नगराची मानसिकता व संस्कृती
एखाद्या कुटुंबाची वागणूक, कुटुंबातील सदस्यांची वागणूक यांवरून ते कुटुंब कसे आहे याची कल्पना सर्वांना येत असते.
त्याचप्रमाणे एखाद्या नगराची मानसिकता,नगरातील पौरजन यांचा
स्वभाव,त्यांची मानसिकता, सभ्य-असभ्यता ,संस्कृती हे सर्व त्या नगरात घडणा-या घडामोडी , घटना , सन्मान , पुरस्कार , स्पर्धा यांवरून कळत असते. “विद्वान सर्वत्र पुज्यते” याप्रमाणे ज्या
देशात, नगरात विद्वानांचा, निस्वार्थी समाज सेवकांचा सन्मान होत असेल त्या देशाची , त्या नगराची वाटचाल नक्कीच योग्य दिशेने होत असल्याची प्रचिती येईल किंवा
येतेच. परंतू ज्या देशात,नगरात याच्या अगदी उलट होत असेल
त्या देशातील, नगरातील तरुण व बालके यांच्यावर काय परीणाम
होईल याचा विचार असे सन्मान करणा–यांनी करायला नको का ?
कोणत्याही व्यक्तीच्या सत्कृत्यांची व दुष्कृत्यांची तुलना केल्यास व त्या तुलनेत
सत्कृत्ये कमी पडत असल्यास अशा व्यक्ती निश्चितच सन्मान पात्रतेत बाद व्हाव्यात. शिवाय
सन्मान करतांना नगरातील खरे,प्रसिद्धी पराङ्विमुख,समाजसेवी,विद्वान यांच्यात मात्र एकप्रकारची
कमीपणाची,नकारात्मक भावना निर्माण होण्याची शक्यता बळावते.
शिवाय असे सन्मान ज्या व्यक्ती करतात त्या कितपत योग्यतेच्या आहे हे सुद्धा
समाजाला कळते. त्यांच्या वरचा समाजाचा विश्वास कमी होतो. प्रत्येक नगराचा जर सखोल
अभ्यास केला तर अनेक प्रकारच्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे अनेक
लोक प्रसिद्धी पासून दूर राहून समाजोपयोगी कार्ये करीत असतात,ज्यांनी स्वत:च्या घर, घरच्या जबाबदा-या यांना मागे
सारून समाजहीतास,राष्ट्रहीतास प्राधान्य दिले असते,जे निस्वार्थ असतात,अर्थसत्तेच्या प्रभावातून
त्यांनी कोणत्याही प्रकारची पदप्राप्ती केलेली नसते व त्यांना स्वत:ला मान,सन्मान यांची अपेक्षा सुद्धा नसते.स्वार्थाचा लवलेश यांच्या अंगी नसतो.अशा
लोकांना हेरून समाजाने त्यांचा सन्मान केल्यास समाजावर,
तरूणांवर, बालकांवर त्याचा हमखास सकारात्मक होईल. अशा नगरात
सत्कृत्ये करणा–यांच्या सख्येत वाढ होईल,ख-या समाजसेवकांना
अधिक जोमाने कार्य करण्याचा हुरूप येईल.सर्वच सन्मान करणा-यांनी मग ते राष्ट्रीय
असो,राज्य असो,विभाग असो,जिल्हा असो वा एखादे शहर असो याचा विचार करणे आवश्यक आहे. सांप्रत समयी
सन्मान करणा-या अनेक संस्था निर्माण झाल्या आहेत. त्या संस्थांनी, त्यातील सदस्यांनी त्यांच्या निवड समितीने सखोल साधक-बाधक चर्चा करून, सर्वांगीण विचार करून, सार्वमताने जर सच्च्या
कार्यकर्त्यांना पाठबळ दिले तर, त्यांना पुढे आणले तर ते शहर
व ते नगर व त्यातील लोक कोणत्या दिशेने मार्गक्रमण मार्गक्रमण करीत आहेत हे कळेल व
त्या नगरातील लोकांची व त्या अनुषंगाने त्या नगराची मानसिकता व संस्कृती इतरांना
कळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा