Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०२/२०१९

Article written in year 2016 about Respected Ex-Headmistress Wanmala Ane madam of A.K..National Highschool Khamgaon


ति.स्व अणें मॅडम,
                   शि.सा.न.
केवळ मॅडम न लिहिता अणें मॅडम लिहिले, कारण तुम्ही त्याच नावाने जास्त लोकप्रिय. सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे पुनश्च आपल्या संपर्कात येण्याचे भाग्य लाभले.आम्हा सर्वाना खूप अभिमान आहे की तुमच्या सारख्या मुख्याध्यापिका असताना आम्ही अ.खि, नॅशनल हायस्कूल चे विद्यार्थी होतो. शिस्त काय असते,मुख्याध्यापकाचा दरारा कसा असतो,आदरयुक्त भीती कशी असते,प्रसंगी कठोर आणि प्रसंगी मृदू कसे व्हावे,हे सर्व आम्हाला तुमच्या कारकिर्दीत समजले. संस्कार हे वरिष्ठांच्या वागणुकीतून आपसूकच होत असतात. तसे तुमच्यामुळे आम्हा अनेक विद्यार्थ्यांमध्ये झाले.आताच्या अनुदानित शाळांमधून मात्र हे सर्व हद्दपारच झालं मॅडम ! मी १९८४ मध्ये आपण मुख्याध्यापिका असतांना शाळेत प्रवेश घेतला होता.वर्ग ५ वा ई मराठी माध्यम. शाळा सुरु होऊन काही दिवस होत नाही तो तुमच्या कार्यालयात जाण्याचा योग आलाच.योग चांगल्या कारणाने आला नव्हता त्यामुळे मनात भीती होती.एका मुलाला मी व आनंद चितलांगे याने मारले होते म्हणून आम्हाला आपल्या कार्यालायात नेण्यात आले.लहान वय असल्याने वरीष्ठांसमोर कसे उभे राहावे ते पण कळत नव्हते,मी आपला दोन्ही हात कमरेवर ठेवून आपल्याशी बोलत होतो.तुम्ही दरडावून सरळ उभे राहण्यास सांगितले,आम्हाला चांगली ‘समज’ दिली.तुमच्या धाकाने पुन्हा आम्ही तसे कृत्य करण्यास धजावलो नाही.वर्ग सहावीत मी मॉनीटर झाल्यावर सर्व वर्गांच्या मॉनीटर सभेत तुम्ही आम्हाला उद्बोधन केले.तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती,तुम्ही म्हणाल्या “आपल्याला सतवंतसिंग, बेअंतसिंग बनायचे नाही आहे चांगल्या वागणुकीने नाव कमवायचे आहे.” तुमचा तो संदेश अजूनही स्मरणात आहे मॅडम.त्यानंतर चंद्रिका केनिया शाळेत आल्या होत्या तेंव्हा तो कार्यक्रम तुम्ही किती शिस्तीत पार पाडला होता.आम्ही वर्ग दहावीत असताना एके दिवशी तुमच्या लक्षात नव्हते की तो ‘सिव्हील ड्रेस” चा दिवस आहे तुम्ही एकेका मुलाला घरी पाठवण्यास सुरुवात केली परंतू एकाची सुद्धा सांगण्याचे हिम्मत झाली नव्हती.नंतर कुणी तरी तुम्हाला आठवण करून दिली तेंव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेमाने परत बोलावले.असे कितीतरी किस्से अनेक विद्यार्थ्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत आहेत.
                 संस्थाचालक,सहकारी शिक्षकवृंद,विद्यार्थी सर्वाना तुमची आदरयुक्त भीती असायची.अ.खि, नॅशनल हायस्कूल म्हणजे पालक डोळे झाकून त्यांच्या पाल्यांना प्रवेशीत करायचे.आता खंत आहे की फार कमी शाळांत अणें मॅडम,तत्कालीन न्यू ईरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शंकरराव तायडे सर यांसारखे मुख्याध्यापक राहिले आहेत.”विद्यार्थी ना शिक्षा करू नका” अशा फतव्यामुळे ते ‘सैराट’ झाले आहेत.निरनिराळ्या शैक्षणिक नसलेल्या कामकाजात शिक्षक,मुख्याध्यापक व्यस्त झाले आहेत.असो ! 
                आम्हाला मात्र तुमच्यासह तुमचे सहकारी शिक्षक श्री काळे सर, श्री संगारे सर , श्री पुणतांबेकर सर , लिखिते मॅडम, एम आर देशमुख सर , शर्मा सर, गळगटे सर  व इतरही अनेक असे शिक्षक श्री नागडा, श्री कोरडे यांसारखे कार्यालयीन कर्मचारी लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तुम्ही सर्व आजही आम्हा विद्यार्थ्यांच्या स्मरणात आहात. आम्ही आमच्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना तुमच्या बाबत सांगत असतो.याप्रसंगी संत कबीराचा दोहा आठवतो
सब धरती कागज करू , लेखनी सब वनराय
सात समुद्र की मसी करू , गुरु गुण लिखा ना जाय
त्यामुळे येथे पत्रास विराम देतो. काही चुकले असल्यास क्षमस्व.
तुम्हास सुख समृद्धी, आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 
तुमचा विद्यार्थी 
विनय विजय वरणगांवकर,खामगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा