Click "Follow" Button below To Follow this Blog

२५/०१/२०१९

Article on completion of 287 years to opening ceremony of Shaniwar Wada, a historical fortification in the city of Pune in Maharashtra, India.

287 वर्षाचा मराठा पराक्रमाचा साक्षीदार
        22 जानेवारीला रेडीओवर मराठ्यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या वास्तूच्या उद्घाटनास 287 वर्षे झाली असे ऐकले. ध्वनी वर्धनासाठी आपसूकच बोट रेडीओच्या ध्वनी वाढवणा-या कळेकडे गेले. निवेदकाने पुढे सांगितले की शनिवारवाडयाचे उद्घाटन शनिवार  दि 22 जानेवारी 1732 रोजी झाले होते. त्यापूर्वी पायाभरणीचा समारंभ सुद्धा  शनिवार दि 10 जानेवारी 1730 रोजी झाला होता. शनिवार या मराठी दिवसाच्या नावावरूनच शनिवारवाडा हे नांव रुढ झाले. दिनविशेष संपले. परंतू मनात शाहू महाराज, त्यांचे सेनापती पेशवे, पहिल्या बाजीरावांनी गाजवलेला पराक्रम, समोरासमोर केलेल्या लढाया, विस्तृत केलेले मराठा साम्राज्य त्यांनीच बांधलेला शनिवारवाडा, राघोबादादा व त्यांनी गाजवलेला पराक्रम, “अटकेपार” लावलेला मराठ्यांचा झेंडा , माधवराव , थेऊर गणपती. सारे आठवू लागले. इतक्या वर्षात या शनिवारवाड्याने काय-काय नाही पाहिले. असे म्हटले जाते की कसबा पेठेत मुळा-मुठा नदीच्या तीरावरील  सात मजली शनीवारवाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरून 17 किमी अंतरावरचे आळंदीचे ज्ञानेश्वर मंदिर दिसत असे.आता केवळ परकोटाच्या भिंती व मुख्य दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा शिल्लक असलेल्या कितीतरी घटनांचा साक्षीदार हा शनिवारवाडा आहे. पहिल्या बाजीरावाचा पराक्रम याने पाहिला ,चिमाजी आप्पाचा पराक्रम व बंधुप्रेम पाहिले, नाना फडणीसची हुशारी पाहिली,बारभाईचे कारस्थान पाहिले,रघुनाथरावांचे धृतराष्ट्रासारखे सत्तेसाठी झुरणे पाहिले, आनंदीबाईंचा “ध चा मा“ पाहिला, रमा-माधवाची प्रिती पाहिली, माधवरावाच्या अकाली मृत्यूने तो हळहळला, पुढे गारद्यांनी मारलेल्या नारायणरावाच्या “काका मला वाचवा” अशा आरोळ्या मूकपणे ऐकल्या.कितीतरी वर्षे पौर्णिमेच्या दिवशी त्या आरोळ्या वाड्यात घुमत राहिल्याच्या शंका/कुशंका सुद्धा ऐकल्या. पहिल्या बाजीरावाचा जसा पराक्रम पाहिला तर दुस-या बाजीरावाची आगतिकता पाहिली. हे सर्व पहात-पहात
कात्रज वरुन खापरी नालीकांद्वारे ज्यात पाणी आणल्या गेले होते त्याच या भक्कम वाड्याने इंग्रजांच्या हल्ल्यात आपलीच झालेली मोठी क्षती पाहिली.पुढे लागलेल्या मोठ्या आगीत होरपळणे अनुभवले. मराठ्यांचा संपूर्ण भारतात वर्चस्व,दबदबा निर्माण होण्याचे एकेकाळचे हे केंद्रस्थान होते.परंतू या वाड्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने न पाहता संकुचित नजरेने पाहिले जाते. कित्येकांना/ फिल्मवाल्यांना पहिले बाजीराव केवळ मस्तानीपुरते तेवढे माहीत आहे. त्यांचा पराक्रम ना त्यांनी कधी ऐकला ना कधी तो जाणण्याचे कष्ट घेतले.काही वर्षांपूर्वी काही नतद्र्ष्टांनी या वाड्यावर थुंकण्याची मोहीम काढली होती. आपल्या इतिहासाची,पूर्वजांची महानता न पाहता जाती भेदांच्या बंधनात आजही अडकलेल्यांना हे सुद्धा कळत नाही की  कधीतरी आपले कुणीतरी पूर्वज सुद्धा याच मराठ्यांच्या फौजेत सहभागी असतील, कुणी सरदार तर कुणी सैनिक असतील. त्यांच्याच पराक्रमावर थुंकण्यासाठी निघण्याची मोहीम काढणे किती लाजिरवाणे आहे.महाराष्ट्राचे हेच मोठे दुर्दैव आहे.येथे अजूनही आपली दुष्टी व्यापक होत नाही किंवा राजकारणी होऊ देत नाही.राजकारणी त्यांच्या चेल्या चपाट्यांकरवी आपल्या डोक्यात काही तरी खुळ घालतो व आपणही सर्वांगीण विचार न करता त्याप्रमाणे वागू लागतो. आज कित्येकांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची काहीही माहिती नाही.त्याचप्रमाणे शनिवारवाडा , त्याचा  ईतिहास हा सुद्धा लोकांना माहीती नसेल.पेशवे वंशावळ, पेशव्यांची स्वामीनिष्ठा, त्यांचा पराक्रम हे तर चार-पाच ओळीत शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात आटोपले जाते. ज्या शनिवारवाड्याने संपूर्ण भारतात, केवळ भारतातच नव्हे तर अटकेपार पर्यंत आपल्या मराठ्यांचा दबदबा निर्माण केला होता त्याची माहिती त्याचा अभिमान आम्हा तमाम मराठ्यांना असायला नको का? तर तो असायलाच हवा. आज आपल्या काही अवशेष काही खुणांंसह शनिवारवाडा गेल्या 287 वर्षांपासून मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.त्याच्या समोरचा बाजीरावांचा तो भव्य पुतळा तरुणांना सतत कार्यरत राहण्याची, निडर, पराक्रमी राहण्याची, देशाप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा देत उभा आहे. पुरातत्व विभागाने लक्ष घालून छोटी का होईना परंतू मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या त्या सात मजली शनिवारवाड्याची एक प्रतिकृती त्या ठिकाणी उभारावी हिच खरी शाहू महाराजांना व त्यांच्या पराक्रमी सरदारांना श्रद्धांजली ठरेल.

२ टिप्पण्या:

  1. खुप छान माहिती लिहिली सर तुम्ही अभ्यासपूर्वक .....शनिवारवाडा मराठ्यांची शान आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद सर
    ब्लॉग फॉलो करावा

    उत्तर द्याहटवा