गुणवत्तेत सुधार तरीही बरेच “बाकी”
"असर” या संस्थेमार्फत
दरवर्षी शैक्षणिक स्थितीचा अहवाल सादर केला जातो. असरच्या अहवालाचे यंदाचे हे 13
वे वर्ष आहे. या वर्षी यंदा ग्रामीण भागातील 990 गावांत शाळा व विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा
हा गेल्या चार वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत उल्लेखनीय असल्याचा निष्कर्ष समोर आला
आहे. तसेच खाजगी शाळांच्या तुलनेत जि. प शाळांची शैक्षणिक स्थिती अधिक चांगली असल्याचे समोर आले आहे.
मागील चार वर्षात अनेक जि. प शाळांनी खरोखर उल्लेखनीय कार्य केले आहे. शाळांचा दर्जा
सुधारला आहे. स्वामी विवेकानंदांनी पूर्वीच सांगितलेला ज्ञानरचना वाद पाश्चात्यांकडून
परत आपल्याकडेच आल्यावर त्याची अंमल बजावणीही अनेक शाळांत केली गेली.शिक्षणात नवीन
तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला आहे हे सर्वश्रूत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे व असरच्या
उषा राणे या दोघांनीही शासकीय शाळांतील गुणवत्तेत वाढ झाली असल्याचे म्हटले आहे.
ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. परंतू वाढलेल्या या शैक्षणिक दर्जासोबतच असरच्या अहवालात
आणीखीही बरेच काही आहे व ते धक्कादायक सुद्धा आहे. असरच्या या अहवालात 60 टक्के विद्यार्थ्यांना
भागाकर येत नसल्याचे समोर आले आहे. वर्ग आठवीच्या मुलांना तीन अंकी संख्येला एक अंकी
संख्येने भागता येत नाही. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. तसेच खाजगी शाळांच्या
तुलनेत जि.प. शाळांतील मुलांना भागाकर येण्याचे प्रमाण हे जास्त आहे. बेरीज, वजाबाकी येण्याची आकडेवारी सुद्धा निराशाजनकच आहे. एककेकाळी अत्यंत प्रगत शैक्षणिक
परीस्थिती असलेल्या महाराष्ट्रात असरच्या अहवालानुसार शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याचे
संगितले गेले तरी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गांतील मुलांना भागाकार,वजाबाकी येत नसल्याचे चित्र धक्कादायक आहे.ज्या देशात पूर्वी शिक्षणासाठी म्हणून
विदेशातून विद्यार्थी येत, ज्या देशात अनेक नामांकीत विद्यापीठे
होती. ज्या देशात प्रख्यात गणितज्ञ होऊन गेले त्या देशात ते शिक्षण पूर्वीसारखेच राहायला
हवे व विद्यार्थ्यांना सुद्धा छोटी-छोटी गणिते सहज सोडविता यावीत. त्यासाठी सर्वांनी
सतत प्रयत्नशील राहायला हवे. शिक्षण क्षेत्रात याबाबत नक्कीच विचार व्हावा. खाजगी व
शासकीय शाळांनी असरच्या अहवालाचे वाचन करून आपल्या शाळांत सुद्धा साध्या, छोट्या-छोट्या गणिती प्रक्रिया,उदाहरणे यांच्या चाचण्या घ्याव्या. आजच्या पिढीला जसे त्यांचे तळमळीने शिकवणारे शिक्षक आठवतात तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना
सुद्धा त्यांचे शिक्षक आठवावेत असे वाटते. आज जरी एकूण शैक्षणिक गुणवत्तेत सुधार झाला असला तरीही विद्यार्थ्यांना न येणा-या भागाकारांची
अद्यापही “बाकी” उरलीच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा