Click "Follow" Button below To Follow this Blog

२४/१२/२०१९

Article on the occasion National Consumer Day 24 Dec 2019


ग्राहक हक्काप्रती प्रशासनाची उदासीनता    

              आधुनिकीकरण , खुली 
अर्थव्यवस्था यामुळे व्यापाराची पद्धत पार बदल झाला आहे. संपूर्ण जग  एक मोठी बाजारपेठ बनली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात मांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.  एका क्लिकसरशी ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू घरपोच मिळू लागल्या आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक राजा बनला आहे. परंतू याच राजाची अनेकदा फसवणूक सुद्धा होतांना दिसते. या ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे. शिवाय ग्राहकाने सुद्धा जागरूक असणे व त्याला त्याच्या हक्कांची पुर्णपणे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो.शासनाच्या वतीने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका स्तरावर व तहसील कार्यालयात पुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिन साजरे केले जात असतात.तसे शासनाचे निर्देश आहेत. ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांच्या लढ्यातून लोकांच्या आग्रहाने ग्राहक हक्क कायदा 24 डिसे 1986 रोजी पारीत झाला होता म्हणून 24 डिसे हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत जाणून घेता येईल. ग्राहकहिताचे रक्षण करण्याकरिता विविध पातळ्यांवर कार्य केले जात आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच हा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या या मंचाच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य होत आहे. महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली. सुरूवातीला ग्राहक हक्क संरक्षण चळवळ क्षेत्रात खाजगी व स्वंयसेवी संस्थां ह्या प्रयत्न करीत होत्या. त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून ग्राहक चळवळीचा विस्तार देशभरात झाला. तद्नंतर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाला. सध्या ग्राहक मंच हा ग्राहकांना दाद मागण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे.पुढे देशात लोकाग्रहास्तव ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार,उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार,निवडीचा अधिकार,तक्रार निवारणाचा अधिकारआणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला.या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. यासाठी विविध पातळीवर ग्राहक मंचाची स्थापना करण्यात आली आहे.जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहक हक्काचे संरक्षण केले जात आहे. तिथे ग्राहकांचे समाधान झाले नाही तर राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो. ग्राहक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम 2004 नुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे.ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात.ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था असली तरच ग्राहक हा राजा’ होऊ शकेल. प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसे व जागतिक ग्राहक दिन 15 मार्च असे दिवस साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतू गेल्या काही वर्षात तहसील कार्यालय व पुरवठा विभाग यांचे ग्राहक दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. प्रशासन ग्राहक हक्क जागृती , ग्राहक दिन साजरा करणे याप्रती अतिशय उदासीन झाले आहे. ग्राहकांना  आमंत्रित न करणे , जागृतीचे कार्यक्रम न राबवणे  असे होत आहे . तेंव्हा प्रशासनाने ग्रह हिताच्या दृष्टीकोनातून ग्राहक हिताच्या हेतून हे दिन उत्साहाने साजरे करावे व ग्राहक चळवळीस पाठबळ द्यावे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा