.खांदेरी- उंदेरी किल्ल्याहून महाराजांच्या
आरमाराने इंग्रजांना कसे पिटाळले, त्यानंतर इंग्रजांनी केलेला पत्रव्यवहार व त्यावरुन
शिवाजी महाराज कसे लढवय्ये होते हे लक्षात येते. आपले बंधू व्यंकोजी यांना महाराजांनी
म्लेंच्छां पासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. मोगली शब्द व्यवहारात वापरले जात असल्याचे पाहून शिवाजी महाराजांनी पत्रव्यवहार मराठी भाषेतून कसा
सुरु केला. संस्कृतप्रचुर मराठी शब्द मराठी भाषेस दिले. या कार्यासाठी त्यांनी हणमंते नामक तज्ञाची नेमणूक केली होती.परंतू इंग्रजांनी रायगडावर जाळपोळ केल्याने अनेक महत्वाच्या
पत्रव्यवहारा समवेत तो मराठी शब्दकोश सुद्धा जळाला. अनेक विषयांचे दाखले देत असतांना
प्रा टेकाडे यांनी पोर्तुगीज किती निष्ठूर होते,पोर्तुगीजांनी भारतीयांना दिलेला
त्रास, शिक्षा, यातना याबाबत सांगितले तेंव्हा अनेकांचे डोळे पाणावले. या
व्याख्यानात त्यांनी सद्यस्थिती,मुलांवरचे संस्कार,संस्थामध्ये व इतर ठिकाणच्या कर्मचा-यांची
कर्तव्यनिष्ठा त्यांची कार्यशैली याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. संपूर्ण व्याख्यान
हे पुराव्यांवर आधारीत असे होते , कुठल्याही दंतकथा यात नव्हत्या. असे श्रवणीय व्याख्यान
ऐकतांना श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले होते. तीन तास केंव्हा सरले हे श्रोत्यांच्या
ध्यानात सुद्धा आले नाही. व्याख्यानोत्तर अनेकांनी श्री टेकाडे यांचे अभिनंदन केले.
टिळक स्मारक महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला याबाबत श्री टेकाडे यांनी त्यांचे
कौतुक केले. महिलांनी स्थापित व महिला संचालित असलेल्या टिळक स्मारक मंडळाची शतकोत्तर
वाटचाल खरोखर प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. या स्मरणीय व्याख्यान आयोजनासाठी टिळक
स्मारक महिला मंडळाचे तसेच व्याख्याते प्रा सुमंत टेकाडे या दोहोंचेही खामगांवकर रसिक
कृतज्ञ राहतील.