पानिपत...मराठ्यांच्या
पराक्रमाची कथा
परवा आशुतोष गोवारीकरचा
पानिपत चित्रपट प्रदर्शित झाला. लोक आता चित्रपट पाहतीलच परंतू त्यांनी पानिपत
कादंबरी वाचली तर पानिपत कळण्यासाठी ते अधिक संयुक्तिक ठरेल असे वाटते. 14 जाने 1761 रोजी 258
वर्षांपूर्वी झालेले मराठा आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धामुळे मराठा पराक्रमाची ख्याती जगभर पसरली.“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा” हे सिद्ध
झाले.मराठा साम्राज्य दक्षिणोत्तर पसरले होते.अटक पर्यंत भगवा फडकत होता. पानिपतच्या या युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात अठरा पगड जाती-जमातीतील
जनता, त्यांना भारताच्या विविध भागातून येऊन मिळालेले सैन्य व त्यांनी गाजवलेल्या
पराक्रमाने विश्वास पाटील या सनदी अधिका-यास झपाटून टाकले व पानिपत या विषयावर त्यांनी 80 च्या
दशकात “पानिपत” ही कादंबरी लिहिली. कादंबरीला मोठा प्रतिसाद मिळाला.याच कथेवर आता
आशुतोष गोवारीकरने “पानिपत“ हा चित्रपट काढला.पानिपत चित्रपट का पहावा? तर या
चित्रपटामुळे पेशव्यांची शाहू महाराज आणि स्वराज्याप्रतीची निष्ठा कळेल. चिमाजी
आप्पा पुत्र सदाशिवराव भाऊ पेशवे म्हणजे महापराक्रमी पहिले बाजीराव पेशवे यांचे
पुतणे कसे पराक्रमी योद्धे होते, सत्ता किंवा पदाची त्यांना मोह
नव्हता हे समजेल.हे युद्ध म्हणजे मराठ्यांच्या पराभवाचे
युद्ध म्हणून शिकवले गेले.परंतू या युद्धात मराठ्यांनी छातीचा
कोट करून,
उपाशी पोटी दुर्राणी सैन्याशी कशी टक्कर दिली आणि लढाईत,
इतिहासात अजरामर करणारा पराक्रम गाजवला हे ज्ञात होईल. अब्दालीस पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचे धैर्य झाले नाही कारण मराठे जरी पराभूत झाले असले तरी अब्दालीला सुद्धा हा विजय फार महागात पडला होता. पेशव्यांना शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले स्वराज्य अटकेपर्यंत विस्तृत करायचे होते असे लक्षात येईल. इब्राहीम गारदी या
निझामाच्या तोफखाना प्रमुखावर सदाशिवराव भाउंनी ठेवलेला विश्वास व त्याने गाजवलेला
पराक्रम, राजा अराजक, नबाब सुजाउद्दौला, सुरजमल जाट यांनी सोडलेली
सदाशिवरावांची साथ, तरीही न डगमगणारे भाऊ,विश्वासराव व भाऊ यांचे काका-पुतण्याचे
जिवापाड प्रेम, त्याकाळात आपल्या पत्नी पार्वतीबाई यांना सती न जाण्याचे सांगणारे
सुधारक भाऊ,प्राणपणाने लढणारे जनकोजी शिंदे,बाजीवर-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर हे
सर्व कळण्यासाठी सर्वानी कुटुंबासहित पहावा असा हा चित्रपट आहे.दत्ताजी शिंदे
यांची "बचेंगे तो और भी लडेंगे" ही कथा मात्र अगदीच संक्षिप्तात आटोपली आहे.या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, झिनत
अमान, रवींद्र महाजनी हे जुने कलावंतही दिसतात. मल्हारराव
म्हणून रविंद्र महाजनींची निवड योग्य झाली आहे.
पानिपतच्या या लढाईमुळे काही म्हणी सुद्धा रूढ झाल्या जसे “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा”, विश्वास ठेवण्या बाबत विषय निघाला तर “विश्वास तर पानिपतातच गेला.” (विश्वासराव पानिपत युद्धात कामी आले होते, हुतात्मा झाले होते). खूप मोठे नुकसान झाले तर "पानिपत
झाले." खूप मोठा पराक्रम केला तर "अटकेपार झेंडे लावले." या म्हणी आजही महाराष्ट्रात प्रचलीत आहेत.
हरियाणातील भाऊपूर या गावाचे नांव भाऊंच्या वास्तव्यामुळे पडले आहे अशी कथा आहे.
प्रा. शेषराव मोरे म्हणतात “जर या युद्धात संपूर्ण पराभव झाला असता तर अहमदशहा अब्दाली हा भारताचा
शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती भारतात रुजली असती मात्र या युद्धामुळेच भारतात लोकशाही
अबाधीत राहिली”
हल्लीच्या ऐतिहासिक
चित्रपटात "सिनेमॅटीक लिबर्टी" च्या नावाखाली कथेत अवास्तव बदल केले जातात. संजय लीला भंसालीने पद्मावत , बाजीराव मस्तानी या चित्रपटात आक्षेपार्ह असे प्रसंग , गाणी
चित्रित केली होती.परंतू आशुतोष गोवारीकरने मात्र "सिनेमॅटीक
लिबर्टी" चा
अतिरेक टाळला. नाच-गाणी आहेतच परंतू ती तितकी आक्षेपार्ह वाटत नाही.तरीही चित्रपटात
पार्वतीबाई या डोक्यावर पदर घेतलेल्या, किंवा पूर्णवेळ अंबाडा घातलेल्या दिसल्या
नाही. ऐतिहासिक सिनेमात मुख्य
पात्रांना नाच-गाणी करतांना दाखवण्याऐवजी नाच- गाणी 'एक्स्ट्रा' कलावंतांवर चित्रित करायची.या सिनेमाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या
हिंदवी स्वराजाच्या विस्तारीकरणासाठी पेशव्यांनी गाजवलेला पराक्रम भारतीयांच्या
समोर आला. आपला इतिहास आपण विसरत चाललो आहोत. नवीन पिढीला कित्येक ऐतिहासिक
गोष्टी ज्ञात नाहीत. इतिहास
हा वर्तमान काळात निर्णय घेण्यास सहाय्यक ठरत असतो. भारतीयांनी , लोकप्रतिनिधींनी इतिहासाचे ज्ञान ठेवावे म्हणजे वर्तमानात योग्य निर्णय घेण्यास इतिहास सहाय्यक ठरतो.इतिहासात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती
टळते. संक्रांतीला झालेल्या या युद्धात पेशव्यांच्या नेतृत्वात सर्व जाती
जमातीचे लोक सामील झाले होते
त्यामुळे हा दिवस जाती भेद
विसरून आपण महाराष्ट्रात "एकता दिवस" म्हणून पाळायला हवा हीच खरी
पानिपतात कामी आलेल्या मराठ्यांना श्रद्धांजली ठरेल तसेच आपल्या पूर्वजांची
गौरवगाथा, पराक्रम, त्याग, निष्ठा कळण्याठी पानिपत चित्रपट सहकुटुंब पाहावा तसेच पानिपत कादंबरी सुद्धा वाचावी. आपण एरवी सलमान खानच्या बाष्कळ कॉमेडी चित्रपटांना उत्स्फूर्त
प्रतिसाद देतो. तसाच प्रतिसाद मराठ्यांचा
भीम पराक्रम दाखवणा-या पानिपत चित्रपटाला सुद्धा द्यायला हवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा