काका दी गड्डी !
दादांसाठी (माझे वडील) Pleasure घेतली तेंव्हा एक लेख लिहिला होता. तेंव्हाच मनात आले होते की सर्वांचे काका अगदी त्यांच्या मुलांचेही काका असलेल्या काकांवर सुद्धा एक लेख लिहावा. तसे त्यांच्या अँम्बेसॅडर गाडी या विषयावर एक लेख लिहिला होता. परंतू काकांवर लिहिण्याचा योग येत नव्हता. पोस्टाची नोकरी, डिंक, मोटार लाईन, जमीन जुमला, संस्था, वैद्य असलेल्या वडिलांचे नांव राहावे म्हणून आयूर्वेदिक वाघ छाप दंत मंजन असे अनेक व्यवसाय सांभाळून ज्यांनी प्रपंच नेटका केला. इतके व्याप सांभाळणा-या तसेच सर्वच आप्त स्वकीयांच्या सुख-दु:खाची सतत जाणीव ठेवणा-या काकांचे जीवनात “इस इस्टोरी मी लव्ह है, ड्रामा है, ट्रॅजेडी है” याप्रमाणे अनेक घटना आहे. अशा अष्टपैलू “काका” उपाख्य रावसाहेब म्हणजेच सुरेश दत्तात्रय वरणगावकर या विषयास A4 साईजचा कागद कसा पुरसा कसा ठरेल? म्हणून मग “काका डी गड्डी” हाच विषय ठरवला. काकांनी त्यांची अँम्बेसॅडर गाडी दुरुस्त केली. तसे दुरुस्त होऊन बरेच दिवस झाले परंतू आज अवकाश मिळाला मग उचलली लेखणी आणि चालवली कागदावर “नॉन स्टॉप” जशी टापोटाप रस्त्यावर अँम्बेसॅडर चालते राजेशाही थाटात. मला अजूनही तो दिवस आठवतो. काका सहकुटुंब आमच्या घरी पेढे घेवून आले होते. कशाचे पेढे विचारल्यावर बाहेर उभी असलेली अँम्बेसॅडर दाखवली. लहानपणापासून त्यांना खाकी पँट आणि पांढरा शर्ट याच एका पोशाखात पाहिले होते या वैशिष्ट्यासह आता अजून एक वैशिष्ट्य जोडल्या गेले ते म्हणजे अँम्बेसॅडरचे. कुठेही जाणे असले मग ते जगन्नाथपुरी, रतलाम, व्दारका असो किंवा मुंबई, अष्टविनायक यात्रा असो किंवा जवळपासचे एखादे खेडे असो काकांची अँम्बेसॅडर ‘फिक्स’. काकांच्या अशा वैशिष्ट्यांसारखी पूर्वी अनेक व्यक्तींची अशी काही वैशिष्ट्ये असत त्यांच्या त्या वैशिष्ट्यामुळे ती व्यक्ती ओळखली जात असे. कुणी वेत बाळगत,कुणी उंच टोपी घालीत कुणी धोतराचा एक टोक हातात पकडून चालत असे तर कुणी मुठीत विडी पकडून विडी ओढत असे.अशा नाना लोकांच्या लकबी असत, नाना त-हा असत.काकांचे वैशिष्ट्य म्हणजे खाकी पँट आणि पांढरा शर्ट आणि अँम्बेसॅडर कार.सध्याची जी अँम्बेसॅडर आहे ती काकांची तशी दुसरी अँम्बेसॅडर, 7859. पूर्वी बलदेव सारथी होता आणि आता गावंडे. काळाच्या ओघात 7859 वृद्धत्वाकडे झुकली परंतू ती सुरु Condition मध्ये काकांनी ठेवली होती. भाजीत भाजी जशी नेहमी मेथीची असते तसेच गाडीत गाडी म्हणजे अँम्बेसॅडर असा खाकी पँटवाल्या काकांचा खाक्या. परिवार आणि मित्र मंडळीनी अनेकदा नवीन गाडी घेण्याचे सुचवले परंतू कुणाचे ऐकतील आणि तसे करतील हा काकांचा स्वभाव नव्हे.“ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे” याप्रमाणे. काकांनी पैसा खर्च केला आणि त्यांची गाडी सजवली.तीला नवी कोरी बनवून सर्वांसमोर पेश केले. अँम्बेसॅडरची वैशिष्ट्ये सुद्धा अनेक, सर्वाना घेऊन जाणारी, मजबूत अशी ही राजा गाडी खरेच तिच्या प्रमाणेच अनेक वैशिष्ट्ये असणा-या काकांसारख्या राजा माणसाला, कित्येकांना पोटापाण्याला लावणा-या, तरूण वयात पत्नीची कठीण Open Heart शस्त्रक्रिया करवून आणणा-या, या ही वयात तरुणांना लाजवेल या उत्साहात आनंद मठ, शाळा, इतर खाते वह्यांची कार्ये, कोर्टाची कामे करणा-या, अनेकांची काळजी मनात बाळगणा-या, गरीबांना मदतीचा हात देणा-या, निव्वळ पैस्यासाठी संस्था उभी करणा-यांच्या काळात स्वत:चे घर सोडून शाळा उभारणा-या काकांना ज्या प्रमाणे अँम्बेसॅडर कधी घाटात खचत नाही त्यापमाणे स्वत:चे मनोबल खचू न देणा-या खंबीर माणसाला शोभणारी आहे. ज्याप्रमाणे ट्रकवर “पापा दी गड्डी” असे लिहिले असते तसे कोणत्याही अँम्बेसॅडरला पहिले की वाटते की ये तो हमारे काका दी गड्डी है !................हमारे काका दी गड्डी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा